Login

शुभविवाह भाग २

गोष्ट एका लग्नाची
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026

शुभविवाह भाग २

मागील भागाचा सारांश: अंकिताला जयसोबत लग्न करायचे असल्याने ती जयने त्यांच्याबद्दल घरी कल्पना द्यावी यासाठी त्याच्या मागे लागली होती. जयचे त्याच्या बाबांशी बोलणं कस वाढलं याबद्दल त्याने सांगितले.

आता बघूया पुढे….

जयने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेलं होतं, तो एका नावाजलेल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत होता. जय शाळेत असल्यापासूनच खूप हुशार होता, त्याला अभ्यासाची आवड होती. जयचे शालेय शिक्षण त्याच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले होते.

जयचे वडील दादासाहेब देशमुख खानदानी शेतकरी होते. शेतात काम करायला भरपूर माणसं होती. दादासाहेब त्यांच्यावर देखरेख करून त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे. दादासाहेबांना तीन मुलं, मोठा अनिकेत, दुसरा शंतनू व तिसरा शेंडफळ जय.

अनिकेतने बी एस्सी ऍग्री शिक्षण घेतलं होतं, त्याचं गावातच कृषी सेवा केंद्र होत. अनिकेत शेतीतही लक्ष घालत होता. अनिकेतचे लग्न झाले होते, त्याची बायको गृहिणी होती, त्यांना एक मुलगी होती, तिचं नाव आदिती. आदिती दादासाहेबांची लाडकी होती.

शंतनू वकील होता, तो तालुक्याच्या गावी कोर्टात प्रॅक्टिस करत होता. शंतनूची बायकोही वकील होती. दोघेजण रहायला तालुक्यालाच होते, त्यांना एक मुलगा होता, राजवीर.

जय पुण्यात नोकरीला होता. आता त्याच्या लग्नाचे वेध घरच्यांना लागले होते. दादासाहेब गावातील बडी आसामी असल्याने त्यांना प्रेमविवाह करणे पटणार नाही, याची कल्पना जयला असल्याने अंकिताचा विषय त्यांच्यापुढे काढायला तो घाबरत होता.

दादासाहेबांच्या घरी दररोज पै पाहुणे यायचे. जयची आई म्हणजेच शालिनीताई सगळ्यांच आदरातिथ्य जिथल्या तिथे करायच्या. शालिनीताई आसावरीला (अनिकेतची बायको) सगळ्यात ट्रेन करत होत्या, कारण पुढच्या पिढीतील अनिकेत व आसावरी हे दोघेच घरी राहणार होते. बाकीचे कामानिमित्त घरी कधीतरी येणार जाणार होते.

आसावरी शालिनीताईंच्या हाताखाली मस्त तयार होत होती. सगळी कामे स्वतःहून शिकून घेत होती. स्वतःहून सगळ्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर ती घेत होती. शालिनीताईंना आसावरीकडे बघून छान वाटायचं. आपल्या नंतर आपला वसा सांभाळायला ती आहे ह्याचं त्यांना समाधान वाटायचं.

दादासाहेब देशमुखांचा मखमलाबाद येथे मोठा बंगला होता. त्या एरियात देशमुख बंगला कोणाला माहीत नाही असं कोणीच नसेल.
—---------------------------------------------------

जय गावी जाण्यासाठी पुण्याहून निघाला होता. वाटेत चहा पिण्यासाठी तो एका टपरीच्या इथे थांबला. गाडीच्या खाली उतरून त्याने तोंडावर पाणी मारले, प्रवासाचा क्षीण गेल्यासारखं त्याला वाटलं. चहा पीत तो एका बाकड्यावर बसला, त्याच्या शेजारी एक त्याच्याच वयाचा मुलगा बसलेला होता.

तो मुलगा कसल्यातरी विचारात हरवलेला होता. जयने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले. त्या मुलाला कोणाचा तरी फोन आला, फोनवर बोलल्यावर तो मुलगा टपरीवाल्याला म्हणाला,

“दादा, इथून नाशिकला जायला बस मिळेल का?”

“बससाठी तुम्हाला पुढच्या गावातील बसस्टँडवर जावं लागेल. इथे बस थांबणार नाही. ( जयकडे बोट दाखवून) हे दादा पुढे जात असतील, तर त्यांना विचारून स्टॅण्डपर्यंत जा.” टपरीवाल्याने सांगितले.

त्या मुलाने व टपरीवाल्याने जयकडे बघितले.

“मी सोडतो तुम्हाला. गाडीत बसा.” जयचा चहा पिऊन झाला होता.

तो मुलगा जयच्या गाडीत बसला. जयने गाडी सुरू केली.

“तुम्ही काही टेन्शन मध्ये आहात का?” जयने गाडी चालवता चालवता विचारले.

“आपण दोघे एकाच वयाचे असू. तुम्ही मला एकेरी नावाने बोलू शकता. माझं नाव आशिष आहे.”

“हाय, मी जय. तू पण मला जयचं म्हण.” जय स्माईल देऊन म्हणाला.

“आता तू दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. दोन दिवसांनी माझं लग्न आहे. मला ते लग्न करायचं नाहीये. वडिलांच्या दबावाखाली मला लग्न करावं लागतंय. मला गर्लफ्रेंड आहे. सहा महिन्यांपासून आम्ही लिव्ह इन मध्ये राहतो.

मी आमच्याबद्दल घरी सांगितलं, पण माझ्या वडिलांनी त्याआधीच लग्नासाठी मुलीच्या वडिलांना शब्द देऊन ठेवला होता. वडिलांना दुखावू शकत नाहीये आणि मनाविरुद्ध लग्न करायला मन धजत नाहीये. त्यात गर्लफ्रेंड इमोशनल ब्लॅकमेल करत आहे.

आता हे सगळं इतकं असह्य झाल आहे की जीव द्यावासा वाटत आहे. अस वाटतय की, प्रेम करून मी गुन्हा केला आहे.” आशिषने थोडक्यात सगळं सांगितलं.

यावर जय म्हणाला,
“जीव देण्याचा विचार करणेच चुकीचे आहे. या सगळ्यातून मार्ग निघू शकतो. परिस्थिती जरी कठीण असली तरी काहीतरी मार्ग असेलच. तू निदान तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न कर.

ज्या मुलीशी लग्न जमलं आहे तिच्याशी बोल. तिला तुझ्या परिस्थितीची कल्पना दे. तिला सगळं कळल्यावर कदाचित तिचं तुझ्याशी लग्नाला नकार देईल.”

“तिला मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण लग्नाच्या आधी ती माझ्याशी बोलणार नाही असं तिने सांगितले, तसं तिने तिच्या वडिलांना वचन दिलं आहे.

ती मुलगी डॉक्टर आहे. तिचे विचार एखाद्या अशिक्षित खेडयातील मुलीसारखे आहेत. वडिलांना न सांगता माझ्याशी एकदा बोलायला, भेटायला काय झालंय, पण ती ऐकतच नाहीये.” आशिष वैतागला होता.

जयने बसस्टँडच्या इथे गाडी थांबवली.

“तू गाडी का थांबावली?” आशिषने विचारले.

“तुझा स्टॉप आला आहे. मी तुला नाशिकपर्यंत घेऊन गेलो असतो, पण पुढे माझी एक आत्त्या राहते. मला तिच्याकडे जायचं आहे.” जयने सांगितले.

“ओके, नो प्रॉब्लेम. बोलण्याच्या नादात बसस्टँड कस आलं हेच समजलं नाही. थँक्स फॉर द लिफ्ट.” आशिष गाडीतून खाली उतरला. जय गाडी सुरू करून मार्गस्थ झाला.

अस म्हणतात की आयुष्याच्या वाटेत भेटणार प्रत्येकजण काहीना काही कारणाने भेटत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या भेटीमागे काहीतरी कारण दडलेलं असतं.

आता जय व आशिषची भेट का झाली असेल? हे जाणून घेण्यासाठी पुढील कथा वाचत रहा.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.