Login

शुभविवाह भाग २८

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग २८

मागील भागाचा सारांश: इंटरव्ह्यू क्लिअर झाल्याचे गौरीने जयला, तिच्या बाबांना व शालिनीताईंना फोन करून सांगितले. सायलीच्या आयुष्यात घडलेल सगळं तिने गौरीला सांगितले.

आता बघूया पुढे…..

घरी गेल्यावर गौरीने भाग्यश्रीला फोन करून नोकरी बद्दल सांगितले. ‘ड्युटी जॉईन करायची म्हटल्यावर सगळं प्रॉपर प्लॅन करावं लागेल. घरातील कामे करून हॉस्पिटलला जावं लागेल. सकाळी लवकर उठाव लागेल. रात्री झोपताना सकाळच्या कामांची सगळी तयारी करावी लागेल.’ हे सगळं गौरीच्या डोक्यात सुरू होतं.

हातात चहाचा कप घेऊन गौरी विचार करत होती. जय त्याच्याकडील चावीने लॉक उघडून घरात आला. त्याला समोर विचाराधीन असलेली गौरी दिसली. जय गौरीजवळ येऊन उभा राहिला, तरी तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही.

“गौरी, घरात चोर येऊन चोरी करून जाईल तरी तू अशीच विचार करत बसशील.” जयच्या बोलण्याने गौरी तिच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली.

“सॉरी, मी लॉक उघडण्याचा आवाज ऐकला होता. तुम्हीच असाल हे माहीत होतं.” गौरी म्हणाली.

“म्हणजे विचाराधीन होण्याची ही ॲक्टिंग होती तर….” जय.

“ते सोडा. तुमच्यासाठी चहा करू का?” गौरी सोफ्यावरुन उठत म्हणाली.

“चहा नको कॉफी बनव.” जय फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेला.

गौरी किचनमध्ये कॉफी बनवत होती. फ्रेश होऊन जय किचनमध्ये गेला.

“कॉंग्रेट्स. मघाशी बोलायचं राहून गेलं.” जय गौरीशेजारी जाऊन उभा राहिला.

“थँक्स. सारख सारख अभिनंदन करण्याची गरज नाहीये.” कॉफीचा कप गौरीने जयच्या हातात दिला.

गौरी चहा व कॉफीची भांडी घासत होती, तर जय तिथेच उभा राहून कॉफी पीत होता.

“आपल्याला आता घरातील कामांना बाई शोधावी लागेल.” जय.

“लगेच नको. मला मॅनेज झालं नाही, तर बघू. मला घरातील काम आणि हॉस्पिटल बॅलन्स झालं तर बाईची गरज पडणार नाही. तुम्हाला घरातील कामे करायला आवडत असतील तर तुम्हीपण हातभार लावू शकता. आपण फक्त दोघेच आहोत, कशाला हवी बाई. पैसा असला म्हणजे कसाही वापरणे योग्य नाही.” गौरी.

“तुझ्यासारखी डॉक्टर मुलगी घरातील कामांना एवढी महत्व देत असेल असं मला वाटलं नव्हतं. शिवाय नेहमी काटकसर करण्याच्या मागे असते.” जय.

“मी डॉक्टर असले तरी आपली मुळं सोडली नाहीयेत. मला आधीपासूनच घरातील कामं करायला आवडतात. पैसे नसल्यावर लोकांची काय स्थिती होते हे मी जवळून बघितलं आहे. शेतीमध्ये किती कष्ट करावे लागतात तेव्हा पिकं येतं. शिवाय दरवेळी पिकाला हवामान साथ देईल अस होत नाही.

बाबानी केलेले कष्ट मी बघितले आहे. पैसा कुठून येतो हे माहीत असल की खर्च करायला आपला हात आपोआप आखडला जातो.

आता राहिला प्रश्न घरातील कामांसाठी बाई लावायचा तर आपण सध्या दोघेजण मिळून कामे करूयात. नाहीच जमलं तर बाई लावूयात.” गौरी.

“ओके मॅडम. मी मित्रासोबत फ्लॅटवर रहायचो तेव्हा घरातील बरीच कामे मी करायचो. मी तुला मदत करत जाईल. आता तू पटकन आवर. आपल्याला बाहेर जायचं आहे.” जय.

“एवढी भांडी घासून झाली की मी लगेच आवरून येते.” गौरी.

कॉफी पिऊन झाल्यावर जय हॉलमध्ये जाऊन बसला. किचन मधील काम आवरून गौरी रूममध्ये गेली. दहा मिनिटात ती रेडी होऊन आली. जय व गौरी लगेच घराबाहेर पडले.

जय गौरीला एका मॉलमध्ये घेऊन गेला. जयच्या आग्रहाखातर गौरीने काही कपडे खरेदी केले.

“आपण इथे फूड झोन मध्ये जाऊन खाऊयात की हॉटेलमध्ये जायचं?” सगळी खरेदी करून झाल्यावर जयने गौरीला विचारले.

“इथेच खाऊयात.” गौरी बोलल्यावर ते दोघेजण फूड झोनमध्ये गेले.

एक रिकामा टेबल बघून दोघेजण बसले. गौरीने सगळ्या फूड स्टॉल्स वर नजर फिरवली.

“तुला काय खायचं आहे?” जयने विचारले.

“पिझ्झा. बरेच दिवस झाले पिझ्झा खाल्लाच नाहीये.” गौरीने उत्तर दिले.

जयने पिझ्झा शॉपजवळ जाऊन ऑर्डर दिली. तो हातात टोकन घेऊन आला.

“आधी पिझ्झा खाऊयात. मग काय खायचं ते ठरवू.” जय.

“हो. शेवटी काहीतरी डेझर्ट खाऊयात.” गौरी.

“यस मॅडम.” जय हसून म्हणाला.

“त्यात हसण्यासारखं काय आहे?” गौरीला प्रश्न पडला होता.

“तू फुडी आहेस हे तुझ्या आत्ताच्या बोलण्यातून, वागण्यातून जाणवतं.” जय.

“हो मी खूप फुडी आहे. मला खायला आवडत म्हणूनच स्वयंपाक पण शिकले.” गौरी.

टोकन नंबर पुकारल्यावर जय पिझ्झा घेऊन आला. जय व गौरीने पिझ्झा खाल्ला. गौरीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून जयला छान वाटले होते. गौरीने नंतर मोमोज खाल्ले, पोटॅटो स्प्रिंग्स टेस्ट केले. बर्गर खाल्ला, मग शेवटी चॉकलेट सिझलिंग ब्राऊनी खाल्ली.

“अजून काही खायचं आहे का?” जयने गौरीकडे बघून विचारले.

“नाही.” गौरीने उत्तर दिले.

“तुम्हाला नसेल खायचं पण आम्हाला खायचं आहे.” जयने आवाजाच्या दिशेने बघितले.

एक कपल त्यांच्या दिशेने आलं. त्यांना बघून जयच्या चेहऱ्यावर स्माईल आली. जयने उठून त्याला मिठी मारली.

“कुठे गायब झाला होतास? किती वर्षांनी भेटतो आहेस.” जय खूप खुश होता.

“इथेच होतो रे. थोडा अडकलो होतो. ह्या मॅडमने सगळ्यातून सोडवले.” तो त्याच्या बरोबरच्या स्त्रीकडे बघून म्हणाला.

“गौरी, हा ओमकार माझा कॉलेज मधील मित्र. आणि ओमकार, ही गौरी माझी बायको.” जयने ओळख करून दिली.

“नमस्कार. जय, ही आरती माझी बायको. आरती, तू तर जयला ओळखतेच.” ओमकार.

“तुम्ही मला कश्या ओळखता?” जयच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.

“ओमकार कडून तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे, म्हणून ते अस बोलले. मी तुमचा फोटो बघितला आहे.” आरतीने सांगितले.

“मी आपल्या सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येतो. कॉफी पिता पिता आपण गप्पा मारुयात.” ओमकार कॉफी घ्यायला गेला.

कॉफी पिता पिता चौघांमध्ये बऱ्याच गप्पा झाल्या. आरती व गौरीने एकमेकींसोबत फोन नंबर एक्सचेंज केले. बोलताना ते एकाच एरियात राहत असल्याचे समजले. साधारण एक तास त्यांच्यात गप्पा रंगल्या. ओमकारने गौरीला जयचे कॉलेजमधील किस्से सांगितले. गप्पा झाल्यावर जय व गौरी मॉलमधून बाहेर पडले.

घरी गेल्यावर गौरी रूममध्ये जात होती, तोच जय तिला म्हणाला,

“गौरी, मला तुझ्यासोबत थोडं बोलायच होत.”

“मी कपडे बदलून येते आणि तोंडावर पाणी मारून येते, मग बोललं तर चालेल ना?”

जयने होकारार्थी मान हलवली.

मॉलमधून खरेदी केलेला नाईट ड्रेस गौरी घालून बाहेर आली.

“हा ड्रेस तुला मस्त दिसतोय.” जयने तिला कॉम्प्लिमेंट दिली.

“थँक्स.” गौरी.

हॉलमध्ये सोफ्यावर गौरी व जय एकमेकांसमोर बसले.

“जय, मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण तुम्ही आधी बोला.” गौरी.

“मला तुला अंकिता बद्दल सांगायचं आहे. दुपारी एका अनोळखी नंबर वरून तिने मला फोन केला होता. तिचं लग्न कस तिच्या मनाविरुद्ध जमवलं हे ती रडून सांगत होती. ती मला बोलली की, प्लिज मला यातून सोडव.

मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही. मला त्याच्यासोबत बोलायला आवडत नाही. आमचे विचारही खूप वेगळे आहेत. जय, मी कसं ॲडजस्ट करू?

ती खूप जास्त रडली. मी तिला शांतपणे सांगितलं की, अंकिता तू तुझा निर्णय मला सांगितल्याने माझं दुसऱ्या मुलीशी लग्न झालं आहे. आता मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही. तू तुझ्या घरच्यांचा विश्वास मोडू नकोस. त्यांनी निवडलेल्या मुलाशी लग्न कर आणि त्याच्यासोबत प्रामाणिक रहा.

माझं लग्न झालंय हे ऐकल्यावर ती खूप चिडली. आम्ही एकमेकांना दिलेले वचन तिने काढले. ती बडबड करत असताना मी एकदम शांत होतो. गौरी, मला तिची मनस्थिती समजत होती. आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करून पुढे जाणं इतकं सोपं नाहीये.

पण जे आहे ते स्विकारलं पाहिजे. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकत नव्हती. शेवटी मी तिला सांगितले की, इथून पुढे मला फोन करत जाऊ नकोस. मी तुझा आवाज ऐकल्यावर फोन कट करेल.

तिची बडबड थांबायचं नाव घेत नसल्याने मी फोन कट केला.”

जयचं बोलणं ऐकल्यावर गौरीची काय प्रतिक्रिया असेल? बघूया पुढील भागात….