सीमोल्लंघन : २ - जवाब

Snehashri ....shocked for malhar;s mesej. she reply but not sure for answer....still waiting for last mesej.

             (पूर्वसूत्र) :- ऐन दसऱ्याच्या दिवशी अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज पाहून तो गोंधळतो. अनेक प्रश्नांची भेळ करतो पण शेवटी काहीही होवो मेसेजला उत्तर द्यायचं ठरवतो.आता पुढे.......

सीमोल्लंघन :- २) जवाब

       हातात मोबाईल,बोटं स्क्रीनवर,छातीत स्पंदनं अशी काहीशी अवस्था.पहिला मेसेज टाईप करतो.

“वि ज या द श मी च्या शु भे च्छा. सो नं घ्या ,

सो न्या सा र खं रा हा. तुमच्या शुभेच्छा मिळाल्या.

पण ओळख पटली नाही”.

असा काहीतरी पटकन सेंड करतो आणि सुटकेचा नि:श्वासही. पण हुरहूर कमी होण्याऐवजी वाढतेच. रिप्लाय केव्हा येईल माहित नाही.पण वेध मात्र तेच लागलेत मनाला.विचारांची गाडी सुरु होणार इतक्यात फोनची रिंग वाजली. घड्याळात १०.३० झाले होते. त्याने ओळखला संकेत. मित्रांची टोळी वाट पाहात होती.जायला लागणारच होते. तो थोडा फ्रेश झाला. चेहरा निर्विकार दिसावा याची काळजी घेत घराबाहेर पडला.खिडकीतून बोट दाखवून बहिणीनं दम भरला. लवकर परतायला हवं हे आता सवयीचं झालं होतं.

         मित्राचं नेहमीचं सर्कल बसलं होतं. एका गोल स्टुलावर प्लेटमध्ये चिकन सिक्स्टी फाय, बाजूला दोनच स्प्राईटच्या बॉटल आणि फिलिप्सचा रेड एफएम. सुदैवाने एकाही मित्राला गप्पा,मैत्री आणि गाणी सोडून कसलेही व्यसन नव्हते. तो देखील खूप दिवसांनी गावी आला होता. दोन शिव्या पचवून मगच मित्रांनी चिकन सिक्स्टी फाय ला हात लावू दिला.सोबत एकमेकांची खेचाखेची होतीच.कुणाची एमपीएससी ची वारी, कुणाची हमाली बिनपगारी, कुणाची बापाशी हमरीतुमरी आणि कुणाचं आपण भले आणि आपली नोकरी भली......याच विषयावर प्रत्येकाची सावध टोलेबाजी चालू होती. आता गाडी पोरींच्या विषयावर घसरायची वेळ झाली होती. हे ताडून तो उठला.उद्या लवकर निघायचं आहे सांगून बाहेर पडला.बराच वेळ झाला होता. आता जागे राहण्यात अर्थ नाही म्हणून बेडवर पडला. लाईट बंद करताना जाणवलं की बहिणीच्या खोलीतला लाईट आताच बंद झालाय. किती काळजी करते ही....ही लग्न करून गेल्यावर करमेल का आपल्याला...? असा विचार करत एक वेळ मोबाईल चेक केला. डिस्प्ले कोराच होता. केव्हा झोप लागली कळलेच नाही त्याला.

.........             ............         .............        ..............           ...............

          गेला आठवडाभर ती नेमकं कोणत्या जगात वावरत होती तिचं तिलाच उमगत नव्हतं. काय करतोय,काय खातोय,काय पितोय,कुणाशी बोलतोय....सगळं स्वप्नात असल्यासारखं. तरी मन सावरायचा आटोकाट प्रयत्न करत होती. खूप वेळ तसाच गेला. काहीतरी आठवलं तसं ती सोफ्यावरून उठली. पाय हल्ली जरा कुरबुर करू लागले होते.पण डोक्यातील दुखणं शरीराकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत होतं. तिनं सावकाश मोबाईल पिनआउट केला.नुकताच नवा फोन घ्यावा लागला.आधीच चणचण त्यात हा एक खर्च.तेही निभावून नेलं तिनं ....,पण जाताना जुना फोन खूप आठवणी पुसून गेला.आता मनातल्या आठवणी सोडून तिच्या जवळ काही उरलं नाही.

           एक नजर तसबिरीच्या आकारातील पुसट चौकोनाकडे टाकली...,नेहमीप्रमाणे. काल पाठवलेल्या मेसेजला अजून रिप्लाय कसा आला नाही मल्हारचा असा विचार करून तिने मोबाईल अनलॉक केला. एक मेसेज होता.तोच नंबर.काल शेवटी मेसेज केलेला.उघडावा का मेसेज..? काय असेल त्याचं उत्तर..? नेहमीप्रमाणे चिडला असेल का...? की आपण मेसेज केला हेच आवडले नसेल..? तो नक्की माफ करेल का आपल्याला...? सोन्याचा दिवस बघून केलेल्या मेसेजचं सोनं झालं असेल का..?

प्रश्नांची चेन्नई एक्प्रेस झाली होती....क्षणात.मोबाईल पुनःपुन्हा लॉक होत होता...ती अनलॉक करत होती.आयुष्य असं लॉक-अनलॉक करता आलं असतं तर किती बरे झाले असते....एक विचार मनात तरळून गेला. तिने प्रयत्नांती सावरले स्वतःला. मेसेज ओपन केला.

“वि ज या द श मी च्या शु भे च्छा. सो नं घ्या ,

सो न्या सा र खं रा हा. तुमच्या शुभेच्छा मिळाल्या.

पण ओळख पटली नाही”.

हा असा का मेसेज केला याने..? आणि इतका तुटक..? राग गेला नसेल बहुधा. तिने मेसेजच्या शेवटी नजर टाकली. ओळखीची खुण काही दिसत नव्हती.तिला आश्चर्य वाटले. रागातही आपली ओळख मल्हार लपवत नाही.मग आताच असं का...? आपण इतक्या दिवसांनी मेसेज केला हे पटलं आणि पचलंही नसेल कदाचित. ती गोंधळात पडली. एक तर मोबाईल नवा....त्यातील सगळे नंबर अनोळखी.. इतक्या लोकांत मल्हारचा आणि आईचाच काय तो नंबर पाठ होता. अजून आठवतील,येतील तसे सेव्ह करायचे म्हणून कोणताच नंबर सेव्ह करून ठेवला नव्हता.काही घोळ तर नसेल ना.....? उगाच मनात शंकेची पाल चुकचुकली.

          पुन्हा एकदा मेसेज वाचला. हा आपली ओळख खरेच विसरला असेल का ? माझी परीक्षा हाही बघणार असे दिसतेय. द्यावं का उत्तर....की थांबवावं सगळं,पुन्हा बिघडण्याआधी..? एखादा राग छेडला आणि मैफिल अशी भंगली की सूरच हरवायची भीती जास्त. मोबाईल हातात घेऊन कितीतरी वेळ ती भिंतीशी टेकून उभी होती.पाय भरून आले अन ती गच्चीत येवून बसली. एक कॉफी गरजेची होती.

............      .............        ..............           ..............             ................

              अलार्मची कटकट दर दहा मिनिटांनी सुरु होती. उठून बंद केली. आज शहरात जायचे होते.मित्रांना तेच कारण सांगून रात्री कल्टी मारली होती.पण सकाळी जागच आली नाही.आता अकरा वाजले होते. ताईच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयारी करावी की जावे दुपारच्या बसने....असा विचार करत तो उठला. अंघोळीला जाण्याआधी ताई कुठे आहे आईला विचारले.ती इस्त्रीचे कपडे आणायला गेली होती. मोबाईल बघत बसलो तर ताई टपकेल मग आपली तत पप होईल म्हणून तो आवरायला गेला.पंधराव्या मिनिटाला तो आवरून बसला होता. आईने नाश्ता दिला. खाण्याला सुरुवात करायच्या आधी मोबाईल आठवला. सहज अनलॉक केला.एक अनसीन मेसेज होता. तोच नंबर. त्याची उत्सुकता वाढली. ओपन केला मेसेज...

“तू खरंच मला विसरलास की तुला बोलायचं नाही माझ्याशी..? माझा नंबर सेव्ह असेलच. पण जाऊदेत,मी तुला डीस्टर्ब केलं असेल तर सॉरी.एका उत्तराची आणि तुझ्या त्या ओळखीच्या खुणेची प्रतीक्षा आहे.” @स्नेह.

त्याने नाश्ता भराभर संपवला.काय खाल्ले हेही आठवणार नाही इतक्या वेगात.घोटभर पाणी प्यायला.

आईने चहा आणून ठेवला होताच. खरं तर आता कॉफी हवी होती.पण ताईची कॉफी अन आईची कॉफी.

.... चहालाच कॉफी समजून पिले त्याने. अरे....हे काय आहे...? कोण आहे हा/ही स्नेह...? विसरणं...डीस्टर्ब..सॉरी...ही काय भानगड आहे..? आणि ओळखीची खुण...? आता हे प्रकरण सुटण्याऐवजी वाढतच चाललंय यार...किमान स्नेह कोण आहे हे तरी कळायला हवे होते...आपण यातून बाहेर पडलेले बरे असा विचार आला डोक्यात.पण एक मन अजूनही कोडं सोडवू पाहात होतं.एखाद्याचा गैरसमज दूर करून मग थांबू असा निर्णय पक्का झाला. किमान हा राँग नंबर आहे हे तरी त्या व्यक्तीला कळायला हवे म्हणून त्याने नवा मेसेज टाईप केला......

........... स्नेहश्रीनं कॉफी संपवून मग बाजूला ठेवला.आणि उत्तराच्या वलयात हरवली.......    ............

क्रमशः.....

🎭 Series Post

View all