Login

शुभविवाह भाग २२

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग २२
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: सागर अंकिताबद्दल बोलल्याने गौरीला वाईट वाटले नाही हे तिने स्पष्टपणे सांगितले. भाजी मार्केट मध्ये गौरीला तिची सिनिअर सायली भेटली. जय व सायलीची ओळख गौरीने करून दिली. सायली ज्या हॉस्पिटल मध्ये जॉब करत होती तिथे व्हॅकन्सी असल्याने गौरीला तिकडे जॉब मिळण्याची शक्यता होती.

आता बघूया पुढे….

गौरी व जय घराच्या दिशेने निघाले होते.

“सायली मॅमला जॉबच विचारायचं तुम्हाला बरं सुचलं. मला तर सुचलच नव्हतं.” गौरी म्हणाली.

“मी गाडीत बसलेलो असताना तुझ्या जॉबचा विचार करत होतो. तुला दिवसभर घरी एकटीला बोअर होईल, म्हणून मी विचार करत होतो. तोच तू सायली मॅम सोबत आली.” जय.

“जय, आपण गॅस शेगडी घेतली. किराणा घेतला, भाजीपाला घेतला, पण गॅस सिलेंडरच काय?” गौरीला अचानक आठवलं.

“मी ऑनलाईन गॅस कनेक्शनसाठी ऍप्लिकेशन केलं आहे. परवा आपल्याला सिलेंडर मिळून जाईल. माझा एक मित्र जवळच राहतो, त्याच्याकडे एक्स्ट्रा सिलेंडर आहे, त्याने ते आपल्या फ्लॅटच्या बाहेर आणून ठेवले आहे.” जयने सांगितले.

“जय, तुम्हाला हे सगळं कसं सुचतं? मला एकेक गोष्टी आत्ता आठवत आहेत.” गौरीला जयचे कौतुक वाटत होते.

“तुझ्या कौतुकाचा मी हक्कदार नाहीये. आई व आसावरी वहिनी दोघींनी मिळून मला घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंची यादी व्हाट्सएपवर पाठवली आहे.” जय.

“ओह! तरी म्हटलं तुम्हाला या सगळ्याचा अनुभव कसा काय?” गौरी हसत म्हणाली.

जय व गौरी घराजवळ पोहोचले होते. गाडीतील सगळं सामान घेऊन ते घरात गेले. जयने सिलेंडर जोडले.

“गौरी, बाकी सगळं राहूदेत. सुपर मार्केट मधून मी दूध घेतलं होतं, ते तापव आणि आपल्याला मस्त चहा बनव. थकवा तरी दूर होईल. मी कपडे बदलतो आणि माझ्या बॅगमधील कपडे कपाटात सेट करतो.”

गौरीने दुधासाठी व चहासाठी लागणारी भांडी आधी धुवून घेतली. साखर व चहा पावडर डब्यात भरली. दूध गरम झाल्यावर तिने चहा गॅसवर ठेवला. चहा उकळेपर्यंत तिने बाकीच सामान भरलं.

चहा झाल्यावर तिने जयला आवाज दिला. दोघेजण चहा पिण्यासाठी हॉलमध्ये बसले.

“आपल्याला एक टीव्ही घ्यावा लागेल.” जय चहा पिताना म्हणाला.

“जय, मला जॉब लागल्यावर आपण दोघेही दिवसभर घरी नसू. टीव्ही बघायला वेळ कधी मिळेल? लगेच टीव्ही घ्यायची काही गरज नाहीये. आताच खूप खर्च झाला आहे.” गौरी.

“मला टीव्ही बघायला आवडतो, पण तू म्हणते तेही खोटं नाहीये. काही दिवसांनी टीव्ही घेण्याचा विचार करू.” जय.

“तुम्ही ऑफिसला जाताना डबा घेऊन जातात का?” गौरीने विचारले.

“मला ऑफिसमध्ये जेवण असत. सकाळी मी नाश्ता करून जात जाईल. मी सहा वाजता उठून जीमला जातो. आठ वाजेपर्यंत जीम मधून परत येतो. अंघोळ, चहा व नाश्ता करून मी दहा वाजता ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघतो. माझं ऑफिस ११ ला असतं. संध्याकाळी ५ पर्यंत ऑफिस असतं. कधी काम असलं तर घरी यायला उशीर होतो, तसं मी मॅसेज करेल.” जयने त्याच पूर्ण शेड्युल सांगितलं.

“रात्रीच जेवण साग्रसंगीत लागतं की फक्त भाजीपोळी चालते?” गौरीचा पुढील प्रश्न.

“तुला जस जमेल तसं बनव. मला काही खावंसं वाटलं तर तसं मी सांगेल.” जयचे उत्तर.

“ओके. आज रात्री काय बनवू?” गौरी.

“काहीच नको. मी बाहेरून ऑर्डर करतो. आज तुही बरीच दमली आहेस. शिवाय अजून बराच पसारा आवरायचा आहे. उद्या सकाळपासून तुझं किचन सुरूच होणार आहे.

गौरी, जे बोलावं वाटल ते मोकळेपणाने बोलत जा. मनात काहीच ठेवण्याची गरज नाही. पैसे लागत असतील तर बिनधास्तपणे मागत जा. स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला तर सरळ सांगत जा. तुझी ड्युटी सुरू झाल्यावर आपण एखादी बाई पण कामाला ठेवू शकतो. आताही लगेच तुला जर गरज वाटत असेल तर बाई भांडी व फरशीसाठी ठेवू शकतो.

मी कामामध्ये बिजी असल्यावर कधी कधी चिडचिड करत जाईल तेवढं ऍडजस्ट करून घे. माझं काही पटलं नाही तर तोंडावर सांगायचं. माझ्याबद्दल मनात भीती बाळगू नकोस. मी कधीतरी चिडतो, रागावतो सुद्धा. कधी कधी काहीच बोलत नाही. तुला हळूहळू माझ्या स्वभावाचा अंदाज येईलच.” जय.

“मला कम्फर्टेबल करण्यासाठी तुम्ही किती काळजी घेतात. मी जॉब करायचे त्यामुळे माझ्याकडे पैसे आहेत, सो ती काळजी करण्याची गरज नाही. तुम्हीही मला हक्काने सगळं सांगू शकता. सध्या कामाला बाई ठेवण्याची गरज नाहीये. हॉस्पिटलला जायला लागल्यावर बघू.” गौरी.

“तू सायली मॅमला तुझा रिझ्युम पाठवला का?” जयने विचारले.

“आता पाठवते.” गौरी.

रात्रीपर्यंत गौरीने किचन मधील पसारा बऱ्यापैकी आवरला होता. जयने जेवण बाहेरून मागवलं होत. गप्पा मारता मारता त्या दोघांनी जेवण केलं. जयने गौरीला कम्फर्टेबल केल्याने गौरीही बऱ्यापैकी मोकळेपणाने बोलत होती.

“गौरी, मी हॉलमध्ये झोपतो. तू बेडरूममध्ये झोप. मला जाम झोप आली आहे. गेले चार ते पाच दिवस खूप धावपळीचे गेले.” जयने सांगितले.

गौरीने होकारार्थी मान हलवली.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.