Login

शुभविवाह भाग २७

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग २७
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: गौरीचा इंटरव्ह्यू डॉ रोहन शिंदे या डॉक्टरांनी घेतला. गौरी खेडेगावात नोकरी करत असल्याचे कौतुक डॉ रोहनने केले. गौरीचे सिलेक्शन दोन पोस्टसाठी झाले होते.

आता बघूया पुढे…..

गौरी केबिन मधून बाहेर आली, तर सायली तिची वाट बघत बाहेर बसलेली होती.

“इंटरव्ह्यू क्लिअर झाला ना.” गौरीच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून सायली म्हणाली.

“हो. माझं सिलेक्शन दोन पोस्टसाठी झालं. मला क्लिनिकल पोस्टिंग पण असतील आणि पेशंट डॉक्टर रिलेशन ऑफिसर म्हणून पण काम करायचं आहे. मला दोन्ही पोस्टसाठी सॅलरी देणार आहेत.” गौरी खूप खुश होती.

“ओह! गुड. कॉंग्रेट्स. जयला फोन करून ही गुडन्यूज सांग.” सायली बोलल्या बरोबर गौरीने जयला फोन केला.

जयने फोन उचलल्या बरोबर गौरीने त्याला जॉब मिळाल्याचे सांगितले.

“अरे वा! कॉंग्रेट्स. आज रात्री मस्त पार्टी करूयात.” जय गौरीसाठी खुश झाला होता.

“घरी फोन करून सांगू का?” गौरीने विचारले.

“तू आईला फोन करून सांग. प्रत्येकाला वेगळा फोन करण्याची गरज नाहीये. मी जरा कामात आहे. संध्याकाळी भेटू. तू रेडी रहा. आपण बाहेर जाणार आहोत.” जयने बोलून फोन कट केला.

गौरीने लगेच तिच्या वडिलांना व शालिनीताईंना फोन करून जॉब मिळाल्याची न्यूज सांगितली. दोघांनीही तिचे अभिनंदन केले. गौरीचं फोनवरील बोलणं संपण्याची सायली वाट बघत होती.

“सायली मॅम, चला आपण निघुयात.” गौरी सायली जवळ जाऊन म्हणाली.

सायलीकडे गाडी होती, त्यावर बसून दोघीजणी हॉस्पिटल मधून बाहेर पडल्या. एका हॉटेलच्या समोर जाऊन सायलीने गाडी पार्क केली. हॉटेलमध्ये जाऊन एका कोपऱ्यातील टेबलच्या इथे त्या दोघीजणी जाऊन बसल्या.

“गौरी, तुला चायनीज आवडत ना? इथे खूप छान चायनीज मिळत.” मेन्यू कार्ड बघता बघता सायलीने विचारले.

“हो, मला चायनीज आवडतं. इथे जे चांगलं मिळत असेल ते ऑर्डर करा.” गौरी.

सायलीने मंचाव सूप, व्हेज क्रिस्पी, फ्राईड राईस व हक्का नूडल्सची ऑर्डर दिली.

“मॅम, आपण एवढं सगळं खाऊ का?” गौरी.

“हो. सगळं इतकं टेस्टी असत ना की लगेच सगळं संपेल बघ.” सायली.

“तुम्ही इकडे नेहमीच येतात का?” गौरीने विचारले.

“नाही. दोन वेळेस आले असेल. चायनीज खायला कोणी पार्टनर नाहीये ना. फॅमिली सोबत आलं की प्रॉपर जेवण करावं लागतं सो.” सायलीने उत्तर दिले.

“पुण्यात आल्यावर लगेच नोकरी मिळेल का? आपल्या ओळखीचं कोणी असेल का? असे आधी प्रश्न पडत होते. सगळं इतकं सहज आणि सोपं होईल असं वाटलं नव्हतं.” गौरी.

“सगळ्या गोष्टी विधिलिखित असतात. आपण उगाच टेन्शन घेत बसतो. दोन पोस्ट म्हटल्यावर तुझ्यावर कामाचा लोड येईल. सगळं मॅनेज करायला शिकावं लागेल.” सायली.

“हो, ते आहेच. मी माझे 100% देणार.” गौरी.

“हम्मम. जॉइनिंग कधीपासून आहे?” सायली.

“परवा.” गौरी.

“तुझ्याकडे उद्याचा एकच मोकळा दिवस आहे. परवा पासून बिजी होशील.” सायली.

“हो.” गौरी.

दोघीजणी जेवण करता करता गप्पा मारत होत्या.

“तुमच्या फॅमिली बद्दल तुम्ही सांगणार होता ना?” गौरीने सायलीला आठवण करून दिली.

“हो. ते बोलायचं राहीलच. तुला आपल्या कॉलेज मधील मनोज लोंढे आठवतोय का?” सायली.

“सिंगर ना.” गौरी.

“यस करेक्ट. तो माझा बॅचमेट होता. मी त्याच्या गाण्याच्या प्रेमात पडले होते. आणि हळूहळू त्याच्या प्रेमात कशी पडले ते मला कळलच नाही.” सायलीच वाक्य अर्धवट तोडत गौरी पुढे म्हणाली,

“तुम्ही दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं माझ्या कानावर आलं होतं.”

“सगळ्या कॉलेजला ते माहीत होतं. मनोज कोल्हापूरचा, त्याची जॉईंट फॅमिली. मनोज स्वभावाने राजा माणूस. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, आहे म्हणावं की नाही यात जरा शंका आहे.

आमच्या दोघांच्या घरून लग्नासाठी सहजासहजी होकार मिळाला. आमच लग्न एकदम थाटामाटात झालं. मनोजने कोल्हापूरला हॉस्पिटल सुरू केलं होतं. माझ्या आयुष्यात करिअर खूप महत्त्वाच आहे हे मनोजला आधीपासूनच माहीत होतं.

लग्न झाल्यावर मी लगेच हॉस्पिटल जॉईन करण्याचा विचार केला होता, पण सासूबाई बोलल्या की महिन्याभरानंतर जॉईन हो. मी विचार केला की, एक महिनाच तर आहे. त्या एक महिन्यात घरी राहून मी घरातील सगळ्या कामात मदत केली.

एकत्र कुटुंब म्हणजे जवळपास चाळीस माणसं होती. शिवाय दररोज कित्येक माणसे सासऱ्यांना भेटायला यायची. माझे सासरे राजकारणात सक्रिय होते. घरात कामाला बायका होत्या, पण त्यांना प्रत्येक कामात आपण मदत करायची हा घरातील नियम होता.

घरात आम्ही सगळ्या सातजणी होतो. दुसऱ्या बायका तीन होत्या. स्वयंपाक घरातील बाईनेच करावा हाही दंडक होता. दिवस किचनमध्येच जायचा. मला सुरुवातीला काही वाटलं नाही, पण हळूहळू कंटाळा यायला लागला होता.

निदान रविवारी तरी मनोज सोबत बाहेर फिरायला जावं ही इच्छा माझी असायची पण तेही होत नव्हतं. एक महिना झाल्यावर मनोजला बोलून बोलून मी हॉस्पिटल जॉईन केले. हॉस्पिटलला जाण्याआधी घरातील कामं करून जायची. आल्यावर सुद्धा कामं करायची. मी जाम थकायचे.

घरातील कोणालाच माझी कीव येत नव्हती. मनोजला बोललं तर तो म्हणायचा की, “मी यात पडणार नाही. तू तुझं बघ.”

बाहेर कुठे जाण नाही. दररोज ठरलेल जेवण करणे, त्यात काहीच वेगळेपण नाही. मी असेच सलग सात महिने काढले. त्यानंतर माहेरी गेले ते लवकर परत आलेच नाही. मनोज मला घ्यायला आला होता, त्यावेळी माझ्या व त्याच्यात खूप वाद झालेत.

मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की, “आपण जर वेगळे राहणार असू तरच मी तुझ्यासोबत येईल.”

नवरा बायकोच नात फक्त बेडरूममध्ये असत का? बाकी गोष्टींमध्ये आम्ही कधीच नव्हतो. मनोज माझ्या वतीने घरी काहीच बोलत नव्हता.

मनोजला वेगळे राहणे योग्य वाटत नसल्याने तो एकटाच निघून गेला. आठ दिवसांनी तो मला घ्यायला परत आला. माझ्यासमोर खूप रडला. तो माझ्याशिवाय राहू शकत नाही असं बोलून त्याने मला इमोशनल केलं.

मी त्याच्यासोबत पुन्हा घरी गेले. परत तेच रुटीन सुरू झालं. एकदा मनोजने त्याच्या आईला माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला तर घरात खूप मोठं भांडण झालं. मला त्या नको नको ते बोलल्या. सगळं एकदम टोकाला गेल्यावर मी त्या घरात राहणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं.

बॅग घेऊन सरळ माहेरी आले. मनोज दररोज फोन करून माझी समजूत काढत होता. पण त्या घरात मला माणूसकी कोणातच दिसत नव्हती. मी त्या घरात कशी राहू.

आठ दिवसांनंतर मला कळलं की मी प्रेग्नंट आहे. मनोज मला भेटायला आला होता. मनोजचे वडील राजकारणात असल्याने आमचं वेगळं राहणं त्याला योग्य वाटत नव्हतं. शिवाय त्याची आई त्याच ऐकत नव्हती.

त्याचं हॉस्पिटल चांगलं चालत असल्याने तो ते सोडून पुण्यात येऊ शकत नव्हता. शेवटी आमचं अस ठरलं की, मी पुण्यात राहणार व तो कोल्हापूरला. महिन्यातून जस जमेल तसं तो इकडे येणार. माझ्या आई वडिलांच्या शेजारी मी एक फ्लॅट रेंटने घेतला. ह्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले.

मला एक दोन वर्षांची मुलगी आहे. मनोज महिन्यातून दोनदा आम्हाला भेटायला येतो. माझी मुलगी माझी आई दिवसभर सांभाळते. आता आमच्या नात्याच एक वेगळं सत्य सांगते.

माझ्या सासरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांमध्ये अस पसरवल आहे की, माझं एक्सट्रा मॅरेटीयल अफेअर होत आणि मी त्याच्या सोबत निघून गेले. मनोजला आता लग्न करायचं नाहीये आणि म्हणून तो कायमस्वरूपी एकटा राहणार आहे.

सुरुवातीला त्यांनी माझ्या बद्दल जे पसरवल त्याचा खूप राग यायचा, पण आता काही वाटत नाही.” सायलीने तिच्या आयुष्याचा पाढा गौरीसमोर वाचला.

“मनोज सर आणि तुम्ही कधीच एकत्र राहणार नाहीत का?” गौरीला प्रश्न पडला होता.

“माहीत नाही. मी तो विचारच करत नाही. मुलीला तिच्या वडिलांच प्रेम मनोजकडून मिळत आहे हेच माझ्यासाठी सध्या खूप आहे.” सायली.

“मॅम, हे काहीतरी वेगळंच घडलं आहे.” गौरी.

“प्रत्येकाच्या आयुष्यात अस काहीना काही घडत असतच. चल आता आपण निघुयात. घरी जायला उशीर होईल.” सायलीने बिल दिलं.

दोघीजणी हॉटेलच्या बाहेर पडल्या. गौरी कॅबने घरी गेली.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.