Login

सामर्थ्य भक्तीचे : वेळ पुनर्मिलनाची : भाग एक

खंडोबावर अगाध श्रद्धा असलेले म्हाळसा आणि सदाशिव एका दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे एकमेकांपासून वेगळे होतात आणि भगवंताच्या एका कार्यासाठी पुन्हा जन्म घेतात. या जन्मात म्हाळसा आणि सदाशिव एक होतील का? काय असेल त्यांचे कार्य? हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचत रहा!

सन १९५०

वेळ : मध्यरात्रीची

अंगावर हिरवी साडी नेसलेली, हातात हिरवा चुडा अगदी गच्च भरलेला, कपाळावर भंडारा आणि त्यात लाल ठसठशीत कुंकू, पायात चांदीचे तोडे आणि साखळ्या, दोन्ही पायांच्या पहिल्या बोटात जोडवी तर, दुसऱ्या बोटात मासोळी, केस जरासे विस्कटलेले, अशा अवतारातील ती, अगदी त्वेषात खंडोबाच्या मंदिरात येते. तिच्या कंबरेच्या एका बाजूला खुरपं आणि एक बटवा बांधलेला होता. त्या बटव्यात असणारा भंडारा हा जादूचा आहे अशी चर्चा गावभर होती. त्याला कारणही तसेच होते. तो भंडारा कधीच संपायचा नाही तर, कित्येकांच्या शरीरातील भुते याच भंडाऱ्याने गायब केली, कित्येकांचे आजार बरे केले होते आणि तिची ताकद या भंडाऱ्यातच होती. खंडोबाच्या प्रत्येक निर्णयाला समर्पित होणारी ती आज मात्र पूर्ण बिथरली होती. त्याला कारणही तसेच होते..तिचा जिवलग, सखा, प्रियकर, नवरा काही दृष्ट लोकांच्या हाती लागला होता. अशी लोक ज्यांना फक्त त्याच्याजवळ असलेली शक्ती हवी होती. तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता. जणू काही ती आज तिच्या खंडोबाला जाब विचारायला आली होती.

“आरं, कसला खवाट आहेस तू… तुझा प्रत्येक निर्णय मी मानला.. नको मला तुझी शक्ती…मला माझे मालक हवेत… तू जी शक्ती दिलीस ती मी फक्त फक्त आणि फक्त लोकांसाठी वापरली. सत्याचा असत्यावर विजय होतो हे लोकांना पटवून देत राहिले. कोण कुठली मी हे सुध्दा मला आठवत नाही. तुझ्या कृपेने मी राहिले, वाढले. तुझी भक्ती हीच माझी ताकद होती आणि आहे…पण आज मालकांना काही झालं ना तर बघ, पुन्हा माझं तोंड तुला दाखवणार नाही”

असे बोलून ती मंदिरातून निघणार इतक्यात एक कपाळाला भंडारा लावलेला, धोतर आणि सदरा परिधान केलेला त्यावर घेतलेली घोगंडी, हातात जाड आणि मजबूत असे कडे, पायात मोठ्या वाळा आणि कोल्हापुरी चप्पल. या माणसाला बघून ती मात्र हरखून जाते. या माणसाशी आपले काही तरी नाते असावे असे तिला मनोमन वाटू लागते. तो मात्र तिला पाहून गालात हसतो पण लगेचच गंभीर होतो.

ती : कोण म्हणायचे तुम्ही? आणि इतक्या रात्री इथे का आलात? काही मदत हवी आहे का?

तो : मी असाच वाटसरू आहे आणि तुझ्यासाठी एक निरोप घेऊन आलो आहे.

ती : निरोप? कुणाचा ? आणि तुम्ही कोण आहात?

तो : मी कोण यावर चर्चा करायची ही वेळ नाही. मी फक्त तुला फक्त निरोप द्यायला आलो आहे. हे युद्ध सोप्पं नाही.शर्थीचे प्रयत्न कर पण हेही लक्षात ठेव की, प्रारब्ध कुणालाही चुकलेलं नाही. यदा कदाचित जरी इथला प्रवास संपला तरी नवीन प्रवासही सुरू होणार आहे. हे मात्र ध्यानात ठेव. या खंडोबावर खूप प्रेम आहे ना तुझं, मग त्याच्या लीलांवर विश्वास ठेव. त्याला हवं तसच घडणार आहे. तो तुला आणि त्याला पुन्हा एकत्र येण्याची संधी नक्की देणार आहे. फक्त त्या संधीची वाट पहा. आता लढाईला जा आणि तूझ्या शत्रूंना दाखवून दे तुझी ताकद. हा खंडोबा तूझ्या पाठीशी आहे. येळयेळकोट जय मल्हार.

त्याचे हे बोलणे ऐकून ती भारावून जाते. पुन्हा एकदा खंडोबाला डोळे भरून पाहिल्यावर ती आत्मविश्वासाने मंदिरातून निघते. काही पाऊले पुढे चालून आल्यावर ती मंदिराच्या दिशेने वळून पाहते तर, तो माणूस मंदिरात न दिसल्याने ती चकित होते. क्षणात ती गंभीर होत नवऱ्याला सोडवण्यासाठी मोठ मोठी पाऊले टाकत शत्रूच्या दिशेने जाते.

—---------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाहेरून पडक्या दिसणाऱ्या वाड्याभोवती काही आडदंड माणसांचा पहारा होता. त्या मिट्ट काळोखात त्यांचे चेहरे भयानक दिसत होते. त्यांच्याकडे बघणाऱ्याला ही माणसे जिवंत आहेत का? हाच प्रश्न पडेल. हा वाडा होता…सूर्यभान पाटलाचा…अत्यंत लोभी माणूस…काळ्या जादूला समर्पित असलेला, दिवसाच्या उजेडात देवमाणूस आणि रात्रीच्या काळोखात राक्षस. कृपालदेव या राक्षसाचा गुरू. गावात नव्यानेच आलेल्या एका जोडप्याकडे असलेल्या शक्तीचा सुगावा त्यांना लागला होता आणि ही शक्ती आपल्याला कशी मिळवता येईल याचा विचार ते करू लागले. अशातच त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी त्या जोडप्यातल्या पुरुषाला म्हणजेच सदाशिवला ताब्यात घेतलं तर, म्हाळसाला मात्र त्यांच्या हाती लागली नाही पण त्यांना खात्री होती की, सदाशिवला पकडलं तर, म्हाळसा आपोआपच त्यांच्याकडे येईल. इकडे एका चंदेरी रंगाच्या पण भरपूर ऊर्जा असलेल्या वर्तुळात अडकलेला सदाशिवला यांचा मनसुबा कळला होता आणि तो मनोमन म्हाळसा इथे येऊ नये अशी खंडोबाला प्रार्थना करत होता.

सदाशिवला पकडल्याचा आनंदात असलेला सूर्यभान कृपालदेवला मद्याचा ग्लास देतो. मात्र त्याची बेरकी नजर दरवाजावर अडकलेली पाहून कृपालदेव गालात हसतो आणि त्याला बोलतो, “भानू, ती नक्की येणार…डोळ्यात भरली आहे ना तूझ्या? तुझं हे इस्पितसुध्दा साध्य होईल बर का, थोडा धीर धर. तिची सगळी ताकद त्या सदाशिवमध्ये आहे. त्याला तिच्यासमोरच संपवू म्हणजे ती तुझी होईल आणि तिच्यामुळे होणारे तुझे मुलं हे संपूर्ण जगावर राज्य करेल.”

कृपालदेवच्या या वक्तव्यावर सूर्यभान गडगडाटी हसू लागतो आणि गुर्मीतच बोलतो, “गुरुदेव, माझ्या चार बायका झाल्या. किती चार, त्या चारपैकी एकीनेच मुलगा जन्मला घातला आणि म्हणून ती जिवंत राहिली. बाकीच्या तिघींनी मुलींना जन्माला घातलं आणि त्या मेल्या. माझ्या चारही बायका लावण्यवती होत्या मात्र म्हाळसाची सर त्यांना येणार नाही. एकदा का तिच्याजवळ असलेली शक्ती आणि तो चमत्कारिक भंडारा मला सापडला की ती सुधा माझ्या काही उपयोगाची नाही. तिला खूप माज आहे ना तिच्या भक्ती आणि शक्तीचा आज तो सगळा उतरवेन आणि गुरुदेव मी तिच्याशी लग्न करणार नाही तर तिला रखेल बनवेन. फक्त माझीच नाही तर साऱ्या गावाची. नावाला राहील देवदासी पण होईल सगळ्यांची रखेल. हाहाहाहा”

त्याचे हे बोलणे ऐकून कृपालदेव मनातल्या मनातच कपाळावर हात मारून घेतो. “याच्या बुध्दीला काय म्हणावं, मी याला काहीतरी मोठं देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा नको त्या गोष्टी करून स्वतःचा नाश करून घेण्याचा विचार करतो आहे. आई शाकंभरी देवी, काय करू मी याचं?”

सूर्यभान जे कृत्य करू पाहत होता, त्याने फक्त विनाश ओढवणार होता. त्यामुळे त्याला काहीही करून हे असलं कृत्य करण्यापासून रोखायला हवं पण ते कसं करायचं या विचारात कृपालदेव पडतो.

त्वेषाने पाटलाच्या वाड्याच्या दिशेने येणाऱ्या तिला पाहून ते आडदांड पहारेकरी खूश होतात व त्यातला एक ती आल्याची बातमी त्याच्या मालकांना देण्यासाठी आत जातो. आज या पाटलाचा किस्साच संपवायचा या हेतूनेच ती पुढे येत होती. तेवढ्यात दोन पहारेकरी तिला पकडून आत न्यायला पुढे आले आणि हीच त्यांची मोठी चूक होती. तिच्यासमोर आलेल्या पहिल्या पहारेकऱ्याला ती लाथेने उडवून लावते. तिचा हा प्रहार इतका मोठा होता की, तो माणूस एका पतंगासारखा लांब उडाला, तर दुसऱ्या पहारेकऱ्याचे ती खुरपाने मुंडके छाटते. रागाने फुललेला तिचा आणि तिची ही आक्रमकता पाहून इतर पहारेकऱ्यांची भीतीने गाळण उडते. त्यामुळे तिला कोणी पकडायला पुढे आले नाही. सगळ्यांवर एक नजर मारत ती वाड्यात जाते.

तिला वाड्यात आलेले पाहून सूर्यभानला आनंदाच्या उकळ्या फुटतात तर, तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून कृपालदेव मात्र भयभीत होतो. आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी असे त्याला वाटू लागते आणि तो तिथून सटकतो.

“तू इथे येशील याची खात्री होती मला. आता बघ तुझ्या डोळ्यादेखत तुझ्या नवऱ्याचे काय हाल करतो ते आणि त्यानंतर तुला मी माझी बनवेन.” सूर्यभान

“इतकं सोप्पं वाटलं का रे तुला? मी कधीच तुझी होऊ शकत नाही. फक्त हाच जन्म नाही तर येणारा प्रत्येक जन्म ही म्हाळसा फक्त त्याच्या सदाशिवची असणार आहे आणि त्याच्यासाठीच जन्म घेणार. आज तुझा अंत माझ्या हातून निश्चित आहे. गावकऱ्यांना पण कळू दे की तू राक्षस आहेस. खंडोबाची आन आहे मला..आज एकतर तू जिवंत राहशील किंवा मी.” म्हाळसाही तितक्याच जोशात त्याला प्रत्युत्तर करते. तिच्या या वक्तव्यावर सूर्यभानचा स्वाभिमान दुखावला जातो आणि तो तिच्यावर चमत्कारिक असे भस्म फेकतो. त्या भस्माचा तिच्यावर काहीच प्रभाव न झाल्याचे पाहून तो चक्रावतो पण लगेचच सावरून पुन्हा तिच्यावर त्याच भस्माचा मारा करतो. ती मात्र त्याचा प्रत्येक वार हाणून पाडते. तिची नजर सदाशिवला शोधत असते. त्यांच्या या लढाईला लपून पाहणाऱ्या कृपालदेवच्या डोक्यात एक कपटी डाव शिजतो आणि तो पावलांचा आवाज न करता सदाशिवला बंदिस्त केलेल्या वर्तुळात जातो. त्या वर्तुळात असलेल्या उर्जेमुळे सदाशिव क्षीण होऊन पडलेला असतो. हे पाहून कृपालदेवला आणखीच जोर येतो आणि तो त्या सदशिवचा गळा धरतो. कृपालदेवच्या समोर सदाशिवची ताकद कमी पडते आणि तो हातपाय झाडत हळूहळू प्राण सोडतो. त्याक्षणी म्हाळसाच्या गळ्यातील मंगळसूत्र वाढवून त्यातील मणी विखुरले जातात. हे लक्षात येताच तिचा क्रोधाग्नी वाढतो आणि ती अधिक आक्रमक होऊन सूर्यभानवर चालून जाते. सूर्यभानला काहीही करून वाचवायला हवे हे लक्षात येताच कृपालदेव एक मंत्र पुटपुटत सर्वत्र धुराचे वलय तयार करतो. त्यामुळे म्हाळसाला समोरचे काहीच दिसत दिसत नाही. ती अंदाज बांधत चालतानाच तिच्या डोळ्यासमोर तेजस्वी पण पांढरी शुभ्र आकृती उभी राहते. त्या आकृतीला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात.

“मालक”, अशी हाक मारत ती त्या आकृतीपाशी जाते. भगवंताचा वरदहस्त असूनही आज आपण हतबल आहोत या जाणीवेने ती बिथरते. सगळ्यात जास्त तिचा जीव या समोरच्या माणसात होता आणि आज तीच व्यक्ती तिच्यापासून हिरावून घेतली गेली होती. हतबल होऊन रडणाऱ्या म्हाळसाला पाहून सदाशिव अस्वस्थ होतो. “राणी, ऐक ना…शांत हो…देव आपल्याला पुन्हा एकत्र येण्याची संधी देणार आहे…तेव्हा रडू नकोस.. खंडोबावर विश्वास ठेव…तो सगळं काही नीट करेल. तू अशी रडलेली मला आवडत नाही माहिती आहे ना तुला?”

“मालक मला कोण आहे हो तुमच्या आणि खंडोबाशिवाय… कशी जगू मी…आई-बाप तर आठवतही नाही मला… सांगा ना मी काय करू तुमच्याशिवाय?” म्हाळसाला असे तुटलेले पाहून कृपालदेव आणि सूर्यभानला आनंद होत होता. त्याच क्षणी कृपालदेव सूर्यभानला हाताला धरून वाड्याबाहेर आणतो आणि त्या वाड्याला आग लावतो.

“गुरुदेव हे काय केलंत तुम्ही? मला ती हवी होती.” सूर्यभान

“मी योग्य तेच केलंय, ही जर जिवंत राहिली तर, अख्या गावासमोर धिंड काढेल तुझी. आता चल इथून” कृपालदेव

कृपालदेव त्याला ओढून नेत असतानाच तिथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत म्हाळसाला पाहून त्या दोघांची तंतरते. त्यांना विचार करायलाही वेळ न देता म्हाळसा सूर्यभान ओढत नेते आणि त्याला दरीत फेकणार इतक्यात तो “म्हाळसा, या जन्मात तू जिंकलीस…तुझ्यासोबत मीही प्रत्येक जन्म घेऊन तुझं जगणं नकोसे करेन मी…माझा सूड मी पूर्ण करून राहणार…” असे बोलून तो त्याच्यासोबत म्हाळसालाही दरीत खेचतो.

हे दृश्य पाहणारा कृपालदेव,“सूर्यभानच्या पुढच्या जन्माच्या तयारीला लागायला हवंय. मला असं हताश होऊन चालणार नाही.” असे बोलून तेथून निघून जातो.