शुभविवाह भाग २३
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जयने गौरीला त्याच शेड्युल सांगितलं. आपल्या स्वभावाबद्दल कल्पना दिली. तसेच तिला मोकळेपणाने बोलण्यास सांगितले.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जयने गौरीला त्याच शेड्युल सांगितलं. आपल्या स्वभावाबद्दल कल्पना दिली. तसेच तिला मोकळेपणाने बोलण्यास सांगितले.
आता बघूया पुढे…..
जागा बदलली असल्याने गौरीला रात्री उशिरा झोप लागली. दुसऱ्या दिवशी साडेसातला तिला जाग आली. ती घाईघाईने उठली. जय जीम वरून परत येईपर्यंत तिला स्वतःच आवरून ठेवायचं होत.
अंघोळ करून गौरी किचनमध्ये गेली. सकाळी उठल्या बरोबर गौरीला चहा पिण्याची सवय होती. चहा गॅसवर उकळत असताना गौरीच्या डोक्यात विचार सुरू होते,
‘दररोज सकाळचा चहा बाबा व मी एकत्र घेत होतो. आता बाबांना चहा पिताना माझी आठवण येत असेल ना. बिचारे किती एकटे पडले असतील. बाबांना फोन करू का?’
गौरीचे विचारचक्र सुरू असतानाच तिचा फोन वाजला, बघते तर काय बाबांचा फोन होता. गौरीने आनंदीत होऊन फोन उचलला.
“हॅलो बाबा, तुम्हाला १०० वर्षे आयुष्य आहे. मी आता तुम्हालाच फोन करायचा विचार करत होते.”
“चहा पिताना आमची आठवण झाली असेल. माझंही तसंच झालं. गौरी, खूप एकट वाटतय ग. तू घरात असल्याने कधी तुझ्या आईची आठवण आली नाही, पण आता अस वाटतय की ती असायला पाहिजे होती म्हणजे आम्हाला असा हा एकटेपणा जाणवला नसता.” बाबांच्या तोंडून हे अस बोलणं ऐकून गौरीचे डोळे पाणावले.
उकळलेला चहा कपात गाळून कप घेऊन ती सोप्यावर जाऊन बसली.
“बाबा, मी तर म्हणत होते की, मला लग्न करायचं नाहीये. मी आयुष्यभर तुमच्यासोबत रहायला तयार होते, पण तुम्हीच माझं ऐकलं नाही.”
“गौरी बाळा, जगारहाटीप्रमाणे चालावं लागतंय. ते जाऊदेत. तुझं काय सुरू आहे. सगळं सामान लावलस का? आमचे जावईबापू काय म्हणत आहेत?” मोहनराव.
“थोडंफार सामान लावायच बाकी आहे, आज सगळ होऊन जाईल. जय जीमला गेलेत. चहा पिऊन झाला की त्यांच्यासाठी नाष्टाच बनवायचा आहे.” गौरी.
“बरं, तुझं काम चालूदेत. मलापण जरा बाहेर जायचं होतं, म्हणून म्हटलं सकाळी सकाळी फोन करावा.” मोहनराव.
“बाबा, तब्येतीची काळजी घ्या. जेवण वेळेवर करत जा. नाहीतर बाहेर गेले की जेवण करायची तुम्हाला आठवण राहत नाही.” गौरी.
“आता माझी काळजी करणं सोड. जय रावांची काळजी घे. मी ठेवतो फोन.” मोहनरावांनी फोन कट केला.
गौरी चहा पीत असतानाच जय त्याच्याकडील चावीने दरवाजा उघडून आत आला.
“गुडमॉर्निंग गौरी.” जय म्हणाला.
“गुडमॉर्निंग.” गौरी.
“हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी.” जय गौरीजवळ येऊन म्हणाला.
“बाबांचा फोन आला होता ना म्हणून.” गौरी.
“तू बाबांना भेटायला केव्हाही जाऊ शकते आणि त्यांना भेटायलाही बोलवू शकतेस. त्यांना इकडे करमणार नाही, पण एका दिवसासाठी तरी बोलावं.” जय.
“बाबा येतील तेव्हा खरे. मी नाश्ता बनवते. तुम्ही तुमच आवरून या.” गौरी किचनमध्ये गेली.
जय बेडरूममध्ये गेला. गौरीने नाश्त्याला आलूपोहे केले होते. जय रेडी होऊन आल्यावर गौरीने त्याच्या समोर पोह्यांची प्लेट व चहाचा कप ठेवला. पोह्यांचा एक घास जयने खाल्ला.
“अप्रतिम! तू एवढं छान जेवण बनवायला कोणाकडून शिकलीस? इतके टेस्टी पोहे आजवर मी
खाल्ले नव्हते.” जयच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
खाल्ले नव्हते.” जयच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
“आमच्याकडे स्वयंपाक करायला एक मावशी होत्या. त्यांच्याकडे बघून बघून शिकले. बाबा म्हणतात की, माझ्या हातात आईची चव उतरली आहे. आई पण असाच स्वयंपाक बनवायची.” गौरी.
“आजच्या रात्रीच्या जेवणाचे वेध मला आत्तापासूनच लागले आहेत. माझं वजन वाढेल अस वाटतय.” जय हसून म्हणाला.
जयने आवडीने पोहे खाल्ले. नाश्ता करून झाल्यावर जय ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. गौरीने जयसोबतच नाश्ता केला होता.
आता राहिलेला पसारा तिने आवरला. दुपारी एकटीसाठी जेवणात काय करायच हा प्रश्न तिला पडला होता. तिने मॅगी बनवायची ठरवली. भूक लागेल तेव्हा मॅगी बनवू अस तिने ठरवलं.
मोबाईलवर वेबसेरीज बघत तिने भाज्या निवडल्या, लसूण सोलून ठेवला. सगळं काम झाल्यावर मग तिने मसाला मॅगी करून खाल्ली. काम करून थकल्याने ती जरावेळ झोपली. झोपेतून उठल्यावर स्वयंपाकाची तयारी तिने सुरू केली.
वरणभात, भेंडींची भाजी, पोळी आणि शिरा असा मेन्यू तिने ठरवला होता. संध्याकाळी जय ऑफिसमधून घरी आला. त्याला तिने चहा बनवून दिला. जय थोड्यावेळ आराम करण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेला.
स्वयंपाक झाल्यावर गौरीने जयला आवाज दिला. जेवण करताना प्रत्येक घासाला जय गौरीचं कौतुक करत होता.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
