सीमंतिनी मात्र रागातच घरी निघून गेली. ती राजसच्या अशा वागण्यामुळे अस्वस्थ होती. ती घरात देखील कोणाशी नीट बोलली नाही. सरळ तिच्या रूममध्ये निघून गेली. ती मनात स्वतःशीच बोलत होती;
‛हा राजस पण ना.. शिट! मी त्याच्याशी मैत्री करायलाच नको होती. पण तो असा माझ्या प्रेमात पडूच कसा शकतो? मला आता पुन्हा तेच करायचे नाही. माझ्या आयुष्यात वादळ आहे ते अजून नीट शमले नाही आणि पुन्हा तेच? माझ्याकडून शक्य नाही. पण सीमा तू त्याच्याशी असं बोलायला नको होतं. त्याने तुझ्याशी मैत्री केली, तुझी इतकी मदत केली आणि तू त्याच्यावर सरळ आरोप केलास की तो हे सगळं पैशासाठी करत आहे. दुखावला गेला तो. पण मी तरी काय करणार? तो मला जे बोलला ते माझ्यासाठी अनपेक्षित होतं. जाऊदे! मला त्याचा विचार नाही करायचा. फार फार तर त्याला सॉरी म्हणेन उद्या पण आता इथून पुढे त्याचा संपर्क नको.’ ती स्वतःच्या मनाला समजावत होती.
★★★
★★★
इकडे मोहित राणेच्या ऑफिसमध्ये अस्वस्थपणे बसला होता.
मोहित,“काय राणे शहरातले तुम्ही टॉपचे वकील आहात. मी माझी केस लढण्यासाठी तुम्हाला लाखोंमध्ये फी दिली आणि तुम्ही काय केलंत?” तो रागाने तणतणत होता.
राणे,“डोन्ट ब्लेम मी लाईक दॅट! चूक तुमची आहे मिस्टर मोहित. तुम्ही रिमाबद्दल मला सांगितले का? जर आधीच तिच्याबद्दल मला कल्पना दिली असती तर आपण सावध झालो असतो आणि तिला कोर्टात येण्यापासून रोखू शकलो असतो.” ते म्हणाले.
मोहित,“मला काय माहीत होतं की सीमा फक्त रिमाच्या नावावरून तिच्यापर्यंत पोहोचेल आणि तिला कोर्टात घेऊन येईल.” तो म्हणाला.
राणे,“हेच चुकलं तुमचं. तुम्ही स्वतःही गाफील राहिलात आणि मलाही गाफील ठेवलंत. तुम्ही सीमाला कमी समजून खूप मोठी चूक केली आहे. आज कालचा जमाना इंटरनेटचा आहे. इथे कोणीही कोणपर्यंतही अगदी सहजगत्या पोहोचू शकतो. सीमाने तेच केले आणि घेऊन आली रिमाला. आता सगळं आपल्या हातातून निसटले आहे.” ते म्हणाले.
मोहित,“असं कसं सगळं निसटले आपल्या हातातून? तुम्ही माझी मेडिकल कोणता डॉक्टर घेणार आहे आणि ती कोणत्या पोलीस ऑफीसरच्या देखरेखीखाली होणार आहे ते शोधा, कितीही पैसा लागू दे आपण त्यांना मॅनेज करू. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे हा.” तो म्हणाला.
राणे,“तुम्हाला काय वाटतं हे इतकं सोप्पं आहे? तुम्ही त्या गवळी बाईला ओळखत नाही. लोक वचकून असतात तिला. तिची करडी नजर आपल्यावर असणार आहे आणि तिने पोलीस ऑफीसर आणि डॉक्टर ती म्हणेल तोच असेल तशी कोर्टाची परवानगी मिळवली आहे. त्यामुळे हे पैशाने मॅनेज वगैरे सगळं विसरा आता. ही केस आपण हरलो आहोत आणि या सत्याला सामोरे जायला तयार रहा.” ते म्हणाले.
मोहित,“म्हणजे आता काहीच होऊ शकत नाही?” त्याने विचारले.
राणे,“नाही होऊ शकत काही.” ते म्हणाले
★★★★
★★★★
गेले आठ दिवस झाले सीमंतिनी अस्वस्थ होती. तिने राजसला अगणित फोन आणि मेसेज केले होते पण त्याने सीमंतिनीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. त्यामुळे ना सीमंतिनीचा फोन त्यांच्यापर्यंत पोहोचत होता ना तिचा मेसेज.
सीमंतिनीला वाटले होते की त्याच्या असण्याने किंवा नसण्याने तिला काहीच फरक पडणार नाही पण कुठेतरी तिच्याही नकळत ती त्याच्यात गुंतली होती आणि त्याच्या दूर जाण्याने या गोष्टीची जाणीव तिला झाली होती. तिने शेवटी राजसच्या ऑफिसचा पत्ता मिळवला आणि हाफ डे घेऊन ती राजसच्या ऑफिस सुटण्याच्या वेळी त्याच्या ऑफीसच्या बाहेर जाऊन उभी राहिली.
राजस पार्किंगमधून त्याची टू व्हीलर घेऊन बाहेर पडला तर ऑफिसच्यासमोर सीमंतिनी त्याला दिसली. त्याने तिला पाहून न पहिल्यासारखे केले आणि बाईक पुढे दामटवली तर सीमंतिनी धावत जाऊन त्याच्या बाईकच्या समोर उभी राहिली. राजसने करकचून ब्रेक दाबला आणि तो चिडून म्हणाला.
राजस,“जीव द्यायला माझीच बाईक मिळाली का तुम्हाला? बाजूला व्हा मॅडम.”
सीमंतिनी,“मी का जीव देईन बरं? मला तर अजून खूप जगायचे आहे.” ती हसून त्याला पाहत म्हणाली.
राजस,“जगा की मग पण माझा रस्ता सोडा.” तो रागाने म्हणाला.
सीमंतिनी,“हो पण असा कसा रस्ता सोडणार ना? मला तुझ्याशी बोलायचे आहे.” ती म्हणाली.
राजस,“त्या दिवशी बोलला ते कमी होते का? हे बघा मॅडम उगीच तमाशा नका करू हे माझे कामाचे ठिकाण आहे. मला जाऊ द्या. असं रस्त्यात बाईक समोर उभं राहून काय साध्य करायचे आहे तुम्हाला?” तो वैतागून पण रागानेच बोलत होता. सीमंतिनी जाऊन त्याच्या बाईकच्या मागच्या सीटवर बसली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
सीमंतिनी,“मला तुझ्याशी बोलायचे आहे तर तुझ्या घरी चल गप्प! नाहीतर तमाशा करेन मी!” ती त्याला धमकावत म्हणाली.
राजस,“तुम्ही मला धमकी देताय? आणि ही काय जबरदस्ती? बाईकवरून उतरा तुम्ही नाही तर मी बाईक तुमच्या सहित सोडून देईल.” तो रागाने म्हणाला
आणि सीमंतिनीने दोन्ही हाताने मागून त्याच्या कमेराला घट्ट विळखा घातला. आणि ती म्हणाली
सीमंतिनी,“आता सोड बरं बाईक. चल ना प्लिज राजस!” ती त्याच्या कानात हळूच म्हणाली.
तशी राजसच्या अंगावर एक गोड शिरशिरी आली पण स्वतःला सावरत तो म्हणाला.
तशी राजसच्या अंगावर एक गोड शिरशिरी आली पण स्वतःला सावरत तो म्हणाला.
राजस,“ठीक आहे तुम्ही चलाच आता पण मी जर वेडंवाकडं वागलो तर त्याला जबाबदार तुम्ही असाल.” तो रागाने म्हणाला.
सीमंतिनी,“मी नाही घाबरत तुला चल आता.” ती हसून म्हणाली.
राजसने रागातच मुद्द्यांम गाडी स्पीडमध्ये पळवली. त्याचं घर त्याच्या ऑफिसपासून जवळच असल्याने दोघे अवघ्या वीस मिनिटात तो राहत असलेल्या सोसायटीमध्ये पोहोचले. सोसायटी तशी हायफाय होती. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज आणि विग्ज होत्या. राजसने एका विंगच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि लिफ्टमध्ये शिरला. सीमंतिनी त्याच्या पाठोपाठ लिफ्टमध्ये शिरली. राजस रागाने लाल बुंद झाला होता. तो सीमंतिनीकडे पाहत देखील नव्हता आणि सीमंतिनी मात्र त्याच्याकडे एकटक पाहत होती. लिफ्ट थांबली आणि राजसने त्याच्याजवळ असलेल्या कीने एका फ्लॅटचे दार उघडले. तो आणि सीमंतिनी त्या फ्लॅटमध्ये गेले. प्रशस्त आणि सुंदर असा वेल फर्निष फ्लॅट होता तो. हॉलही प्रशस्त आणि एका बाजूला गॅलरी दिसत होती. समोर कदाचित किचन आणि दुसऱ्या बाजूला तीन बेडरूम सलग दिसत होत्या. सीमंतिनी हॉल आणि बाकी सगळं न्याहाळत होती आणि राजसने त्याची कामाची बॅग सोफ्यावर रागाने भिरकावली आणि तो जवळ जवळ ओरडला.
राजस,“बोला काय काम आहे माझ्याकडे?” त्याच्या आवाजाने सीमंतिनी दचकली पण लगेच सावरत ती म्हणाली.
सीमंतिनी,“तुमच्यात घरी आलेल्या पाहुण्याला असं वागवतात का?” तिने डोळे मिचकावून विचारले.
आता मात्र राजसचा राग शिगेला पोहोचला त्याने तिचा दंड रागाने धरला आणि तिला भिंतीला टेकवत तो तिला बोलू लागला.
राजस,“तुला काय हवं माझ्याकडून गं? तुझं नाही प्रेम माझ्यावर ठीक आहे. तू माझ्यावर आरोप केलेस, तुला वाटतं की तुला मिळणाऱ्या पैशामुळे मी तुझ्या मागे मागे लागलो. मी दूर झालो ना आता? मग आता मला का छळत आहेस तू?” तो चिडून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि तिचा हात सोडून दिला आणि बाजूला झाला.
सीमंतिनी,“तू माझा फोन ब्लॉक का केला?” तिने विचारले.
राजस,“कारण मला तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. मी तुझ्यावर प्रेम केलं पण तू तर मला मित्रही समजत नाहीस.” तो पुन्हा रागाने म्हणाला.
सीमंतिनी,“मी तुला त्या दिवशी खूप चुकीचं बोलले त्यासाठी आय एम सॉरी! मी तसं बोलायला नको होतं राजस. मला तुझी माफी मागायची होती आणि…” ती पुढे बोलणार तर त्याने तिचे बोलणे मध्येच तोडले आणि तो म्हणाला.
राजस,“बरं झाली माफी मागून तुझी? आता तू निघू शकतेस दरवाजा तिकडे आहे.” तो दाराकडे बोट करत म्हणाला.
सीमंतिनी,“तू समजतोस कोण रे स्वतःला? एकतर गेले सहा महिने झाले माझ्या मागे रुंझी घालत आहेस, माझ्याशी मैत्री केली, मला मदत केली आणि अचानक मला म्हणतोस की तुझं प्रेम आहे माझ्यावर मग मी कसं रिऍक्ट व्हावं? मला मान्य मी चुकीच्या पध्दतीने रिऍक्ट झाले, तुला दुखावलं पण म्हणून तू माझ्याशी संबंध तोडणार का? हे बरं आहे! पहिल्यांदा एखाद्या माणसाला सवय लावायची, त्याच्या मागेपुढे करायचे आणि तो माणूस चुकला की त्याच्याशी संबंध तोडून मोकळे व्हायचे. आठ दिवस झाले मी कशी जगतेय मला माहीत.” ती आता रागाने तणतणत होती.
राजस,“अच्छा? म्हणजे सगळी चूक माझीच आहे ना! तुमची तर काही चुकच नाही ना मॅडम. बरं! माझंच चुकलं मी तुमची हात जोडून मा…..” त्याने हात जोडले आणि तो बोलत होता पण त्याचे पुढचे शब्द त्याच्या ओठांतच राहिले कारण सीमंतिनीने तिच्या ओठांनी त्याचे ओठ बंद केले होते. राजसला पाच मिनिटं काहीच कळतं नव्हतं की त्याच्याबरोबर काय होतंय पण तो भानावर आला आणि तिला ढकलून देत म्हणाला.
राजस,“व्हॉट द हेल इस दॅट?”
आणि सीमंतिनीने त्याला मिठी मारली ती रडत बोलत होती.
राजस सीमंतिनीला माफ करेल का?
©स्वामिनी चौगुले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा