सीमोल्लंघन : ४ :- सिलसिला

and finely start messejing eich other.....

पूर्वसूत्र :- दोन तीन दिवसाच्या मेसेज नाट्यानंतर “@स्नेह” चा उलघडा झाला.एक अंक संपला. पुढे काय होईल हे त्या दोघांना तरी कुठे ठाऊक होतं......चला बघुया.

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र,त्यांची नावे,स्थळांची नावे कथेच्या परिणामकारकतेसाठी घेतली आहेत.योगायोग असतोच.)

सीमोल्लंघन : ४ –सिलसिला

          “स्नेहश्रीजी अहो चुकून घडलेल्या छोट्या गोष्टीसाठी सॉरी कशाला म्हणताय..? मला कसलाही त्रास झाला नाही.उलट तुम्ही पाठवलेला पहिला मेसेज अधिक आवडला.तुमच्या भूतकाळात शिरायचा मी कधीही प्रयत्न करणार नाही. तुमचं नाव सार्थ करताय तुम्ही.मला आवडेल तुम्ही बोललेलं....यापुढेही. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर. शुभ रात्री.”

अगदी सहज त्याने मेसेज पाठवला.ही नवी सुरुवात होती की या सगळ्याचा शेवट काही ठावूक नव्हते.

...............          ...............         ...............           ...............

          स्नेहश्री झोपायच्या तयारीतच होती आणि हा एक मेसेज झळकला.तिला उत्तराची अपेक्षा नव्हती.पण हा मेसेज वाचला आणि हलकेसे स्मित झळकले गालावर....जे कित्येक दिवस गायब होते. स्क्रीनवर टाईम पहिला तिने. साडेदहा झाले होते. कोण असेल ही व्यक्ती..? आपण तर सगळं क्लीअर केलं होतं.मग पुन्हा कशाला नवी परीक्षा.पण हा मेसेज....बिचाऱ्यानं नाव तरी सांगायचं होतं....करू का रिप्लाय...? ती व्यक्ती म्हणतेय तसं आपल्यालाही आवडेल बोलायला...? अनोळखी व्यक्तीशी मैत्री जमेल आपल्याला...? आपला ओळखीच्या लोकांशी असा अनुभव असताना हे पचेल..? काही नवीन समस्या तरी उभी राहायची नाही ना...?

         आपली शंका एक्स्प्रेस भारी द्वाड आहे....काय हरकत आहे...? तसेही योग बराच जुळून आला म्हणायचा.....दसऱ्याचं सोनं. विचारावरून तर सभ्य वाटतीय ही व्यक्ती..का ओढ वाटतेय...? असं काय आहे..जे अजूनही पुरतं कळलंय असं वाटत नाही .बोटं इतकी अधीर का झालीयत...? हा संकेत कसला...? तिच्याही नकळत तिनं टाईप केलं....

      “ तुम्ही हे सगळं इतक्या सहज घेतलं हे बरंच.समजूतदार वाटताय तुम्ही. मलाही आवडेल आपल्याशी बोलायला....तुमचं नाव कळलं असतं तर...? पण तुम्ही आताच सांगा असे नाही म्हणत.”

..................          .................         ...................             ................

      तो वाट पाहात होताच उत्तराची.मेसेज वाचला आणि त्याच्या लक्षात आले की आपण नावच सांगितले नाही. एक टपली मारली.....स्वतःच्या डोक्यात आणि गालात हसला. सिलसिला सुरु होतोय याची खात्री झाली. मनात काहीतरी झालं...काय ते माहित नाही पण गोडसं होतं एवढं मात्र नक्की.... त्यानं रिप्लाय दिला...

       “आता मात्र खरंच सॉरी हं...मी विसरूनच गेलो...भानच नाही राहिले...तुम्ही सहज नाव सांगितले....मी गंधार.सांगलीत राहतो. नुकताच छोटासा जॉब पकडलाय...तुम्ही मनमोकळेपणाने बोलत आहात हे खूपच आवडलं. कदाचित आपली भेट अशीच व्हायची असेल....सो आता जमेल तसे बोलत राहू...शुभ रात्री.”  

               कटकट वाटणारी गोष्ट आता आवडायला लागली होती. गंधार आता निवांत आणि भारी फील करत होता. फारशी ओळख नाही पण स्नेह जुळत होता......”स्नेहश्री” पेक्षा “स्नेह” हे नाव खूप भावलं होतं त्याला. नव्या मेसेजबरोबर नवी हुरहूर जन्म घेत होती. दुधात साखर विरघळावी तशी रजनी गोड भासत होती. खिडकीतून नेहमी दिसणारी खुळी चांदणी खुदकन हसत होती.आता मेसेज येणार नाही कदाचित असे वाटत असतानाच “टिकटिक टिकटिक” झालं. चटकन ओपन केला मेसेज त्यानं....

      “सुंदर नाव आहे तुमचं...गंधार.तसं माझं आणि संगीताचं कानापुरतंच नातं आहे म्हणायचं...पण हे नाव जवळचं वाटलं....तुम्ही बरोबर बोललात, आपली भेट अशी व्हावी ही कदाचित नियती असेल. मी प्रयत्न करेन जमेल तसे बोलायचा.शुभ रात्री.”

.................           ...............             .................               ...............

       गांधारला जाग आली ती अलार्ममुळे. रात्री केव्हा झोपी गेला कळलेच नाही. आज कामावर जाणार होता. आठवड्याच्या सुट्टीमुळे जायची इच्छा नव्हती.पण कळी खुललेली होती कालपासून. नेहमीचे सगळे आवरून तो नाश्त्यासाठी नेहमीच्या गाडीवर गेला. पोहे आणि उप्पीट मिक्स घेतले. वर शेव मागून घेतली. लिंबू पिळून घेतला आणि खाऊ लागला. हा असा नाश्ता करायची त्याची हटके पद्धत होती. मस्तपैकी चहा घेतला आणि बसची वाट बघू लागला. सहज मोबाईलवर नजर टाकली. एक मेसेज होता. तिचाच. रात्री नंबर सेव्ह करायला विसरला नव्हता तो.....तिचं नाव त्यानं सेव्ह केलं होतं, @स्नेह या नावाने.

“ कोवळ्या किरणात रवीच्या नाहायचा होतो मोह

संथ तरीही चमकतो खुळ्या आठवांचा डोह...@स्नेह”

शुभ सकाळ गंधारजी.

आता कुठे दिवसाची खरी सुरुवात झाली असे वाटले. पण पंचायत अशी होती की या मेसेजला उत्तर म्हणून साजेसा मेसेज त्याच्या मोबाईलवर नव्हता. काय लिहावे...? कशाला इतकं टेन्स व्हायचं... म्हणून उभ्या उभ्याच त्यानं टाईप केलं...,

“मेसेज उशिरा पाहिला.ऑफिसला जायच्या गडबडीत होतो. तुमचं @स्नेह हे नाव मला प्रचंड आवडलंय. मी तुमचा नंबर त्याच नावाने सेव्ह केलाय. शुभ सकाळ ,तुमचा दिवस आनंदात जाऊदे. @गंधार.”

बस आली आणि तो सावकाश चढला. आज दिवस प्रसन्न जाणार यात काही शंका नव्हती. सीबीएस एरियात त्याचं ऑफिस होतं. चेहऱ्यावरचे हसू जपतच तो बसमधून उतरला. रस्ता क्रॉस करतच होता... आणि .......करकचून मारलेल्या ब्रेकचा आवाज कानात घुमला.त्याला काही कळायच्या आत तो मागे खेचला गेला....कुणीतरी वायुवेगाने येऊन त्याला मागे खेचले आणि क्षणात भय डोळ्यासमोरून निसटून गेलं. एका दुचाकीवर तो आणि ज्यानं त्याला खेचले तो दिघे कोलमडले. पण ती रस्त्याकडेला लावलेली गाडी होती. काय घडले,कसे घडले काही कळत नव्हते. शेजारी उभा असलेला जीवनदाता गेलेल्या कार मालकाला शिव्यांची लाखोली वाहत होता. त्याला सावरायला वेळ लागला.

“भावा, जरा बघून तरी रस्ता क्रॉस करायचा....यमाच्या दाराला शिवून आलास तू...बरा आहेस ना..?”

त्या अनोळखी तरुणानं विचारलं आणि तो भानावर आला.

“....मी...ठीक..म्हणजे व्यवस्थित आहे...तुमचे आभार कसे मानू कळत नाही....माझेच चुकले. गडबडीत रस्ता क्रॉस करत होतो. तुम्ही सावरलं नाहीतर.....”

“चल तू नको आभार मानू...चल मीच तुला चहा पाजतो...”

ते दोघे चहा प्यायला गेले.त्या तरुणाने पुन्हा विचारपूस करून निरोप घेतला त्याचा. गंधार इतका घाबरला होता की त्याचं नावही विचारायचं भान नव्हतं. कधीतरी भेटेल ही अशा मनात ठेवून,नीट आजूबाजूला पाहून रस्ता क्रॉस केला. या सगळ्या धावपळीत जरा उशीर झाला होता. बॉसला काय उत्तर द्यायचे या विचारात तो ऑफिसमध्ये पोहोचला.......

क्रमशः

🎭 Series Post

View all