Login

शुभविवाह भाग २४

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग २४
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: मोहनरावांना गौरीची आठवण आल्याने त्यांनी तिला फोन केला. त्यांचे बोलणे ऐकून गौरीचे डोळे पाणावले होते. गौरीच्या हातचा स्वयंपाक जयला खूप आवडला होता.

आता बघूया पुढे….

जेवण झाल्यावर गौरी व जय हॉलमध्ये सोप्यावर बसले होते. जय मोबाईलवर काहीतरी करत होता.

“घरून फोन आला होता का?” गौरीने विचारले.

“गौरी, मी काही मेल चेक करत आहे. मला फक्त 5 मिनिटे दे.” जय मोबाईल मध्ये बघूनच म्हणाला.

मग गौरी पण तिचा मोबाईल हातात घेऊन बसली. नेट चालू करून मॅसेज चेक करत होती. तेवढ्यात तिला सायलीचा मॅसेज आला,

“हाय गौरी, आज मी हॉस्पिटलमध्ये तुझा रिझ्युम सरांना दाखवला. त्यांनी तुला उद्या सकाळी 11 वाजता बोलावलं आहे. हॉस्पिटलला आल्यावर मला कॉल कर. मी तुला हॉस्पिटलचा पत्ता पाठवते. वेळेत येशील. आमचे सर वेळेच्या बाबतीत खूप शिस्तीचे आहेत.” मॅसेज करून सायली ऑफलाईन गेली होती.

“ओके मॅम, मी हॉस्पिटलला आल्यावर तुम्हाला कॉल करते.” गौरीने रिप्लाय केला.

तोपर्यंत जयचे मेल चेक करून झाले होते.

“हं गौरी, तू घरच्यांच्या फोनबद्दल बोलत होतीस ना?” जयने मोबाईल बाजूला ठेवला होता.

गौरीनेही मोबाईल बाजूला ठेवला.

“हो. तुम्हाला दररोज घरून फोन येत असेलच ना, म्हणून विचारलं.” गौरी.

“गौरी, मी 11वी पासून घराबाहेर राहतो. पहिले माझं व बाबांचं इतकं पटायच नाही. तेव्हा आई आठवड्यातून एकदा फोन करायची. अनिकेत व शंतनू दादा काही काम असेल तर फोन करतात किंवा मॅसेज करतात.

कोणाचा फोन आला नाहीच तर मी 4 ते 5 दिवसांतून एकदा फोन करून चौकशी करतो. बाबांचं ऑपरेशन झाल्यावर आमच्या दोघांमधील नातं बदललं, मग आमच्यात दररोज फोन होऊ लागले होते.

आता बाबा मला फोन करणार नाही, कारण माझ्या लग्नाचा निर्णय त्यांनी परस्पर घेतल्याचे मला आवडले नाही, हे मी त्यांना तोंडावर सांगितले आहे. गौरी, आम्ही सगळे एकत्र राहत जरी असलो, तरी प्रत्येकाच वेगळं विश्व आहे.

आईचा जेव्हा फोन येतो, तेव्हा सगळ्यांची ख्याली खुशाली कळूनच जाते. साधना आत्त्या मॅसेज करून चौकशी करत असते.” जयने सगळं स्पष्टपणे सांगितले.

“मला वाटलं होतं की, आई मला फोन करून चौकशी करतील, पण त्यांचा फोन आला नाही.” गौरी.

“आई, कोणामध्येच इंटरफिअर करत नाही. ज्याने त्याने स्वतःच आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगावं अस तिचं मत आहे. आसावरी वहिनी तिथे राहतात तरी आई त्यांना जास्त काही विचारपूस करत नाही. काही अंतर्गत गोष्टी आहेत त्या तुला हळूहळू समजतील. काही गोष्टी तर मला अजूनही माहीत नाहीयेत.” जय.

“घरोघरी मातीच्या चुली.” गौरी मिश्कील हसून म्हणाली.

“हो असही असेल. सायली मॅमचा काही निरोप?” जयने विचारले.

“त्यांचा इतक्यातच मॅसेज आला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मला हॉस्पिटलला बोलावले आहे.” गौरीने उत्तर दिले.

“ओके. मी उद्या ऑफिसला जाताना तुला हॉस्पिटलला सोडवतो. तिकडून येताना उबेर किंवा ओला करून ये.”

गौरीने होकारार्थी मान हलवली.

“ उद्या समजा तिथे तुला जॉब मिळाला नाही, तरी नाराज होऊ नकोस. आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जॉब शोधू. जॉबच्या टर्म नीट समजून घे, त्यावर विचार कर आणि मगच होकार दे. घाईघाईत कोणतेच निर्णय घेऊ नकोस. हे पुण्यातील हॉस्पिटल आहे, इथे सहजासहजी काहीच मिळणार नाही.

हॉस्पिटल छान आहे, पण मनाविरुद्ध काम करायचं नाही. सॅलरी, सुट्ट्या, दरवर्षी होणारी पगारवाढ, शिफ्ट या सगळ्याची माहिती घे. बॉण्ड साइन करायला सांगितला तर फक्त 1 वर्षाचा कर.” जयने गौरीला काही टिप्स सांगितल्या.

“हो, मी सगळं लक्षात ठेवेल.” गौरी.

“आता लवकर झोप. जास्तवेळ जागरण केलंस तर डोळ्याखाली काळी वर्तुळे येतील. इंटरव्ह्यूच्या वेळी ते चुकीचं दिसेल.” जय.

“तुम्ही या सगळ्याचा विचार करतात. स्ट्रेंज आहे.” गौरी.

“खोटं बोलणार नाही. अंकिता एच आर डिपार्टमेंटला होती, त्यामुळे ही सगळी माहिती आहे.” जय.

“तुम्हाला तिची आठवण येत असेल ना?” गौरी.

“मी तिची आठवणच काढत नाही. तिच्यासोबत बरेच दिवस होतो, त्यामुळे अधूनमधून अश्या गोष्टी आठवत असतात. मी तिला विसरलो नाहीये आणि आठवणही काढत नाहीये. आता तुच काय ते समजून घे.” जय.

“तुमच्याशी बोलण्यात कोणीच जिंकू शकणार नाही. चला, मी झोपते. गुड नाईट.” गौरी बेडरूममध्ये निघून गेली.

गौरीला नोकरी मिळेल का? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.