Login

सिंहासन–एक रहस्यभेद ४

एक नवरत्न सिंहासनाच्या चोरीची कहाणी
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद कथालेखन (संघ कामिनी)

सिंहासन–एक रहस्यभेद!
©® भालचंद्र नरेंद्र देव

भाग ४

मुंबई महानंद वस्तुसंग्रहालयातून चोरी झालेले नवरत्न सिंहासन आता तुकड्यांमध्ये सापडले होते. डीएसपी कामिनी कुर्वे यांच्या नेतृत्वाखाली सीबीआयने गोडाऊन, बोगदे, पेंटिंग्ज आणि ‘ब्लॅक आऊल्स’ स्ट्रीट आर्ट ग्रुप यांच्यामागे लागून या गुन्ह्याचे मोठे जाळे उघड केले होते.

पण मुख्य प्रश्न अजूनही कायम होता, 'खरा सूत्रधार कोण?'

राघव राजे, आर्ट स्टुडंट, हे तर केवळ एक प्यादे वाटू लागले होते. इतक्या अचूक योजनेसाठी अनुभवाची आणि आतल्या माहितीची गरज होती. हे कोणी तरुण कलाकाराने एकट्याने केले होते असे मानणे अशक्य होते.

म्युझियमच्या जुन्या कर्मचाऱ्यांची चौकशी करत असताना अजून एक महत्त्वाची माहिती समोर आली. मुख्य सल्लागार अधिकारी मयुरी यांचे वर्तन गेल्या काही महिन्यांपासून बदललेले होते. त्यांनी सुरक्षा प्रणालींच्या अपडेट्सबाबत वारंवार आक्षेप घेतला होता. शिवाय, त्यांच्यावर निवृत्तीनंतरची पेंशन रोखण्याचा कारवाईचा इशारा म्युझियम प्रशासनाने दिला होता. कारण त्यांच्या बिलांमध्ये काही आर्थिक अनियमितता आढळली होती.

मयुरी यांच्यावर आता संशय अधिक गडद होत होता. तेव्हाच एक बातमी आली, राघव राजेच्या पासपोर्टचा वापर करून कोणी तरी श्रीलंकेकडे प्रवास केला होता; पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरा दिसत नव्हता. मात्र त्याच्या बरोबर असलेला एक प्रवासी 'मयुरी पाटील' म्हणजेच तीच मुख्य सल्लागार अधिकारी, एक वेगळी ओळख घेऊन तिथून परत आलेली होती.


कामिनी यांनी लगेच तिचे लोकेशन ट्रेस केले. पाटील एका फार्महाऊसवर लपलेली होती. रायगडजवळ छापा मारला गेला आणि तिला ताब्यात घेण्यात आले.

प्रत्येक प्रश्नाला सुरुवातीला ती मौन राखत होती; पण जेव्हा कामिनी यांनी तिला राघवच्या स्ट्रीट आर्ट फोटोज, कोडेड नोट्स आणि सुप्रियाच्या कबुलीजबानीची फाईल दाखवली, तेव्हा तिचा चेहरा बदलला.

मयुरी म्हणाली, “मी आयुष्यभर प्रामाणिक काम केले; पण जेव्हा माझी पेंशन रोखली गेली, तेव्हा कळाले की इथे प्रामाणिकपणाचे काहीच मूल्य नाही. राघव माझा भाचा आहे. तो लंडनहून कला आणि क्रांती घेऊन परत आला. त्याला हे सिद्ध करायचे होते की कला फक्त भिंतीवर राहू नये, तिने त्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न देखील विचारले पाहिजेत.”

कामिनी चकित झाली.

“त्याने हा सगळा प्लॅन तयार केला. मी फक्त त्याला आतून मदत केली. सुप्रियाला धमकी दिली. सिंहासनाचे भाग खालच्या बोगद्यामधून लपवून बाहेर काढले. आम्ही परदेशी आर्ट गॅलरीमध्ये त्याची विक्री करणार होतो; पण... त्याआधीच तुम्ही पोहचलात!”

दुसरीकडे, ब्लॅक आऊल्स ग्रुपवर दबाव टाकून कुर्वेंनी एक महत्त्वाचा क्लू मिळवला. त्यांच्यातला एक सदस्य सर्वेश भोसले हा राघवचा जवळचा मित्र होता आणि त्यानेच त्या गुप्त गोडाऊनमध्ये सगळे भाग वेगळे करून त्याला रंग द्यायचे काम केले होते.

सर्वेशला ताब्यात घेतल्यावर त्याने सांगितले, “राघव वेगळा होता. त्याला फक्त चोरी करायची नव्हती. त्याला म्युझियमवरचा लोकांचा विश्वास मोडायचा होता. लोकांना दाखवायचे होते की इतिहास जिथे जपला जातो, तिथेच सुरक्षा व्यवस्थेत भ्रष्टाचारही लपलेला असतो.”


सगळे जण सापडले असताना राघव अजूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होता. इतक्यात सीबीआयला आणखी एक धक्का बसला.

राघव राजेंच्या मेल अकाउंटवरून एक लाईव्ह ईमेल पाठवण्यात आला होता :

Subject : The Game’s Almost Over

"तुम्ही सिंहासन शोधलंत... तरी ‘राजा’ अजून झोपेत नाही. शेवटचा प्यादा अजून उरलेला आहे."

ईमेलचे लोकेशन ट्रेस करण्यात आले, तो आला होता बांद्राच्या एका लॉजमधून!

कामिनी टीमसह तिथे धावत पोहोचली. आतल्या एका बंद कपाटात राघव स्वतः लपून बसलेला होता.

तो थकलेला होता. चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता, फक्त समाधान विलसत होते.

“तुम्ही ते मिळवलंत; पण प्रश्न शिल्लक आहेत. ही फक्त चोरी नव्हती... हे एक माझे स्टेटमेंट होते.” तो म्हणाला.

कामिनी हसली आणि म्हणाली, “आणि ते स्टेटमेंट आता तुरुंगातून तुला ऐकवले जाईल.”


मयुरी, राघव, सर्वेश आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली.

क्रमशः

भालचंद्र नरेंद्र देव ©® ( संघ कामिनी )
0

🎭 Series Post

View all