Login

संशयी स्वभाव भाग 1

संशयी स्वभावामुळे आयुष्य उध्वस्त होऊ शकते हे सांगणारी मराठी कथा
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कुठल्याही जीवित अथवा मृत घटनेशी संबंध नाही.

संशयी स्वभाव भाग 1

"अगं किती वेळा समजून सांगू तुला. तरीही तुझ्या डोक्यात कसे घुसत नाही. शेवटी तुला जे करायचे तेच केलं ना तू.प्रेम करते ना माझ्यावर मग एवढाही विश्वास नाही...."
सचिन रागाने लाल झाला होता.त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जीव तोडून तो आपल्या बायकोला रेवतीला बोलत होता.

" प्रेम केलं आहे म्हणून आंधळी नाहीये मी. सगळं दिसतं आणि कळतंय मला."
रेवतीही तेवढ्याच तावातावाने म्हणाली.

"काय कळतंय आणि दिसतंय ग तुला. अगं बेअक्कल ही कितवी वेळ आहे तुझी माझ्यावर संशय घ्यायची.माझा तर माझ्यावरच विश्वास बसत नाही का मी तुझ्या प्रेमात पडलो.सगळ्यात मोठी चूक केली मी माझ्या आयुष्यातील."

" हो का? माझ्याशी लग्न करून चूक केली का तू? बघच आता मी काय करते."

दोघांच्या भांडणाने टोक गाठले होते.रागाच्या भरात रेवती बॅग भरायला लागली.

"आताच्या आता जाते मी माझ्या घरी."

"रेवती काय करते हे."
तिच्या हातातली बॅग घेत सचिन म्हणाला.

त्याच्या हातातून रेवतीने पुन्हा बॅग ओढून घेतली आणि म्हणाली,
"एक क्षणही थांबायचे नाही मला इथे."

" रेवती एक चूक केली तर केली आता दुसरी...आपल्या नवराबायकोतील वाद आपल्या आईवडिलांपर्यंत जाऊ देणार आहे का तू?"

"का? घाबरतोस! तुझे लफडे आई बाबांना कळेल म्हणून..."

"काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का ? माझ्या आई बाबांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे.पण आपल्या भांडणामुळे त्यांना त्रास नको म्हणून म्हणतोय या चार भिंतीच्या आत ठेव आपल्यातील वाद."

"तू कर तुझ्या आई बाबांची काळजी. माझे आईबाबा स्ट्रॉंग आहेत. आता तेच तुझ्याशी बोलतील."

रेवती ने रागारागाने बॅग भरायला सुरुवात केली.
सचिन तिला तळतळीने समजावण्याचा प्रयत्न करत होता....

सचिन आणि रेवतीचे लव्हमॅरेज होते.दोघेही एकच कॉलेज मध्ये होते. सचिन रेवतीला एक वर्ष सिनियर होता.कॉलेज च्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये दोघांची भेट झाली आणि कॉलेज संपेपर्यंत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

सचिन एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा होता. त्याला एक मोठी बहीण होती.तिचे लग्न झाले होते तर रेवती मात्र एकुलती एक लाडात वाढलेली मुलगी होती.अर्थात हट्टीपणा तिच्या नसानसात भिनलेला होता.तिच्या घरून तिच्या लग्नाला विरोध होणार नव्हता पण सचिन च्या घरी लव मॅरेज म्हटल्याबरोबर शांतता पसरली होती. आपल्या पाहुण्यांमध्ये कधी कोणी असं केलं नाही. लोक काय म्हणतील या विचाराने आई-बाबा(सुनीताताई आणि मधुकरराव) सुन्न झाले होते. एकीकडे एकुलता एक मुलगा तर एकीकडे समाज पण सचिनच्या आई-बाबांनी समजूतदारपणा दाखवून सचिनच्या प्रेमाची निवड केली.

थाटामाटात दोघांचं लग्न झालं.रेवती घरी आली. लाडात वाढलेली रेवती सासरी ही फारशी काही बदलली नाही.
मला याची सवय नाही,आमच्याकडे हे असं करत नाही,
मला ते जमणार नाही याप्रकारे बऱ्याच गोष्टीत तिचं हे बोलणं असायचं. सचिनच्या आई-बाबांनी ही तिच्यावर कुठल्याच गोष्टीची जबरदस्ती केली नाही. नवीन मुलगी आहे,तिच्या घरची तिला सवय आहे म्हणून त्यांनी तिच्या प्रत्येक गोष्टी समजून घेतल्या. तिच्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं होतं आणि चांगल्या गोष्टी आनंदाने स्वीकारल्या होत्या.तिला अगदी आपल्याच मुलीप्रमाणे वागवलं होतं.
रेवती मात्र मुळातच संशयित स्वभावाची होती. तिच्या या संशयी स्वभावामुळे बरेचदा सचिनने तिच्या इच्छे खातर त्याची नोकरी ही बदलली होती.

सुरुवातीला कॉलेजमध्ये जेव्हा सचिन एखाद्या दुसऱ्या मुलीबरोबर बोलायचा तेव्हा ही रेवती त्याच्याशी भांडायची, रुसून बसायची पण त्यावेळी सचिनला वाटलं आपल्यावर असलेल्या प्रेमामुळे ती असं करत आहे. कधी कधी तिचा हा बालिशपणा त्यालाही आवडायचा. परंतु लग्नानंतर तिचा हा संशयी स्वभाव अजूनच वाढला.

कोणत्याही दुसऱ्या मुलीबरोबर सचिन बोलताना दिसला की रेवती सचिनची भांडण व्हायची. यामुळे सचिन ने मुलींबरोबर बोलणेही कमी केलं होतं. पण कंपनी म्हटले की लेडीज स्टाफ असणारच आणि कामानिमित्त बोलणं होणारच.

काही दिवसांपूर्वी सचिनच्या कंपनीत एक नवीन मुलगी जॉईन झाल्याचे रेवती ला कळलं होतं. ती आणि सचिन एकाच प्रोजेक्टवर काम करणार होते. त्यामुळे कामानिमित्त त्यांचं बराच वेळा बोलणं व्हायचं. फोनही व्हायचे. एकदा दोनदा रेवतीने स्वतःच फोन उचलून त्या मुलीला सुनावले ही होते. त्यानंतर सचिनला त्या मुलीची माफी मागावी लागली होती. कसं बस त्यावेळी त्याने ते प्रकरण मिटवलं होतं. परंतु यावेळी मात्र रेवतीने हद्द केली होती.
कॉफी शॉप मध्ये बसून दोघांनी एकत्र कॉफी घेतल्याच तिला समजलं आणि ती ऑफिसमध्ये पोहोचली. सचिन मीटिंग निमित्त बाहेर गेला होता. रेवतीने ऑफिसमध्ये बराच गोंधळ घातला. सर्व स्टाफ समोर ती त्या नवीन मुलीला नको नको ते बोलली. ही गोष्ट वरती बॉस पर्यंत गेली. आणि या प्रकरणाला नको ते वळण लागले.
लोकांना चघळण्यासाठी विषय पाहिजेच असतात. बायकोच नवऱ्यावर संशय घेते म्हणजे नक्कीच काहीतरी असणार हा विचार करून सर्व स्टाफ मध्ये सचिन आणि त्या मुली विषयी रेवतीमुळे नको नको ते बोलले जाऊ लागले. यामुळे त्या मुलीची ही बदनामी झाली. ती दुखावली गेली. रेवतीने घातलेल्या गोंधळामुळे बॉस ने ही सचिनला चांगलेच सुनावले होते.
सचिनची सगळीकडूनच नाचक्की झाली होती.

काय घडेल पुढे? रेवती समजून घेईल का सचिनला?
वाचा पुढील भागात

0

🎭 Series Post

View all