Login

शुभविवाह भाग २६

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग २६

मागील भागाचा सारांश: इंटरव्ह्यू साठी गौरीने जो लूक केलेला होता, तो जयला आवडला होता. जय आता गौरीच्या कपड्यांच्या चॉईस बद्दल जाणून घेत होता. सायली अंकिताची मावस बहीण असल्याचे तिने गौरीला सांगितले. अंकिताच सध्या काय सुरू आहे, ह्याची कल्पना सायलीने गौरीला दिली.

आता बघूया पुढे….

गौरीचा इंटरव्ह्यू जे सर घेणार होते, त्यांच्या केबिन समोर जाऊन गौरी बसली. गौरीने केबिनच्या दरवाजावर लावलेली नेमप्लेट बघितली.

‘डॉ रोहन शिंदे’ हे नाव त्यावर लिहिलेले होते. गौरीला ते नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटले होते, पण तिला आठवत नव्हते. शिपायाने गौरीला आत जाण्यास सांगितले.

सरांची परवानगी घेऊन गौरी केबिनमध्ये गेली. सरांनी तिला आपल्या समोरील खुर्चीत बसण्यास सांगितले.

“ डॉ गौरी, मी तुमचा रिझ्युम बघितला. तुमच्या एज्युकेशनल डिटेल्स मला माहित आहेच. तुम्ही जिकडे प्रॅक्टिस करत होत्या, तो ग्रामीण भाग होता. मला त्याबद्दलच तुमच्याशी बोलायचं आहे.” डॉ रोहनने गौरीचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली.

“त्याबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे?” गौरीने विचारले.

“ आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. बोलता बोलता मला जी माहिती पाहिजे आहे ती कव्हर होईलच, पण समजा त्यावर बोलणं झालं नाही, तर मी तुम्हाला त्यावर वेगळे प्रश्न विचारेल.

आता तुम्ही बी ए एम एस करून सीजीओ केलं आहे. तुमचं मुख्य काम स्त्रीरोग या विभागात यायला हवं. आता मला एक सांगा, तुमचे मार्क्स बघता तुम्हाला कोणत्याही शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला असता, तरीही तुम्ही गावाकडे नोकरी का स्विकारली?” डॉ रोहन.

“सर, गावाकडे नोकरी स्विकारण्याचे दोन कारणं होती. एक म्हणजे माझं घर तेथून जवळ होत. मला माझ्या बाबांसोबत रहायचं होत. दुसरं कारण म्हणजे माझ्या गावाच्या आसपास स्त्रीने स्वतःचे आरोग्य कसे राखावे याबद्दल म्हणावी तशी जागरूकता नाहीये. मला आपल्या लोकांसाठी काहीतरी काम करायचे होते. मला शक्य असत तर मी कायमस्वरूपी तिथेच राहिले असते. मला माझं काम खूप आवडत होत.” गौरीने सांगितले.

“आता बघायला गेलं तर सगळे डॉक्टर्स गावात प्रॅक्टिस करायला नाही म्हणतात. सगळ्यांनाच शहरात काम करायचं असत, पण तुम्हाला गावात काम करायला आवडत होत, हे ऐकून छान वाटलं. गावात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?” डॉ रोहनचा पुढील प्रश्न.

“माझे वडील शेतकरी आहेत. शेतात अनेक बायका कामाला येतात. त्यातील काहीजणी प्रेग्नंट असतात, तर काहीजणींकडे लहान बाळ असतात. त्या स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीत. त्यात त्यांची चूक नाहीये. परिस्थिती समोर त्या हरतात.

कडक उन्हाळ्याचे दिवस होते. आमच्या एका शेतात विहिरीचे काम सुरू होते. तिथे काही स्त्रिया काम करत होत्या, त्यातील एकीची डिलिव्हरी पंधरा दिवस आधी झालेली होती. ती आपल्या बाळाला घेऊन कामावर आली होती. उन्हामुळे त्या स्त्रीला चक्कर आली व ती खाली पडली. तिचं डोकं दगडावर आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

त्या स्त्रीबद्दल चौकशी केल्यावर कळलं की, तिचा नवरा व सासूने तिला बळजबरी कामावर जाण्यास भाग पाडले होते. आता जेव्हा मी गावातील महिला किंवा मोलमजुरी करणाऱ्या महिला ह्यांना आरोग्याबद्दल जागरूक करत होते, तेव्हाच त्यांना थोडं बोलायला, त्यांचं म्हणणं मांडायला शिकवत होते. त्यांच्यात असणाऱ्या ताकदीची आठवण त्यांना करून देत होते.

सर, त्या महिलांचे प्रॉब्लेम्स ऐकले ना तर अस वाटत की आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सुखी आहोत.” गौरीने उत्तर दिले.

“तुमचे विचार खरंच खूप ग्रेट आहेत. ह्या हॉस्पिटलमध्ये बरेच इंटर्न, ज्युनिअर, सिनिअर डॉक्टर आहेत, पण पेशंट सोबत लगेच कनेक्ट होणारे असे कोणीच नाहीये. मला वाटतय की हे काम तुम्ही अगदी बरोबर करू शकाल. क्लिनिकल वर्क तर तुम्हाला करायचं आहेच, पण त्याच बरोबर पेशंट डॉक्टर रिलेशन ऑफिसर म्हणूनही काम करायचं आहे. तुम्हाला पगार दोन्ही पोस्टचा मिळेल.” डॉ रोहन.

“म्हणजे मला जॉब मिळाला आहे का?” गौरीला विश्वास बसत नव्हता.

“हो, डॉ गौरी. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. जॉइनिंग परवा पासून लगेच करा. तुम्हाला लगेच जॉईन व्हायला जमणार नसेल तर मग मला दुसरा एम्प्लॉई शोधावा लागेल.” डॉ रोहन.


“सर, मी परवा पासून जॉईन होईल.” गौरी.

“कॉंग्रेट्स. आपण परवा भेटुयात. तुम्हाला नेमकं काम काय करायचं असेल ते मी तुम्हाला परवा सांगतो.” डॉ रोहन.

“थँक्स सर.” गौरी रोहनच्या केबिनच्या बाहेर पडली. जॉब मिळाल्याने गौरी खूप खुश होती.