Login

श्वास घेण्यास कारण की... भाग 15

Story Of Two Different Souls
श्वास घेण्यास कारण की... भाग 15


अभिमान ने अपूर्वाला डिनरसाठी इन्व्हाईट केले आणि तिला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला..
"आजकाल साहेबांचा दिवस कुठून उगवतोय काय माहीत, मला घ्यायला काय बोलावतोय, कॉफी काय... त्यानंतर गाडीतून बाहेर पडताना हात काय दिला आणि आज चक्क डिनर... काहीतरी बोलायचं आहे म्हणाला, आमच्या दोघांबद्दल म्हणत असेल का? तसेही हॉस्पिटलमध्ये सगळेजण आमच्याकडे कपल म्हणूनच बघतात... तो मला, मी त्याला किती अनुरुप आहोत.. पण त्याच्या नजरेत मला कधीच प्रेम दिसलं नाही..जे...मला..." तिने क्षणात तिचे विचार थांबवले आणि आवंढा गिळला. तिच्या समोर अचानक तिला ती सिंगापोरच्या सोलो ट्रिप ला गेलेली असताना, दुःखात बुडालेला तो भेटला होता तिला...काय नाव होतं बरं त्याचं..अम्म्म... संकेत..संकेत द्रविड...
"खरंच असा अचानक का आठवला मला तो?" ती परत विचारात बुडाली..
त्याचं झालं असं...
इतके दिवस अभिमानवर प्रेम करूनही त्याच्याकडून योग्य तो रिस्पॉन्स मिळाला नव्हता म्हणून ती वैतागली होती..नेमकं काय करायचं तिला कळत नव्हतं..शेवटी तिने  तिच्या मनातील भावना व्यक्त करायचं ठरवलं..पण ती काही बोलायच्या आधीच अभिमान आणि माईंचं बोलणं तिच्या कानावर पडलं... अभिमान माईंना स्पष्ट सांगत होता, मला कोणाबद्दल काहीच वाटत नाही माई, मी आणि माझं काम..जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेल आणि पहिल्यांदा येऊन तुला सांगेन...पण आता सध्या नाही म्हणजे नाही...

अपूर्वा ला परत एकदा भ्रमनिरास झाला होता..."का करतोय इतकं सगळं आपण? अभिमान हॉस्पिटल हे आपलं नसूनसुद्धा जीवतोडुन इथे मेहनत घेतोय... माईंचं हे गायनक अँड मॅटर्निटी डिपार्टमेंट हक्काने सांभाळतोय....या वेळात आणि इतक्या मेहनतीत आपलं स्वतःचं छोटंसं पण का होईना क्लीनिक झालं असतंच की? चुकीच्या मार्गाने जातेय का मी? अभिमान नाही तर नाही, खरंतर आत्तापर्यंत माईंनीही माझं नाव का सुचवलं नसेल अभिमानला?" एक ना हजार प्रश्न..आणि त्यांची उत्तरं तरी कशी मिळणार..म्हणून कंटाळून आणि शांत डोक्याने विचार करण्यासाठी तिने सुट्टी घेतली व सिंगापोर फिरून यायचा विचार केला होता.. तेव्हाही अगदी तेव्हाही माईंना आणि अभि ला एकच काळजी.. ती नसे पर्यंत त्यांचं गायनक डिपार्टमेंट कोण सांभाळणार याची...म्हणून निघतानाही ती नाराजच होती आणि अचानक फ्लाईट मध्ये तिची गाठ पडली ती संकेत द्रविडशी..हो ... तोच तो..नचिकेत चा भाऊ..

आताही अभिमानसोबत डिनर ला जायचं म्हणून आवरताना..तिला का कुणास ठाऊक आठवण आली त्याची...काय करत असेल तो आता? नंबर एक्सचेंज केले असते तर किती बरं झालं असतं? किती व्यवस्थित समजावून सांगितलं होतं त्याने आपल्याला... असो.. देव करो आणि लवकरच गाठ पडो.. आता आज हे अभिमान महाशय काय म्हणतात बघावं लागेल... ती कपबोर्ड मधून काळ्या रंगाची साडी काढत म्हणाली...

"ब्लॅक इज अ रिअल ब्युटी..आय विल विअर दीज ओन्ली" इकडे सानुने काळ्या रंगाचाच knee length वन पीस घातला..त्या ड्रेस मध्ये ती अगदी बाहुली सारखी दिसत होती.. ठेंगणी, सडपातळ, लांबसडक केसांना फक्त एक एक बट घेऊन क्लिप मध्ये अडकवून मोकळे सोडलेले, नैसर्गिक गुलाबी ओठ..आणि सर्वात उठून दिसणाऱ्या तिच्या पाणीदार बोलक्या डोळ्यांवर काजळाची एक हलकीशी बारीक रेष...
सानु ला फोन आला नचिकेतचा तो तिला घ्यायला येत असल्याचा..आणि ती बाहेर आली.
"व्वा सानु, मी गिफ्ट केलेला ड्रेस आहे ना हा..मस्त दिसतेस...आज संकेत भाई तर फ्लॅट होणार बघ तुला पाहून..आधीच किती खुश होता तू येणार म्हणून.."
"ऐ तू गप रे...केयु कुठेय.." सानु  गाडीचा बेल्ट लावत म्हणाली..
"ती परस्पर येणार आहे..आणि संकेत भाई ही त्याची मिटिंग आटोपली की येतो म्हणाला..."
"हं मग ठीक आहे, ऐ पण आज भारी वाटतंय बरं का मला.. किती दिवसांनी इतकं छान आवरलं..आज एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय.."
"हो..म्हणूनच तर हा प्लॅन केला ना.. नाहीतर बसली असतीस त्या डॉक्तर च्या आठवणीत.."
"काय??? काय म्हणालास?"
"अगं म्हणजे, त्या हॉस्पिटलमध्ये जे काही घडलंय त्याचा तुला त्रास होत असेल ना विचार करून करून म्हणून म्हंटलं मी..."
"हं...."

बोलत बोलत ते दोघेही ग्रीन पार्क मध्ये पोहोचले...
ग्रीन पार्कमध्ये अभिमान आणि अपूर्वा नुकतेच पोहोचले होते.. ते फॅमिली केबिनमध्ये बसले होते..पण केबिन च्या काचेतून बाहेरचं सगळं दिसत होतं..
बोलता बोलता अभिमान ची नजर बाहेरच्या लॉन वर पडली आणि तो बघतच राहिला.. हे दोघे इथेही?
सानिका किती छान दिसत होती..अगदी छोटी बाहुली..आणि नचिकेत बोलता बोलता तिला क्षणाक्षणाला हसवत होता...कितीतरी दिवसांनी ती किती हसत होती.. हसताना तिचे पांढरे शुभ्र दात आणि नाजूक जीवणीची हालचाल अभिमानला मोहवून टाकत होती...
पण इकडे अभिमानच्या चेहरा पारच उतरला..
"आपण इकडे इतके नाराज आणि ही पहा कशी तिकडे मस्तपैकी एंजॉय करतेय... ते काही नाही आपल्याला का इतकं वाईट वाटतंय? तू ठरवलंय ना , अपूर्वासोबत बोलायचं..." हा इतका गुंग झाला की बाजूला वेटर येऊन उभा आहे आणि अपूर्वा कधीच्या हाका मारतेय लक्षातच आलं नाही...
"अभि...अभि...लक्ष कुठेय तुझं? अरे ऑर्डर दे ना.."

"अं.. हो हो..अम्म्म...बटर नान दोन...एक..." अभिमान ने अपूर्वा ला तिच्या आवडीचं काय ऑर्डर करायचं हे न विचारताच स्वतः ऑर्डर केली..त्यामुळे ती हिरमुसली..
"असा कसा हा...मला ट्रीट देतोय आणि स्वतःचं स्वतःचं सांगतोय..वा.." अपूर्वा त्याच्याकडे नुसती पाहतच बसली..मनात, डोक्यात विचारांचा नुसता कल्लोळ माजला होता..
अपूर्वा स्वभावाने शांत आणि मॅच्युअर होती..दुनियादारी आणि ह्युमन बिहेवीअर तिला माहीत होते..
क्षणात कसल्याश्या विचाराने तिच्या कपाळावर सुक्ष्मशी रेष पसरली... आणि इकडे अभिमानला तर जाणीव ही नव्हती अपूर्वाच्या डोक्यात काय काय चाललंय याची.. त्याचं सगळं लक्ष आणि जीव सानु मध्ये अडकून पडला होता, ईच्छा नसूनही तो बाहेरचाच विचार करत होता...
"अभिमान... तुला काय बोलायचं होतं..." अपूर्वा ने थेट प्रश्नाला हात घातला...
"हो..अम्म्म.." त्याने एकवार बाहेर नजर फिरवली..
सानु आणि नचिकेतच्या गप्पा रंगात आल्या होत्या...
..........
"तर..हे असं सगळं जुळलं आमचं दिल्लीत असताना.." नचिकेत म्हणाला
"बरी भेटली ती तुला.. आता बघ कशी सुतासारखी सरळ करेल तुला..आय एम सो एक्सायटेड टू मिट हर..आहे कुठे पण ती अजून कशी आली नाही..."
तेवढ्यात नची चा फोन वाजलाच
"हं आलीयेस ना..थांब येतो बाहेर..."
नचिकेतच्या चेहऱ्यावर आनंद सरळ सरळ दिसुन येत होता... तो उठला..सानु ती आलीये, मी येतो तिला घेऊन..
"नची, थांब..किती खुश दिसतोय.. तू हॅपी तर मी ही हॅपी.. असाच खुश रहा..कायम आणि once again happy birthday.." तिने उठत नचिकेत ला जादू की झप्पी दिली.. "जा  आता, घेऊन ये तुझ्या सौलमेटला" हसतच तिने त्याला म्हंटल आणि जागेवर येऊन बसली व नचिकेत बाहेर निघून गेला..

इकडे अभिमान ने एकवार बाहेर नजर टाकली आणि त्याला हे दृश्य दिसलं आणि डोळ्यात अंगार फुलले..  कारण त्यांचं बोलणं ऐकायला गेलं नव्हतं फक्त जे दिसत होतं त्याचाच परत एकदा गैरसमज झाला होता...
त्याला इतका राग आला की रागारागातच त्याने निर्णय घेतला...इथल्या इथे अपूर्वाला प्रपोज करायचं...तेही या सानिकाच्या समोर
"अपूर्वा...चल बाहेर.." तो चटकन उठला.. आणि तिला हाताला धरून लॉन च्या मध्यभागी येऊन उभा राहिला, जेणेकरून सानुला ती दोघे स्पष्ट दिसतील.. आणि दिसलीही..
सानुचं लक्ष गेलंच तिकडे आणि धक्काच बसला तिला...
अभिमान ने रागाने बाजुच्या टेबलवरचं फुल उचललं आणि अपूर्वासमोर गुढग्यावर बसला... तसं बाकीच्या उपस्थित लोकांचही लक्ष गेलं आणि ते ही बघायला लागले..
"अभि काय करतोय.." अपूर्वा गोंधळून इकडे तिकडे आणि त्याच्याकडे बघत म्हणाली... तिला प्रचंड आश्चर्य वाटत होतं..
"अपूर्वा...अपूर्वा.. विल यु मॅरी मी?" हातातलं फुल अपूर्वाला देत तो म्हणाला...आणि परत सानु कडे बघितलं..तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं... त्याने परत नजर वळवली तेव्हा नचिकेत आणि केयु हातात हात घट्ट पकडून येताना दिसले.. नचिकेत आनंदात दिसत होता आणि केयुने त्याच्या उजव्या खांद्याची तिच्या डाव्या हाताने मजबूत पकड केली होती.... हे दृश्य बघून अभिमान च्या हातातले, अपूर्वाने न घेतलेले फुल आपोआप गळून पडले..