Login

हास्य : एक अनोखी वक्र रेषा

मनमोहक सुहास्य - एक किमती दागिना


चेहऱ्यावरील स्मितहास्य ही एक अशी वक्र रेषा आहे , जी बऱ्याच वक्र गोष्टींना सरळ करते. खरंच आहे ना? भल्याभल्यांचा बिघडलेला मूड ठीक करण्याचे सामर्थ्य या वक्र रेषेत आहे. भांडण झाले असताना सर्व विसरून , पाठीवर एक थाप मारून "ए जाऊ दे ना ते आता" असं म्हणून एक गोडसे हास्य समोरच्या व्यक्तीला मनापासून दिले तर किती काळ ते भांडण तग धरू शकेल?

हसरा चेहरा कोणाला आवडत नाही? मग ते हास्य एखाद्या सुहास्यवदना ललनेचे असो, की लहान बाळाचे वा एखाद्या लहान मुलामुलीचे सुंदर , निरागस, निर्व्याज हास्य असो, ते बघून समोरचा त्याच्याही नकळत सुखावतोच. ओळखीचे असो वा अनोळखी, त्या हास्याकडे कसलीशी एक चुंबकीय शक्ती नकळत आकर्षित करतेच.

लाजून हासणे अन् हासून ते पहाणे,
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

प्रेयसीच्या लाजून हसण्यातील सौंदर्य न जाणवलेला माणूस विरळाच! शेकडो काव्य आणि गाणी आजतागायत यावर लिहिली गेली आहेत.

घरी सर्व नातेवाईक, लेकीसुना जमलेले असताना , चेष्टामस्करी , हास्यविनोद सुरू असतात, हास्याचा खळखळाट घर कसे निनादून टाकतो आणि घरातली वृध्द माणसे समाधानाने हसतात. \" सुख म्हणजे काय असतं, हेच ना?\" असेच जणू त्यांचे डोळे मूकपणे बोलत असतात .

हास्य हे मानवाला मिळालेले वरदानच जणू ! फक्त स्मितहास्य हे सुद्धा मनातील भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत शब्दाविना पोचवू शकते. मग त्यात भाषेचा अडसर सुद्धा येत नाही. बस किंवा ट्रेनने जाताना अनोळखी सहप्रवाशाला दिलेले स्मितहास्य क्षणात दोघांमधले अवघडलेपण दूर करते अन् पुढचा संपूर्ण प्रवास सहजतेने सोबत पार पडतो. परदेशात तर पायी चालताना रस्त्यावर भेटणाऱ्या व्यक्तीला सुद्धा स्मितहास्य करत \" हॅलो\" म्हणण्याची पद्धत आहे.

हास्य म्हणजे प्रसन्नता, सकारात्मकता. कठीण परिस्थिती असतानाही रोज मनाशी चांगला विचार करून चेहऱ्यावर हसू आणले, हसऱ्या, सकारात्मक व्यक्तींच्या संपर्कात राहिले, तर दुःखाची तीव्रता थोडी कमी होऊन त्याच्याशी लढायला आणखी बळ येईल.

मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. लोकांना आनंदाला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करणे , निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी हास्याच्या असंख्य फायद्यांची जाणीव करून देणे हा या जागतिक हास्य दिनाचा उद्देश आहे.जागतिक हास्य दिनाचे उद्दिष्ट लोकांना जोडणारे साधन म्हणून हास्याविषयी जागरूकता पसरवणे हे आहे. हसण्यामुळे मानसिक आरोग्य तर सुधारतेच पण ते शारीरिक आरोग्य सुधारण्यासही मदत करते.

हसण्यामुळे \" हॅपी हॉर्मोन्स \" स्त्रवतात . सकाळची आणि दिवसाची सुरुवात अशी हसून सकारात्मकतेने झाली, की त्याचा चांगला परिणाम आपल्या मन:स्थितीवर आणि एकंदरीत आरोग्यावर होतो. हास्याचे हे महत्त्व ओळखूनच हास्ययोगाची सुरुवात झाली आणि असंख्य लाफ्टर क्लबही सुरू झाले. रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाने हसणे विसरू नये आणि समाजातील वाढता ताणतणाव कमी व्हावा यासाठी हास्य दिन साजरा करण्याची सुरुवात मुंबई येथून झाली. त्यानंतर हळूहळू तो जगभरात साजरा केला जाऊ लागला.

मनमोकळे हसण्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते. जगण्याचा उत्साह वाढतो. पोटापासून ते फुफ्फुसापर्यंत अवयवांचा आणि स्नायूंचा व्यायाम होतो. भरपूर ऑक्सिजन मिळाल्यामुळे फुफ्फुसे निरोगी होतात. चेहरा तजेलदार होतो. ताणतणाव दूर राहतात. हसल्याने आणि इतरांना हसवल्यामुळे वातावरण सकारात्मक राहते. एखाद्या व्यक्तीचे गडगडाटी हास्य समोरच्याला सुद्धा आपोआपच हसायला भाग पाडते. अट मात्र एकच , हे हास्य निर्मळ असावे आणि ते मनापासून यायला हवे. उपहासात्मक किंवा कोणाला खिजविण्यासाठी नको.

शेवटी , स्माइल अ लॉट, इट कॉस्टस नथिंग.
मग काय, खूप हसणार नि हसविणार ना?


© स्वाती अमोल मुधोळकर