चॅम्पियन्स ट्रॉफी -2025
जलद कथालेखन स्पर्धा
जलद कथालेखन स्पर्धा
सायलेंट डिवोर्स - भाग -1
पुण्यातील एक सुखवस्तू कुटुंब. ज्यातील अविनाश हा एका नामांकित आयटी कंपनीत सीनियर मॅनेजर, तर सई शाळेत मराठी शिक्षिका होती. दोघांच्या लग्नाला दहा वर्षं झाली होती. लग्न पहिल्या दोन-तीन वर्षांत रंगतदार, हसतं-खेळतं, प्रेमळ होतं. लहानसहान गोष्टीतून आनंद शोधणारे हे जोडपे लोकांना 'आदर्श' वाटायचे.
सई नेहमी म्हणायची,
"आपलं नातं असंच हसतमुख राहावं. जग जसं बदलतंय तसं आपण बदललो, तरी आपल्या प्रेमातला गोडवा कधी कमी व्हायला नको."
"आपलं नातं असंच हसतमुख राहावं. जग जसं बदलतंय तसं आपण बदललो, तरी आपल्या प्रेमातला गोडवा कधी कमी व्हायला नको."
अविनाश यावर हसून तिच्या केसांवरून हात फिरवायचा.
पण काळ पुढे सरकत गेला. जबाबदाऱ्या, करिअर, पैशांच्या स्पर्धा,... सगळंच हळूहळू बदलायला लागलं. अविनाशचा दिवस सकाळपासून व्यस्ततेत सुरू व्हायचा. सकाळी आठला घराबाहेर, रात्री घरी यायला कधी दहा तर कधी अकरा व्हायचे. ऑफिसचं काम, मीटिंग्ज, टार्गेट्स यामुळे त्याच्या आयुष्यात थकवा पसरू लागला. सई दिवसभर शाळेत असायची, मग मुलाचा अभ्यास. ( त्यांना एक मुलगा होता अर्णव, जो दुसरीत शिकत होता.)
पूर्वी रात्री झोपण्याआधी दोघे अर्धा तास तरी बोलायचे; पण आता अविनाश थकून आल्यावर मोबाईलवर नजर खिळवून झोपून जायचा. सईला बोलावं वाटायचं; पण तो दमलाय म्हणून ती गप्प राहायची.
त्यामुळे न बोलता, नकळतच एक पातळ पडदा त्यांच्या मधे उभा राहिला होता.
बाहेरून बघितलं तर सगळं व्यवस्थित होतं. गाडी, घर, नोकरी, मुलगा चांगल्या शाळेत, दोघेही कमावते. नातेवाईक आणि समाजाच्या दृष्टीने ते एक 'परफेक्ट कपल' होते.
पण दोघं बोलतच नव्हते. जेवणाच्या टेबलावर आवश्यक शब्दांपलीकडे तर संवाद होतच नव्हते.
जेव्हा सई विचारायची, "ऑफिसमध्ये खूप ताण आहे का?"
अविनाश थोडक्यात उत्तर द्यायचा, "हो थोडा.." आणि पुन्हा मोबाइलमध्ये मग्न होऊन जायचा.
सई विचार करायची, 'हेच आपलं आयुष्य आहे का? आपण इतक्या स्वप्नांनी लग्न केलं; पण आता आपण फक्त रूम पार्टनर्स आहोत का?'
तिच्या मैत्रिणी व्हॉट्सॲपला स्टेटसवर नवऱ्याबरोबरच्या छोट्या छोट्या क्षणांचे फोटो टाकायच्या. कधी ट्रिप, कधी डिनर, कधी फक्त कॉफी... तिलाही वाटायचं की आपण पण हे केले असते; पण अविनाशला तर वेळच नव्हता या गोष्टींसाठी.
अविनाशही आतून अस्वस्थ होता. त्याचं सईवर अजूनही प्रेम होतं; पण तो कामाच्या धावपळीत इतका गुरफटला होता की घरातल्या छोट्या सवांदांची त्याला किंमतच राहिली नव्हती.
कधीतरी त्यालाही हे जाणवायचं की आपण नीट बोलत नाही सईशी. दोघांमधला संवाद काहीसा तुटलाय; पण पुढच्या क्षणी मेल्स, रिपोर्ट्स, टार्गेट यांचा भडीमार सुरू व्हायचा आणि आपसूकच तो विचार मागे ढकलला जायचा.
अर्णव आठ वर्षांचा होता. तो कधी कधी आईबाबांच्या शांततेकडे पाहायचा.
एक दिवशी त्याने सईला विचारले,
"आई, बाबा तुझ्याशी नेहमी कमी का बोलतात गं? टीव्हीवरचे आई-बाबा कसे एकत्र हसतात, मज्जा करतात. आपल्याकडे तसं का नाही?"
"आई, बाबा तुझ्याशी नेहमी कमी का बोलतात गं? टीव्हीवरचे आई-बाबा कसे एकत्र हसतात, मज्जा करतात. आपल्याकडे तसं का नाही?"
यावर सई फक्त एवढंच म्हणाली, "बाबांना खूप कामं असतात रे बाळा."
सईच्या मनात हळूहळू प्रश्न वाढू लागले होते.
'हे कायम असंच राहणार का?', 'आपलं लग्न केवळ सामाजिक कागदावर टिकणार आहे का?'
तिने एक-दोनदा अविनाशशी बोलायचा प्रयत्न केला की आपल्याला वेळ काढायला हवा. अविनाश फक्त ऐकायचा, मान डोलवायचा; पण पुढच्या दिवसापासून पुन्हा सगळं तसंच सुरू राहायचं.
अर्णवच्या शाळेतल्या पालक सभेत तिला बऱ्याच लोकांनी म्हटलं की "तुमचा चेहरा थकलेला जाणवतोय. तुम्ही ठीक आहात ना?"
त्या रात्री ती आरशासमोर उभी राहिली. स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहून तिला स्वतःचं एकाकीपण साफ दिसत होतं आणि तेव्हाच तिने ठरवलं की 'आता असं आयुष्य जगायचं नाही. मी स्वतःला हरवू देणार नाही.'
क्रमशः
©® निकिता पाठक जोग
©® निकिता पाठक जोग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा