Login

शुभविवाह भाग १

गोष्ट एका लग्नाची
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025

शुभविवाह भाग १

“जय, तू आपल्याबद्दल तुझ्या घरी केव्हा सांगणार आहेस?” अंकिताची चिडचिड सुरू होती.

“तू चिडचिड का करते आहेस? या विषयावर आपण शांतपणे बोलू शकतो.” जयचा चढता स्वर लागला होता.

“चिडू नको तर काय करू? आई सतत लग्नासाठी मुलं बघूयात म्हणून मागे लागली आहे. नातेवाईक स्थळ दाखवत आहेत. मी किती दिवस लग्नाच्या विषयाची टाळाटाळ करू.

इकडे तू तुझ्या घरी काही सांगत नाहीये. मला अस वाटतंय की तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. तुला माझ्याशी लग्नच करायचं नाहीये.” अंकिताच्या डोळ्यात पाणी आले होते.

अंकिताच्या डोळ्यातील पाणी बघून जय तिच्याजवळ आला, तिचे हात आपल्या हातात घेतले. तिच्यासमोर तो खाली गुडघ्यावर बसला.

“ये राणी, अशी रडू नकोस ग. तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी मला आवडत नाही.” जयने खिशातून रुमाल काढून अंकिताचे डोळे पुसले.

“जय, प्लिज आपल्याबद्दल घरी बोल ना.” अंकिताचा आवाज अजूनही भरलेला होता.

“अंकिता, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मलाही तुझ्याशी लग्न करण्याची घाई आहे, पण घरी थोडा प्रॉब्लेम सुरू आहे, म्हणून मी दोन वेळेस घरी गेलो तेव्हा लग्नाचा विषय काढू शकलो नाही.

आई, बाबा खूप टेन्शन मध्ये होते. एकतर बाबांना आधीच एक हार्ट अटॅक येऊन गेला आहे, एकाचवेळी त्यांना जास्त ताण देणे मला योग्य वाटत नाही.

आता यावेळी परिस्थिती काही असली तरी दोन दिवस जास्त थांबून का होईना, आपल्याबद्दल बोलून येईल. माझ्यावर विश्वास ठेव.” जयने अंकिताचा हात हातात घेतला.

“तू अचानक घरी का चालला आहेस?” अंकिताला प्रश्न पडला.

“बाबांच्या एका जवळच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे. बाबांची इच्छा आहे की, मी त्या लग्नाला उपस्थित रहावं. खरंतर लग्नाला जाण्याची माझी इच्छा नाहीये, पण बाबांसाठी जावं लागेल.” जयने उत्तर दिले.

“जय, आईपेक्षा तू बाबांच्या जास्त जवळचा आहेस ना.” अंकिता.

“लहान असताना आईसोबत मी जास्त बोलायचो. बाबा थोड्या कडक स्वभावाचे असल्याने मला त्यांची भीती वाटायची. बाबांशी मी खूप कमी बोलायचो, पण जेव्हा बाबांना हार्ट अटॅक आला, तेव्हा ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते, त्यावेळी बाबांचं माझ्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे मला जाणवलं. ते जर माझ्या आयुष्यात नसतील तर काय होईल याची प्रचिती आली.

बाबा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, त्यांच्यासोबत मी हॉस्पिटलमध्ये असायचो, त्यावेळी आमच्यात खूप गप्पा झाल्या. बाबांचा खरा स्वभाव कसा आहे हे तेव्हा मला समजलं.

बाबा कुठेही असले तरी आमचा दररोज फोन होत असतोच. बाबांशी बोललं नाही तर मला करमत नाही. बाबा त्यांच्या आयुष्यात जे सुरू आहे ते मला सगळं काही सांगत असतात.” जय.

“तुला काय वाटतंय, तुझे बाबा आपल्या लग्नाला होकार देतील का?” अंकिता अंदाज घेत होती.

“सुरुवातीला प्रेमविवाह म्हणून बाबा तयार होणार नाहीत, पण मी त्यांना आपली बाजू समजावून सांगेल. ते माझ्यासाठी नक्कीच होकार देतील. तू काळजी करू नकोस.” जय अस बोलल्यावर अंकिताने त्याला मिठी मारली.

“जय, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. आय लव्ह यू सो मच.”

“आय लव्ह यू टू बेबी. आता मला सोड. मी लवकर घरी जातो आणि गुड न्यूज घेऊन येतो बघ.” अंकिताने जयला आपल्या मिठीतून सोडलं. जयने बॅग हातात घेतली व तो दरवाजाच्या दिशेने चालला होता. अंकिताने त्याला आवाज दिला.

“जय, तू दरवेळी गावी जातोस, तेव्हा मला एकदम नॉर्मल वाटत असत, पण यावेळी मन अस्वस्थ होत आहे. तू जाऊ नये असच वाटतय. काहीतरी हातातून सुटत आहे, अस वाटत आहे.”

जय हातातील बॅग दरवाजा जवळ ठेवून अंकिता जवळ आला.

“तू भलते सलते विचार मनात आणू नकोस. हातातून काही निसटणार नाहीये. माझा हात कायम तुझ्याच हातात असणार आहे. मी असा जातो आणि असा येतो बघ.” जयने अंकिताला मिठी मारून आश्वस्थ केलं.

जय बॅग घेऊन दरवाजा बाहेर गेला व तो मागे वळून बघून मनातल्या मनात म्हणाला,

‘अंकिता, आज मलाही वेगळंच काहीतरी वाटत आहे. तुला मारलेली ही मिठी शेवटची तर नसेल ना अस वाटत आहे. होप सो सगळं काही ठीक होईल.’

जय गाडीत बसला व गावाच्या दिशेने रवाना झाला.

जय त्याच्या बाबांसोबत अंकिताबद्दल बोलू शकेल का? त्याचे बाबा लग्नाला होकार देतील का? की जय समोर वेगळंच काहीतरी वाढलेलं असेल का? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all