१-@स्नेह.
कट्ट्यावर फारसा न जाणारा तो या दिवशी मात्र जायचा.सर्वांना आपुलकीनं भेटायचा. या दिवशी तुटलेले जोडता येते,दूर गेलेले जवळ येते,हरवलेले गवसते अशीच काहीशी धारणा होती त्याची. आज “सीमोल्लंघन” होतं. नुकतंच विजयादशमीचं सोनं ग्रामदेवतेला अर्पून तो मित्रांच्या घोळक्यात सामील झाला होता. काही रोजचे तर काही दसरा आहे म्हणून विशेष सुट्टी काढून गावी आलेले मित्र. मग गप्पांना आणि हास्याला पूर आला होता. सगळी संध्याकाळ मग तिथेच संपली. घरातून “जेवायला खोळंबलेत सगळे” असा बहिणीचा मेसेज आला. काही तरी कारण सांगून तो तिथून बाहेर पडला. मन मात्र तिथेच अडकले होते.मितभाषी होता पण सर्व मित्रांचा खास होता तो.
आज का कुणास ठाऊक मन बेटं स्वैर होतं. कसल्या तरी अनामिक लाटेवर स्वार होतं. “पाय जमिनीवरच आहेत ना?” दोन-तीनदा बहिणीनं छेडून झालं होतं.त्या आभासी जगातच जेवण केव्हा उरकलं हे त्यालाही कळले नाही. “आज पोरगं पोट भरून जेवलं’ इतकं मात्र आईच्या तोंडून आपसूकच निघाल्याचं कानावर पडलं त्याच्या. ते कानात साठवून पानावरून उठला आणि निघाला बाहेर.नेहमीप्रमाणे मोबाईल घ्यायला विसरला नाही. नेहमीच्या जागी जाऊन बसला आणि मोबाईलवर नजर टाकली. एक टेक्स्ट मेसेज वाट पाहत होता. नंबर अनोळखी होता. कदाचित कंपनीचा असेल म्हणून डिलीट करायला निघालाच होता तो. काहीतरी वेगळं जाणवलं आणि बोटं थांबली त्याची. त्यानं मेसेज उघडला.
“आपट्याचं पान देऊन
नवं पान जोडू म्हणते
झालं गेलं विसरता येईल
प्रयत्नांची वात लावते.”
“मला आणि त्या क्षणाला जमलं तर माफ कर.
सोन्यासारखं मन तुझं ,मळभ सारं साफ कर.”
@स्नेह.
मेसेज वाचला आणि तो बुचकळ्यात पडला. कशाचा कशाशी ताळमेळ लागेना. हे काय आहे आणि हे आहे तरी कोण याचा अंदाज लावायचा प्रयत्न तो करू लागला. नावावरून देखील कळत नव्हतं, मुलगा असेल की मुलगी असेल. की फक्त स्नेह व्यक्त करणारा एखादा हितचिंतक.पण मेसेजचा मजकूर काही वेगळंच सांगत होता. या सगळ्यात एक गोष्ट मात्र आवडली होती. तो छोटासाच पण सुंदर मेसेज आणि त्या खालच ते “@स्नेह”. पण हा स्नेह,ही स्नेह की अजून काही ? हे उलघडत नव्हतं. आता काय करावे ? उत्तर द्यावं का मेसेजचं ? पण आपण तर ओळखत देखील नाही. मग नाही दिलं तर काय होईल,दिलं तर काय होईल? गुंता सुटेल की आणखी वाढेल ? की सरळ मेसेज डिलीट करावा ? पण आजचा हा सोन्याचा दिवस, असे वागणे बरे दिसत नाही. पण ओळख हा मुद्दा उरतोच....... उफ्फ. डोक्यात विचारांची गर्दी झाली. कुणाशी बोलावं का ? पण कुणाशी ? काय उत्तर येईल ? राँग नंबर असेल रे....सोडून दे. हेच ना ? द्यावं का सोडून...? हा इतकं मोठा विषय आहे का ? मग का आपण इतके विचारात पडलो बरे ? थोडा वेळ जाऊ दिला त्यानं आणि तडक घरी आला. बहिण नेहमीप्रमाणे वाट पाहात होती.त्याला पाहताच प्रश्नार्थक भाव दिसले तीच्या चेहऱ्यावर. पण तिकडे गांभीर्याने न पाहता त्याने हाताने खुण केली. तिला कळलं की भावाला कॉफी हवीय.
पाचव्या मिनिटाला हातात कॉफीचा मग होता. नजरानजर न होताच बहिणीला टाळून खोलीचं दार बंद केलं त्यानं. दहा वाजून गेले होते. वाफाळत्या कॉफीचे दोन घोट घेताच बराच मोकळा झाला तो. “@स्नेह” अशी अक्षरं कॉफीच्या मगात तरळून गेली...क्षणभर. थांबलेले विचारचक्र पुन्हा सुरु झाले. हा स्नेह भलताच पेच घेवून आला होता. खूप बेचैन झाला की मग रेडीओ ऐकायचा तो. ही सवय बाबामुळे लागलेली. उठून बिग एफ.एम लावले. तरुण असूनही मेलोडी ऐकायला फार आवडायचं त्याला. “मै जिंदगीका साथ निभाता चला गया....हर फिक्र को...” तेच तर. हा खूपच साधा अन सोपा विषय आहे. आपण का इतके कासावीस होतोय हेच कळत नाही. कोण जाणे असा अनुभव यावा ही कदाचित नियती असेल. पण ते सगळे आताच विचार करण्यात काय अर्थ आहे. एक साधा मेसेज. अनोळखी नंबर वरून आलेला. तोही शुभेच्छांचा. यात विचार किती केला आपण. तेव्हाच वाचून डिलीट केलं असता किंवा उत्तर म्हणून आपण देखील एक मेसेज पाठवला असता तर एव्हाना आपण या सर्व त्रासातून मुक्त झालोही असतो. त्यामुळे कळले तरी असते की समोरची व्यक्ती कोण आहे. खरंच अनोळखी आहे की कुणी ओळखीचं आपली चेष्टा तर करत नाही हेही समजेल. तसेच मेसेज मधील मजकुरानुसार आपण कुणाला कधी दुखवल्याचं स्मरत नाही.
इतका वेळ बिचारा मोबाईल एकटाच पडला होता. त्याने हातात घेतला. पुन्हा तो मेसेज उघडला. त्या चार ओळी वाचल्या. आता लक्षात आलं की त्या फोरवर्ड केलेल्या ओळी नक्कीच नाहीत. ही जी कोण व्यक्ती आहे ती नक्कीच रसिक असावी. कदाचित कवी,कवयित्री. दोनच ओळीत मन कळतं का ? नंतरच्या दोन ओळी. नेमकं काय सांगतात.? असं काय झालं असेल ? कोण असतील हे किंवा ही दोघं ? काय नातं असावं ? आत्ता कुठे थांबलेली मानस रेल पुन्हा चालू झाली. त्याच्या लक्षात आलं. आपलं काय चाललंय हे कोडं असलं तरी आता पुरे. हे सगळं पहिल्यांदा होत होतं. आता काहीही असो, काहीही होवो या सुह्र्द व्यक्तीला उत्तर द्यायचं हे त्याने ठरवलं. आता इतक्या सुंदर मेसेजला उत्तर देखील तितकंच सुंदर हवं म्हणून तो मोबाईलवर शोधू लागला. इतकं चांगलं आपल्याला सुचेल अशी शक्यता खोडून काढली त्याने. अरे यार....ताईचा मोबाईल मिळाला असता तर एखादा मेसेज नक्की सापडला असता. पण तिचा प्रश्नार्थक चेहरा....? नको रे बाबा.
इतक्यात दारावर “टकटक” झाली. हातातला मोबाईल पटकन बाजूला गेला. त्यानं दार उघडलं. मिश्कील हसत बहिण उभी होती. “काय हवंय गं आत्ता” ? जरा त्रासातच तो बोलला. “भावा, मस्त गरमगरम कॉफी पिली, साधा थ्यांक्यू पण नाही.” “मग आता काय तो थ्यांकू मागायला आलीस का” ? पुन्हा गुश्यातच बोलला तो. तिकडे सवयीने दुर्लक्ष करत ती म्हणाली, “तुझं थ्यांकू ठेव तुझ्याजवळ. कॉफीच्या मगाला मुंग्या येतील... तुझ्या डोक्याला जशा संध्याकाळपासून आल्या आहेत ना तश्या. आई मला स्पेशल थ्यांकू म्हणेल...ते परवडायचं नाही बा...आण तो मग इकडे. आणि बस कोडी सोडवत.” ही अंतर्ज्ञानी तर नसेल ना...? त्यानं मनातल्या मनात म्हटलं. तसंही ताई समोर तो नेहमी मनातल्या मनातच बोलायचा. ती त्याच्या चेहऱ्यावरून सगळं ओळखायची. या बाबतीत ती आईच्या बरीच पुढे होती. पण त्याच्याही नकळत त्याची खूपच काळजी घ्यायची ती. तोही चिडायचा तिच्यावर पण प्रेमही तितकंच करायचा. त्या दोघांचा बहिणभाऊ म्हणून मोकळा संवाद तसा कमीच होता. पण मनांची भाषा परफेक्ट कळायची. म्हणुनच त्याला धास्ती होती. हिला कधी कशाचा सुगावा लागेल नेम नाही. कदाचित आपल्या हालचाली, चेहरा पाहून काही तरी कळलंय तिला. ती जायला निघाली. त्याला वाटले की एखादा छानसा मेसेज मिळेल, ताईचा फोन मागावा. पण तोही विचार मनातल्या मनात गिळला. त्याने दार बंद केले.
काहीतरी जुळवाजुळव करून मेसेजला उत्तर द्यावं आणि हे विचारांचं चक्र इथेच थांबावं असे त्याला मनापासून वाटले. पुन्हा मोबाईल चाळू लागला. पण हवं तसं हाती काही लागलं नाही. दिवसभरात इतक्या लोकांना भेटलो पण काहीच उपयोग नाही.काहीच सुचलं नाही. शेवटी सगळेच विचार बाजूला सारले आणि सहज साध्या सोप्या भाषेत उत्तर देऊन मोकळे व्हावे असा विचार करून तो सावरून बसला.
“@स्नेह” ला शुभेच्छा देण्यासाठी त्याने मोबाईलवर टाईप करायला सुरु केले.....
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा