Login

शुभविवाह भाग २९

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग २९

मागील भागाचा सारांश: जय गौरीला मॉलमध्ये घेऊन गेला. शॉपिंग झाल्यावर दोघेजण फुडझोन मध्ये गेले. गौरीच्या आवडीचे पदार्थ त्यांनी खाल्ले. तिथे जयचा मित्र ओमकार व आरती ह्यांची भेट झाली. जयला अंकिताचा फोन आल्याचे व त्यांच्यात झालेले बोलणे त्याने गौरीला सांगितले.

आता बघूया पुढे…..

अंकिता सोबत फोनवर झालेल बोलणं जयने गौरीला सांगितले. गौरी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देईल याची वाट जय बघत होता.

“जय, तुम्ही हे सगळं खूप छान पद्धतीने हाताळत आहात. अंकिताच बोलणं तुम्ही ऐकून घेतलच, पण तिला ठामपणे आपलं लग्न झाल्याचे व पुन्हा कॉन्टॅक्ट करण्यास मनाई केली ते बर केलं.

अंकिता जर समजदार मुलगी असती आणि तुमच्या दोघांमध्ये मैत्रीचे नाते ठेवण्यास तिने फोर्स केला असता, तर मी तुम्हाला तिच्याशी मैत्री ठेवण्यास कधीच नकार दिला नसता.

जय, तुम्ही दोघे आयुष्यातील एका वळणावर भेटले होते, पण ते नात पुढे जाऊ शकल नाही हे तिने स्विकारायला हवे. ती ज्या मुलाशी लग्न करणार आहे तेही तिने स्विकारायला पाहिजे, तरच ती सुखी राहील.

दरवेळी आपल्याला हवं तसं घडत नाही. काहीवेळी नियती जे घडवते ते मान्य करावे लागते. या सगळ्यात मला तुमचं जास्त कौतुक वाटतय. आज अंकिताचा तुम्हाला आलेला फोन तुम्ही माझ्यापासून लपवू शकला असता, पण तुम्ही तसं केलं नाही.

आपलं नातं पुढे कधी आणि कसं जाईल हे मला माहित नाही, पण माझं एका योग्य व्यक्तीसोबत लग्न झालं ह्यात काही शंकाच नाहीये.” गौरीच्या डोळ्यात जयबद्दल कौतुक दिसत होते.

“गौरी, अंकिताची या सगळ्यावर असणारी प्रतिक्रिया मलाही आवडली नाही. तिच्यासोबत लग्न व्हावं हे स्वप्न मी सुद्धा बघितलं होत, पण ते नाही झालं, त्यामागे काही कारण जरी असलं तरी मी ते स्विकारलं.

लग्न झाल्यावर मी एकटाच इकडे निघून आलो असतो. तुझा, माझ्या घरच्यांचा राग केला असता, तर त्यात कोणीच सुखी झालं नसत, मी पण नाही. आता आपलं नातं पुढे कधी जाईल हे मलाही माहीत नाही, पण आजरोजी आपण एकमेकांसोबत कम्फर्टेबली एका घरात राहत आहोत हेच खूप आहे.

एनिवेज तुलाही मला काहीतरी सांगायचं होत ना?” जयने विचारले.

“हो. मी जे सांगणार आहे तेही अंकिता संबंधितच आहे. सायली मॅम व अंकिता ह्या दोघीजणी मावस बहिणी आहेत. अंकिताने तुमचा फोटो सायली मॅमला दाखवला होता, सो त्यांनी तुम्हाला आपल्या पहिल्या भेटीतच ओळखलं होत.

अंकिताच लग्न तिच्या मनाविरुद्ध घरच्यानी कस जमवलं, त्याचा तिला किती त्रास होत आहे हे त्यांनी मला सांगितले. तुमच्यासोबत लग्न झाल्याने मी किती नशीबवान आहे हेही त्या म्हणाल्या.

शिवाय मला अंकिता बद्दल जे कळलं ते तुम्हाला सांगू नये अशी मॅमची इच्छा होती, कारण तिच्याबद्दल तुमच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर असल्याने तुम्हाला तिची कीव येईल, तुम्ही तिची मदत कराल आणि त्यामुळे आपल नात प्रॉब्लेम मध्ये येईल असं त्यांना वाटलं होतं.” गौरी.

“मग तू मला अंकिता बद्दल सांगणार नव्हतीस का?” जयने गौरीकडे बघून विचारले, त्याला गौरीच्या चेहऱ्यावरील भाव बघायचे होते.

“मी सांगणारच होते, कारण मॅम तुम्हाला ओळखत नाहीत, पण मी ओळखते. तुम्ही अंकितामुळे आपल्या दोघांचं नात खराब होऊ देणार नाही ही मला खात्री आहे.” गौरी.

“गेल्या तीन चार दिवसांत तू मला इतकं ओळखलं आहेस का?” जयच्या चेहऱ्यावर आश्चर्य होत.

“मी तुम्हाला नाही, तर तुमच्या संस्कारांना ओळखते. आपण ज्या खानदानी पणाची निंदा करतोय, त्याच बीज आपल्यात सुद्धा खोलवर रोवलेलं आहे. तुम्हाला नात्यांची, आपल्या माणसांची किंमत आहे. माहीत नाही का, पण तुमच्या प्रत्येक बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्यावर मनापासून विश्वास ठेवावा वाटतो.” गौरी हे सगळं बोलल्यावर जय पुढे काहीच बोलला नाही. त्याला पुढे काय बोलाव हेच सुचत नव्हतं.

थोड्यावेळ दोघांमध्ये शांतता होती.

“गौरी, बराच उशीर झाला आहे. आपण झोपायला हवं.” जय.

“हो. मी तुमच ब्लॅंकेट आणि उशी आणून देते.” गौरी बेडरूममध्ये गेली.

जयला ब्लॅंकेट व उशी देऊन गुड नाईट बोलून गौरी रूममध्ये निघून गेली.

जय झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या मनात राहून राहून गौरीच्या बोलण्याचा विचार येत होता.

‘गौरीचा खरच माझ्यावर किती विश्वास आहे. कोणतंही नात विश्वासावरच टिकतं ना. खासकरून नवरा बायकोच नातं. शिवाय ती मला किती परफेक्ट ओळखायला लागली आहे.’

गौरीचं काही वेगळं नव्हतं. तिच्याही मनात जयचे विचार सुरू होते.
‘जय किती चांगले आणि प्रामाणिक आहेत. खरतर ते अंकिताच्या फोनबद्दल माझ्यापासून लपवू शकत होते. ते दररोज तिच्याशी बोलले असते, भेटले असते तरी मला समजल नसतं. जय प्रत्येक नातं असच मनापासून निभावत असतील. मी आज त्यांचं कौतुक करून माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीतरी हे अप्रत्यक्षपणे सांगितलं तर नाही ना?

मला जय आवडायला लागले आहेत का? ह्या प्रश्नाच उत्तर शोधायला गेलं तर…. ते माणूस म्हणून तर मला आवडत आहेच, पण त्या पलीकडे जाऊन माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही आहे की नाही हे लगेच सांगता येणार नाहीच.

आमचं नातं एकमेकांच्या सहवासानेच फुलणार आहे. जयसोबत नातं फुलण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. मनाला थोडं शांत करावं लागेल.’

जयचा विचार करत गौरीला व गौरीचा विचार करत जयला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीने लवकर उठून जयसाठी नाश्ता तयार करून ठेवला. जय नाश्ता करत असताना गौरी त्याच्या सोबत गप्पा मारत होती.

“गौरी, आज दिवसभर काय करणार आहेस?” जयने विचारले.

“घरातील सगळं आवरेल. इथल्या जवळच्या भाजी मार्केटला जाऊन आठवडाभर पुरेल अशी भाजी घेऊन येईल. भाज्या निवडून ठेवल्या की म्हणजे मला दररोज अडचण येणार नाही. सगळं वेळेत आवरत जाईल.” गौरीने सांगितले.

“फक्त कामच नको करुस, तर आरामही कर. उद्यापासून तुझी धावपळ तर होणारच आहे. निदान आजचा दिवस तरी शांतपणे घालव.” जय.

“हो.” गौरीने होकारार्थी मान हलवली.

जय त्याच्या ड्युटीसाठी घराबाहेर पडला. गौरीने घरातील कामं आवरली. जवळच्या भाजी मार्केट मध्ये ती भाजी आणायला गेली. तिकडून आल्यावर ती लिफ्टची वाट बघत उभी होती.

“तू इकडे नवीन रहायला आली आहेस का?” गौरीने आवाजाच्या दिशेने आपली मान वळवली. तिच्या शेजारी एक मावशी उभ्या होत्या.

“हो.” गौरीने उत्तर दिले.

“मी दुसऱ्या मजल्यावर राहते. तू कितव्या मजल्यावर राहते?” मावशींचा प्रश्न.

“चौथ्या.” समोरील व्यक्ती अनोळखी असल्याने गौरी जेवढं विचारलं तेवढंच उत्तर देत होती.

“तुला बघितल्यावर मला कोणाची तरी आठवण येत आहे. अस वाटतय की, तीच माझ्यासमोर उभी आहे.” मावशी.

“असेल. जगात बरेच लोकं एकसारखे दिसायला असतात अस म्हटलं जातं.” गौरी.

“नाही ग. तिच्यासारखं दुसरं कोणीच असू शकत नाही.” मावशीच्या डोळ्यात पाणी आले होते.

“मावशी, तुम्ही रडत का आहात? माझ्याकडे बघून तुम्हाला तुमच्या मुलीची आठवण आली असेल.” गौरी.

“नाही. माझी एक बालमैत्रीण होती, गायत्री. तिचे डोळे सेम तुझ्या डोळ्यांसारखेच होते.” मावशी.

“माझे बाबा म्हणतात की माझे डोळे माझ्या आईसारखे आहेत.” गौरी.

“तुझ्या आईचा फोटो दाखव ना म्हणजे मलाही कळेल की, एकसारखे डोळे असणाऱ्या ह्या जगात खूप जण असतील.” मावशी.

गौरीच्या मोबाईल मध्ये तिच्या आईचा एकच फोटो होता, तो तिने त्या मावशींना दाखवला. फोटो बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.

“तू हिची मुलगी आहेस तर…. हा फोटो तर खूप जुना आहे. तुझ्याकडे आत्ताचा फोटो नाहीये का?” मावशी.

“मावशी, मी लहान असतानाच आई हे जग सोडून गेलीय.” गौरी उदास चेहरा करून म्हणाली.

“मी ज्या गायत्री बद्दल बोलत होते ना, ती हीच आहे.” मावशी.

“मावशी, तुमचं नाव काय?”;गौरीला प्रश्न पडला होता.

“मला सगळेजण सरिता मावशी म्हणतात.” सरिता मावशी.

“मावशी, मी आधी घरी जाऊन येते. खाली आल्यावर आपण या विषयावर बोलू.” गौरी घरी निघून गेली.

सरिता मावशींसोबत गौरीने तिचा नंबर एक्सचेंज केला.