शुभविवाह भाग ८
मागील भागाचा सारांश: दादासाहेबांनी गौरीचे लग्न जय सोबत ठरवल्याचे त्यांनी जयला सांगितले. जयची इच्छा आहे की नाही हे सुद्धा त्यांनी विचारले नाही. ज्या मुहूर्तावर गौरीचे आशिष सोबत लग्न ठरलेले होते, त्याच मुहूर्तावर जय व गौरीचे लग्न करण्याचे ठरले.
आता बघूया पुढे…..
जयची त्याच्या घरापासून वाजतगाजत मिरवणूक गावाच्या वेशीपर्यंत निघाली. जय सोडून घरातील सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू होते. जय न्यूट्रल होता. तो खुशही नव्हता आणि दुखीही नव्हता.
लग्नाच्या हॉलवर जय गेला होता. गौरीच्या घरच्या बायकांनी जयचे ओवाळून स्वागत केले. दादासाहेबांनी सगळ्यांशी जयची ओळख करून दिली.
थोड्याच वेळात सुपारी फुटली. साखरपुड्याच्या वेळी गौरीला जयने पहिल्यांदा बघितले. गौरीच्या चेहऱ्यावर जयसारखेच भाव होते, एकदम न्यूट्रल. आपल्या होणाऱ्या बायकोला आपण डायरेक्ट साखरपुड्याच्या वेळी बघू असे जयला कधीच वाटले नव्हते.
जयच्या मनात चाललेली चलबिचल साधनाला मात्र समजत होती. जय वरून कितीही शांत दिसत असला तरी त्याच्या आत एक वादळ उठलेले होते.
जय व गौरीचा साखरपुडा झाला. थोड्या वेळाने त्यांना साग्रसंगीत पद्धतीने हळद लागली.
“दादा, हे लग्न जयला मान्य असेल का? की हे तो फक्त बाबांच्या शब्दखातर करतो आहे. त्याच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज त्याच्या चेहऱ्यावरून लागत नाहीये.” शंतनू व अनिकेत या दोघा भावांमध्ये चर्चा सुरू होती.
“शंतनू, गौरी ही चांगली मुलगी आहे यात शंकाच नाहीये, पण अस अचानक लग्न होणे हे जय काय त्याच्याजागी आपण असतो तरी मान्य केलं नसतं. बाबांनी जयच्या मनाचा थोडातरी विचार करायला हवा होता.
मोहन काकांना शब्द देण्याआधी एकदा तरी त्यांनी जयशी बोलायला पाहिजे होत. असो, आता जयचं लग्न तर होणार पण झाल्या प्रकारामुळे जय बाबांपासून दुरावला जाऊ नये.” अनिकेत.
“तो आपल्यापासून पण दुरावू शकतोच. मला आश्चर्य ह्या गोष्टीच वाटत आहे की, आई सुद्धा या सगळ्यात काहीच बोलली नाही.” शंतनू.
“आई, आजवर कधी बाबांच्या शब्दाच्या पुढे गेली आहे का? ते सगळं सोड आता. आपल्याला बरीच कामं आहेत.” अनिकेत.
हळद लागल्यावर सगळे विधी पार पडल्यावर जय वर कक्षात बसलेला होता. शालिनीताई तिथे आल्या.
“जय, तुला हळद लागल्याने आजची रात्र तुला इथेच रहावं लागेल. तुला काही पाहिजे असेल तर सांग. मी कोणाकडे तरी पाठवून देते.”
“मला काही नकोय.” जय त्यांच्याकडे न बघता म्हणाला.
“जय, तुला गौरी आवडली ना, तशी ती आवडेल अशीच आहे.” शालिनीताई.
“आई, प्रश्नही तुच विचारतेस आणि उत्तरही तुच देते. ती मला आवडायला, मी तिला नीट बघितले सुद्धा नाही.” जय चिडून बोलला.
“जय, चिडचिड करू नकोस. मी तुझ्या काळजीने इथवर आले. असो मी जाते.” शालिनीताई निघून गेल्या.
जयला रात्रभर झोप लागली नाही. या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता.
‘कालपर्यंत मी अंकिता सोबत लग्न करून आयुष्य जगण्याचे स्वप्न बघत होतो. आता उद्या अचानक गौरीसोबत लग्न करणार आहे, पण मी जर तिच्यावर प्रेमच करत नाही, तर तिच्यासोबत कसा राहू?
देवा, हे माझ्यासोबत काय करतो आहेस? मला मान्य आहे की माझं अंकिता सोबत लग्न होणे शक्य नव्हतं, पण हे सगळं समजायला मला वेळ तरी द्यायला हवा होता ना.
ज्या मुलीसोबत माझं लग्न होणार आहे. तिचा आवाज सुद्धा मी ऐकला नाही. देवा, उद्यापासून जे काही घडेल ते स्विकारायची हिंमत मला दे.’ जयच्या मनात वेगवेगळे विचार येत होते.
पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. साधनाने त्याला उठवल्यावर तो उठला.
“नवरदेव उठा, आज आपलं लग्न आहे.” साधना हसून म्हणाली.
“आत्त्या, मला काहीच कळत नाहीये.” जय.
“बाळा, त्या वरच्यावर विश्वास ठेव. सगळं काही ठीक होईल. मी तुला काही उखाणे पाठवले आहेत ते पाठ करून ठेव. लग्नात कामी येतील.” साधना रूममधून निघून गेली.
जयने उखाणे बघितले त्यात गौरीचं नाव बघून त्याचे डोळे भरून आले.
अनिकेत व शंतनूने जयचा मेकअप केला. त्याला नवरदेवाच्या रुपात तयार केले. घोड्यावरून जयची मिरवणूक काढण्यात आली. राजवीर व आदिती घोड्यावर बसण्यासाठी भांडत होते. त्यांना एकेक करून जयसोबत घोड्यावर बसवलं जात होतं.
लग्नाचा मुहूर्त जवळ आल्यावर जयची मिरवणूक कार्यालयाच्या गेटजवळ येऊन थांबली. जय घोड्यावरून खाली उतरला. गौरी नवरीच्या रुपात नटून थटून आली होती. ती जय शेजारी उभी राहिली. जयने तिच्याकडे बघितले सुद्धा नाही.
दोघे सोबत चालत स्टेजपर्यंत गेले. दोघांना समोरासमोर उभे केले, त्यांच्या मध्ये अंतरपाट धरला गेला. लग्नात आलेल्या मान्यवरांनी वर वधूला आशीर्वाद दिले. मंगलाष्टकांच्या सुरात जय व गौरीचे लग्न पार पडले.
लग्नानंतर सगळे विधी झाले. जयने मोबाईल मध्ये बघून उखाणे घेतले. जयने गौरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. हातात हात देऊन तिला सात वचने दिली. सगळ्यांचा उपस्थितीत, धुमधडाक्यात जय व गौरीचे लग्न पार पडले.
पाठवणीच्या वेळी मोहनराव खूप रडले. त्यांनी हात जोडून जय व दादासाहेबांचे आभार मानले.
देशमुखांच्या घरी जय व गौरीचे स्वागत जोरात झाले. सगळी तयारी बघून कोणीच म्हणणार नाही की एक दिवस आधी लग्न होणार असल्याचे समजले.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा