Login

सियांश - CRUEL LOVESTORY (भाग २१)

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, सौ. जानकी नारायण कटक लिखित, सियांश - cruel lovestory.
महत्त्वाची नोंद: - कथेचं शीर्षक मी प्रेमसिया बदलून सियांश करत आहे, कारण कथा वेगळ्या पद्धतीने वळवण्याचा मी निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाव बदलणं गरजेचं होतं. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

                              



                                       मागील भागात



" ती वस्तू कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या हातात आलीच पाहिजे सूर्या. जर ती चुकूनही देवांश सरंजामेच्या हातात गेली तर विनाश निश्चित आहे. त्याला त्या वस्तूपर्यंत पोहोचण्यापूर्वी आपल्याला ती वस्तू मिळवावी लागेल. " सत्येंद्र अग्निहोत्री त्यांच्या आलिशान अग्निहोत्री पॅलेसमध्ये बसून फोनवर त्यांच्या मुलाशी म्हणजेच सूर्यांशशी बोलत होते.

" तुम्ही काही काळजी करू नका डॅड. लवकरच ती वस्तू आपल्या ताब्यात असेल. असा कसा आपण विनाश होऊ देऊ शकतो. त्या देवांश सरंजामेची लिमिट आता संपत आली आहे. एका माफियाची सहनशक्ती जास्त वेळ टिकून राहत नाही. माझी सहनशक्ती संपत आली आहे. फक्त एक वर्ष, मग त्या एक वर्षानंतर तो कायमचा या जगातून बाद होईल. " सूर्यांश रागाने आपल्या हातांच्या मुठी वळवत म्हणाला.

" तुमच्यावर विश्वास आहे आमचा. लवकरात लवकर कामाला लागा. जेवढा जास्त उशीर कराल तेवढं धोकादायक आहे. एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत आपल्याला ती वस्तू हवी. " सत्येंद्र कपाळावर बोटे रगडत म्हणाले.

" तुम्ही आधी डोकेदुखीची गोळी घ्या डॅड. कुठल्याही गोष्टीसाठी डोकं दुखवून घेऊ नका. तुमचा मुलगा समर्थ आहे सर्व गोष्टींसाठी. ठेवतो फोन, काळजी घ्या. " त्याला न पाहताही सत्येंद्र यांनी कपाळावर बोटे रगडलेली समजलं होतं.

अखेर त्यांचाच मुलगा होता तो. सुप्रीम डॉनचा वारस. त्यांनी बोलून दाखवलं नाही तरी तो त्यांचा त्रास समजू शकत होता. त्याच्या बोलण्यावर त्यांच्या ओठांवर हसू आलं. दोघांनी फोन ठेवला आणि इकडे सूर्यांश काहीतरी विचार करण्यात मग्न होता. ती वस्तू सिया कडून मिळवण्यासाठी त्याला लगेच मार्गही सापडला. आता फक्त अंमलात आणणं बाकी होतं.



                                       आता पुढे



"काय?! नाही... नाही सर. मला हे नाही जमणार. मी आत्तापर्यंत अशी कामे नाही केली हो." प्रीतम घाबरून दोन पावले मागे सरकत म्हणाला.

"प्लीज यार प्रीतम. नाही म्हणू नकोस. सियाच्या घरातून ती वस्तू शोधण्यासाठी मला हा एकच मार्ग सुचला." आज पहिल्यांदाच प्रेम त्याच्याकडे विनंती करत होता.

त्याला नकार द्यावा तर आपण त्याचा अनादर केल्यासारखं होईल, आणि होकार द्यावा तर ते काम त्याला व्यवस्थित जमतही नव्हतं. आता प्रेमने त्याच्याकडे कुठल्या कामासाठी विनंती केली होती ते पाहुयात.

प्रेमने सकाळी हॉटेलकडे जाण्यापूर्वी तात्काळ रॉबर्ट आणि प्रीतम दोघांना भेटायला बोलावलं होतं. ते दोघेही ताबडतोब आले होते. त्यांची नेहमीची ठरलेली जागा होती भेटण्याची. त्या व्यतिरिक्त ते दुसरीकडे कुठेही भेटत नव्हते. ते दोघेजण आल्यानंतर प्रेमला कशी सुरुवात करावी ते समजत नव्हतं. त्याला अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारताना पाहून दोघेही चिंतित झाले होते.

"सर, काय झालं आहे सांगा तरी? केव्हापासून फक्त फेऱ्या मारत आहात. तुम्हाला पुन्हा हॉटेलकडे सुद्धा जायचं आहे." रॉबर्टने विचारलं, तसा तो फिरायचा थांबला.

"मला कसं बोलावं काही समजत नाही आहे. मला तुम्हा दोघांची मदत हवी आहे." दरवेळी आदेश सोडणाऱ्या प्रेमला आज आपली मदत हवी आहे, हे ऐकूनच दोघांना जबरदस्त धक्का बसला होता.

"तुम्ही हक्काने काम सांगू शकता सर. आम्ही आत्तापर्यंत तुमच्यासाठीच काम करत आलो आहोत. बिनधास्तपणे सांगा." प्रीतमने असं बोलून त्याचं मन हलकं केलं. प्रेमने एक सुस्कारा सोडला आणि बोलायला सुरुवात केली.

"सियाच्या घरातून वस्तू आणण्यासाठी मला एक उपाय सुचला आहे, ज्यासाठी मला तुम्हा दोघांपैकी एकाची गरज आहे." प्रेमने सांगितलं, पण या दोघांना काहीच समजत नव्हतं म्हणून ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते.

"ठीक आहे सर, जी हवी ती मदत आम्ही करायला तयार आहोत." त्याच्या मनावर अजूनही दडपण होतं ते ओळखून प्रीतम म्हणाला.

"तुम्हा दोघांपैकी कोणा एकाला सियाच्या घरी जाऊन काही दिवस नोकर म्हणून राहावं लागेल." जसा त्याने हा स्फोट केला तसे ते दोघेजण घाबरून दोन पावले मागे सरकले.

"काय झालं?" त्या दोघांचे पांढरे पडलेले चेहरे पाहत त्याने विचारलं.

"स... सर..." दोघांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता, तसं तो जे समजायचं ते समजून गेला.

"आता काय झालं? आत्तापर्यंत तर मोठे मोठे बाता करत होतात तुम्ही दोघे. मग आता कामाची गोष्ट निघाली तर का बरं दातखिळी बसली?" त्याने एक भुवई उंच करून त्या दोघांकडे पाहत विचारलं.

"सर, आम्ही दोघे फक्त तुमचे नोकर म्हणून राहू शकतो. इतर कोणाची चाकरी आम्ही करू शकत नाही. ते आम्हाला पटणारही नाही. प्लीज हे असं काही काम सांगू नका." रॉबर्ट हात जोडून म्हणाला.

ते दोघेजण फक्त त्याच्यासाठी काम करून इच्छित होते. त्याच्या व्यतिरिक्त ते कोणाचीही चाकरी करणार नव्हते. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी हे स्पष्ट करून दिलं. त्यांचं आपल्या प्रती हे प्रेम पाहून तो भारावून गेला.

"दुसरं काही काम असेल तर ते सांगा सर, पण हे नोकरांचं काम नको." प्रीतम कळकळीने म्हणाला, तसा प्रेमने सुस्कारा सोडला.

"दुसरं असं कुठलंच काम नाही ज्यामुळे तुम्ही सियाच्या घरात शिरू शकाल. त्यासाठी तुम्हाला हेच एक काम करावं लागेल. आणि मला वाटतं की प्रीतम हे काम तूच करावं." दुसरा कुठलाही पर्याय नाही असं त्याने सांगितलं, पण ही जबाबदारी प्रीतमने घ्यावी हे सांगितल्यानंतर तर प्रीतमची दातखिळी बसली.

"काय?! नाही... नाही सर. मला हे नाही जमणार. मी आत्तापर्यंत अशी कामे नाही केली हो." प्रीतम घाबरून दोन पावले मागे सरकत म्हणाला.

"प्लीज यार प्रीतम. नाही म्हणू नकोस. सियाच्या घरातून ती वस्तू शोधण्यासाठी मला हा एकच मार्ग सुचला." आज पहिल्यांदाच प्रेम त्याच्याकडे विनंती करत होता.

"सर, तुम्ही जीव मागितला तर मी लगेच देईन, पण हे काम मला सांगू नका प्लीज." प्रीतम अक्षरशः त्याच्यासमोर खाली गुडघ्यांवर बसून हात जोडत म्हणाला.

"काहीच कामाचे नाही आहात तुम्ही. पहिल्यांदाच मी काहीतरी विनंती केली, तर ते सुद्धा तुम्हाला करायचं नाही आहे. पुन्हा या तुमचं कुठलं काम घेऊन, मग मी बघतो तुम्हा दोघांकडे." त्यांच्यावर चिडून बोलत तो तिथून निघून गेला.

"मागून मागून हे काय मागितलं यार सरांनी आपल्याकडे. अशी कुठली मदत असते का तेव्हा?" प्रीतमने रॉबर्टकडे पाहून हळहळ व्यक्त केली.

"आपल्याकडे नाही, फक्त तुझ्याकडे. आणि तू एवढीशी गोष्ट नाही देऊ शकत सरांना? काय कामाचा मग तू!" रॉबर्ट त्याची टांग खेचत म्हणाला.

"अस्सं का? आता मजा वाटत आहे का तुला माझी परिस्थिती पाहून? मघाशी तर किती रडत होतास सरांसमोर. येऊ दे तुझी वेळ, मग पाहतो मी तुला." चिडून प्रीतम सुद्धा त्या खोलीतून बाहेर पडला, तसा रॉबर्ट मोठमोठ्याने हसू लागला.

प्रीतमच्या चिडलेल्या चेहऱ्याने त्याला हसू आणून दिलं होतं. त्याचं ते लाल झालेलं तोंड पाहून रॉबर्ट नुसता हसत सुटला होता.


*****************************


"आत येऊ का मॅम?" प्रेमने सियाच्या केबिनसमोर उभं राहून अदबीने परवानगी मागितली, तसा आतून तिचा आवाज आला.

"या." तिने त्याला आत यायला सांगितलं. तो येऊन उभा राहिला, पण काही बोलत नव्हता. फक्त तिचं निरीक्षण करत होता.

"बोला." तिने त्याला बोलायला सांगितलं, पण तिची नजर मात्र तिने वर केली नव्हती.

"मॅम, आपल्याकडे उद्यासाठी एक ऑर्डर आली होती, पण ते लोक आता मांसाहार जेवणाची मागणी करत आहेत." प्रेमने सांगितलं, तशी ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.

"आपण फक्त शाकाहारी अन्न पुरवतो. याबद्दल काल मी त्यांच्याशी बोलले होते. काल त्यांना त्यावर काहीच हरकत नव्हती, मग आज अचानक कशी काय त्यांनी मांसाहारची मागणी केली?" सिया ऐकूनच चक्रावली होती.

कालच ती समोरच्या व्यक्तींशी बोलली होती. तेव्हा त्यांना शाकाहारी अन्न चालेल असं त्यांनी सांगितलं होतं, पण आज अचानक कसं काय मांसाहार मागत आहेत हे तिला समजत नव्हतं.

"माहित नाही मॅम, पण आज त्यांचा एक माणूस आला होता. त्यांनी सांगितलं की साहेबांनी ऑर्डर बदलली आहे." त्याने जी होती ती माहिती पुरवली.

"इतके दिवस झाले तुम्ही व्यवस्थित सगळं सांभाळत आहात, मग अशावेळी काय करायचं हे सुद्धा तुम्हाला समजलंच असेल." सिया तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली.

"हो मॅम, मी त्यांची ऑर्डर कॅन्सल करणार होतो. त्याआधी तुम्हाला कळवावं असं वाटलं म्हणून तुमच्याकडे आलो होतो." त्याने सांगितलं, पण खरंतर तो फक्त तिला पाहण्यासाठी आला होता.

आज आल्यापासून ती त्याला दिसली नव्हती. काल त्यांच्यामध्ये जे काही बोलणं झालं होतं, त्यानंतर ती दुखावली गेली असणार याचा त्याला अंदाज होताच. ती आपल्यावर रागावली आहे की काय? हे पाहण्यासाठी तो आला होता. ऑर्डरचा तर फक्त एक बहाणा होता.

"ठीक आहे, ऑर्डर कॅन्सल करा." एवढंच बोलून तिने पुन्हा आपली मान हातात असलेल्या फाईलमध्ये घातली.

तिचं बोलून झालं तरीही तो आहे तिथेच उभा होता आणि तिचं निरीक्षण करत होता. तो इथेच उभा आहे हे जाणवल्यानंतर तिने त्याच्याकडे पाहिलं.

"अजून काही बोलायचं आहे का?" तिने विचारलं, तशी त्याने नकारार्थी मान हलवली.

"ठीक आहे, ही ऑर्डर कॅन्सल करून दुसरी ऑर्डर आहे ती पूर्ण करायला घ्या." अप्रत्यक्षरीत्या ती त्याला तिथून जायला सांगत होती.

"हो मॅम." असं म्हणत तो जायला निघाला.

केबिनच्या दरवाजाजवळ पोहोचल्यावर त्याने एकदा मागे वळून पाहिलं, तर तिची नजर त्या फाईलमध्येच होती. त्याच्या मनात एक आशा होती की ती आपल्याला जाताना पाहून आपल्याकडे पाहील, पण तिने काही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं. त्याचं मन नाराज झालं होतं. दरवाजा उघडून तो बाहेर गेला. दरवाजा बंद होण्याचा आवाज येताच तिने आपली मान वर करून त्या दिशेला पाहिलं.

"तुम्हाला पाहिलं की वारंवार कालचा विषय मनामध्ये येतो. कधीच विसरू शकत नाही मी तुमचे शब्द. तुमच्यापासून दूर राहणंच मला योग्य वाटत आहे आता." सिया दुःखी मनाने स्वतःशीच बडबडली.

काही वेळ ती त्या दिशेला पाहत राहिली, मग तिने सगळे विचार झटकून आपल्या कामाला सुरुवात केली.


काय असेल भविष्य त्या दोघांच्या नात्याचं? येतील दोघे एकत्र की घेईल त्यांचं आयुष्य एक नवीन वळण? कळेलच पुढे. तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की कळवा.


महालक्ष्मी ते दिवाळीपर्यंत माझे खूप दगदगीचे दिवस असतात. माझेच काय, सर्वच गृहिणींचे असतात. मला अजिबात लिहायला वेळ मिळत नव्हता. सणवार म्हटलं की घरात दहा कामं शिल्लक निघतात. त्यानंतर झालेल्या दगदगीमुळे आजाराने जरा जास्त त्रास द्यायला सुरुवात केली. मागच्या काही दिवसांपासून लिखाण सुरू केलं आहे. आज भाग पूर्ण झाला तर प्रकाशित करत आहे. कृपया गोड मानून घ्या.