Login

श्शू! आवाज कोणाचा? भाग ८

एक कथा
श्शू! आवाज कोणाचा? भाग ८

मागच्या भागात आपण बघीतलं की नयनाला बडबडताना बघून तिचे आईवडील घाबरले आणि त्यांना वेगळीच शंका आली. कोणती शंका ते आता बघू.

प्रतिक फ्रेश व्हायला गेला.नयनाच्या आईबाबांना खूप काळजी वाटायला लागली.

" अहो प्रतिकला मी सांगते की नयनाला बाहेरची बाधा असू शकते."

" काही नको. तुला माहिती आहे नं की प्रतिकचा अशा गोष्टींवर विश्वास नाही. माहिती आहे नं? मग हा विषय त्याच्याजवळ काढू नको."

" सकाळी ती स्वयंपाकवाली बाई पण म्हणाली मला. मला तर तिचं म्हणणं पटतंय."

" तुला अणि मला जरी हे पटत असलं तरी त्याला पटत नाही तर तो ऐकणार आहे का आपलं."

" असा कसा ऐकणार नाही? आपली मुलगी आहे आपल्याला नाही का तिची काळजी वाटणार?"

" बरोबर आहे तुमचं म्हणणं "

प्रतिकच्या आवाजाने दोघंही चपापले.प्रतिक कधी तिथे आला हे त्यांना कळलंच नाही.

" हे बघा मी विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. नयनाला अतिताणामुळे हा त्रास होतो आहे. मलापण नयनाची काळजी आहे."

" तुला नयनाची काळजी नाही असं आम्हाला म्हणायचं नाही."

नयनाच्या बाबांनी सावरून घेत प्रतिकला म्हटलं.

" प्रतिक ही बाजू पण आपण लक्षात घ्यायला हवी."

" कशाकरता? कशाकरता ही बाजू लक्षात घ्यायला हवी? डाॅक्टरांची औषधं चालू आहेत. अजून दोनतीन दिवस तिने चांगला आराम घेतला की सगळं व्यवस्थित होईल."

" प्रतिक या सृष्टीत जशा चांगल्या शक्ती आहेत तशाच वाईट शक्ती पण आहेत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही." नयनाची आई म्हणाली.

" अहो आई विज्ञान हीच सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. तिच्या आधारे ब-याच गोष्टी आपण सोडवू शकतो."

" विज्ञान चूक आहे असं आम्ही म्हणत नाही प्रतिक. पण कितीतरी उदाहरणं आपण बघतो.की जिथे विज्ञान थिटं पडतं."

" बाबा तुम्हाला त्या स्वयंपाक करणाऱ्या राधाबाईंनी काही सांगीतलं असेल तर ते विसरा. त्यांच्या बोलण्यात येऊ नका. हे गावंढळ लोक हे असलं काहीतरी पसरवतात."

" हे बघ प्रतिक त्या राधाबाईंनी त्यांच्या मनातील शंका माझ्या जवळ बोलून दाखवली.पण जेव्हा नयनाला असं विचित्र बडबडतांना बघीतलं तेव्हा माझ्याही मनात हीच शंका आली." नयनाची आई ठामपणे प्रतिकला म्हणाली.

" आई अहो तुम्ही पण त्या गावंढळ बाईवर विश्वास ठेवता! आपण कुठल्या शतकात राहतोय! विज्ञानाने किती प्रगती केली आहे. त्या विज्ञानामुळे मेडीकल सायन्स मध्ये कितीतरी नवीन शोध लागले आहेत. माणसाच्या शरीरातील कितीतरी रोगांवर उपाय शोधून काढले आहेत आणि तुम्ही त्या विज्ञानाला पर्यायाने मेडीकल सायन्सकडे असलेल्या ऊपचारांवर अविश्वास दाखवतात."
हे बोलताना प्रतिकच्या आवाजाला रागाची किनार होती.

"प्रतिक विज्ञानावर आमचा अविश्वास नाही. विज्ञानामुळे झालेल्या प्रगतीला आम्ही मानतो तरीही काही गोष्टी अजूनही विज्ञानाच्या कक्षेबाहेरच्या आहेत. त्या गोष्टी का आहेत याचा अजून शोध लागलेला नाही त्यामुळे त्या गोष्टींवर उपचार अजून आपल्याला सापडलेला नाही. मग अशा वेळी या विज्ञानाच्या कक्षेबाहेरच्या गोष्टींवर विश्वास का दाखवायचा नाही? आपण डाॅक्टरांचे उपचार घेतोच आहे तर हा पण उपाय का नाही करायचा?"

नयनाच्या आईने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.

" म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का नयनाच्या अंगात भूत शिरलय. त्या राधाबाई म्हणतात तसं नयनाला पछाडलय. "

" हो." आई म्हणाली.

" अजिबात तसं काही नाही." प्रतिकने आईचं म्हणणं उडवून लावलं.

" कोणाला पछाडलय?"

नयनाच्या आवाजाने तिघही चमकले.

" अरे नयना ये बस. कधी उठलीस? कसं वाटतंय आता?"

प्रतिकने सारवासारव करत नयनाला विचारलं.

" मी ठीक आहे. पण आत्ता तू नयनाला पछाडलय असं का म्हणालास?"

" मी ! मी म्हणालो. नाही ग. तू काही तरी चुकीचं ऐकलस."

" आई मला खरं सांग आत्ता तुमच्या मध्ये काय बोलणं चालू होतं? नयनाला पछाडलय असं प्रतिकला म्हटलेलं ऐकलं. ते चुकीचं ऐकलं नाही."
नयनाने आईजवळ येऊन विचारलं.

" बस बेटा." नयनाला आई म्हणाली.

" आई मला खरं खरं उत्तर दे."

नयना सोफ्यावर बसत म्हणाली.

प्रतिकच्या चेहे-यावर राग दिसत होता कारण त्याला हे सगळं नयनाच्या कानावर जाऊन ये असंच सतत वाटायचं.आता तिला समजावणं कठीण जाणार हे त्याच्या लक्षात आलं.

नयनाच्या बाबांच्या चेहे-यावर त्यांचा गोंधळ उडालेला आहे हे स्पष्ट दिसत होतं.

" आई मी काय विचारलं?"

" नयना "
आईने जरा चाचरत बोलायला सुरुवात केली.

" नयना बेटा तुझ्या कानात आवाज येतो असं तू म्हणतेस ते खरं आहे की डाॅक्टर म्हणतात तसं खूप ताणामुळे तुझी ही गोंधळलेली अवस्था झाली आहे यावर आम्ही बोलत होतो."

नयनाच्या आईने सारवासारव केली हे बघून प्रतिकला जरा बरं वाटलं.पण क्षणभरच कारण नयना लगेच रागाने बोलली,

" आई मला वेड लागलं नाही पण हा आवाज माझ्या कानात आणखी काही दिवस बोलला तर मला नक्की वेड लागेल. तुमचा माझ्यावर विश्वास नाही त्या डाॅक्टरवर विश्वास आहे. आता जर पुन्हा तो आवाज माझ्या कानात बोलला तर त्याला सांगेन बाई ग जे बोलायचं आहे ते इथे सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात बोल म्हणजे सगळ्यांचा विश्वास बसेल की कोणीतरी माझ्या कानात बोलतं."

एवढं बोलून नयनाला धाप‌ लागली. तिचा श्वासोच्छ्वास जोराने चालू लागला. तिला शांत करण्यासाठी आईने तिचा हात थोपटला.

" नयना फार विचार करू नकोस. आत्ता डाॅक्टरांच्या गोळ्यांमुळे तुला छान झोप लागली होती नं? पुन्हा हे विचार नको करुस"

प्रतिकच्या बोलण्यावर नयनाने रागाने त्याच्याकडे बघितलं.

" मला काय झालं आहे हे शोधण्याऐवजी तुम्ही सगळे आपापसात वादविवाद करत बसले आहे. माझ्या कानात येणारा आवाज कधी बंद होईल याचं मला उत्तर द्या. नाहीतर एक दिवस मी खरंच वेडी होईन."

एवढं बोलून नयना ढसाढसा रडू लागली. रडता रडता म्हणाली,

" आई बाबा मला वेडं व्हायचं नाही. प्रतिक काहीतरी उपाय शोध. मला वेड व्हायचं नाही. मला वेडं व्हायचं नाही"

असं म्हणत नयना आईच्या मांडीवर कोसळली.
नयनाच्या या बोलण्याने तिघही फार व्यथित झाले. नयनाचं मला वेडं व्हायचं नाही हे रडत म्हटलेल्या शब्दातून तिची अगतिकता त्या तिघांना दिसून आली.

नयना या गोष्टी मुळे फार थकली आहे हे तिघांच्याही लक्षात आलं.

" प्रतिक"
नयनाच्या बाबांनी प्रतिकला हळूच हाक मारली

" काय?" हातानी खुण करून प्रतिकने विचारलं.
"
जरा तिकडे चल मला तुझ्याशी बोलायचं आहे"

हे बाबांनी हाताच्या खाणाखुणा करून प्रतिकला सांगीतलं.

दोघेही उठून प्रतिकच्या बेडरूमच्या बाल्कनीत गेले.
नयना अजूनही रडतच होती. तिचे हुंदके ऐकून आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं.

****

" प्रतिक तू विज्ञान निष्ठा आहेस पण काही गोष्टी निसर्गातील अशा आहेत की या विज्ञानाचे हात तिथपर्यंत पोहचत नाहीत अजूनही पोचलेले नाही. तुला हे पटत नसेल पण आम्ही या गोष्टी मानतो. आम्ही विज्ञानाला चूक ठरवत नाही पण काही गोष्टी अशा घडतात की त्यावर विज्ञान काहीच उपाय पुढे करू शकत नाही. मी हात जोडून तुला विनंती करतो की तुला मान्य नसलं तरी आमच्या साठी हो म्हण. नयना आमची एकुलती एक मुलगी आहे. विज्ञान खरं की त्या विचित्र शक्तींचं अस्तित्व खरं या वादामुळे तिला खरच वेड लागलं तर आपल्याला परवडणार नाही. आमच्या डोळ्यांदेखत आमची चांगली शहाणी सवलती मुलगी तिची काही चूक नसताना आपल्यातील वादांमुळे योग्य उपचार न झाल्याने तिचं आयुष्य ती घालवून बसेल. असं झालं तर तिच्यावर आपण केलेला अन्याय असेल आणि आमच्यावरही हा अन्यायच ठरेल. हे असं घडलं तर आम्ही आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. डाॅक्टरांबरोबर हाही उपाय करून बघू. मी हात जोडतो "

नयनाच्या बाबांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं ते न पुसता त्यांनी आपले हात प्रतिक समोर जोडले. त्यांचे हात थरथरत कापत होते.

" रडू नका बाबा मी तयार आहे. तुमच्या प्रमाणे नयना माझ्यासाठी पण महत्वाची आहे. तुम्ही म्हणाल तो उपाय आपण करू.

प्रतिकने त्यांचे हात धरत म्हटलं. प्रतिक बोलतच होता की दोघांच्या कानावर नयनाचं ओरडणं आलं.ते ऐकून दोघंही घाई घाईने समोरच्या खोलीकडे धावले.

" तू जात का नाहीस? तू माझ्या कानात बोलते हे या लोकांना खोटं वाटतं."

नयनाचे डोळे वटारले होते. चेहरा रागाने फुलून गेला होता. नयनाची आई चांगलीच घाबरली होती.

" बोल नं मोठ्याने बोल. माझ्या आईबाबांना नव-याला ऐकू जाऊ दे तुझा आवाज म्हणजे त्यांना खरं वाटेल."

हे बोलताना नयना कुठेतरी भलतीकडेच बघत होती.

" तू मला नको सांगू. मी वेडी नाही मला कळतं. मला माझं आयुष्य जगू दे. "

हे बोलताना नयनाने रागाने मुठी आवळल्या. ती रागाने थरथर कापत होती. अचानक रडायला लागली.रडता रडता म्हणायला लागली,

" मला जगायचंय.मला वेडं व्हायचं नाही. माझा पिच्छा सोड. तू जा .मला माहिती नाही तुझ्या बाबतीत काय घडलं ते .मला नाही जाणून घ्यायचं. तू जा."

" तुझं माझ्यासारखं होऊ नये म्हणून मी सारखी तुला सांगते आहे. तू का ऐकत नाही? तुला वेड लागावं असं मला वाटत नाही."

" तू जर सतत माझ्या कानाशी बोलली तर तुला वाटतं नसलं तरी मला एक दिवस वेड लागेल. मला वेड लागलं तर माझा नवरा मला ठेवेल का? तू तर भटकतेय मी पण जाऊ का वेड्यांच्या दवाखान्यात?"

हे नयनाचं वाक्य ऐकल्यावर प्रतिकच्या मनाचा थरकाप उडाला.

" असं काही होणार नाही.मी तुला सांगते तसं वागलीस की बघ काही दिवसात तुझ्या ऑफीसमधले तुझ्या बद्दल नको नको ते बोलणारे लोक कसे गप्प होतात ते. ते गप्प बसले की मी निघून जाईन. पण तू ऐकतच नाहीस. मी आले की तू आरडाओरडा करते." आवाज म्हणाला.

" मला काही कोणाला अद्दल घडवायची नाही. तू जा. मला शांत पणे जगू दे.जा."

एवढं बोलून हंबरडा फोडून नयना सोफ्यावर कोसळली. प्रतिक चटकन पुढे धावला.नयनाला सरळ केलं हळुच प्रतिकने नयनाला उभं करून हळूहळू तिला सावरत बेडरूममध्ये घेऊन गेला.

नयनाचे आईबाबा सोफ्यावर कोसळल्या सारखे धप्पकन बसले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. नयनाच्या एकेक शब्दाने त्यांचं मन चरकलं.

"ऐकलस नयनाच्या या अवस्थेवर आता उपाय करायलाच हवा. मी बोललो आत्ता प्रतिकशी तो तयार झाला आहे."

" खरच तयार आहे का? मला माझ्या लेकीची काळजी लागली आहे. तिची आत्ताची अवस्था बघून आणि तिचं बोलणं ऐकून काळजाचं पाणी पाणी झालं हो. मला माझी लेक हातातून जाऊ द्यायची नाही. तो प्रतिक तयार झाला नाही तरी आपण नयनावर उपाय करू. चुलीत गेलं त्याचं विज्ञान."

शेवटचं वाक्य बोलताना आईच्या आवाजात प्रतिकबद्दलचा राग व्यक्त झाला.

" आई मी तयार आहे. तुम्ही यावर काय उपाय करायचा तो शोधा. नयना मला पण हवी आहे. माझं खूप प्रेम आहे हो तिच्यावर. तिला मी वेड्यांच्या दवाखान्यात नाही बघू शकणार. तुम्ही उपाय शोधा."

हे बोलून प्रतिक आपले डोळे पुसत घाईने बेडरूममध्ये निघून गेला.

नयनाच्या बाबांनी आपल्या बायकोचा हात हळूच थोपटला. प्रतिकने परवानगी दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण बराच निवळला.
_________________________________
प्रतिक आणि नयनाच्या आई बाबांना नयनाच्या या अवस्थेवर उपाय करणारा कोणी मिळेल का? बघू पुढील भागात.


0

🎭 Series Post

View all