शून्यातून..!
'शून्य' ही संकल्पना प्राचीन काळापासून महत्त्वाची व महत्त्वाचे स्थान असलेली संख्या आहे. शून्यामुळे संख्येच्या किमतीत होणारा बदल प्रथम दर्शनी नजरेस पडतो. एखाद्या संख्येत उजव्या बाजूला शून्य असल्यास त्या संख्येची किंमत बदलते. तसेचं डाव्या बाजूला असल्यास त्याची किंमत बदलत नाही. शून्य ही संकल्पना गणितशास्त्रात एक संख्या व स्थान मूल्य दर्शक म्हणून वापरली जाते. अशा या शून्याचे महत्त्व गणितशास्त्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हा 'शून्य' मानवी मनावरही एकंदरीत मानवी अस्तित्वावरही आपली छाप सोडून जातो. मानवी अस्तित्वातील नकारात्मक भाग या शून्यांनी व्यापलेला आहे, असं दर्शवल्या जाते. "माझं अस्तित्व मी शून्यातून निर्माण केलेल आहे" असे वक्तांच्या भाषणातून, दैनंदिन जीवनात, बऱ्याचदा व्यक्तीच्या तोंडातून शून्याला घेऊन निघालेले शब्द, शून्याच महत्त्व दर्शवतात.आपण हे ऐकलेलं असते. आपल्याजवळ सर्व काही असूनही आपली किंमत ही शून्य धरल्या जाते. म्हणावं तसे महत्त्व स्वतःच्या रहात्या घरातही दिल्या जात नाही. पद, पैसा, प्रॉपर्टी, सरकारी नोकरी, शेतीवाडी अशा बऱ्याच गोष्टीला घेऊन माणसाची किंमत ठरलेली असते. गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय,अति श्रीमंत असले शब्द वापरले जातात. यावरून स्वतःचा रुबाब समाजामध्ये निर्माण केला जातो. येथे कुठेही तुमचा स्वभाव, तुमची इतरांप्रती असलेली दयाळूवृत्ती, सहकार्यवृत्ती, प्रेमळपणा, सामाजिक बांधिलकी या मूल्यांना दुर्लक्षित करून, नको त्या गोष्टीला महत्त्व दिल्या जाते. पैशाला महत्त्व मोठ्या प्रमाणात दिले जाते. पैसा नसला की आपलेही अनोळखी बनतात. आणि पैसा असला की अनोळखीही आपले नातेवाईक किंवा मित्र बनवून मिरवतात हेच दृश्य सहसा बघायला मिळते. आपण पैसे कमावणारे असलो तर घरातही आपला मोठा आदर केला जातो. मात्र जे पैसे कमवू शकत नाही त्यांना कमी लेखल्या जाते. ही सत्य परिस्थिती आहे. असे व्यक्ती स्वतःला अपयशी न समजता, स्वतःला सिद्ध करण्याचा, स्वतःला घडवण्याचा, काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. जे यशस्वी नाही अशांना शून्य धरल्या जाते. हे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ज्यांच्याकडे मोठे घर, मौल्यवान वस्तू सुख सुविधा नसतात, अशांना किंमत दिला जात नाही. मात्र ज्यांच्याकडे या सुख सुविधा नाही, असे लोक आपल विश्व तयार करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. रोज रोज नवीन काही शिकून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. रोज नवीन शिकत स्वतःला घडवत असतात. शून्यातून सुरुवात केलेल्या व्यक्तीला, पुन्हा आयुष्यात शून्य होण्याची कधीच भीती वाटत नाही. सतत येणाऱ्या अपयशाला ही ते घाबरत नसतात. कारण त्याच्याकडे असं काही गमावण्याकरिता राहतच नाही. आयुष्यात मिळणारा प्रत्येक अनुभव काहींना काही शिकवतो हे त्यांना कळतं असते. सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मिळणारे यश अपयश असे प्रत्येक अनुभव महत्त्वपूर्ण वाटतं असतात. कारण आपण स्वतःच्या चुकांमधून शिकत आहोत, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीला इतरांना दोष देण्यासाठी वेळ नसतो. तर असे व्यक्ती स्वतःला घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये सतत गुंतलेले असतात. कारण त्यांना माहित असते की आपल्या आयुष्याची दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास आपल्याला कधीच मन:शांती मिळणार नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहावे. हा मूलमंत्र जणू त्यांनी त्यांच्या अंतर्मनामध्ये बिंबवलेला असतो. 'कर्म माझे भाग्य आहे' या विश्वासाने, विचाराने जगणारा कधीही हरत नाही. आणि तसेही म्हणतात ना दवाखाना कितीही मोठा असला तरी मनावर झालेले घाव रिपोर्ट मध्ये कधीही येत नाही. मनातील घाव सहसा कोणाला दिसत नाही. शंभर शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. शून्य हा अंक लहान आहे मात्र त्याची किंमत जेव्हा पुढे लागते, तेव्हा त्याची किंमत ही वाढतेच. जेव्हा जेव्हा अंकांच्या पुढे शून्य लागत जातात तसा त्याचा मूल्यांकन व मूल्य भाव हा सतत वाढणारच असतो. ही वाढ म्हणजे प्रगती होय. याच प्रसंगातून मानवी मन सतत स्वतःला घडवत, स्वतःला सिद्ध करत, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे पुढे सरकत जाते. कधी कोणाचे बोलणे तर कधी कोणाचा नि:शब्द पणा मनावर शब्दासारखा वार करतो. म्हणूनच तर म्हणतात ना ओळख लहान असली तरी चालते फक्त स्वतःच्या जीवावर असली पाहिजे. यश मिळवण्याची जिद्द असले की धाडसाने आकाशापर्यंत ही उडता येते. आणि आपण कासवाची गोष्ट ऐकलेली आहे. कासव शर्यत जिंकतो कारण तो सावकाश का होईना मात्र तो सतत चालत राहतो. कासवाचं हे उदाहरण आयुष्याला कलाटणी देणार आहे. आपल्याला जे आवडते ते आपण सतत करत राहिल पाहिजे. मग त्यात यश मिळो किंवा अपयश. मात्र ते काम आपल्याला आवडते हा आनंदच आपल्याला जगणं शिकून जात असतो. बऱ्याचदा मार्गामध्ये आडवं बोलणारे. त्रास देणारे. दूरची किंवा जवळची मंडळी ही भेटतच राहणार.आपण त्यांचे बोलणे जास्त मनावर न घेता आपला जगण्याचा प्रवास सतत सुरू ठेवावा. कोणाच्या जीवाला लागतील अशी शब्द बोलून कोणाला दुःख देऊ नये. आणि तसेच कितीही जपले कुणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव. अन तेव्हाच खरे कडून येतात स्वभाव हेही तितकेच खरे आहे. कधीही कोणाच्या दिसण्यावर जाऊ नये. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. आपण जसे आहोत तसाच,आपला साधेपणा जपावा. माणसाचे दिवस बदलत असतात म्हणून सहनशक्ती ठेवावी. कारण आजची ही परिस्थिती उद्या राहणार नसते. आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक संधीला संधी द्यावी. मग त्यामुळे होणार असे की पश्चाताप करण्यासाठी जागाच मिळणार नाही. प्रत्येक जन जन्मताच कोणत्या ना कोणत्या कामात उत्कृष्ट असतो. आपली आवड बघून, आपल्याला आवडणार काम करावं. स्वप्नं आपण रोज जरी बघितली तरी ते जादू सारखे, चमत्कार करत, काही वास्तवात उतरवता येत नाही. यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे करावेच लागणार आहे. म्हणून कोण काय बोलतो. कोण काय करतो. याकडे जास्त लक्ष देऊ नये. आपल्याला जरी कोणी शून्य समजत असेल. मात्र आपण सतत पुढे चालत राहावे. जे आपल्याला त्रास देतात. आपल्याला चिडवत राहतात. आपल्या मार्गात अडथळे आणतात, यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. पण त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करावा. हा धडा आपला यशातून त्यांना शिकता यायला हवा. एक असंही आहे की विसरण्याची सवय महत्त्वाची. कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. म्हणूनच झालं ते विसरून जायचं आणि पुढे चालत रहायचं. हे आयुष्याचा गमक आहे. सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडलो तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नये. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. सहनशक्ती ठेवावी. आजची परिस्थिती उद्या राहणार नसते. काहीही झाले तरी जिद्द सोडू नका, आपण जिंकणार हा विचाराने कामाला सुरुवात करा.किंमत त्याची करा, जो पाठी मागेही आपली किंमत करतो..!
शून्यातून स्वतःच अस्तित्व
घडवण्याचा अनुभवाचा प्रवास
माणसाला मजबूत आणि
समजूतदार बनवत असतो..!
घडवण्याचा अनुभवाचा प्रवास
माणसाला मजबूत आणि
समजूतदार बनवत असतो..!
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
मूर्तिजापूर, जि अकोला
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा