शुभविवाह भाग ७
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: गौरीच्या होणाऱ्या नवऱ्याने आत्महत्या केल्याचं दादासाहेबांना कळल्यावर ते व शालिनीताई लगेच गौरीच्या घरी गेले. गौरीचा होणारा नवरा आशिष होता हे जयला त्याचा फोटो बघून कळाले. अंकिताने फोन करून जयला सांगितले की, तिच्या आईसाठी ती तिला बघायला येणाऱ्या मुलाशी लग्न करायला तयार आहे.
आता बघूया पुढे….
अंकिता सोबत घालवलेले क्षण आठवून जयला खूप त्रास होत होता. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. जयचं डोकं दुखायला लागलं होतं. जयच्या रूमच्या दरवाजावर कोणीतरी नॉक केल्याचा आवाज आल्यावर जय पटकन बेडवरून उठला. बाथरूममध्ये जाऊन त्याने तोंडाला पाणी मारले. त्याने दरवाजा उघडला तर साधना दरवाजात उभी होती.
“जय, तुझे डोळे एवढे लाल का आहेत?” साधनाने काळजीने विचारले.
जयने अंकिताच्या फोनबद्दल सांगितले.
“जय, नशिबात जे असत ते घडत. स्वतःला सावर. तुला दादाने खाली बोलावलं आहे.” साधना सांगून निघून गेली. जय त्याच आवरून खाली गेला.
हॉलमध्ये सगळेजण बसलेले होते. घरातील सगळ्यांना एकत्र बसलेल बघून जयला आश्चर्य वाटलं.
“जय, इथे बस. आम्हाला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे.” दादासाहेबांनी त्याला आपल्या समोर बसायला सांगितलं.
“काय बोलायचं आहे?” जयला प्रश्न पडला होता.
“जय, मोहन माझा बालपणीचा मित्र. माझ्या कठीण काळात तो जर धावून आला नसता तर आज आपल्याकडे जे वैभव आहे ते कधीच दिसले नसते. आम्ही एकमेकांना नेहमी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत केली आहे. संकटात एकमेकांसोबत कायम उभे राहिलो आहोत.
आज पुन्हा त्याच्यावर एक संकट आल आहे. मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी त्याने केली होती. त्याचा होणारा जावई अस काही करेल हे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नसेल.
आम्ही दोघे त्याच्याकडे गेलो तर तो खूप कोलमडलेला दिसला. त्याने माझ्याकडे काही मागितले नाही, पण यावेळी मी त्याला मदत करायची ठरवली. जय, गौरी ही एक चांगली, संस्कारी, गुणी मुलगी आहे. शिवाय तू एक डॉक्टर आहे. दिसायलाही सुंदर आहे.
मी आणि तुझ्या आईने मोहनला शब्द देऊन आलोय की, गौरी आपल्या घराची सून होईल. जय गौरीसोबत लग्न करेल, तेही उद्या. ज्या मुहूर्तावर गौरीचं दुसऱ्या कोणाशी लग्न होणार होत, त्याच मुहूर्तावर तिचं तुझ्यासोबत लग्न होईल.
आज संध्याकाळी तुमचा साखरपुडा व हळद पार पडणार आहे. अनिकेत व आसावरी सोबत तालुक्याला जाऊन कार्यक्रमासाठी लागणारे कपडे घेऊन ये. आम्ही येतानाच आपल्या महत्त्वाच्या पाहुण्याना फोन करून बातमी सांगितली आहे,ते काही वेळात इथे पोहचतील. ते येण्याच्या आत तुम्ही निघा.
आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कामं जास्त आहेत. साधना, शीतल तुम्ही शालिनीला मदत करा. सगळ्यांनी पटापट काम आवरा. शंतनू थोड्या वेळात डेकोरेटर घरी येतील, त्यांच्याकडून घर सजवून घ्या.
कितीही घाईत लग्न होणार असलं तरी देशमुखांच्या लहान मुलाच लग्न आहे. कसलीच कमी वाटली नाही पाहिजे. अनिकेत, माझ्याकडे बघत काय बसला आहेस, लवकर निघा.” सगळ्यांना त्यांची कामं सांगून दादासाहेब त्यांच्या रूममध्ये निघून गेले. जय ह्या लग्नासाठी तयार आहे की नाही हे सुद्धा त्यांनी जाणून घेतले नाही.
जयने साधनाकडे बघितले. जयला डोळ्यातून काय बोलायचं होत ते साधनाला समजलं होत.
“जय, पटकन चल. कपडे चॉईस व्हायला वेळ लागेल.” अनिकेत गाडीची चावी घेऊन घराबाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ आसावरी सुद्धा बाहेर गेली. जयलाही नाईलाजास्तव त्यांच्यामागे जावं लागलं. तिघेजण तालुक्याच्या दिशेने निघाले.
जय काहीच बोलत नाहीये हे बघून अनिकेत म्हणाला,
“जय, टेन्शन आलं आहे का? चिल, लग्न एन्जॉय कर.”
“दादा, आशिषने आत्महत्या करायला नको हे मलाही वाटत होतं, पण आज जे काही बाबा वागले त्यावरून त्याने घेतलेला निर्णय मला योग्य वाटतोय. त्याच्यावरही असाच दबाव असणार.” जय.
“जय, तू हे काय बोलतो आहेस?” अनिकेत.
“तसही आता हे सगळं बोलून काहीच फायदा नाहीये. लग्न तर मला करावं लागणार आहेच. दादा, मी एक जीवंत माणूस आहे रे. मलाही भावना आहे. ज्या मुलीसोबत माझं लग्न होणार आहे, तिला मी बघितलं सुद्धा नाहीये.
माझं लग्न फायनल करताना बाबांना साधं मला विचारावं वाटलं नाही. आताही फक्त तुझं लग्न आहे, तू तयारी कर एवढं सांगून मोकळं केलं. ह्याला काय म्हणशील?” जय.
“भाऊजी, प्लिज चिडचिड करू नका. त्याने तुम्हालाच जास्त त्रास होणार आहे. गौरी खरंच चांगली मुलगी आहे. तुम्हाला बाबांचा स्वभाव आधीपासूनच माहीत आहे ना. तुमच्यासाठी हे सगळं अनपेक्षित आहे, तुम्हाला याचा किती त्रास होत असेल याची कल्पना मला आहे, पण हे क्षण आयुष्यात परत येणार नाहीत, ते एन्जॉय करा.” अ
आसावरीने जयला समजावून सांगितले.
आसावरीने जयला समजावून सांगितले.
जय पुढे काहीच बोलला नाही. मोबाईल काढून त्यावर तो टाईमपास करत बसला. नेट ऑन केले, तर साधनाचा मॅसेज आला होता.
“जय, तू नजरेतून जे सांगितलं ते मला समजलं. दादासाहेबांनी साधी तुझी इच्छा सुद्धा विचारली नाही. असंही अंकिताने तिच्या बाजूने तुमचं नातं तोडलं होतच, तर आता तू फ्री आहेस. तुला हे सगळं पचायला खूप जड जाईल, पण पचवाव तर लागेल ना. डोकं शांत ठेव.
जेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे काही घडत नाही, तेव्हा प्रवाह ज्या दिशेने वाहत जातो त्या दिशेने न काही प्रश्न विचारता वाहत जावं. यापेक्षा जास्त मी तुला काही सांगू शकत नाही.”
साधनाच्या मॅसेजला जयने काहीच रिप्लाय दिला नाही.
दुकानात गेल्यावर अर्ध्या तासात जयने सगळ्या कपड्यांची खरेदी केली. घरीही लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. सुनेच्या आगमनासाठी देशमुखांच घर सज्ज झालं होतं.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
