पूर्वसूत्र :- दोन तीन वर्षाच्या मेहनतीचे चीज म्हणजे प्रमोशन आणि नवी केबिन यामुळे गंधार खुश होतो. या खुशीचं कारण तो स्नेहश्री समजतो.तसं बोलूनही दाखवतो.... आता पुढे....,
`
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र,त्यांची नावे,स्थळांची नावे कथेच्या परिणामकारकतेसाठी घेतली आहेत.योगायोग असतोच.)
सीमोल्लंघन : ६-
त्या दिवशी घरी यायला थोडा उशीरच झाला गंधारला. दिवसभर मेसेजेस धडकत होते. तासाभराच्या अंतराने बुके भेटत होता. मित्रांना पार्टीचं आश्वासन देवूनच तो घरी परतला होता. रूमवर आल्या आल्या पहिला फोन घरी केला. आई आणि बाबा दोघेही भलतेच सुखावले. अन त्याची ताई तर..... तिचे गंधारवर विशेष प्रेम होते. आई आणि बाबांपेक्षा जास्त तिचं लक्ष होतं त्याच्या अभ्यास आणि करीयरवर. ती बोलताना नक्की रडली असणार हे त्याने फोन वरूनच ओळखले होते. मनभरून बोलून झाल्यावर त्याने स्नेहश्रीला मेसेज करून कळवले होते. तिला मेसेज वाचून काय वाटलं असेल याच विचारात तो झोपी गेला. सुखाची झोप ही व्याख्या कळली होती....सर्वार्थाने.
“सुप्रभात गंधार....तुमच्या आयुष्यात तुम्ही अशीच यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करत राहा हीच सदिच्छा. तुम्ही मला श्रेय देऊ नका. तो निव्वळ योगायोग समजा. खरे श्रेय तुमच्या हुशारी आणि कष्टाला आहे.आणि हो रस्त्यावर चालताना आजूबाजूला बघावं...कुणी तरी काळजी करत असेल हे ध्यानात ठेवा. तुमचा दिवस उत्तम जावो.”
मेसेज वाचला आणि गंधारचा दिवस सुरु झाला. काहीही म्हणा,आपण मेहनत केलीच पण लक आज कळले. माझ्या साठी क्रेडीट तिचंच.... गालावर हसू उमटले त्याच्या. त्याच वेळी रिप्लाय दिला त्याने.
“गुड मोर्निंग स्नेहश्रीजी, तुमच्या सदिच्छा अशाच राहूद्यात....नेहमी. तुम्ही राहता कुठे...? काय करता..? सांगाल का ? अर्थात तुम्ही सांगणार असाल तर हं...सहज विचारले. संकोच करू नका. माहिती असावं इतकंच वाटतंय.”
जबाबदारी वाढली होती...गंधार आटोपून निघाला देखील बससाठी. आज बसचा संप होता असे कळले आणि त्याने तत्काळ आटोला हात केला...
................ ............... ............. ...............
ब्रेकफास्ट आटोपून स्नेहश्रीने नुकताच मोबाईल हातात घेतला आणि मेसेज नजरेस पडला. मेसेज वाचला आणि ती विचारात पडली. आपण गंधारला नाव तर सांगितले पण कुठे राहतो,काय करतो, कोण आहोत काहीच सांगितले नाही. सुरुवातीला नवखेपणामुळे कदाचित टाळलं गेलं असेल आपल्याकडून पण आता तर तशी परिस्थिती मुळीच नाही आहे. आपला चांगला मित्र तर नक्कीच झालाय तो. शिवाय आपल्या भेटीचं, माझ्या असण्याचं किती कौतुक आहे त्याला.... आणि आपण..? एक टपली मारली डोक्यात आणि हसत मेसेज टाईप केला तिने..
“आपण इतके काही बोलतोय पण मी वेंधळी ,तुम्हाला कुठे राहते हेही सांगितले नाही. खरंच अगदी मनापासून सॉरी. मी परभणीला राहते. तसे तुमच्या पासून बरेच दूर आहे म्हणा...! साध्या तरी कोणताही जॉब वगैरे करत नाही. आधी करायची इच्छा होती पण मिळाला नाही आणि आता करता येत नाही. आणि हो.., तुमच्या यशाचं खरं श्रेय हे तुमचेच आहे बरं....मी निमित्तमात्र.”
थोडं बरं वाटलं तिला. कधी कधी ओघात साध्या पण महत्वाच्या गोष्टी आपण विसरून जातो हे तिलाही पटलं. यापुढे काळजी घ्यायची असे ठरवले तिने. आता काय करावे अशा विचारात होतीच आणि दारावरची बेल वाजली. बेल वाजवायची वैशिष्ट्यपूर्ण खुण तिने लगेच ओळखली आणि तिचा चेहरा खुलला.हातातले काम,डोक्यातले विचार क्षणात गायब झाले आणि ती लगबगीने दरवाजाकडे धावली.कधी एकदा त्यांना बिलगतेय असे तिला झाले होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा