Login

शुभविवाह भाग २१

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग २१

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026

मागील भागाचा सारांश: जय गौरीला घेऊन फ्लॅटवर गेला. फ्लॅट बघून लागणाऱ्या सामानाची यादी दोघांनी मिळून केली. फर्निचरच्या दुकानात जाऊन फर्निचर व भांड्याच्या दुकानात जाऊन भांडी घेतली. घरी सगळं सामान सेट केल्यावर दोघेजण जेवायला हॉटेलमध्ये गेले, तिकडे जयचा मित्र सागर त्यांना भेटला, त्याने अंकिताचा विषय काढल्याने जय अवघडल्यासारखा झाला होता.

आता बघूया पुढे….

अंकिताचा विषय काढून सागर निघून गेला, पण जयला गौरीसोबत काय बोलावे हे सुचत नव्हते. गौरीला त्याची परिस्थिती समजली, ती पुढे म्हणाली,

“जय, हे अस होणारच आहे. अंकिताच नाव तुमच्या मित्राने घेतल्याने मला काहीच वाटलं नाही. आता माझ्याही मैत्रिणींना माझ्या नवऱ्याचं नाव आशिष माहीत आहे. आता आपण सगळ्यांना पूर्ण कथा तर लगेच सांगू शकणार नाही.

तुमच्या मित्राच्या नावाने ती अंकिता होती हे तर मला कळल. आपल्याला एकमेकांबद्दल सगळं ठाऊक आहे हेही थोडं नाही. आयुष्यभर एकमेकांसोबत असेच प्रामाणिक राहुयात.”

“मला वाटलं तुला तिचं नाव ऐकून राग आला असेल. तुझं म्हणणं बरोबर आहे, आता आपण सगळ्यांना सगळंच सांगू शकत नाही. तू हे सगळं समजून घेत आहेच तेच माझ्यासाठी खूप होत. मला आधी वाटलं होतं की, माझ्या आयुष्यात कोणीतरी होत हे ऐकून तुला वाईट वाटेल, पण बर झालं तू हे स्विकारलं.” जय.

“माझ्याशी अचानक झालेल लग्न तुम्ही स्विकारलं तर मी हे स्विकारुच शकते ना.” गौरी.

जेवण झाल्यावर जय व गौरी किराणा घेण्यासाठी सुपरमार्केटला गेले. तेथून पुढे भाजी मार्केटला ते गेले.

“तू भाजी घेऊन ये. मी इथे गाडीजवळ थांबतो. इथे पार्किंगचा इश्यू आहे असं मला वाटतय.” जयने आजूबाजूला बघितले.

“मला तुमच्या आवडीनिवडी माहीत नाहीयेत. मी भाज्या कोणत्या आणू हे मला कसे कळेल.” गौरी.

“सगळ्या भाज्या खायच्या हा देशमुखांच्या घरचा नियम आहे.” जय हसून म्हणाला.

जयने गौरीला पैसे दिले. गौरी भाजी आणण्यासाठी पिशवी घेऊन गेली. गौरी भाज्या खरेदी करत होती, तोच तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला म्हणून तिने आश्चर्याने मागे वळून बघितले.

“हाय गौरी, ओळखलस का?”

“सायली मॅम, मी तुम्हाला कशी विसरेल.” गौरीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली होती.

सायलीने गौरीला मिठी मारली.

“मॅम, आपण थोडं बाजूला जाऊन उभ्या राहू. इथे गर्दी नको.” गौरी अस बोलल्यावर दोघीजणी थोड्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या.

“गौरी, तुझं लग्न कॅन्सल झाल्याचं मला कोणीतरी कालच बोललं आणि तुझ्या गळ्यात मंगळसूत्र?” सायलीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.

“ज्याच्यासोबत माझं लग्न होणार होत, त्याने एक दिवस आधी आत्महत्या केली. माझं लग्न आता दुसऱ्या सोबत झालं आहे. माझं लग्न झालं हे महत्त्वाच आहे, बाकी काहीच नाही.” गौरी.

“ओह! तो विषय सोड. तू ह्याच एरियात राहतेस का?” सायलीने विचारले.

“मला एरिया बद्दल काहीच माहीत नाही. मी कालच इथे आले आहे. काल आम्ही हॉटेलवर राहिलो होतो. आज फ्लॅट घेतलाय. ही सगळी तीच तयारी सुरू आहे. माझे मिस्टर मला जिकडे घेऊन जात आहेत तिकडे मी जात आहे. एरिया वगैरे काहीच माहीत नाही.” गौरीने सांगितले.

“ओके. तुझे मिस्टर कुठे आहेत?” सायलीचा पुढील प्रश्न.

“ ते गाडीत बसलेत. इकडे पार्किंगचा इश्यू आहे तर…” गौरीचे उत्तर.

“भाज्या घेऊन झाल्या का?” सायली.

“हो.” गौरी.

“चल मग तुझ्या मिस्टरांची आणि माझी ओळख करून दे. मी त्यांना तुमचा पत्ता विचारते.” सायली.

गौरी व सायली दोघीजणी जयच्या दिशेने गेल्या. जय गाडीला टेकून उभा होता. गौरी सोबत कोणीतरी लेडीज येत आहे हे बघून जय जरा गोंधळला होता.

जयसमोर जाऊन उभे राहिल्यावर गौरी म्हणाली,

“ह्या सायली मॅम माझ्या सिनिअर. मला इकडे भाजी घेताना भेटल्या. सायली मॅम, हे जय देशमुख माझे मिस्टर.”

जयने सायलीकडे बघून स्माईल दिली.

“तुम्ही राहता कुठे?” सायलीने विचारले.

“थेरगाव.” जयने उत्तर दिले.

“मी तापकीर चौकात राहते.” सायली.

“तुम्ही कुठे जॉब करता का?” जयने विचारले.

“हो. संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.” सायली.

“गौरीला तिकडे जॉब मिळेल का? किंवा तुमच्या ओळखीचं दुसरं हॉस्पिटल असेल तरी चालेल.” जय.

“गौरी, हे तू विचारायला हवं होतं. सगळं नवराच बघणार आहे का? जोक्स अ पार्ट. दोन दिवसांपूर्वी माझी एक कलीग जॉब सोडून गेली आहे. मी सरांना विचारते आणि तुला कळवते. तुझा फोन नंबर दे.” सायलीने गौरीसोबत फोन नंबर एक्स्चेंज केला.

“मॅम, आम्ही निघतो आता. घरी जाऊन बरंच आवरायचं आहे.” गौरी.

“हो, चालेल. मी तुला उद्या कळवते. तुझा रिझ्युम तयार असेल तर मला पाठवून ठेव.” सायली.

“हो, घरी गेले की पाठवते.” गौरी.

गौरी व जयने सायलीचा निरोप घेतला.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.