Login

शुभविवाह भाग ९

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग ९
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जय व गौरीचे लग्न थोरा मोठ्यांच्या उपस्थितीत विधीवत पार पडले. गौरीचे देशमुखांच्या घरी जोरात स्वागत झाले.

आता बघूया पुढे….

गौरीचा गृहप्रवेश झाला. नवीन नवरी नवरदेवासोबत जे खेळ खेळले जातात ते त्यांच्या सोबत खेळले जात होते. जय व गौरीच्या चेहऱ्यावर मात्र ते हसू नव्हते. ते दोघेही फक्त यंत्रवत सगळं काही करत होते.

रात्री जेवण झाले. सत्यनारायण पूजेच्या आधी गौरीला जयच्या रूममध्ये राहता येणार नसल्याने गौरी व तिच्या सोबत आलेल्या करवलीची सोय गेस्ट रूममध्ये करण्यात आलेली होती. गौरीसोबत तिची जीवलग मैत्रीण भाग्यश्री आलेली होती.

जेवण झाल्यावर गौरी व भाग्यश्री रूममध्ये गेल्या. दिवसभर केलेला साजशृंगार गौरीने उतरवला. तेवढ्यात दरवाजावर टकटक आवाज आला. भाग्यश्रीने दरवाजा उघडला. आसावरी दारात उभी होती.

“गौरी, तुला काही हवं आहे का? हे मी विचारायला आले होते. माझा फोन नंबर घेऊन ठेव म्हणजे काही वाटलं तर तुला फोन करता येईल.”

गौरीने आसावरीचा नंबर मोबाईल मध्ये सेव्ह करून घेतला. आसावरीनेही गौरीचा नंबर घेतला. आसावरीने दरवाजा बंद केला, आसावरीच्या अश्या वागण्याने गौरी व भाग्यश्रीला थोडे आश्चर्यच वाटले.

“गौरी, तुझी यावेळी मनस्थिती काय असेल हे मी समजू शकते. तुला निदान तुझं लग्न होणार हे आधी माहीत तरी होत. जय भाऊजींवर तर अचानक बॉम्ब फुटला आहे. त्यांना तर त्यांचं अस लग्न होईल हे वाटलं सुद्धा नव्हतं. बिचारे या सगळ्याकरिता तयार नव्हते.

बाबांचा शब्द ओलांडायचा नाही हे तुमच्या दोघांमध्ये कॉमन आहे. तुला एकच सांगते, जय भाऊजी म्हणजे जेम ऑफ अ पर्सन आहेत. सध्या ते थोडे भांबावलेले आहेत, पण त्यांना थोडा वेळ दे. हळूहळू तुमच्या दोघांचं नात फुलेल.

त्यांच्याबद्दल मनात नको ते गैरसमज तयार करून घेऊ नकोस, त्यांना समजून घे. एक मोठी बहीण या नात्याने सांगतेय अस समज. चल मी जाते. नंतर आपण निवांत गप्पा मारुयात.” आसावरी रूममधून निघून गेली.

आसावरी गेल्यावर भाग्यश्री म्हणाली,

“गौरी, हा तर विचार आपण केलाच नाही. आसावरी वहिनी बरोबर बोलल्या. जयची लग्न करण्याची मानसिकता झालेली सुद्धा नसेल.”

यावर गौरी म्हणाली,

“जशी मी बाबांच्या इच्छेखातर लग्नासाठी तयार झाले. अगदी तसच जय सुद्धा तयार झाले असतील. खानदानी माणसांच्या घरात जन्माला आल की हे होणारच.”

“तुला म्हणायच काय आहे, तुझे बाबा आणि सासरे चांगले नाहीयेत का?” भाग्यश्री.

“अस नाही ग. ते भरपूर चांगले आहेत, पण त्यांच्या मुलांची लग्न लावताना निदान त्यांनी मुलांच्या मनाचा विचार करायला हवा होता. आज आपण एकविसाव्या शतकात आहोत. मी मुलगी असून बाबांनी मला डॉक्टर केलं. मुलीला शिकवताना पुढारलेले विचार असतात, मग लग्नाच्या वेळी ते कुठे जातात.

आशिष सोबत लग्न जमवल्यावर आम्हाला दोघांना बोलण्याची संधी सुद्धा दिली नव्हती. आमच्यात जर तेव्हा बोलणं झालं असत तर कदाचित आशिष आजरोजी जीवंत असतात. माझ्याशी बोलता यावं म्हणून आशिषने किती प्रयत्न केले होते.

आणि ज्याच्या सोबत लग्न झाले त्याला तर बघितले सुद्धा नव्हते. आता या सगळ्याचा परिणाम आमच्या दोघांच्या संसारावर होईल त्याचा कोणी विचार केला आहे का? लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का?

माझं अश्या मुलासोबत लग्न झालं आहे, जो लग्नासाठी तयार सुद्धा नव्हता. आता सत्यनारायण होईपर्यंत आम्हाला दोघाना भेटता, बोलता येणार नाही. कधी कधी या सगळ्या विधी डोक्यात जातात ग.

जय सोबत सगळं क्लिअर कट बोलणं होईपर्यंत माझ्या डोक्यात नको ते विचार येत बसतील. त्याच्या आयुष्यात जर आधी दुसरी कोणी मुलगी असेल का? तो मला बायकोचे स्थान देईल का?” गौरीची चिडचिड होत होती.

“गौरी, असे निगेटिव्ह विचार मनात आणण्यापेक्षा हा विचार कर की, आधी तुम्ही दोघे फ्रेंड्स व्हा. सोबत राहिल्यावर तुमचे नाते बहरेलच ना. तुमच्या संसाराचे एकेक पान हळुवार उलगडणार आहे. प्रवहासोबत चालण्याची मजा अनुभव म्हणजे त्रास कमी होईल.

नवरा बायकोच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात ते काही खोटं नाही. तुमचीही गाठ तिथेच बांधलेली असेल.” भाग्यश्री तिला समजावून सांगत होती.

दोघींमध्ये पुढील बराचवेळ गप्पा रंगल्या. रात्री उशिरा दोघीजणी झोपल्या.

जय मात्र स्वतःच्याच घरात त्याच्याच रूममध्ये असून सुद्धा रेस्टलेस झाला होता. रूममध्ये सगळीकडे नजर फिरवत तो मनाशीच म्हणाला,

‘आता ही रूम माझ्या फक्त एकट्याची राहणार नाही. उद्यापासून ती सुद्धा या रूममध्ये असेल. आम्हाला दोघांना एकत्र राहणे किती अवघड जाईल. घरच्यांना कळायला नको म्हणून एकाच रूममध्ये रहावं लागेल. सत्यनारायण पूजेमुळे निदान आजचा एक दिवस तरी ती दुसरीकडे राहत आहे. उद्यापासून दुसरं कारण सुद्धा नसेल.

माझ्या मनात या फिलिंग्ज आहेत तर तिच्या मनात काय फिलिंग्ज असतील. मी तर माझ्याच घरात आहे तरी इतका रेस्टलेस झालो आहे. ती तर या घरात नवीन आहे, मग तिला काय वाटत असेल? तिचा फोन नंबर पण नाहीये, नाहीतर तिला विचारलं असतं.

आसावरी व शीतल वहिनी तिची चौकशी करत असतील, पण माझही काहीतरी कर्तव्य आहेच ना. जय रूमच्या बाहेर जाणार तोच त्याच्या डोक्यात आलं की, नको, नाहीतर माझ्या विचारपूस करण्याचा ती उगीच वेगळा अर्थ काढेल.’

जयची पाऊले जागीच थबकली.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.