Login

शुभविवाह भाग २५

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग २५
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जयचं त्याच्या कुटुंबासोबत कसं नात आहे हे जयने गौरीला सांगितले. गौरीला इंटरव्ह्यू करीता हॉस्पिटलमध्ये बोलावले होते.

आता बघूया पुढे….

गौरी सकाळी जरा लवकरच उठली होती. घरातील सगळी कामे तिने पटापट आवरली. जयसोबत बसून तिने नाश्ता केला. सगळं आवरल्यावर ती बेडरूममध्ये जाऊन इंटरव्ह्यू साठी तयार झाली.

गौरी जेव्हा रूममधून बाहेर आली तेव्हा जय तिच्याकडे बघून आश्चर्य चकित झाला. गौरीने मरून कलरचा ड्रेस घातलेला होता. त्या ड्रेसमध्ये गौरी उठून दिसत होती. तिने एका हातात घड्याळ व दुसऱ्या हातात नाजूक ब्रेसलेट घातले होते.

गळ्यात मनी मंगळसूत्र तर होतेच. केसांची पोनी बांधलेली होती. भांगेत सिंदूर लावलेला होता. प्रोफेशनल वाटेल अशी पर्स तिने घेतली होती. गौरी जयसमोर येऊन उभी राहिली, तेव्हा त्याने तिच्यावरून नजर हटवली.

“माझ्याकडे असे का बघत होता?” गौरीने विचारले.

“तू इंटरव्ह्यू साठी जो लूक केला आहे तो बघत होतो. सगळं साधंच आहे, पण त्यातही वेगळेपणा जाणवतो आहे.” जय स्माईल देऊन म्हणाला.

“आपण आता निघुयात का? तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल.” गौरी म्हणाली.

घर लॉक करून जय व गौरी गाडीत जाऊन बसले.

“गौरी, घराची एक चावी तुझ्याकडे आहे ना?” जयने विचारले.

पर्समध्ये चेक करून गौरी म्हणाली,
“हो.”

“सगळं काही घेतलं आहेस ना?” जय.

गौरीने होकारार्थी मान हलवली. मग जयने गाडी स्टार्ट केली. गाडी चालवताना जय गौरीसोबत बोलत होता.

“गौरी, तू जीन्स घालत नाहीस का?”

“घालते, पण तुम्ही अस का विचारल?” गौरी.

“मी तुला ड्रेसमध्येच बघत आहे. घरी पण तू कुर्ता आणि ट्रॅक पॅन्ट घालतेस. तुला हवे ते कपडे तू घालू शकतेस. मला काहीच प्रॉब्लेम नसेल.” जय.

“माझं कॉलेज संपून 2 वर्षे झालीत, त्यानंतर मी गावी राहत होते. कॉलेजला असताना मी जीन्स, टॉप घालायचे, पण घरी गेल्यावर ते घालण्याची तिथे परवानगी नाहीये. तर माझ्याकडे नवीन जीन्स टॉप नाहीयेत. शिवाय माझी साईज पण चेंज झाली आहे. तिकडे दिवसभर घरी मी कुर्ता व ट्रॅक पॅन्ट घालायचे. माझ्याकडे टी शर्ट नसल्याने मी कुर्ताच घालत आहे.” गौरीने सविस्तरपणे सांगितले.

“आज आपण संध्याकाळी शॉपिंगला जाऊयात. तू स्वयंपाक करू नकोस. आपण बाहेरच काहीतरी खाऊयात.” जय.

ते दोघेजण गप्पा मारत असतानाच हॉस्पिटल आले. जयने गाडी बाजूला घेतली. गौरी गाडीतून खाली उतरली. जयने तिला शुभेच्छा दिल्या. गौरी हॉस्पिटल मध्ये गेली व जय निघून गेला. गौरीने सायलीला फोन केला. सायली तिला घेण्यासाठी हॉस्पिटलच्या एन्ट्रान्स जवळ आली.

“गौरी, तू अर्धा तास लवकर आलीस.” सायली घड्याळात बघून म्हणाली.

“जय ऑफिसला चालले होते, मग त्यांनीच मला इकडे सोडले.” गौरी.

“आपण अर्धा तास कॅन्टीन मध्ये बसूयात. माझी शिफ्ट संपायला आलीच आहे.” सायली.

“तुमची नाईट शिफ्ट होती का?” गौरी.

“नाही. पहाटे 5 ते सकाळी 11 ही एक शिफ्ट असते. माझी ड्युटी आय सी युत असल्याने ही एक शिफ्ट आहे. प्रत्येक डिपार्टमेंट नुसार शिफ्ट वेगवेगळ्या असतात.” सायलीने माहिती दिली.

सायली गौरीला घेऊन कॅन्टीन मध्ये गेली. दोघीजणी एका टेबलच्या इथे जाऊन बसल्या. सायलीने कॉफी व सॅंडविचची ऑर्डर दिली.

“तुझा नवरा डिसेंट वाटतोय.” सायली.

“हो. मनात एक ओठावर एक असे ते नाहीयेत. जे आहे ते क्रिस्टल क्लिअर.” गौरी.

“चांगलय. त्याला जप. तुझं लग्न थोड्या वेगळ्या परिस्थितीत झाल्याने तुमचं नातं नॉर्मल नसेलच, पण तुच हळूहळू पुढाकार घे. त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नकोस.” सायली.

“तुम्हाला हे सगळं कसं समजलं?” गौरीला प्रश्न पडला होता.

“अनुभवी नजर आहे. सगळं लगेच हेरते. जोक्स अ पार्ट. त्याची गर्लफ्रेंड अंकिता माझी मावस बहीण आहे.” सायलीने उत्तर दिले.

गौरी आश्चर्य चकित झाली होती.

“तुम्ही आधी जयला भेटला होता का?” गौरी.

“नाही ग. अंकिताने त्याचा फोटो दाखवला होता. अंकिता त्याच्याबद्दल नेहमी भरभरून बोलायची. अंकिताच्या घरी लव्ह मॅरेज अलाऊड नाहीये, म्हणून तर तिचे लग्न दुसरीकडे जमवले. तोही मुलगा चांगलाच आहे, पण तो जय नसल्याची खंत तिला आहे.

असो, तो त्या दोघांचा भूतकाळ होता. आपण त्याबद्दल न बोललेलं बरं. तशीही अंकिताने पुणे सोडलं आहे. ती कालच तिचं सगळं सामान घेऊन गेली. तिच्या आईचा तिच्यावर विश्वास राहिला नाहीये. त्यांना वाटतय की, ती इकडे असेल तर जयसोबत परस्पर लग्नही करून घेईन.

तिच्या घरी बरेच वाद झालेत. तिचं कोणीच ऐकलं नाही. तू हे जयला सांगू नकोस. कदाचित हे ऐकल्यावर त्याच्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होईल. तो तिची चौकशी करण्यासाठी तिला पुन्हा कॉलही करेल.” सायली.

“प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात. सगळं काही विधिलिखित असतं. आपण फक्त कटपुतळ्या आहोत. बाकी तुमचं काय सुरू आहे? फॅमिलीत कोण कोण आहे?” गौरी.

“आपण त्यावर बोलूच पण आत्ता नाही, कारण ते ऐकायला तुला खूप वेळ लागेल. तू इंटरव्ह्यू दे. माझी शिफ्ट संपलेली असेल, तर आपण मस्त लंच करूयात. तुझ्याशी गप्पा मारल्यावर माझंही मन मोकळं होईल.” सायली.

“चालेल.” गौरी.

“तू सरांच्या केबिनच्या बाहेर जाऊन थांब. मी माझ्या डिपार्टमेंटला जाते.” सायली.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.