Login

सीमंतिनी भाग ३३

मीरा खरचं आता सीमंतिनीला त्रास देणार नाही का?


भाग ३३

सीमंतिनीला माहेरी येऊन एक महिना होऊन गेला होता आणि आता तिच्या नातेवाईकांमध्ये आणि तिच्या सोसायटीमध्ये तिच्याबद्दल कुजबूज सुरू झाली होती. लोक समोर काही बोलत नसले तरी मागे मात्र सीमंतिनी आणि तिच्या घरच्यांबद्दल चर्चा करत होते. मीराचा मात्र सीमंतिनीला पुन्हा घरात पाहून तिळपापड होत होता. सीमंतिनी अर्धा पगार घरात देत असली तरी ती पैसे तिच्या आईच्या हातात देत होती त्यामुळे प्रत्यक्षरित्या मीराच्या हातात काहीच पडत नव्हते. त्यामुळे मीराने सीमंतिनीशी पुन्हा पहिल्यासारखे वागायला सुरुवात केली होती. सकाळी लवकर न उठणे, जास्तीत जास्त काम सीमंतिनीच्या अंगावर कसे पडेल? हे पाहणे, संध्याकाळी सीमंतिनी घरी आल्यावर पुन्हा तिनेच कामं करावीत म्हणून वेगवेगळी कारणे देऊन कामातून अंग काढणे असं सगळं तिचं सुरू झालं होतं. सीमंतिनीची आई आणि सीमंतिनी प्रत्यक्ष काही बोलत नसल्या तरी त्यांना मीराचे वागणे कळत होते. तरी दोघींनी तिच्याकडे कानाडोळा केला. सीमंतिनीने भांड्याला आणि बाकी कामांना बाई लावली आणि हप्त्यावर वॉशिंगमशिन घेतली. जेणे करून तिच्या आईला कामाचा त्रास होणार नाही.

इकडे मोहितला सीमंतिनी वकिलाला भेटली आहे हे कळले होते, पण तो त्याच्या काही प्रोजेक्ट्समध्ये महिना झाला बिझी होता पण सीमंतिनीला धडा शिकण्याचा त्याने जणू चंग बांधला होता. त्याला सीमंतिनी पुन्हा त्याच्या घरात हवी होती. म्हणूनच त्याने मीराला भेटायला बोलावले होते. मीराही घरी थाप मारून तो काय म्हणतो? ते पहायला आली होती.

मोहित,“कशा आहात मीरा वहिनी?” त्याने विचारले.

मीरा,“मी ठीक आहे पण तुम्ही मला भेटायला का बोलावले आहे?” तिने विचारले.

मोहित,“आढेवेढे न घेता सरळ मुद्द्यावरच येतो. माझं तुमच्याकडे काम आहे.” तो म्हणाला.

मीरा,“माझ्याकडे तुमचं काम?” तिने आश्चर्य झाल्यासारखे विचारले.

मोहित,“मीरा वहिनी तुम्हाला मी चांगलंच ओळखून आहे. मी तुम्हाला भेटायला बोलावले याचे तुम्हाला फारसे आश्चर्य वाटले नसणार मग कशाला उगीच निरागसपणाचा आव आणायचा?” तो कुत्सितपणे हसून म्हणाला.

मीरा,“बरं! बरं! मुद्द्याचा बोला आता.” ती म्हणाली.

मोहित,“तुम्ही सीमाला इतका त्रास द्यायचा, इतकं अपमानित करायचं की तिने माझ्याकडे पळून यायला हवं.”

मीरा,“पण त्या बदल्यात मला काय मिळणार?” तिने विचारले.

मोहित,“हा एक लाखाचा चेक! जर सीमा तुमच्या त्रासाला कंटाळून माझ्याकडे परत आली तर तुम्हाला मी हवे तितके पैसे देईन.” तो म्हणाला.

मीरा,“जर तर नाही. सीमाताई तुमच्याकडे आल्याच म्हणून समजा आता. त्यांना इतकं सळो की पळो करते मी की त्या तुमच्याकडे परत आल्या पाहिजेत पहाच तुम्ही.” ती हसून म्हणाली आणि निघून गेली.
★★★

आज सीमंतिनीला उठायला जरा उशीरच झाला होता. सगळ्या कामाला बाई असली तरी स्वयंपाक आणि स्वतःचा डबा मात्र तिला स्वतःलाच करायला लागत होता. तिने घाईतच भाजी-पोळी केली आणि स्वतःच आवरून डबा भरून घ्यावा म्हणून ती तिच्या रूममध्ये गेली. तर मीरा येऊन किचनमध्ये लुडबुड करत होती. तिने सीमंतिनीने केलेली सगळी भाजी सांडली. सीमंतिनी आली तर मीरा तिला म्हणाली.

मीरा,“सॉरी ताई ते बंटीचे दूध बनवताना माझ्याकडून चुकून भाजी सांडली हो.” ती म्हणाली आणि सीमंतिनीच्या पाठोपाठ आईही किचनमध्ये आल्या.

आई, “अशी कशी सांडली गं चुकून भाजी तुझ्याकडून मीरे?” त्या रागाने म्हणाल्या.

मीरा,“आई जरा जपून! मी या घरची सून आहे. सासर सोडून आलेली मुलगी नाही. आता चुकून सांडली भाजी तर काय करू मी?” ती तोऱ्याने म्हणाली आणि निघून गेली.

आई, “सीमा तू थांब मी लगेच बनवून देते तुला भाजी आणि या मीराचं बोलणं नको मनाला लावून घेऊस.” त्या म्हणाल्या.

सीमंतिनी,“जाऊदे ना आई मी कॅन्टीनमध्ये जेवण करेन आज.” ती म्हणाली.

आई, “अगं तूच म्हणालीस ना की कॅन्टीनमध्ये चांगलं जेवण नसतं म्हणून?” त्या म्हणाल्या.

सीमंतिनी,“एक दिवस जेवले तर काय होतंय कँटीनमध्ये?” असं म्हणून ती निघून गेली.

मीराचं काही ना काही सांडासांडी करणं आणि सीमंतिनीला घालून-पाडून बोलणे नेहमीचेच झाले होते. सीमंतिनी आणि तिची आई मात्र तिच्याकडे कानाडोळा करत होत्या कारण त्यांना समीरची काळजी होती. त्याचा संसार सुरळीत सुरू रहावा म्हणून सीमंतिनी मीराचे सगळे त्रास सहन करत होती.
★★★

आज मकरसंक्रात होती आणि सीमंतिनीला सुट्टी असल्याने ती घरीच होती. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असल्याने समीर आणि बाबा बाहेर निघून गेले होते. सीमंतिनी नको म्हणत असताना देखील तिच्या आईने तिला साडी नेसायला लावली. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे त्यांच्या सोसायटीमधील आणि नात्यातील बायका आल्या होत्या.

मीरा सगळ्यांना हळद-कुंकू लावून वाण देत होती पण तिने सीमंतिनीला मात्र मुद्दाम वगळले. तरी सीमंतिनी शांत होती. सोसायटीमधील एक बाई खोचकपणे म्हणाली.

पहिली बाई, “काय गं मीरा सीमाला पण दे की वाण.”

दुसरी बाई, “काय हो काकू तुम्ही पण हे वाण सुहासिनीला दिले जाते. सीमा तर नवरा सोडून आली. आता तिला काय म्हणायचे? धड विधवाही नाही आणि धड सदवाही नाही.”

मीरा,“काय करणार आपण तरी? एखाद्याला भिकेचे डोहाळे लागलेले असतात. सगळं चांगलं असताना.” ती पुढे बोलणार तर तिची एक लांबची मामी म्हणाली.

मामी,“काय गं सीमे? इतकं श्रीमंत सासर आणि नवरा सोडून तू इथे माहेरात येऊन पडलीये, नोकरी करतेस. तुझ्यामुळे आम्हाला काय काय ऐकून घ्यावे लागते लोकांचे? काय झालं गं असं की चार-पाच महिन्यात माहेरी आलीस?”

सीमंतिनीला आणि तिच्या आईला देखील सगळ्यांचेच बोलणे टोचले होते. आईच्या डोळ्यात पाणी होते पण सीमंतिनी मात्र धीर न खचू देता बोलू लागली.

सीमंतिनी,“काय आहे काकू माझा नवरा अजून जिवंत आहे म्हणजे मी विधवा नाही आणि कायदेशीर आमचा घटस्फोट नाही झाला ना त्यामुळे मी अजून तरी सुहासिनच आहे बरं का. मीरा वहिनी भिकेचे डोहाळे नाही ओ लागले मला. मी स्वतः चांगलं पन्नास हजार कवमते हो! त्यातला निम्मा पगार तुमचं घर चालवायला आईच्या हातात देते. काय मामी तुम्ही पण तुमची जयश्री मागच्याच आठवड्यात माहेरी आली होती ना? तिने तर लव मॅरेज आहे की! तरी तिचा नवरा तिला मारझोड करतो म्हणे? आणि राहिला प्रश्न माझा तर उद्या कोर्टात खटला उभा राहिला की मी मोहितला का सोडले? हे जग जाहीर होईल. तेव्हा तुम्हाला पण कळणारच की तोपर्यंत धीर धरा. मीरा वहिनी तुमचं चालू द्या.”

तिच्या बोलण्याने सगळ्यांची तोंड बंद झाली खरी पण सीमंतिनीला सगळ्यांचे बोलणे मनाला लागले होते. ती रूममध्ये गेली आणि तिने मसोक्त रडून घेतले. तिला खरंतर जेवायची इच्छा नव्हती पण बाबा आणि समीर ती सणाचं का जेवत नाही? म्हणून विचारतील म्हणून ती जेवायला येऊन बसली. तिचा आणि आईचा देखील चेहरा पडलेला होता.

मीरा सगळ्यांना जेवायला वाढत होती. तिने सगळ्यांना जेवायला वाढले आणि सगळ्यांना तिळगुळ देत होती. तिने समीरलाही तिळगुळ दिले.

समीर, “तू हे तिळगुळ देऊन माझ्या बहिणीला तुझ्यामुळे ऐकावे लागलेले कटू शब्द गोड होणार आहेत का मीरा? तुला आणि तुम्हा दोघींनाही काय वाटतं की माझ्या लक्षात काहीच येत नाही की मीरा सीमाशी कशी वागते? मी तर सीमा माझ्याकडे तक्रार करायची वाट पाहत होतो पण सीमा तर तिच्या भावावर इतकाही हक्क समजत नाही. इतका परका झालो आहे मी तिच्यासाठी.” तो दुःखी होत म्हणाला.

सीमा,“तसं काही नाही दादा...!” ती पुढे बोलणार तर समीर रागाने बोलू लागला.

समीर, “ते कसं ही असू दे. मीरा! तू रोज सीमा ऑफिसला निघायच्या वेळी काही ना काही सांगते. तू बायका हळदी-कुंकला आल्यावर माझ्या बहिणीचा अपमान करतेस. तुला काय वाटलं मला काहीच कळत नाही का? तुला नीट या घरात राहायचे तर रहा नाही तर तुझा रस्ता रिकामा आहे. मी उद्याच गवळी मॅडमकडे जाऊन घटस्फोटाची प्रोसिजर सुरू करतो. काय आहे आपल्या लग्नाला पाच वर्षे होत आली. त्यामुळे सीमा सारखं वर्षभर थांबायचे झंझट नाही. बाकी बंटी तर माझ्याकडेच राहील. उद्याच तुला तुझ्या माहेरी सोडतो. तू तर सीमा एवढी शिकली पण नाहीस. बघ तुला तुझ्या घरचे ठेवून घेतात का?”

तो रागाने बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून मीरा मात्र चांगलीच चरकली. समीरला जर ती हे सगळं मोहितच्या सांगण्यावरून करते आहे हे कळले तर समीर तिला एका मिनिटात माहेरी घालवेल याची तिला भीती वाटली.

मीरा,“माझं चुकलं. मी इथून पुढे असं वागणार नाही पण प्लिज तुम्ही घटस्फोटाची भाषा करू नका.” ती हात जोडून रडत म्हणाली.

समीर, “आता मी काय करायचं हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे.” तो म्हणाला आणि अर्धवट जेवण सोडून रागाने निघून गेला.

तो व्हरांड्यात एकटाच उभा होता. सीमंतिनीला कळून चुकलं होत की तिने आज समीरला नकळत का होईना दुखावले आहे. ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली.

सीमंतिनी,“सॉरी ना दादा. मी किंवा आईने तुला हे सगळं सांगितले नाही कारण….” ती बोलणार तर समीर तिचे बोलणे मध्येच तोडत बोलू लागला.

समीर, “कारण तुम्हाला माझ्या संसारात कोणताही अडथळा आणायचा नव्हता. तुला भीती होती की तू मीराची तक्रार माझ्याकडे केली तर लोक तुला नावे ठेवतील वगैरे वगैरे…” तो तिला पाहत म्हणाला.

सीमंतिनी,“तुझा पहिला अंदाज बरोबर आहे दादा पण दुसरा अंदाज चुकीचा आहे कारण लोक काय म्हणतील? याचा विचार मी कधीच केला नाही, पण मला माझ्यामुळे तुला त्रास झालेला चालणार नाही. माझ्यामुळे मीरा वहिनी आणि तुझ्यात आलेला दुरावा सहन नाही होणार. मीरा वहिनी माझ्याशी कशीही वागली तरी तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे मी विसरू शकत नाही; म्हणून नाही सांगितले तुला काही पण तू दुखावला जाणार असशील तर इथून पुढे असं काही झालं तर मी नक्कीच तुला सांगेन. आता तरी माफ कर ना मला.” ती त्याचा हात धरून म्हणाली.

समीर, “बास झाला मस्का मारून. असंही मीराला मी चांगलं ओळखतो ती कशीही असली तरी तू म्हणते तसं तिचं प्रेम आहे माझ्यावर आणि ती खूप भित्री आहे. आज मी तिच्याशी ज्या भाषेत बोललो आहे त्यानंतर ती नाही वागणार इथून पुढे असं. काय आहे अधूनमधून असे झटके गरजेचे असतात.” तो हसून तिला डोळा मारत म्हणाला आणि सीमंतिनी त्याच्या बरोबर हसायला लागली.

दोघांचे बोलणे आई-बाबा ऐकून हसत होते. समीर म्हणाला तसे मीरा खरंच पुढे सीमंतिनीला त्रास देणार नाही का? आणि जर असे असेल तर ती मोहितला आता काय उत्तर देणार होती?

©स्वामिनी चौगुले
0

🎭 Series Post

View all