Login

सायलेंट डिवोर्स भाग 2

आयुष्य आपण जसं विचार करतो तसं नसता.. बरंच काही घडत असता.
चॅम्पियन्स ट्रॉफी -2025
जलद कथालेखन स्पर्धा

सायलेंट डिवोर्स भाग -2

सईने आरशातल्या त्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघून जे ठरवले होते, ते तिच्या जीवनात हळूहळू प्रत्यक्षातही येऊ लागले. पहिले काही दिवस ती लहानसहान निर्णयांशी मर्यादित होती. सकाळी लवकर उठणे, स्वतःकडे लक्ष देणे, अर्णवला भरपूर वेळ देणे, त्याच्यासोबत रोज गार्डनला जाणे, नवीन लोकांना भेटून बोलणे,.. हे असे छोटे बदल तिने केले होते.

ती सकाळी पार्कमध्ये चालायला जाऊ लागली. चालताना तिच्या मनात अनेक विचार येत-जात होते. मुलाच्या भविष्यासाठी काय योग्य, तिला काय आवडते आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिला खरोखर काय हवे आहे?

शाळेतही तिने बदल केले. शिक्षक म्हणून तिला स्वतःच्या कामात आनंद वाटायला हवा असं तिने ठरवलं. पुस्तकी वर्गांसोबतच दरम्यान छोटे कार्यक्रम, पालकांसाठी संवाद, या सगळ्यामुळे तिला नवीन लोकांशी संवाद करता आला आणि तिला जाणवलं की तिची ओळख फक्त 'अविनाशची पत्नी' नसून 'सई' म्हणूनही आहे.

ती आपल्या मैत्रिणींसोबत फिरायची. कधी शॉपिंग कधी कॉफी... हा बदल तिला स्वतःला शोधण्यासाठी खूप उपयोगी ठरला होता.
एके दिवशी तिला तिची सगळ्यात जवळची मैत्रीण मीराचा फोन आला. ती लग्नानंतर मुंबईला शिफ्ट झाली होती; पण ऑफिसच्या कामामुळे ती दोन दिवस पुण्यात येणार होती. त्या दोघींनी भेटण्याचे ठरवले.

मग मीरा पुण्यात आली आणि दोघी भेटल्या. सई जास्तच उघडपणे बोलली.

मीराने तिला विचारलं, " तू स्वतःला विचार तू तीच सई आहेस का? तुला बघून मला कळतंय की तू खूप बदलली आहेस. तू स्वतःकडे लक्ष दे गं."
तिने सईला त्याच्या भावनांची नोंद घेण्यास सांगितलं; पण सोबतच असंही सुचवलं की प्रत्येक गोष्ट समोर ठेवून त्यावर शांतपणे चर्चा करायला हवी.


सईने पहिले प्रयत्न केले. एक दिवशी घरात तिने खास जेवण बनवले आणि अविनाशला आग्रहाने बोलावले. टेबलवर दिवा लावला. अर्णवही त्यांच्या सोबत होता.

सईने हसत हसत म्हटलं, "आज आपल्या लग्नाला दहा वर्षं पूर्ण झाली. आपल्याला आज तरी थोडा वेळ एकत्र घालवायला पाहिजे."

अविनाशने एक नजर घड्यावर टाकली आणि मग मोबाईलवर...

मग थंडपणे उत्तर दिले, " आज ऑफिसचा प्रोजेक्ट तयार करायचा आहे. मी थोड्याच वेळात जाऊन येईन."

त्या थोड्याच वेळाचा तास झाला. अर्णव जेवण करून झोपी गेला. सईने पण वाट बघत जेवण केले आणि जाऊन झोपली. तिने ठरवलं, उद्या स्पष्टपणे बोलायचं.


तिने दुसऱ्या दिवशी त्याला समोर बसवून घेतले आणि कटू न होता विचारले, " आपण असेच राहणार आहोत का? आपलं नातं फक्त ढकलल्यासारखं होतंय. हे बरोबर नाही. आपल्याला बोलायला हवं."

अविनाशने तोंड उघडले आणि म्हणाला,"काम खूप आहे सई. तरी मी तुझ्याशी बोलतोच हां; परंतु तुझा आवाज हा नेहमी अपेक्षेने आणि रागाने भरलेला असतो."

दोघांमध्ये थोडी तक्रारांची देवाण-घेवाण झाली; पण काही ठोस बदल झाला नाही. काही आठवड्यांत सईला समजले की आपण फक्त बोलून नाही, त्याला ऐकून पण घ्यायला पाहिजे; पण अविनाशची प्राथमिकता आता वेगळी होती. फक्त करिअर, प्रतिष्ठा आणि प्रगती... घरातल्या छोटा क्षणांना तो किंमत देत नाही हे सईला जाणवलं.

अर्णवही मोठा होत होता. शाळेतील मुलं आपल्या पालकांसोबत फिरायला जायचे. तिकडे त्यांनी काय मज्जा केली, कुठे फिरले हे सांगायचे आणि कधी घरी फोटोही दाखवायचे.

हे सगळं बघून एकदिवशी अर्णवने सईला विचारलं, "आई... बाबा, तू आणि मी पण असं कधी फिरायला जाऊयात का? ते नेतील का आपल्याला?"

"हो बाळा, नक्कीच जाऊ आपण पण." सईने अर्णवला सांगितले.


सईच्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं जेव्हा तिला एक संदेश आला. शाळेतील एक पूर्व विद्यार्थी रोहन, त्याने स्वतःचा 'कम्युनिटी प्रोजेक्ट' सुरू केला होता. त्याने तिला मदतीसाठी विचारलं. ही संधी सईसाठी नव्याने खिडकी उघडणारी होती. सईने वेळ न दवडता त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तो प्रोजेक्ट तिला व्यस्त ठेवत होता.

अविनाश अजूनही शांतच होता. त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. तिला खूप वाईट वाटले; पण तिने ही गोष्ट मनातच ठेवली.
शेवटी एक संध्याकाळ अशी आली जिने घरातली ही शांतता फोडली. अर्णवने आईचा फोन समजून अविनाशचा फोन उचलला आणि अनवधानाने एक मेसेज पाहिला. अर्णवने तो फोन तसाच ठेवला.

सईने अर्णवच्या डोळ्यांतील बेचैनता पाहिली.

तिने विचारले, "काय पाहिलेस तू?"

अर्णव हळूच म्हणाला, "आई... बाबाच्या फोनवर एक मेसेज आला होता. तो R या नावावरून होता. त्या मेसेजमध्ये लिहिले होते की "तू आज आणि नेहमीच माझ्यासाठी खास आहे."

सईने अर्णवला कसंतरी झोपवलं; पण तिला रात्रभर झोप नव्हती.

त्या तीन शब्दांच्या मागे असलेल्या सत्याने मात्र आता सईच्या आयुष्याला एक नवीन वळण देण्याची काहीतरी तयारी केली होती.

क्रमशः
© निकिता पाठक जोग
0

🎭 Series Post

View all