दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
शुभविवाह भाग ४
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
शुभविवाह भाग ४
मागील भागाचा सारांश: साधनाने जयच्या चेहऱ्यावरून तो कोणाच्यातरी प्रेमात आहे हे जाणले होते, म्हणून तिने त्याला आपली कथा सांगितली. दादासाहेब कधीच प्रेमविवाह करायला मान्यता देणार नाहीत, हे तिने त्याला समजावून सांगितले.
आता बघूया पुढे….
जय शंतनू सोबत घरात गेला. राजवीर व आदीती त्याच्याकडे पळत आले. दोघांनी त्याला मिठी मारली व पप्पी दिली. राजवीर व आदीतीचा लाडका व आवडता काका जय होता. जयही नेहमी घरी येताना त्यांच्यासाठी खाऊ आणि गिफ्ट घेऊन यायचा.
जयने आपल्या बॅग मधून त्यांना त्यांची गिफ्ट्स काढून दिले. आदिती साठी त्याने टेडी आणला होता, तर राजवीर साठी गाडी आणली होती. दोघेजण खूप खुश झाले होते.
“जय भाऊजी, मुलांना तुम्ही खूप डोक्यावर बसून घेतलं आहे. सतत त्यांच्यासाठी काहीना काही घेऊन येतात.” आसावरी त्याच्यासाठी पाणी घेऊन आली होती.
“असुद्या ओ वहिनी. लहान आहेत ते. मोठे झाल्यावर स्वतःहूनच गिफ्टला नाही म्हणतील. मी छोटस काही आणल तरी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी लाखमोलाचा आहे.” जय म्हणाला.
“आता मुलांसाठी एक छानशी काकू पण घेऊन या.” शीतल (शंतनूची बायको) हातात चहाचा कप घेऊन आली होती.
“आमची लहान सुनबाई आमच्या पसंतीची असेल.” शालिनीताई पायऱ्या उतरत होत्या.
शालिनीताई समोर आल्यावर जयने त्यांच्या पाया पडल्या.
“जय, प्रवासाने बराच थकलेला दिसतोय. बाहेरचं जेवण करत असल्याने अंगावर मास अजिबात चढल नाहीये. सुनबाई शोधायला सुरुवात करावीच लागेल अस वाटतय.” शालिनीताईंनी जयच्या चेहऱ्यावर हात फिरवला.
“मी तर आधीच सुरुवात केली आहे. दोन बायोडेटा निवडून ठेवले आहेत. परवाच लग्न पार पडलं की आपण सगळे बसून त्यावर बोलूयात.” दादासाहेब दरवाजातून आत आले.
जय त्यांच्या पाया पडला.
सगळेजण जयच्या लग्नाबद्दल बोलत होते. सगळेजण जयला चिडवत होते. हसून खेळून गप्पा सुरू होत्या. जय मात्र वेगळ्याच विचारात हरवलेला होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. अंकिताचा फोन आलेला होता हे बघून जय उठला,
“मी फ्रेश होऊन येतो.”
“जरावेळ आरामही कर. इतक्या लांबची ड्रायव्हिंग झाली आहे.” साधनाने जयच्या मनातील चलबिचल ओळखली होती.
आपल्या रूममध्ये गेल्यावर जयने अंकिताला फोन केला. अंकिता मुसमुसत होती.
“अंकिता, काय झालं? तू रडत का आहेस?” जयला काळजी वाटत होती.
“जय, सगळं संपलं.” अंकिता रडवेल्या आवाजात बोलत होती.
“तू आधी शांत हो आणि मला काय झालं ते सांगशील.” जय.
“जय, आईने मला घरी बोलावलं आहे. उद्या मला बघायला मुलगा येणार आहे.” अंकिताने शांत होऊन सांगितले.
“एवढंच ना, म्हणजे अजून लग्न ठरलं तर नाही ना.” जय.
“जय, हे एवढंच नाहीये. जो मुलगा मला बघायला येणार आहे तो माझ्या मावस आत्त्याचा मुलगा आहे. सगळं आपसात असल्याने उद्याचा कार्यक्रम म्हणजे फक्त फॉर्मलिटी असणार आहे.” अंकिता.
“अग, पण ते तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न फिक्स नाही करू शकत.” जय.
“माझी मावस आत्या खूप श्रीमंत आहे. त्यांच्या घरी कसलीच कमी नाहीये. मुलगा दिसायला चांगला आहे, शिकलेला आहे, चांगली नोकरी आहे. मी कोणतं कारण देऊन नकार देऊ.” अंकिता.
“अंकिता, आता ते तुझं तू ठरव ना. आता तू त्या मुलाचं इतकं कौतुक करत आहेस तर…” जय चिडला होता.
“जय, ही जेलस होण्याची वेळ नाहीये. यावर एकच उपाय आहे. आज रात्री तू तुझ्या घरच्यांना लग्नासाठी तयार कर आणि उद्या आमच्या घरी मला मागणी घालायला या.” अंकिताने सुचवले.
“अंकिता, इतक्या लवकर हे सगळं होणं शक्य नाही. मला थोडा वेळ लागेल.” जय.
“मग मलाही विसरून जा.” अंकिताने रागाने फोन कट केला.
‘ओह गॉड! हे सगळं काय होत आहे. एकीकडे अंकिता व दुसरीकडे माझं कुटुंब. अंकिता सोबत लग्न केलं तर मला कुटुंबाच्या प्रेमाला मुकावे लागेल. राजवीर व आदिती मला कधीच भेटणार नाहीत. किती गोड काका म्हणून हाक मारतात.
भावासारखं प्रेम करणाऱ्या वहिनी पुन्हा भेटणार नाहीत. आई व बाबांच्या चेहऱ्यावरील हास्य मला दिसणार नाही. मी अंकितावर प्रेम करायला नको होतं. मी अंकिता शिवाय सुद्धा राहू शकत नाही.
माझ्या बायकोच्या स्थानी मी अंकिता सोडून दुसऱ्या कोणालाच बघू शकत नाही.’
जयने अंकिताला मॅसेज केला,
“अंकिता, प्लिज मला दोन दिवस दे. मी बाबांशी बोलतो आणि तुला कॉल करतो. काहीही करून दोन दिवस लग्नाची बोलणी होऊ देऊ नको.”
अंकिताने मॅसेज वाचला, पण तिने काहीच रिप्लाय दिला नाही.
जय त्याच्या बाबांसोबत अंकिता बद्दल बोलेल का? बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
