Login

शुभविवाह भाग ६

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग ६

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जय दादासाहेबांसोबत मित्राच उदाहरण देऊन प्रेमविवाह याबद्दल बोलला, तेव्हा त्याला समजले की, काहीही झालं तरी ते प्रेमविवाहाला संमती देणार नाहीत. एकीकडे त्याची फॅमिली होती आणि दुसरीकडे अंकिता. जयला काय निर्णय घ्यावा हे सुचत नव्हते.

आता बघूया पुढे…..

सकाळची वेळ होती. जयच्या घरातील सर्वजण लग्नघरी जाण्यासाठी तयारी करत होते. नाश्त्यासाठी सगळेजण एकत्र बसले होते. नाश्ता करत असतानाच दादासाहेबांचा मोबाईल वाजला. दादासाहेब फोनवर बोलत असताना खूप टेन्शन मध्ये वाटत होते.

फोन झाल्यावर शालिनीताई म्हणाल्या,

“अहो, कोणाचा फोन होता?”

“हल्लीच्या मुलांना काय झालंय तेच कळत नाहीये. नवरदेवाने आत्महत्या केलीय. आज हळद आणि त्याने अस केलं. आता या सगळ्यात त्या बिचाऱ्या गौरीचा काय दोष? मोहन टेन्शन मध्ये असेल, मी लगेच जाऊन येतो.

तू पण माझ्यासोबत चल. गौरीची समजूत काढावी लागेल. बिचारी पोरगी भांबावून गेली असेल.” दादासाहेब अर्धवट नाश्ता करून उठले.

शालिनीताई व दादासाहेब दोघेजण गाडीत बसून गेले.

“अनिकेत, तू त्या मुलाला ओळखत होतास का? त्याने आत्महत्या का केली असेल? मुली आत्महत्या करतात हे ऐकलं होतं, मुलगा आत्महत्या करतो म्हटल्यावर जरा हे वेगळंच वाटत आहे.” साधनाला प्रश्न पडला होता.

“तो शिक्षणामुळे पुण्यात रहायला होता, त्यामुळे माझा काही त्याच्याशी संबंध आला नाही, पण घरचे खानदानी लोकं आहेत. तू हा फोटो बघ, त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो अस काही पाऊल उचलेल अस वाटलं होतं का?” अनिकेतने आपल्या हातातील मोबाईल साधनाकडे दिला.

बाकीच्यांना पण मुलगा बघायचा होता, म्हणून मोबाईल सगळ्यांकडे फिरून जयकडे गेला. जयने फोटो बघितला व तो म्हणाला,

“याच्यासोबत गौरीचं लग्न होणार होत का?”

“तू त्याला कसा ओळखतोस?” अनिकेतला प्रश्न पडला होता.

“काल नाशिकला येताना तो मला भेटला होता. तो खूप टेन्शन मध्ये दिसत होता. मी त्याला बसस्टँड पर्यंत लिफ्ट दिली होती, त्याने मला त्याचं दुःखही सांगितलं नव्हतं.” जय.

“त्याने आत्महत्या का केली असेल?” अनिकेत.

“त्याला हे लग्न करायचे नव्हते.” जयने आशिषची सगळी स्टोरी सांगितली.

“अरे पण आत्महत्या करण्यापेक्षा त्याने लग्नाला विरोध करायचा होता ना. गौरीला सगळं खरं सांगायचं होत. आत्महत्या करायला जीव एवढा स्वस्त वाटला होता का त्याला? कठीण आहे रे बाबा.” शंतनू.

“दादा, सगळे मार्ग बंद झाल्यावरच त्याने हा निर्णय घेतला असेल. त्याची गर्लफ्रेंड त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत होती. वडिलांनी हे लग्न करण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव टाकला होता. गौरी त्याला भेटायला आणि त्याच्याशी बोलायला तयार होत नव्हती. मी त्याला बोललो होतो, काहीतरी मार्ग निघेल, पण कदाचित त्याला एकच मार्ग सापडला असेल.

दादा, मला वाटत ना, हे सगळं घराणेशाही मुळे होत आहे. आशिषच्या वडिलांनी त्याच लग्न जर त्याच्या मनाविरुद्ध करण्याचा घाट घातला नसता तर आज तो जीवंत असता. तुम्ही मुलांना शिकवता, बाहेर पाठवता, त्यांना जगाची ओळख करून देतात, मग त्यांच्या मनाने लग्न करण्याची अनुमती का देत नाहीत?” जय चिडला होता.

“भाऊ, चिल. आशिष तुला भेटला होता, त्याने तुझ्याकडे त्याचं मन मोकळं केलं होतं, म्हणून तुला त्याच्याबद्दल वाईट वाटत आहे. तुझी मनस्थिती मला समजते आहे.

पण तुला एक सांगतो. कोर्टात चालणाऱ्या घटस्फोटाच्या केसमध्ये ८० ते ९०% केस लव्हमॅरेजच्या असतात. सुरुवातीला प्रेम आहे म्हणून संसार सुरू होतो, पण प्रॅक्टिकल आयुष्यात सगळ्यांचच प्रेम टिकत नाही.

आपण ज्या कुटुंबात जन्माला आलो आहोत, जिथे वाढलो आहोत, जिथे राहत आहोत, तिथे प्रेमविवाहाला सहजासहजी संमती मिळत नाही. काही वर्षांनी ही परिस्थिती बदललेली असेल, पण आता हे असंच होईल.” शंतनू.

जय पुढे काही बोलणार एवढ्यात जयचा मोबाईल वाजला. अंकिताचा फोन होता, म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला.

“हॅलो, बोल.” जय.

“जय, हा माझा शेवटचा कॉल आहे. माझं सगळं ऐकून घे, प्लिज मध्ये बोलू नकोस. आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो. सोबत आयुष्य जगण्याची स्वप्नं पाहिली. पण आपण बघितलेली सगळीच स्वप्नं पूर्ण होतील अस नाही ना.

मी आईला आपल्याबद्दल सगळं सांगितलं. बोलताना मला खूप हिंमत करावी लागली. माझं बोलणं ऐकल्यावर आईने मला एक कानाखाली मारली. तिने मला धमकी दिली आहे की, जर मी हे लग्न केलं नाही, तर ती तिच्या जीवाच बरेवाईट करेल.

जय, जिने मला जन्म दिला, तिच्या मृत्यूचं कारण मी होऊ शकणार नाही. मला माझ्या आई वडिलांसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागणार आहे. सॉरी मी तुझी साथ देऊ शकणार नाही.

आपण या क्षणापासून एकमेकांसाठी अनोळखी असू. मी तुला फोन करणार नाही आणि तुही मला फोन करायचा नाही. कधी वाटेत भेटलो तरी ओळख दाखवायची नाही. कारण मी तुझ्याशी फक्त मैत्री ठेवूच शकत नाही.

आपण एकमेकांना भेटणे, प्रेमात पडणे ही एक फेज होती. ती फेज खूप छान होती. कितीही ठरवलं तरी मी ती फेज विसरू शकणार नाही. माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी मुलगी तुला भेटेल. एखादी योग्य मुलगी बघून लग्न कर.

उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत. कायमसाठी बाय.”

जय पुढे काही बोलण्याआधीच फोन कट झालेला होता. जय बेडवर धपकन बसला. अंकिताने बोललेले एकेक शब्द आठवून त्याच्या डोळ्यात पाणी येत होते.

‘अंकिता, आपलं एकत्र येणे हे त्या विधात्यालाच मान्य नव्हत. माझ्याही घरचे कधीच आपल्या लग्नाला तयार झाले नसते आणि मला त्यांना दुखवायला जमलं नसत. मी एखाद्या मुलीशी लग्न करेल, पण तिच्यावर मी प्रेम करू शकेल का?’

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.