Login

शुभविवाह भाग ५

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग ५

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026

मागील भागाचा सारांश: जय घरी पोहोचला होता. त्याच्या घरी त्याच्या लग्नाचा विषय सुरू होता. अंकिताला दुसऱ्या दिवशी मुलगा बघायला येणार असतो, हे तिने जयला फोन करून सांगितले.

आता बघूया पुढे….

अंकिताचा फोन आल्यापासून जयचं डोकं काम करत नव्हतं. तो डोळे मिटून बसला होता. तेवढ्यात दरवाजावर नॉक झाल्याचा आवाज आला. जयने दरवाजा उघडला. साधना दरवाजात उभी होती.

साधना रूममध्ये आली. जयने तिला अंकिताच्या फोनबद्दल सांगितलं.

“जय, तिला जर चांगला मुलगा भेटत असेल तर तू मध्ये येऊ नकोस.” साधना.

“आत्त्या, पण एकदा बाबांशी बोलू का? नाहीतर मला कायम वाटेल की मी प्रयत्न करायला हवा होता.” जय.

“तुला त्यांचं मत ऐकायचं असेल तर एका त्रयस्थ मुलाचं उदाहरण देऊन विचार. स्वतःबद्दल काहीच बोलू नकोस, नाहीतर त्यांच्या नजरेतून तू कायमचा उतरशील.” साधना.

“ओके, मी तसच करतो. आत्त्या, तुझं बोलणं मला समजतंय पण माझं मन मानायला तयार होत नाहीये.” जय.

“तोंडावर पाणी मार. चेहरा हसरा ठेवून दादासाहेबांसमोर जा, नाहीतर ते तुझ्या मनातील लगेच ओळखतील.” साधना.

जयने होकारार्थी मान हलवली. साधना रूममधून निघून गेली. जय फ्रेश झाला व दादासाहेब त्यांच्या रूममध्ये होते, तिथे गेला.

“बाबा, आत येऊ का?” जयने रूमच्या बाहेर उभे राहून विचारले.

“चिरंजीव, या ना.” दादासाहेब हसून म्हणाले.

आपल्या हातातील फाईल त्यांनी बाजूला ठेवली. दादासाहेब त्यांच्या आराम खुर्चीत बसले होते. जय त्यांच्या समोर एक खुर्ची घेऊन बसला.

“बोल काय म्हणतोस?” दादासाहेब.

जयने त्यांना आशिषची कथा सांगितली.

“बाबा, यात तुम्हाला चूक कोणाची वाटते?” जयने त्यांच्याकडे बघून विचारले.

“अर्थात त्या मुलाची. जय, हे प्रेमविवाह वगैरे सगळं खोटं आहे रे. घराणेशाही पण असते की नाही. आपल्या पिढ्यान पिढ्या पासून लग्न घरातील मोठी माणसे जमवत आली आहे. हल्ली तुम्हाला तरी पसंती विचारली जाते. आम्हाला तर तेही विचारलं जात नव्हत.

आमचं अरेंज मॅरेज आहे, तर आमचा संसार सुखाचा नाहीये का? प्रेम हे क्षणिक असतं. घरातील माणस, त्यांचे संस्कार हे सगळं शेवटपर्यंत टिकत. मलातरी प्रेम, प्रेमविवाह अजिबात पटत नाही.” दादासाहेब.

“आशिषने घरच्यांचं ऐकून लग्न केलं तर तो कधीच सुखी राहू शकणार नाही, अस मला वाटत.” जय.

“तुमच्या पिढीची विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे. आशिषच्या वडिलांनी त्याच्यासाठी शिकलेली, सालस मुलगी बघितलेली असेल,तर मग दुःखी का राहील. लग्न झाल्यावर काही दिवसातच तो त्या मुलीला विसरून जाईल बघ.

जय, आपल्या भागात प्रेमविवाह चालत नाही रे. ते पांढरपेशी लोकांच काम. आपण चालत आलेल्या परंपरेनुसार अरेंज मॅरेज करून संसार करावा.” दादासाहेबांच्या बोलण्यावरून जयला यायचा तो अंदाज आला होता.

दादासाहेबांना संशय येऊ नये म्हणून जयने विषय तिथेच थांबवला. दादासाहेब कोणत्याही परिस्थितीत लव्ह मॅरेजला परवानगी देणार नाहीत, हे त्याला उमगले होते.

जय दादासाहेबांच्या रूममधून बाहेर आला तर शालिनीताई हॉलमध्ये बसलेल्या होत्या. जय आईजवळ जाऊन बसला.

“जय बाळा, तुला काही खायचं नाहीये का?”

“नाही, मी डायरेक्ट जेवण करेल.” जय.

“लग्नासाठी लागणारे कपडे इस्त्री केलेले आहेत ना?” शालिनीताईनी विचारले.

“एक ड्रेस तर लागणार आहे.” जय.

“उद्या सकाळी आपण त्यांच्या घरी जाणार आहोत, तेव्हा एक ड्रेस. संध्याकाळी हळद त्यासाठी एक ड्रेस. परवा लग्न त्यासाठी तिसरा ड्रेस.” शालिनीताई.

“आई, सगळी फंक्शन अटेंड करणे गरजेचे आहे का?” जय आधीच वैतागलेला होता. त्याला लग्नाला जाण्याची इच्छाच राहिलेली नव्हती.

“आपण सगळे फंक्शन अटेंड करावे ही तुझ्या बाबांची इच्छा आहे. मुलीचे वडील बाबांचे खूप जवळचे मित्र आहेत. बाबांना त्यांनी पडत्या काळात मदत केली होती. आता त्यांना लग्न पार पाडायला आपल्या मदतीची गरज आहे. तुला यायचं नसेल तर बाबांशी बोल.

आईविना वाढलेली गोड मुलगी आहे रे. डॉक्टर आहे पण घरातील मोठ्यांसमोर एक शब्द सुद्धा उच्चारत नाही. वडिलांनी सांगितलं, तुला ह्या मुलासोबत लग्न करायचं आहे तर तिने एक प्रश्न सुद्धा विचारला नाही. लगेच होकार देऊन मोकळी झाली. तिच्यासारखी गोड, सालस मुलगी तुझ्यासाठी आपल्याला भेटायला हवी.” शालिनीताईंचं बोलणं ऐकून जय पुढे काही बोललाच नाही.

जयच्या डोक्यात राहून राहून अंकिताचा विचार येत होता. त्याला काय करावे हेच समजत नव्हते. घरच्यांच्या विरोधात जाणेही त्याला पटत नव्हते. जयला रात्री जेवण सुद्धा गेले नाही. झोपताना सुद्धा सतत त्याच्या डोक्यात अंकिताचा विचार येत होता. रात्री उशिरा त्याला झोप लागली.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.