Login

शुद्ध बीजापोट... भाग २

शुद्ध बीजापोटी... भाग २
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शुद्ध बीजापोटी... भाग २

मामा, शरद आणि आई शुभदा यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता . आपल्या परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होते. आपल्या मुलाचे यश पाहून शुभदाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.

"आज शशांकचे बाबा असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता." या विचाराने शुभदा भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली पण तिने डोळ्यातील अश्रू अलगदपणे टिपले.

मात्र शशांकच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाही.

"आई का रडते आहेस? शशांकने विचारले.

"अरे बाळा हे आनंदाश्रू आहेत रे."

"नाही आई, तुला बाबांची आठवण येत आहे. मलाही बाबांची खूप आठवण येते गं."

बोलता बोलता शशांकचेही डोळे भरून आले.

"पण तू काळजी करू नको. मी आहे ना."

त्याचे ते शब्द ऐकून शुभदाला आपल्या मुलाचा अभिमान वाटला. तिने शशांकला कवेत घेतलं आणि त्याच्या डोक्यावर अश्रूंचा अभिषेक केला.

" आई मला काही खायला दे ना गं. मला खूप भूक लागली आहे. आई उद्या मला निघायला हवं. उद्या माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे." शशांकने विषय बदलला.

शुभदा आणि मामाने बळेबळेच त्याला संमती दिली. दुसऱ्या दिवशी शशांकने जायच्या वेळी देवाला नमस्कार केला. आई आणि मामाला नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

"आई आणि मामा तुम्ही काळजी करू नका. सर्व व्यवस्थित होईल. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी वेळोवेळी फोन करीत राहिलंच." असं म्हणत त्याने आई व मामाचा निरोप घेतला.

' किती मोठं झालं आहे माझं पिल्लू.मलाच धीर देत आहे. किती परिपक्वता आली आहे शशांक मध्ये. एवढ्याशा वयात मोठ्या माणसासारखा बोलत आहे. खरंच आपण मुलांना दोन गोष्टी शिकवल्याच पाहिजेत. पैसे कसे कमवायचे आणि सांस्कृतिकदृष्ट्या पुढे कसे जायचे. जर आपण मुलांना फक्त पैसे कमवायचे शिकवले तर ते भौतिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकतात. परंतु त्यांच्यात भावनिक खोली, मानवी मूल्ये, नैतिकता किंवा आंतरिक समाधानाचा अभाव असेल. जर ते केवळ सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध झाले, परंतु आर्थिक कौशल्ये शिकले नाहीत तर त्यांना या आधुनिक जगात स्वतःला टिकवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. मला आज शशांकची आई असल्याचा खूप अभिमान वाटत आहे.'
शुभदा मनातल्या मनात विचार करत होती.

"अगं शुभदा कुठे हरवलीस?" शरद दादाने शुभदाला आवाज दिला.

" काही नाही रे. आपला शशांक आज इतका हळवा झाला होता की, त्याला आपल्याला सोडून निघावंसं वाटत नव्हतं."

पुढील भाग अवश्य वाचा.