Login

श्शू...! आवाज कोणाचा? भाग ५

एका स्त्रीची कथा
श्शू…! आवाज कोणाचा? भाग ५

मागच्या भागात आपण बघीतलं की बेडरूम पाशी आल्यावर प्रतिक थबकला.त्याने असं काय बघीतलं? बघू या भागात

प्रतिक बेडरूमच्या दारातच थबकला. त्याने नयनाला पुन्हा तसंच बडबडतांना बघीतलं.

" मी तुला कितीदा सांगितलं की तू मला त्रास देऊ नकोस."

" मी तुला त्रास नाही देत. मी तुला सांगतेय की तू कसं वागायचं ते." आवाज म्हणाला.

" तू नको सांगू मला मी कसं वागायचं ते. मला कळतं."
नयना चिडून म्हणाली.

" चिडू नकोस.तू तुझ्या कामात किती वाकबगार आहेस हे तुलाही माहिती आहे. तरी तुझे साहेब आणि ऑफीसमधले का तुझ्याशी विचित्र वागतात."

" ते कितीही विचित्र वागले तरी मला फरक पडत नाही. तू जा ग. नसतं ज्ञान मला देऊ नकोस."

हे बोलताना नयनाचा आवाज चिरकला.

" अजूनही वेळ गेली नाही. तू अरेला कारे करायला शिक. नाहीतर तुला हे सगळे लोक राबवून घेतील आणि श्रेय स्वतः कडे घेतील."

" घेऊ दे.मला काम करण्यात आनंद मिळतो. मला ऑफीसमध्ये काय चालतं सगळं कळतंय. तू नको सांगू. आणि तुला हे सगळं कसं माहिती?"
नयनाने विचारलं.

" मी चोवीस तास तुझ्या आसपास असते. तुझा क्षणोक्षणी होणारा अपमान, होणारी चेष्टा मला बघवत नाही. तुझ्याबद्दल बाकी लोक काय बोलतात ते मला कळतं म्हणून मला त्यांचा राग येतो." आवाज म्हणाला.

" त्यांचं वागणं तुला का बघवत नाही? "

" माझ्या बाबतीत सुध्दा असंच सगळं घडलं होतं.जे सध्या तुझ्या बाबतीत घडतंय. म्हणून माझा जीव तुटतो. म्हणून तुला सावध करायला मी आले. माझा उद्देश तुला त्रास देण्याचा नाही."

" मला सांग तुझ्या बाबतीत घडलेलं माझ्या बाबतीत घडतंय म्हणून तुझा जीव का तुटतो आहे? तू माझी कोण? कोणी नाहीस. मला फक्त तुझा आवाज ऐकू येतो. तू कुठे दिसतेस? मला असा त्रास देण्याचा तुला अधिकार नाही. तू जा. मला माझं आयुष्य जगू दे."

" मी फक्त तुला सांगतेय तू काय करायचं. तू तुझं आयुष्य जग पण ते जगताना तू ज्या चुका करते आहेस त्या करू नकोस. हेच मला सांगायचं आहे."

त्या आवाजात नयना बद्दलची काळजी नयनाला जाणवली पण ते जाणवल्यामुळेही नयना आणखी धास्तावली.

कोणी समोर दिसत नाही फक्त आवाज ऐकू येतो. बोलण्यातून कळतं तो आवाज स्त्रीचा आहे. त्या अनोळखी आवाजात आपल्या बद्दलची काळजी जाणवून नयना आणखी घाबरली.

एवढं बोलून नयना तोंडावर हात ठेवत रडत पलंगावर बसली.

" रडू नकोस.शांत रहा.माझं ऐक." आवाज म्हणाला.

तोपर्यंत प्रतिक भानावर आला. तो लगेच आत शिरला.

" नयना काय झालं? रडतेस का?"

" वैतागले मी आता. हा आवाज मला शांतपणे जगू देणार नाही असं वाटतं."

आणि रडायला लागली.

प्रतिक तिच्याजवळ पलंगावर बसला.

" नयना आज आपण डाॅक्टर कडे जाऊन येऊ."

" डाॅक्टर कडे कशाला? मी आजारी थोडीच आहे?"

नयना प्रतिककडे विचित्र नजरेने बघायला लागली.

" अगं तू आजारी नाही हे मला माहिती आहे. मला वाटतं तुला खूप ताण आलाय त्यामुळे असं होतंय. त्यावर जर डाॅक्टरांनी काही औषधं दिलीत तर तुला लवकर बरं वाटेल. म्हणून जाऊ असं म्हणतोय."

प्रतीकने खूप हळूवारपणे तिला समजावलं.

" माझ्या कानात कोणाचा आवाज येतो हे थोडी कळणार आहे डाॅक्टरांना. ते आणखी काही वेडेवाकडे प्रश्न विचारतील.नको.मी नाही येणार."

नयना रडत रडतच म्हणाली.

" असं काही नाही होणार. तुला जो ताण आला आहे त्यामुळे तुला स्वस्थ झोप लागत नाही म्हणून हे सगळं होतंय.तुला शांत झोप लागावी आणि तुझ्यावरच ताण जावा म्हणून डाॅक्टर काही औषधं देतील तर तुला बरं वाटेल म्हणून जाऊ या डाॅक्टरांकडे."

आताही न चिडता प्रतिकने नयनाला म्हटलं.

नयनाची अस्वस्थ चुळबूळ चालूच होती. प्रतिक तिची चुळबूळ बघत होता पण काही बोलला नाही फक्त तिला जवळ घेऊन तिला थोपटू लागला.

नयना पेक्षा प्रतिकलाच आता ताण यायला लागला. नयनाला हे काय झालं असेल हेच त्याला कळत नव्हतं. असा कोणता ताण नयनाने घेतलाय की अशी पछाडल्या सारखी करतेय. पछाडल्या सारखी हा शब्द मनात येताच प्रतिक दचकला. एका अनामिक भीतीने त्याचं सगळं शरीर शहारलं.

प्रतिक विज्ञानावर विश्वास ठेवणारा असल्याने तो या सगळ्या गोष्टींना महत्व देणारा नव्हता.तरीही हा शब्द आपल्या मनात कसा आला याचं त्याला आश्चर्य वाटलं.

नयनाचं काम खूप चांगलं असल्याने तिचे साहेब नयनावर खूश आहेत. हेच काहीजणांना बघवत नाही. कोणाला बघवत नाही हे सुद्धा नयनाला माहिती आहे. तिनेच प्रतिकला त्यांची नावं सांगितली होती. नयना त्यांना एवढं महत्त्व द्यायची नाही मग आता त्यापेक्षा जास्त कोणता ताण नयनाला आला असेल?

प्रतिक विचार करून थकला. त्याने बघीतलं नयनाचा डोळा लागलेला दिसला. प्रतिकने हळूच उठताना नयनाला पलंगावर ठेवलं . तिच्या अंगावर पांघरूण घातलं आणि पावलांचा आवाज न करता खोलीबाहेर पडला.

प्रतिकचं आता काम करण्याची इच्छा होईना पण काम तर करावी लागणार होतं. पोटासाठी करावं लागेल काम. हे मनात आलं ना शेवटी तो काम करायला बसला.

***
प्रतिक काम करत असताना नयनाचा फोन वाजला. प्रतिकने बघीतलं तर पुन्हा नयनाच्या आईचा फोन आलेला दिसला. प्रतिकने फोन घेतला.

" हॅलो."

" नयना उठली का?" आईने विचारलं.

" नाही उठली अजून."

" अजून नाही उठली? सकाळचे दहा वाजले अजून झोपली आहे?"

नयनाच्या आईचा प्रश्न ऐकून प्रतिकला आश्चर्य वाटलं. आपली मुलगी बरं नाही म्हणून झोपली आहे तर तिला झोपू द्या. आराम करू द्या असं म्हणण्याऐवजी नयना अजून उठली नाही हा प्रश्न या कसा विचारू शकतात. हा प्रश्न प्रतिकच्या मनात आला तेव्हाच नयनाची आई बोलल्या,

" एकदा उठवून बघा नयनाला. बघा काय झालं आहे तिला. बरं नसलं तरी ती एवढ्या वेळ झोपून रहात नाही."

" आत्ताच मी तिला उठवलं होतं तर ती म्हणाली जरावेळाने उठते."

" होका! मग ती उठल्यावर लगेच मला फोन करा. ती नाही म्हणाली तरी फोन करा." नयनाच्या आईने हे वाक्य ठासून म्हटलं.

" नयना नाही कशाला म्हणेल? करेल ती फोन. ती उठली की मीच फोन करतो. "

" नयनाचा स्वभाव असाच आहे तुला अजून कळलेला नाही. एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी कशाला आईला करायचा फोन असं तिचं म्हणणं असतं."

" ते बरोबरच आहे." प्रतिक म्हणाला.तसं त्या लगेच बोलल्या,

" बरोबर कसं आहे? आत्ता मी फोन केला नसता तर मला कळलंच नसतं नयना आजारी आहे म्हणून."

" आई छोट्या छोट्या गोष्टींसाठी कशाला तुम्हाला फोन करायचा. ऊगीच तुम्हाला काळजी लागून राहील म्हणून नयना सांगत नाही."

"आईवडील आहोत आम्ही तिचे. काळजी करणं आमचं कामच आहे."

नयनाच्या आईच्या या वाक्यावर प्रतिकला प्रश्न पडला की मुलांची आईवडिलांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे पण काळजी वाटणं हे काम कसं असू शकतं!

" तू सुद्धा झोपलास का?" या त्यांच्या प्रश्नांवर प्रतिक दचकून विचारातून बाहेर आला.

" नाही हो मी काम करतोय. मी नयना उठली की फोन करतो."

" अरे! साॅरी माझ्या लक्षात आलं नाही. करा तुमचं काम. नयना उठली की फोन करा."

असं म्हणून नयनाच्या आईने फोन ठेवला .प्रतिकला त्यांनी फोन ठेवल्यामुळे बरं वाटलं आधीच त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं त्यात त्यांचं सविस्तर बोलणं ऐकणं त्याला नकोस वाटलं. म्हणून त्याने मुद्दाम सांगीतलं की तो काम करतोय. हे सांगताना त्याला योग्य वाटत नव्हतं पण नयनाच्या आईला खूपच सविस्तर बोलायची सवय असल्याने त्याला नाईलाजाने सांगावं लागलं. त्यांनी फोन ठेवल्यावर प्रतिकने एक दीर्घ श्वास घेतला आणि सोडला तेव्हा त्याला जरा बरं वाटलं.

तो नेटाने ऑफीसचं काम करायला लागला.

***

प्रतिकचं कामात लक्ष लागतं न लागतं तोच पुन्हा त्याचा फोन वाजला.त्याने मान तिरकी करून कोणाचा फोन आहे हे बघण्याचा प्रयत्न केला तर स्क्रीनवर प्रतिकच्या कलिगचं हितेशचं नाव स्क्रीन वर ओळखलं.प्रतिकने लगेच फोन घेतला.

" हॅलो" फोन घेत प्रतिक म्हणाला.

" गुड मॉर्निंग.कधी येतोय ऑफीसला?"

हितेश ने विचारलं.

"आज संध्याकाळी नयनाला डाॅक्टरकडे घेऊन जातोय.बघू ते काय म्हणतात.त्यांच्या औषधाने नयना ठीक झाली तर मी परवा येतो ऑफीसला."

" ये बाबा लवकर. आपला बाॅस जाम टेन्शन मध्ये आलाय.."

" टेन्शन मध्ये? का?"

" अरे ते परदेशातील लोक येणार होते नं त्याचं फायनल झालय. पुढल्या आठवड्यात ते सगळे इथे भारतात येतात आहे. त्यांच्यासमोर प्रेझेन्टेशन तुला द्यायचंय ."

" मला? अरे माझी काही तयारी नाही."

" मग कर बाबा तयारी. बाॅसला तुझ्या वरच विश्वास आहे."

" मी बोलतो आज बाॅसशी. एवढ्यासाठीच केला होता का फोन?" प्रतिक ने नाईलाजाने विचारलं.आज त्याला कोणाशीच फोनवर बोलायची इच्छा नव्हती कारण त्याच्या डोक्यात नयनांचे विचार चालू होते.

" हो.याच्यापेक्षा दुसरं कुठलं काम महत्वाचं आहे? चल ठेवतो."

असं बोलून हितेश ने फोन ठेवला. तसं प्रतिकला बरं वाटलं. खरतर त्याला सुट्टी घ्यायची होती पण सुट्टी मिळणार नाही हे माहिती असल्याने त्याने काल ऑफीसमध्ये येणार नसल्याचं कळवलं तेव्हा एका अक्षरानेही सुट्टी बद्दल विचारणा केली नव्हती.
आज संध्याकाळी डाॅक्टरांकडे जाऊन आल्यानंतर आपलं डोकं शांत होणार आहे हे त्याच्या लक्षात आलं.

शेवटी तोही कामाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायला लागला.

__________________________________
डाॅक्टर काय सांगतील? प्रतिकला बरं वाटेल का बघू पुढील भागात.


0

🎭 Series Post

View all