Login

सीमंतिनी भाग ३५

लढाईचे रणशिंग फुंकले गेले होते दोन्ही बाजू आपल्या परीने कायदेशीर लढाई लढण्यास तयार झाल्या होत्या.


भाग ३५

सीमंतिनी आज मोहितला नोटीस पाठवायची म्हणून गवळी मॅडमकडे नोटीस वाचून सही करायला गेली होती. गवळी मॅडम तिला पाहून म्हणाल्या.

गवळी मॅडम, “ये सीमंतिनी! तुझेच काम करत होते. ही नोटीस तयार आहे. तू वाचून घे आणि सही कर म्हणजे आपण मोहित खोतला ती पाठवून देऊ.

सीमंतिनी,“हो मॅडम! ती म्हणाली आणि तिने नोटीस वाचली.

‛आमचे आशील सीमंतिनी मोहित खोत म्हणजेच तुमच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वतीने मी ऍडव्होकेट रुपाली गवळी नोटीस बजावत आहे.

तुम्ही लग्नाच्या नावाखाली आमचे आशील सीमंतिनी मोहित खोत यांची फावणूक केली आहे. तुमच्यात शारीरिक कमतरता असताना देखील तुम्ही जाणूनबुजून आमच्या आशिलास फसवून तिच्याशी लग्न केले. इतकेच नाही तर जेव्हा आमच्या आशिलास तुमच्यात शारीरिक कमतरता आहे, तुम्ही नपुंसक आहात हे कळले तेव्हा तुम्ही त्यांना मारझोड केली, त्यांना धमकावून त्यांना तुमच्या घरात राहण्याची जबरदस्ती केलीत. त्या बदल्यात तुम्ही आमच्या आशिलास घटस्फोट देऊन योग्य ती नुकसान भरपाई करावी. तसेच त्यांची जगजाहीर माफी मागून तुमच्यावर असलेले आरोप मान्य करावेत. नाहीतर कायदेशीर कार्यवाहीस सज्ज राहावे.’

अशा आशयाची नोटीस वाचून सीमंतिनीच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झाले. ते गवळी मॅडमनी ओळखले आणि त्यांनी सीमंतिनीला विचारले.

गवळी मॅडम,“नोटीस वाचून तुला कोणते प्रश्न पडले आहेत सीमंतिनी? निःसंकोचपणे विचार.”

सीमंतिनी,“मॅडम आपण मोहितला अशी नोटीस पाठवली तरी काही फायदा होणार नाही कारण मोहित हे त्यांच्यावरचे आरोप कधीच मान्य करणार नाहीत. मग ही नोटीस पाठवण्याचा अर्थ काय?” तिने विचारले.

गवळी मॅडम, “ते मलाही माहीत आहे सीमंतिनी की मोहित त्याच्यावरचे आरोप नाही मान्य करणार, पण ही नोटीस पाठवणे म्हणजे एक कायदेशीर प्रोसिजर आहे. त्यामुळे आपल्याला कोर्टात खटला दाखल करता येईल आणि उद्या मोहित किंवा त्याचा वकील म्हणू शकणार नाही की आम्हाला न माहीत होता कोर्टात खटला दाखल केला. त्याला या नोटिशीचे उत्तर द्यावे लागेल आणि त्याने याचे उत्तर नाही दिले तरी देखील आपल्याला काहीच फरक पडणार नाही. पंधरा दिवस आपण उत्तराची वाट पहायची आणि कोर्टात खटला दाखल करायचा.” त्या तिला समजावत म्हणाल्या.

सीमंतिनी,“ठीक आहे मॅडम.” ती म्हणाली आणि तिने नोटीसवर सही केली.
★★★
मोहितच्या हातात नोटीस पडली आणि तो चांगलाच चिडला.

‛या सीमाची मजल चांगलीच वाढली आहे. हिने मला कायदेशीर नोटीस पाठवली. आज, उद्या कोर्टात खटला उभा राहील. पण मीही शहरातला सगळ्यात नामवंत वकील हायर केला आहे म्हणावं. बरं झालं ऍडव्होकेट जयेश राणेशी अर्धवट का असेना पण आधीच बोलून घेतलं आहे. त्यांची उद्याचीच अपॉइंटमेंट घेतो आणि या नोटीसला काय उत्तर द्यायचे? ते पाहतो.’

त्याने मनात विचार केला आणि ऍड. राणेची दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घेतली. दुसऱ्या दिवशी मोहित वेळेवर ऍडव्होकेट राणेंच्या ऑफिसमध्ये पोहोचला.

राणे, “या मिस्टर खोत बसा.”

मोहित,“या आधी काही महिन्यांपूर्वी माझे लग्न आणि बायको विषयी आपले जुजबी बोलणे झाले होते. त्यावेळी लग्नाला एक वर्ष पूर्ण व्हायचं होतं आणि मला वाटत होतं की ती परत येईल म्हणून आपण थांबलो होतो पण परवा आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आणि काल माझ्या बायकोने मला ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.” तो त्यांच्या हातात नोटीस देत म्हणाला.

राणेंनी नोटीस घेतली आणि लक्षपूर्वक वाचली आणि ते गंभीर होत बोलू लागले.

राणे,“मिस्टर मोहित या नोटीसमध्ये तुमच्या मिसेसनी तुम्ही इंपोटंट असून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप तुमच्यावर लावला आहे. हा खूप गंभीर आरोप आहे आणि हा एक आरोप सिद्ध झाला तर त्यांना तुमच्यापासून घटस्फोट तर मिळेलच वरून तुम्हाला त्यांना त्या मागतील तितकी नुकसानभरपाई द्यावी लागेल. तसेच तुमची समाजात बेअब्रू होईल ती वेगळीच. तुम्हाला मी काही प्रश्न विचारीन त्याची खरी खरी उत्तरं मला अपेक्षित आहेत, कारण डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काही लपवले तर त्यात नुकसान त्यांचं नाही तुमचं होत असतं.”

मोहित,“विचारा काय प्रश्न आहेत तुमचे?” तो म्हणाला

राणे,“तुम्ही खरंच इंपोटंट आहेत का? मला खरं सांगा कारण तुमच्या खऱ्या उत्तरावरच आपण आपली रणनीती आखू शकतो मिस्टर मोहित.” ते त्याला रोखून पाहत म्हणाले.

मोहित,“हो मी आहे इंपोटंट आहे.” तो खाली मान घालून म्हणाला.

राणे,“याची कल्पना तुमच्या मिसेसना होती का?” त्यांनी विचारले.

मोहित,“नाही. याची कल्पना तिला नव्हती.”

राणे,“या नोटिसमध्ये म्हणले आहे तसे तुम्ही त्यांना मारझोड केली आहे का?” त्यांनी विचारले.

मोहित,“हो केली आहे.” तो म्हणाला.

राणे,“ठीक आहे. आता आपण काय करायचं ते मी पाहतो तुम्ही काळजी करू नका. फक्त एकच लक्षात ठेवा; उद्या जर कोर्टात त्यांनी मेडिकल चेकअपची मागणी केली तर काहीही झालं तरी मेडिकल चेकअपला तयार व्हायचं नाही. बाकी मी सगळं पाहून घेतो. मी नोटीसचे उत्तर आज तयार करून घेतो उद्या आपण त्यांना ते पाठवून देऊ. त्या उत्तर मिळाले की कोर्टात खटला दाखल करतील. तर त्यासाठी तयार रहा.” ते म्हणाले.

मोहित,“ठीक आहे. मी उद्या येईन सही करायला.”

राणे,“ओके.” ते म्हणाले.
★★★

दुसऱ्या दिवशी मोहित नोटीसवर सही करायला गेला. त्याने नोटीस वाचली.

‛आमचे आशील मोहित सुरेश खोत यांना सौ. सीमंतिनी मोहित खोत यांनी केलेले आरोप मान्य नाहीत. त्या घरगुती झालेल्या भांडणांचा आकस मनात धरून आमच्या आशिलावर असे आरोप करत आहेत तरी आमचे आशील त्यांना मोठ्या मनाने माफ करून त्यांना नांदायला घेऊन जायला तयार आहेत तरी सौ. सीमंतिनी मोहित खोत यांनी मागचे सगळे विसरून पुन्हा आमच्या आशीलकडे नांदायला यावे.” त्याने वाचले आणि सही केली

मोहित,“राणे मी तुम्हाला कितीही पैसा द्यायला तयार आहे फक्त सीमाने माझ्यावर केलेले आरोप सिद्ध व्हायला नकोत. तसे झाले तर मला समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. काहीही झालं तरी केसचा निकाल आपल्याच बाजूने लागला पाहिजे.” तो गंभीरपणे म्हणाला.

राणे,“मिस्टर खोत माझा रेकॉर्ड आहे, मी जी केस हातात घेतो ती मीच जिंकतो. तुम्ही निश्चिंत राहा. केसचा निकाल आपल्याच बाजूने लागेल उलट आपण तुमच्या मिसेस वर अब्रू नुकसानीचा दावा ठोकू.” ते ठामपणे म्हणाले.

मोहित,“थँक्स मिस्टर राणे.” तो म्हणाला आणि निघून गेला.
★★★
सीमंतिनी मात्र आता स्वतःला मनातून पुढच्या लढाईसाठी तयार करत होती. ती रात्री अस्वस्थपणे व्हरांड्यात येरझाऱ्या घालत होती. तिचे बाबा पाणी प्यायला उठले होते तेव्हा किचनमध्ये जाताना त्यांना सीमंतिनी व्हरांड्यात दिसली.

बाबा,“सीमा अगं रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. तू इथे काय करत आहेस बेटा?” त्यांनी विचारले.

सीमंतिनी,“काही नाही बाबा झोप येत नव्हती म्हणून आले होते.” ती नजर चोरत डोळ्यातले पाणी आडवत म्हणाली.

बाबा,“तुझा बाप आहे सीमा मी! तुझ्या आवाजावरून मी ओळखू शकतो तुझ्या मनात काय सुरू आहे ते. सांग बरं आता काय झालं?” त्यांनी विचारलं आणि सीमंतिनी डोळ्यातले पाणी गालावर ओघळले.

सीमंतिनी,“बाबा माझ्या आयुष्यात हे काय होऊन बसले? मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मला घटस्फोटासाठी कोर्टाची पायरी चढावी लागेल याचा, पण आज तेच सगळं माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष घडत आहे. खूप मोठी स्वप्ने नव्हती बाबा माझी. मला एक प्रेमळ आणि समजुदार जोडीदार हवा होता जो माझ्यावर प्रेम करेल, सुखदुःखात माझ्या पाठीशी उभा राहील वेळ पडली की मी त्याच्या पाठीशी उभी राहीन पण उद्या कोर्टात मी आणि मोहित एकमेकांच्या समोर एकमेकांच्या विरुद्ध उभे राहणार. मोहितचे मी काय बिघडवले होते? की त्यांनी माझी अशी फसवणूक केली. त्यांना कोणी हक्क दिला होता माझ्या आयुष्याशी खेळण्याचा?” ती रडत बोलत होती. तिच्या बाबांनी तिला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ते बोलू लागले.

बाबा,“बेटा या सगळ्याचा विचार करून स्वतःला दुःखी करून घेण्यात काहीच अर्थ नाही. तुझ्या मनात आले असते तर तू मोहितचा पैसा, त्याची प्रतिष्ठा पाहून तिथेच राहू शकली असतीस. त्याच्या बरोबर प्रतारणा करून उलट त्यालाच ब्लॅकमेल देखील करू शकली असतीस पण तू असं काहीच केलं नाहीस. तर तू त्याच्याशी कायदेशीर नोटीस काढून स्वतःसाठी न्याय आणि मोहितसाठी धडा शिकवण्याचा निर्णय घेतलास. माझी मुलगी आहेस, तुझ्यावर आमचे संस्कार आहेत याचा रास्त अभिमान आहे मला बेटा. या सगळ्यातून तू लवकरच बाहेर पडशील आणि एक नवीन आयुष्य जगायला सज्ज होशील. कमी तुझ्यात नाही त्याच्यात आहे सीमा. सत्याची बाजू आपली आहे न्याय आपल्याला मिळेलच. तू इतका विचार नको करुस. मीच का? हा प्रश्न विचार बसण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हात करायला सज्ज हो. जा आता झोप उद्या ऑफिस आहे ना? आणि जास्त विचार नको करू बेटा.” ते तिला समजावत म्हणाले आणि तिला तिच्या रूममध्ये पाठवून दिले.

कोणत्याही स्त्रीसाठी घटस्फोटाचा निर्णय घेणे सोपी गोष्ट नक्कीच नसते. स्वतःचे घर, स्वतःचे नाते स्वतःच्या हाताने मोडण्यात तिला किती यातना होत असतील? हे फक्त आणि फक्त ती स्त्रीच जाणू शकते.

लढाईचे रणशिंग तर फुंकले गेले होते. दोन्ही बाजू आपापल्या परीने कायदेशीर लढाई लढण्यासाठी सज्ज होत्या. आता कोर्टात काय होणार होते? हे मात्र येणारी वेळच ठरवणार होती.

©स्वामिनी चौगुले
0

🎭 Series Post

View all