सीमोल्लंघन : ३ -उलघडा

after few complication finely he know.....meaning of "Sneh"....next will be interesting ...

(पूर्वसूत्र) :- त्याला मेसेज मिळतो पण तो वाचून काहीच उलघडा होत नाही. उलट गुंता वाढू नये म्हणून शेवटी हा राँग नंबर असल्याचा मेसेज करायला घेतो.....आणि पुढे,,,

सीमोल्लंघन :- ३ : उलघडा           

            “टिकटिक....टिकटिक..” वाजलं आणि स्नेहश्रीची तंद्री भंग पावली.मेसेजला एक रिप्लाय होता. आता हा आणि काय म्हणतोय बघुया असं म्हणून तिनं मेसेज ओपन केला.

“तुमचा काहीतरी गैरसमज झालाय.हा राँग नंबर आहे.मी खरेच तुम्हाला ओळखत नाही.सीमोल्लंघन होते, शुभेच्छांचा मेसेज होता म्हणून मीही रिप्लाय दिला.पण कालचा तुमचा मेसेज वाचून जास्तच बुचकळ्यात पडायला झाले.आता तुमच्या खाजगी आयुष्यात काहीतरी उलथापालथ होऊ नये इतकीच इच्छा आहे.तुम्ही कदाचित चुकीचा नंबर निवडलाय.असो...काळजी घ्या.काही चुकलं असेल तर क्षमस्व.”

जोडू पाहात होतो ती शृंखलाच तुटली हे आता पक्के झाले. याचा अर्थ मोबाईल आणि आपली स्मृती दोघांनीही विचका केला.आता हा खेळ पुन्हा करण्यात काहीच अर्थ नाही.आपल्या आयुष्यात उरलेला ‘मल्हार’ आता विरला....ना धुन ना शब्द. हीच नियती असेल तर....?

          एक दीर्घ उसासा सोडला तिनं. तोच मेसेज वेड्यागत पुन्हा वाचला. लिहिण्या आधीच अध्याय संपला. तिनं फोन बाजूला ठेवला आणि किशोरीचं गाणं लावलं......फक्त तिलाच ऐकू येत होतं.

................       ................        ...............        ...............

              नुकताच रूमवर पोहोचला होता तो.सात वाजले होते. संध्याकाळच्या जेवणाची चिंता नव्हती.आईने आणि ताईने भरपूर डबा आणि आवडत्या कडाकण्या दिल्या होत्या. त्या व्यक्तीला आपण खरे सांगितले याचं समाधान होतं. पण ती कोण असेल...? असं काय झालं असेल आणि विशेष म्हणजे ‘ओळखीची खुण’ या प्रश्नांची उत्तरे अजूनही छळत होती. उद्यापासून रुटीन सुरु होईलच. हा विषय विस्मरणात जाईल इतकं काम असणार आहे याची जाणीव होऊन तो उद्याची तयारी करू लागला.

          प्रवास झाला की जेवणानंतर काम जमत नाही मग सकाळी धावपळ आणि चिडचिड हातात हात घालून मानेवर बसतात. आख्खा दिवस खराब जातो. त्यापेक्षा आताच तयारी केलेली बरी. तासाभरात सगळे आवरून तो फ्रेश होऊन आला..., आणि डबा उघडला.सहज ताईची आठवण झाली. ती सतत आपल्याजवळ असावी असे जरी वाटत असले तरी तिचं सगळं चांगलं व्हावं हे मनापासून वाटतंय.पण बिचारी किती स्थळ अजून नाकारणार कळत नाही. जेवण आटोपून जवळच एक फेरफटका मारून यावा म्हणून पायात स्लीपर्स अडकवून निघाला. मोबाईल न घेताच.आज कुल्फी खायची खूपच इच्छा झाली.नेहमीच्या माणसाकडून विकत घेतली आणि गार्डनमध्ये न जाता बाहेरच थोडा वेळ टेकला. समोरच्या हॉटेलच्या टेरेसवर स्क्रीन चालू होती. त्यावर गाणं सुरु होतं....”ये मोह मोह के धागे...तेरी उन्गलियो से जा उलझे.....” पुढील ओळी अस्पष्टशा गुणगुणत तो रूमवर आला.

           दहा वाजायला आले होते.मोबाईल बेडवर अंधाराशी गप्पा मारत होता. त्यानं तो उचलला. अनलॉक केला आणि आश्चर्याचा धक्का बसला. जो विषय संपवून थोडासा निवांत झाला होता त्याच अनोळखी नंबरवरून चक्क मिस कॉल....? अरे हे अजून काय..? नेहमीप्रमाणे चुकून फोन लागलाय की खरेच आपल्याशी बोलायचं आहे या व्यक्तीला...? पण आपण ओळखत नाही..आणि हे आपण सांगूनही टाकलंय.,मग आता काय काम असेल..? मला त्रास झाला म्हणून माफी वगैरे मागतेय की काय ही व्यक्ती...? आता झोपायचं म्हणून ठरवलं आणि हे नवीन काय..? करावा का फोन ? पण एकच मिस कॉल दिसतोय...चुकुनच लागला असेल. कशाला पुन्हा नसतं लफडं मागे...! पण खरेच काही बोलायचे असेल तर...? काय करावं बरे..?

..............         ...............       ..............          ................

          हे आपण काय करून बसलो असा विचार करून स्नेहश्री स्वतःला दोष देत बसली होती. हा नंबर डिलीट करायला म्हणून गेले आणि चुकून कॉल गेला...शिताफीने कट करायचा प्रयत्न करूनही एखाद दुसरी रिंग नक्कीच गेली असणार...आता ती पलीकडील व्यक्ती काय विचार करत असेल आपल्याबद्दल ? आधीच त्या मेसेजमुळे काय समज झालाय त्यांचा कोण जाणे. आपट्याचं पान, ओळख, ती खुण आणि काय काय... त्यात हा नवा उद्योग करून बसलो आपण. आता पुढे काय असा विचार डोक्यात येतो न येतो...मोबाईलवर टेक्स्ट मेसेज झळकला.

“तुमचा मिस कॉल होता.मी उशिरा पहिला.काही बोलायचं होतं का..? मी फोन करणार करणार होतो पण आता बराच उशीर झालाय म्हणून नाही केला. तुम्ही मेसेज किवा कॉल करू शकता.”

आता आली ना पंचायत...आपल्या घोडचुकीची शिक्षा उगाच दुसऱ्याला...काय करावं..? मेसेज करून सॉरी म्हणावं आणि रिकामं व्हावं...त्यांनाही त्रास नको. की फोन करावा...? साडेदहा तर वाजलेत रात्रीचे. पण नकोच....फोन पेक्षा मेसेज बरा.विषय संपेल...? की काही नवा गुंता व्हायचा...? ही मनात चलबिचल का व्हावी...? एका साध्याशा मेसेजसाठी. कसल्या जाणीवेचा पडदा फडफड करतोय उरी..? पुन्हा एक दीर्घ उसासा सुटला...आणि तिनं टाईप केलं....

..............        ...............        ...............           ................

          “ मी स्नेहश्री दीक्षित.गेल्या दोन तीन दिवसात माझ्या छोट्याशा चुकीमुळे तुम्ही बराच त्रास सहन करताय.विनातक्रार.त्यासाठी मनापासून सॉरी. एका अंकाच्या घोळामुळे तो मेसेज तुम्हाला गेला. तुम्ही स्पष्ट सांगून टाकल्यावर मला कळले की हा राँग नंबर आहे.पण पुन्हा माझ्याकडून मिस कॉल पडला तुम्हाला.त्यासाठी देखील सॉरी.पुन्हा अशी चूक होणार नाही.शुभ रात्री.”

असा मेसेज वाचला आणि त्याची झोप पळाली. त्याला वाटलं नव्हतं की असा मेसेज येईल.म्हणजे हा सगळा प्रकार एका चुकीच्या नंबरमुळे झाला म्हणायचा. पण एक गोष्ट त्याला जास्त भावली....ती म्हणजे “@स्नेह” या नावावरील पडदा त्याच व्यक्तीनं दूर केला होता. ती एक स्त्री किंवा मुलगी होती आणि तिचं नाव होतं स्नेहश्री. नावातच स्नेह दडलाय तर...! हा राँग नंबर आवडला आपल्याला. सॉरी म्हणायची गरज नव्हती पण इतक्या सहज,अशा पद्धतीने क्षमा मागणं आपल्याला तरी जमलं नसतं बुवा. एक मेसेज करून टाकूच.....आणि त्यानं सहज टाईप केलं.....

क्रमशः..........

🎭 Series Post

View all