Login

सौदामिनी 12

marathi narivadi katha

सौदामिनी खोलीत जाऊन खूप रडली. बराच वेळ विचार करून झाल्यानंतर तिने बॅग भरायला सुरुवात केली. तिने बॅगेमध्ये स्वतःचे कपडे भरून घेतले आणि ती तिच्या आईकडे जायला निघाली. आजच राजन आला होता आणि ती आजच या घरातून जायला निघाली होती. ज्या राजनसाठी तिने आईला माहेरी येण्यास नकार दिला होता तोच राजन आज तिला विनाकारण ओरडत होता. आज जे काही घडले ते तिला अनपेक्षित होते. किमान राजन आल्यानंतर तरी घरात सगळे व्यवस्थित होईल असे तिला वाटत होते, पण झाले काही उलटेच.

राजन आधीपासूनच आईचे ऐकत होता, पण लग्न झाल्यानंतर सत्य आणि असत्य परिस्थिती ओळखून तो वागेल असे सौदामिनीला वाटले होते. त्याला सत्य जाणून घ्यायचेच नव्हते. त्याची आई जे काही सांगत होती ते त्याला पटत होते, त्यामुळे तो सौदामिनीला ओरडला होता आणि त्याने रागाच्या भरात सौदामिनीवर हात उगारला होता. ते पाहून सौदामिनीला खूप वाईट वाटले होते. तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता. आजपर्यंत ती राजनसाठी त्या घरात होती. आता राजनदेखील तिच्याविरुद्ध झाल्यामुळे तिला त्या घरात क्षणभरही राहण्याची इच्छा नव्हती.

रागाच्या भरात सौदामिनी तिचे सगळे सामान घेऊन जात होती. तिने घरातील देवाला नमस्कार केला आणि ती सर्वांसमोरून घरातून बाहेर पडत होती, पण कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही. 'तू घर सोडून जाऊ नकोस.' असा शब्द कुणाच्याही तोंडून आला नाही, त्यामुळे सौदामिनीला खूप वाईट वाटले. ती तशीच सर्वांच्या समोरून तिचे सामान घेऊन घराबाहेर पडली ते तडक स्टॅन्डवर गेली. तिच्या गावाची बस लागल्यानंतर ती बसमध्ये बसली आणि तिच्या आईकडे गेली.

सौदामिनीला पाहतात तिची आई आणि बहीण दोघेही आनंदून गेले. त्या दोघींना खूपच आनंद झाला. "आज आपल्या लेकीने येऊन आपल्याला सरप्राईज दिले आहे." असे त्या म्हणाल्या. लग्न झाल्यानंतर खूप दिवसांनी सौदामिनी माहेरी आली होती, त्यामुळे घरामध्ये तर एखादा सण असल्याचे वातावरण निर्माण झाले. पण 'सौदामिनी एकटीच आली म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल का?' असे तिच्या आईला वाटू लागले.

"सौदामिनी, तू एकटीच का आली आहेस? जावईबापू येणार होते ना? मग त्यांना घेऊन यायचे होते. ते येणार म्हणून तर तू इकडे यायला नकार दिलास ना? मग आता अचानक कशी आलीस?" सौदामिनीची आई म्हणाली.

"आई, तुमची मला खूप आठवण येत होती म्हणून मी आले. माझ्या घरी मी यायचं नाही असा नियम केला आहे का आता? की लग्नानंतर हे घर माझे राहिले नाही." सौदामिनी म्हणाली. 

"तसे काही नाही ग बाळा. हे घर तुझेच आहे आणि तू इथे कधीही येऊ शकतेस. पण जावईबापू येणार होते म्हणूनच तर तू येण्यास नकार दिलास आणि आता अचानक आलीस म्हणून काळजी वाटली ग." सौदामिनीची आई म्हणाली. 

"तुमच्या दोघींची खूप आठवण येत होती, म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी आले आहे. आता मी इथे निवांत राहणार आहे." असे जरी सौदामिनीने सांगितले तरी सुद्धा तिच्या आईच्या मनात थोडी शंका वाटू लागली. नक्कीच काहीतरी कारण आहे असे तिला वाटत होते. आणि वाटणारच ना? कितीही झाले तरी ती आई होती. सौदामिनीने मात्र आईला काही त्रास होऊ नये म्हणून काहीच सांगितले नाही. थोडे दिवस गेले की मग बोलू असा विचार करून ती शांत बसली होती. 

सौदामिनी जरी माहेरी आली होती तरी राजनच्या आठवणीने तिला चैन पडत नव्हते. तिला सारखी राजनची आठवण येत होती. 'खूप दिवसांच्या विरहानंतर ते दोघे एकत्र आले होते, पण राजनच्या आईमुळे आता पुन्हा त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. नियतीच्या मनात नक्की काय आहे? आम्ही प्रत्येक वेळी एकत्र आलो की असे काहीतरी घडते आणि पुन्हा विरह होतो. आम्हा दोघांचे एक होणे नियतीला मान्य नाही की काय?' असे अनेक प्रश्न सौदामिनीच्या मनामध्ये चालले होते. ती आल्यापासून शांत शांत होती. आधीसारखी खळखळून हसत नव्हती ना इतरांशी गप्पा मारत होती. ती नेहमी असे अस्वस्थ बसत होती ते तिच्या आईला पाहवत नव्हते. सौदामिनीने काही सांगितल्याशिवाय तिला तरी काय कळणार? तिने हर एक प्रयत्न करून तिला बोलते केले पण सौदामिनी काही सांगायला तयार नव्हती.

तिकडे सौदामिनीच्या सासूच्या मनामध्ये मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. 'आता ही माहेरी गेली म्हणजे तिची आई उरलेले सोने घालण्यास तयार होईल. काहीही प्रयत्न करून ती नक्कीच उरलेले सोने घालेल.' असे तिला वाटत होते. 'किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सोने त्यांनी घालणे गरजेचे आहे, पण आहे तेवढे सुद्धा घालायची त्यांची लायकी नाही तर जास्त काय घालणार?' असेही ती मनामध्ये म्हणत होती. पण एकदाची कटकट या घरातून गेली असे वाटून तिच्या मनाला समाधान वाटत होते.

थोडे दिवस गेले. सौदामिनीच्या सासूला घरातील सगळी कामे करावयास लागत होती. सौदामिनी होती तेव्हा त्या काहीच करत नव्हत्या. अगदी निवांत बसून टाकायच्या आणि घरातील सारे कामे ती एकटीच करत होती पण आता तीच नाही म्हटल्यानंतर सगळी कामे करण्याची जबाबदारी यांच्यावर आली आणि ती कामे करता करता यांची नाकीनऊ होऊ लागली. इतक्या दिवसांचा आराम आणि आता तर त्यांना सवयच लागली होती. आता सौदामिनी नाही म्हटल्यानंतर काम करण्यास त्यांचे मन रमेना. त्यांच्या शारीरिक तक्रारी थोड्या वाढल्या होत्या आणि काम करण्यास त्या कचरत होत्या. शिवाय सौदामिनी सुद्धा येण्यास तयार नव्हती आणि सोन्याचे तर काही नावच निघाले नाही त्यामुळे त्या पुन्हा हिरमुसल्या. आपल्या मुलाला दुसरे लग्न करण्यास प्रोत्साहन करू लागल्या.

"राजन, तू माझे ऐक. त्या मुलीच्या नादी लागू नकोस. सरळ दुसरे लग्न करुन मोकळा हो. ती बाई काही इकडे येण्याची तयार नाही, शिवाय ती आपल्या घराण्याच्या लायकीची सुद्धा नाही त्यामुळे तू तिला घटस्फोट दे आणि दुसरे लग्न करून सुखाने संसार कर." आईच्या या बोलण्याचा राजनला थोडा राग आला.

सौदामिनी गेल्यापासून राजनला प्रत्येक क्षणी सौदामिनीची आठवण येत होती पण त्याचा इगो आड येत होता. ती रागाने स्वतः घर सोडून निघून गेली आहे तर तिची ती परत येऊ दे असा हा मनात विचार करत होता. माझ्या आईची हिने माफी मागितली नाही तर मी का हिच्या घरी जाऊ? असेही त्याला वाटत होते. त्याच्या मनाची द्विधा मनःस्थिती झाली होती. सौदामिनीला जर घेऊन आलो तर आई खूप ओरडेल, तिला हे आवडणार नाही आणि जर तिला घेऊन आलो नाही तर आई दुसरे लग्न करण्यास मागे लागेल असे त्याला वाटू लागले.

सौदामिनी येऊन चार दिवस झाले तरी तिने एक अवाक्षरही सांगितले नाही याचे तिच्या आईला खूप वाईट वाटले. ती खोदून खोदून तिला प्रश्न विचारत होती पण सौदामिनी काहीच सांगायला तयार नव्हती. एके दिवशी रात्री सौदामिनी विचार करत बसली असता तिची आई तिच्याजवळ आली. तिने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"सौदामिनी, तुझ्या मनामध्ये काय चालू आहे ते तुझ्या आईला सांगणार नाहीस का? तुझ्या आईवर तुझा काही विश्वास नाही का? तुझ्या मनामध्ये जो काही गोंधळ चालू आहे तो तुझ्या आईला सांगशील का?" सौदामिनीची आई काळजीने म्हणाली.

"आई, तुलाच काही टेन्शन नको म्हणून मी सांगितले नाही ग. तुझ्यापासून काही लपवण्याचा माझा हेतू नव्हता, पण उगीच छोट्या छोट्या गोष्टीने तू विचार करत बसशील आणि तुझा त्रास वाढेल म्हणून मी तुला काहीच सांगितले नाही." असे म्हणून सौदामिनीने घडलेली सगळी घटना सविस्तरपणे आईला सांगितली.

सौदामिनीच्या तोंडून सारे काही ऐकल्यानंतर सौदामिनीच्या आईच्या मनात सोन्याविषयी विचार आले, 'आपण सोने दिले नाही म्हणून ही बाई माझ्या मुलीला त्रास देत आहे. किती विकृत मनाची बाई असेल. मी वर्षाच्या आत सोने देते म्हणून तिला म्हटले होते, पण त्या बाईला एक वर्षही काही धीर निघेना. आता काहीही करून तिचे सोने द्यायला हवे. दोन-चार दिवसात थोडे सोने घेवून लेकीला तिच्या सासरमध्ये सोडून यावे आणि मग उरलेले सोने पुन्हा देता येईल.' असा विचार सौदामिनीची आई करत बसली होती.

'या सोन्यामुळे ती दोन जीवांचा संसार मोडत आहे कोठे फेडणार ही पापं? या बाईला मुलाच्या संसारापेक्षा दागिने जास्त महत्त्वाचे वाटत आहेत. ती स्वतःच्या मुलाचा संसार मोडायला पुढे मागे बघत नाही तर माझ्या लेकीची काय काळजी घेईल? त्यासाठी मलाच माझ्या लेकीला सक्षम बनवावे लागेल. त्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी नक्कीच करणार.' अशा विचारात सौदामिनीची आई स्वतःलाच धीर देत होती.

पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

0

🎭 Series Post

View all