सीमंतिनी आज खरंच समाधानी होती कारण ऑफिसमध्ये तिचा झालेला अपमान आणि कुचंबणा तिने त्याचे सडेतोड उत्तर दिले तरी तिच्या जिव्हारी लागले होते आणि पुन्हा असे घडणार नाही असे सांगताही येत नव्हते, पण एच.आर. हेडने त्या तिघांनाही चांगलेच झाडले होते आणि वरून त्यांच्या वागणुकीबद्दल त्यांना शिक्षाही दिली होती त्यामुळे इथून पुढे ते तिघेच काय पण ऑफिसमध्ये काम करणारे बाकी लोकही तिच्याशी असं वागताना दहा वेळा विचार करणार होते. आपण एका चांगल्या ठिकाणी काम करत आहोत याचे समाधान तिला वाटले.
पण काम करताना रिमा शर्माचा विचार मात्र तिच्या डोक्यात घोळत होता. तिला फेसबुकवर तर तिची माहिती मिळत नव्हती कारण तिथे रिमा शर्मा नावाच्या अनेक मुली होत्या आणि तिने रिमा शर्माला कधीच पाहिले नव्हते. ती त्याच विचारात घरी गेली. रात्री झोपताना अचानक तिच्या लक्षात आले की जर रिमा शर्माचा फॅमिली बिझनेस आहे इंदौरमध्ये तर त्यांची एखादी वेबसाईट किंवा फेसबुक पेज असेल पण जर वेबसाईट शोधली तर तिथून त्यांच्या ऑफिसचा पत्ता आणि रिमाची माहिती मिळेल म्हणून मग तिने गुगलवर शर्मा अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंदौर असे टाकले आणि तिचा अंदाज खरा निघाला. त्यांची एक बिझनेस वेबसाईट होती. तिथे ऑफिसचा पत्ता आणि लँडलाईन नंबर देखील होता. तिने त्याचे स्क्रीन शॉर्ट काढून घेतले आणि उद्या ऑफिस अवर्समध्ये फोन करायचा असे मनोमन ठेरवून ती झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी तिने घरातून निघण्यापूर्वी काल शोधलेल्या नंबरवर घाबरतच फोन लावला. तिकडून फोन उचलला गेला.
“हॅलो इट्स शर्मा अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. हाऊ कॅन आय हेल्प यु?” तिकडून आवाज आला.
सीमंतिनी,“हॅलो मॅम कॅन आय स्पीक टू रिमा शर्मा? आय एम हर फ्रेंड!” ती म्हणाली.
“ सॉरी टू से बट रिमा मॅम एक बिझनेस डील के लिए अब्रॉड गई है! तो अभी आपकी उनसे बात नही कर सकती.” तिकडून एका मुलीचा सुमधुर आवाज येत होता.
सीमंतिनी, “उनका मोबाइल नंबर मुझे मिल सकता है क्या?” तिने विचारले.
“सॉरी वन्स अगेन हम उनका मोबाइल नंबर ऐसे किसी को नही दे सकते.” ती अगदी अदबीने म्हणाली.
सीमंतिनी, “ठीक है लेकिन रीमा इंडिया कब तक आने वाली है ये तो आप मुझे बता सकती है क्या?” तिने विचारले.
“जी हाँ वो अगले महीने की 30 तारीख को आनेवाली है।” ती म्हणाली.
सीमंतिनी,“ओके थैंक्स!” ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला.
सीमंतिनीने तर फक्त अंदाजाने तिच कंपनी असेल का? म्हणून घाबरत बाण सोडला होता पण बाण अगदी अचूक लागला होता. आता तिच्याकडे रिमा शर्माच्या ऑफिसचा पत्ता होता पण तिला भेटण्यासाठी तिला जवळ जवळ दोन महिने वाट पहावी लागणार होती कारण आज महिन्याची पाच तारीख होती. तिने गवळी मॅडमला रिमा शर्माबद्दल सविस्तर माहिती दिली.
★★★
काही दिवसांनी..
आज कोर्टाची तारीख होती. आता कोर्टात काय करायचे? किंवा काय सांगायचे? हा प्रश्न होता. पण गवळी मॅडम चांगल्याच हुशार होत्या त्यांनी कोर्टात सरळ मोहितची मेडिकल टेस्ट करा म्हणून मागणी केली.
गवळी मॅडम, “जर मिस्टर मोहित खोत ते इंपोटंट नाहीत आणि त्यांनी माझ्या आशिलास फसवले नाही असा दावा करत असतील तर त्यांनी मेडिकल टेस्टला सामोरे जावे. कोर्टाने त्यांना त्यांची मेडीलक टेस्ट करून घ्यावी असे आदेश द्यावेत.” त्या म्हणाल्या.
राणे,“माझ्या आशिलावर केले गेलेले आरोप धादांत खोटे आहेत आणि त्यांना कोणताही ठोस पुरावा नसताना असं मेडिकल चेकअप करायला सांगणे चुकेचे तर आहेच पण त्यांचा अपमान देखील आहे. माझे आशील इंपोटंट आहेत याचे पुरावे विरुद्ध पक्षाने सादर करावेत मग त्यांनी अशी मागणी करावी.
जज,“एडव्होकेट गवळी फक्त तुमच्या आशिलाने लावलेल्या आरोपांवरून आपण मिस्टर मोहित खोत सारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला मेडिकल टेस्ट करण्याचे आदेश देऊ शकत नाही. तुम्ही अशी काही मागणी करण्याआधी त्यांच्या विरुद्ध पुरावे घेऊन या मग आपण त्याचा विचार करू.”
कोर्टाने गवळी मॅडम म्हणजेच सीमंतिनीची मोहितची मेडिकल टेस्ट करण्याची मागणी फेटाळली होती. त्यामुळे आज मोहित सातवे आसमानवर होता. सीमंतिनी गवळी मॅडम बरोबर कोर्टातून बाहेर पडली आणि मोहितने तिला अडवले.
मोहित,“मी तुला म्हणालो होतो सीमा तुझ्या हाती काहीच लागणार नाही. बघ आज कोर्टाने तुझी मागणी फेटाळली ना? ही तर सुरवात आहे तुझ्या हरण्याची. अजूनही वेळ गेली नाही हे कोर्ट कचेरी राहू दे तू अजूनही माझ्याबरोबर येऊ शकतेस.” तो फुशारकी मारत म्हणाला आणि सीमंतिनी त्याला काहीच बोलली नाही.
मोहितला पुसटशीही कल्पना नव्हती की ही तर त्याला अडकवण्यासाठी केली गेलेली व्हीव रचना आहे. ज्याला तो स्वतःचं जिंकणे समजत होता ती तर त्याच्या हरण्याची सुरूवात होती. गवळी मॅडमला माहीत होतं की त्यांची ही मागणी कोर्ट फेटाळणार आहे तरी त्यांनी ती मागणी ठेवली कारण उद्या जेव्हा रिमा शर्मा जर कोर्टात हजर झाली तर कोर्ट लगेच मेडिकल टेस्टची त्यांची मागणी मान्य करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे राणे वकील आणि मोहितला त्यांना गाफील ठेवायचे होते. ते जिंकत आहेत असा भास त्यांच्यासमोर उभा करायचे होता.
पण कोणीतरी सीमंतिनीवर दुरून नजर ठेवत होते. ते सीमंतिनीला जाणवले होते पण तिने दुर्लक्ष केले. गवळी मॅडम निघून गेल्या आणि सीमंतिनीही घरी जाण्यासाठी जवळच असलेल्या रिक्षा स्टॉपकडे निघाली होती. ती पुढे जात होती आणि कोणीतरी तिच्या मागे येत आहे असे तिला जाणवत होते. तिने डोळ्यांच्या कोनाड्यातुन कोण आहे? याचा अंदाज घेतला तर खरंच तिच्या मागे कोणीतरी होते.
सीमंतिनीने तिच्या पर्समध्ये हात घातला आणि तिच्या पर्समध्ये कायम ती ठेवत असलेला मिरची स्प्रे बाहेर काढला आणि चालता चालता ती अचानक गर्रकन मागे वळली आणि त्या पाठलाग करत असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांवर तिने तो स्प्रे फावरला. त्या व्यक्तीने मात्र सीमंतिनीचे पुढचे पाऊल ओळखून पटकन डोळ्याला गॉगल लावला होता.
सीमंतिनी,“तू असा नाही ऐकणार रोड रोमियो कुठला तुला ना चांगला चोपच देते.” म्हणून तिने तिचा सॅंडेल त्या व्यक्तीवर उगारला आणि त्या व्यक्तीने तिचा हात धरला आणि बोलू लागला.
“मॅडम अहो तुम्ही समजता तसा मी रोड रोमियो नाही. हे माझे आय कार्ड मी सबसे तेज या न्यूज चॅनलचा पत्रकार आहे. तुमच्या अनोख्या केसबद्दल ऐकलं आणि कोर्टाची परमिशन घेऊन मी मागील काही तारखा तुमच्या केसचा पाठ पुरावा करण्यासाठी कोर्टात हजर राहत आहे.” तो इतकं बोलेपर्यंत दोघांना तसे उभे पाहून लोक गोळा झाले होते.
सीमंतिनी,“हे पहा मिस्टर तुम्ही कोणीही असा मला त्याच्याशी घेणं-देणं नाही पण इथून पुढे माझा पाठलाग करायचा नाही.” ती सॅंडल पुन्हा पायात घालत म्हणाली.
“मी राजस जेधे! लोक हो तुम्ही जा आता इथे मी यांना छेडत नाही एव्हाना तुम्हाला कळले असेल ना? तर प्लिज जा.” तो लोकांना हात जोडत म्हणाला आणि लोक निघून गेले.
सीमंतिनी,“तुम्हीही निघू शकता.” ती म्हणाली.
राजस,“मला तुमचा इंटरव्ह्यूव हवा आहे मॅडम म्हणून मी तुमच्या मागे येत होतो तेच बोलण्यासाठी.” तो म्हणाला.
सीमंतिनी,“मिस्टर… ऍनि वन तुम्हाला तुमच्या न्यूजसाठी हवा असणारा मिर्च मसाला माझ्याकडे नाही तर प्लिज तुम्ही जा.” ती वैतागून म्हणाली.
राजस,“आय एम नॉट मिस्टर ऍनि वन. माझं नाव राजस जेधे. तुम्ही मला आर.जे म्हणू शकता आणि मी काय बातमीत मसाला शोधणारा पत्रकार नाही तर मला तुमची स्टोरी कव्हर करून ती लोकांच्यापर्यंत पोहोचवायची आहे जेणेकरून तुमच्याकडे पाहून आणखीन महिला त्यांच्या हक्का प्रति जागरूक होतील.” तो म्हणाला आणि सीमंतिनीने त्याला नखशिखांत न्याहाळले.
जवळ पास तिच्यापेक्षा वयाने दोन-चार वर्षे मोठा, गोरा गोमटा, उंचापुरा घाऱ्या डोळ्यांचा उमदा तरुण तिच्या समोर उभा होता. दोघांची नजरा नजर झाली आणि सीमंतिनीने नजर दुसरीकडे वळवली.
राजस,“इतक्या साशंकपणे नका पाहू मॅडम मला. मी तुमच्या केसची माहिती गोळा केली आहे. तुमचीही माहिती गोळा केली आहे. मानलं पाहिजे तुम्हाला मोहित खोत सारख्या मोठ्या आसामीच्या विरुद्ध बंड करून उभं राहणं साधी गोष्ट नाही.” त्यांच्या डोळ्यात तिच्या बद्दल कौतुक दिसत होते.
सीमंतिनी,“तुम्ही माझे कितीही कौतुक केले तरी तुमच्या हाती काही लागणार नाही. मी तुम्हाला इंटरव्ह्यूव देऊ शकत नाही.” ती म्हणाली आणि रिक्षाला हात करून त्यात बसून निघून गेली.
राजस,\"इंटरव्ह्यूव तर मी तुमचा घेणारच मिसेस सीमंतिनी.\" तो ठामपणे म्हणाला आणि स्वतःशीच हसून निघून गेला.
ज्या रिमा शर्माच्या जीवावर सीमंतिनी आणि गवळी मॅडम पुढची व्युव्ह रचना करत होत्या ती रिमा शर्मा खरंच सीमंतिनीला मदत करायला तयार होईल का? आणि राजस जेधे उर्फ आर.जे. हे कोणते नवीन प्रकरण सीमंतिनीच्या आयुष्यात डोकावून पाहत आहे?
© स्वामिनी (अस्मिता) चौगुले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा