Login

शुद्ध बीजापोटी भाग ३

शुद्ध बीजापोटी भाग ३
चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद लेखन
शुद्ध बीजापोटी... भाग ३

"अगं शुभदा, मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवावी लागत नाही. बऱ्याच गोष्टी ते संस्कारातून शिकतात. तुझे संस्कार चांगले होते. मी तुला लहानपणापासून पाहत आहे. आपल्या घरची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तुझं शिक्षण पूर्ण झालं नाही. तुला शिक्षणाची भारी आवड. पण तुझी ती इच्छा अपूर्णच राहिली.

तू शिक्षणात हुशार होतीस आणि त्यामुळेच आजही तुझे विचार खूप प्रगल्भ आहेत. तुझे संस्कार शशांकने घेतले. शशांकच्या वडिलांच्या आजारपणात तू त्यांची खूप काळजी घेतली. पण दैवाला काही वेगळेच मंजूर होते. त्यांच्या मृत्यू नंतर तुझ्या सासरच्यांनी तुला कोणतीच मदत केली नाही. जी काही थोडी फार शेती होती, त्यावरही त्यांनी आपलाच हक्क दाखवला. पण तू डगमगली नाहीस.

निस्वार्थी वृत्तीने स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिंमतीवर तू उभी राहिलीस. खरोखरच मला तुझा अभिमान आहे. आता मात्र शशांककडे पाहून आपल्याला सर्व विसरायला हवं. हस बघ आता."

" काय रे दादा, आधी रडवतोस आणि मग हसवतोही. चल आपण जेवण करू. स्वयंपाक तयार आहे."

" हो शुभदा, मलाही खूप भूक लागली आहे. " शुभदा व शरदने जेवण केले आणि झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेताना शुभदाने आपल्या दादा जवळ शशांकच्या लग्नाचा विषय काढला.

"दादा, मला वाटतं आता शशांकचे लग्न उरकून टाकायला हरकत नाही."

"हो शुभदा, पाहणी सुरू करूया.आपल्या शशांकला अनुरूप मुलगी मिळाली की, आपण त्याचे लग्न उरकून टाकू."

काही महिन्यातच एक चांगले स्थळ शशांकसाठी चालून आले. मुलगी अगदी शशांकला अनुरूप होती. तिचे विचार शशांकच्या विचाराशी मिळतेजुळते होते. शुभ्रा तिचे नाव. शुभ्रा एम. एस. सी. (गोल्ड मेडलिस्ट) होती. आदर्श शिक्षिका होण्याची तिची मनापासूनची इच्छा होती. म्हणून तिने बी.एड. केले आणि एका शाळेवर शिक्षिका म्हणून नुकतीच रुजू झाली होती.

शुभ्रा नावाप्रमाणेच निर्मळ मनाची मुलगी होती. पसंती झाली आणि लवकरच शशांक व शुभ्राचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले. शुभ्राला आपल्या घरच्या संपूर्ण परिस्थितीची माहिती शशांकने दिली होती, त्यामुळे आपल्या सासूबाईंविषयी व मामाविषयी तिच्या मनात आदर वाढला होता. आता शशांक व शुभ्रा दोघांनी मिळून नोकरीच्या ठिकाणी एक मोठे घर खरेदी केले व सासुबाई व मामांना तिथेच राहायला घेऊन आले.

सुरुवातीला शुभदा व शरदमामाने असंमती दर्शवली. कारण त्यांना गावी राहणे आवडत होते, परंतु शुभ्राने त्यांचे ऐकले नाही. आता संपूर्ण कुटुंब एकत्र आल्यामुळे सर्वच जण खूप आनंदी होते. मामाने आपल्या शिक्षणासाठी जमीन विकली या गोष्टीचे शशांकला खूप वाईट वाटत होते. मामाने आपल्यासाठी एवढा मोठा त्याग केला. त्याची परतफेड आपण करायलाच हवी.यासाठी शशांकने मामाच्या गावातीलच पाच एकर जमीन मामाच्या नावाने विकत घेतली.

पुढील भाग अवश्य वाचा.