Login

सौदामिनी 39

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


\"आज माझ्या आयुष्यातील इतका आनंदाचा दिवस होता. मला खूप मोठा अॅवाॅर्ड मिळाला. तोसुद्धा माझ्या मुलीच्या हस्ते. खरंच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. पण आमच्या मायलेकीचे कौतुक पाहण्यासाठी राजन आले नाहीत. त्यांना मी निक्षून येण्यास सांगितले होते, पण शेवटी ते आले नाहीत. इतके कोणते महत्वाचे काम आले असेल? जे त्यांना त्यांच्या कुटुंबापेक्षा महत्वाचे असेल. त्यांना कुटुंबापेक्षा काम महत्वाचे आऐऐअहे का? माझे काहीच कौतुक नाही का? की अजूनही त्यांना तोच अहंपणा आहे? मला तरी काही समजेना. जाऊ दे ते आल्यानंतर त्यांनाच सगळा जाब विचारते.\" सौदामिनी मनातच म्हणाली.

दारावरची बेल वाजली. तशी सौदामिनी झोपेतून उठल्याप्रमाणे जागी झाली. तिने आजूबाजूला पाहिले तर ती आता या वर्तमानकाळात होती. म्हणजेच मला जो काही आठवत होता तो माझा भूतकाळ होता. किती त्या त्रासदायक यातना सहन केल्या आणि आता या पदावर आले आहे. आता हे सुख उपभोगत आहे. त्यावेळी जर मी समंजसपणे आणि धैर्याने राजनची साथ दिली नसती तर याक्षणी एकटी पडले असते. पण आता माझ्यासोबत माझे कुटुंब आहे. माझा परिवार आहे. या परिवारासोबत मी खूप समाधानी आहे. माझे कर्तव्य मी अगदी व्यवस्थित पार पाडले. त्यासोबतच माझी नोकरीही केली. आता बक्कळ पैसा आहे, माणसं आहेत. माझ्या हक्काची माणसं माझ्या सोबत आहेत असे तिला वाटत होते.

सौदामिनी खुर्चीतून उठली आणि तिने दरवाजा उघडला. समोर पाहते तर तिची मुलगी आली होती.
"हे काय आई, तू लगेच घरी आलीस? थोडा वेळ थांबायचं ना? खूप छान कार्यक्रम होता आणि सर्वांनी तुझ्यासोबत माझेही कौतुक केले. मला खूप छान वाटत आहे. खरंच आई, तू किती ग्रेट आहेस! तू स्वतः तर कठीण परिस्थितीतून वाट काढायला शिकलीस आणि मलाही तसे होण्याचे बळ दिलेस. आज तुला अॅवाॅर्ड देताना मला खूप आनंद झाला होता. मी खूप लहान आहे पण जेव्हा सरांनी मला स्टेजवर बोलावले हा अॅवाॅर्ड तुला देण्यास सांगितला तेव्हा एक क्षण माझी गर्वाने छाती फुगून आली. खरंच आई प्राउड ऑफ यू. तुझ्यासारखी आई मला मिळाली खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते." असे सौदामिनीची मुलगी म्हणाली. तिच्या डोळ्यांमध्ये आईबद्दलचा अभिमान चमकत होता.

"खरंच, तुला माझा अभिमान वाटला म्हणजे मी जे काही केले त्याचे सार्थक झाले. अगं, मुलांना आईचा अभिमान वाटावा यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आई म्हणजे फक्त चूल आणि मूल. घरातील कामे करायची आणि मुलांना सांभाळायचं या पलीकडे तिचे जगच नसतं ग. पण ती आई ज्या मुलांसाठी इतकं करते तीच मुले मोठी झाल्यावर तिलाच तू माझ्यासाठी काय केलेस? असा प्रतिप्रश्न विचारतात. तेव्हाच ती अर्धी खचून जाते. आपण आयुष्यात नेमकं काय मिळवलं? हा प्रश्न तिला त्यावेळी पडतो. पण गंमत माहित आहे का? जेव्हा असा प्रश्न पडतो ना तेव्हा तिच्या हातात काहीच नसतं. तसं पाहिलं तर तिच्या हातात कधीच काहीच नसतं, पण तिने जर मनात आणलं तर ती काहीही करू शकते. अगदी काहीही. जसे मी केले. प्रत्येक गोष्टीला विरोध मिळत होता, पण मी त्याच्याशी लढले. तुम्ही आता नशीबवान आहात बाई. आमच्यावेळी असे काही नव्हते बरं. आम्हाला सगळ्यांनाच सोबत घेऊन चालावे लागायचे. तुमची ती स्पेस बीस आमच्यावेळी नव्हती हो. आता जरा काही झालं की घटस्फोट घेऊन मोकळे होता, पण त्यावेळी मुलगी घरात राहिली की लोकं नावं ठेवायची, त्या बाईचे जगणे मुश्किल करायचे. किती तो लोकांचा विचार करायचा. तरी मी आईला म्हणायचे लोकं काय म्हणतील? इकडे लक्ष द्यायचे नाही. आपण फक्त आपला विचार करायचा. तर ती म्हणायची आपण या समाजात राहतो म्हटल्यावर आपल्याला तसेच आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तेव्हा मग जपून वागावे लागे. आज तसे काहीच नाही. आता सगळे फक्त स्वतःचा विचार करतात. इतरांना काही वाटेल याकडे कुणीच लक्ष देत नाही. आता सख्खी नाती नको आहेत तर इतरांना कोण विचारतय? त्यावेळी मी जे सहन केले ते आजच्या पिढीला सांगितले तर त्यांना अजिबात पटणार नाही. ही काय सांगते? नोकरी होती, खंबीर होती तर वेगळे राहून किंवा आईसोबत राहिली असतीच ना? हिला काय अडचण होती? तर बाळा, आमच्यावेळी असे सहसा कोणी वागत नव्हते. आईबाबांचे नाव करण्यासाठी, या समाजाला घाबरून सासूने कितीही त्रास दिला तरी तो सहन करत असत. आता काळ बदलला आहे. एक स्त्री तिला हवे तसे हवे तेव्हा काहीही करू शकते. खरंच, हे पाहून मला खूप समाधान वाटते. आम्ही जे सोसलय ते आजच्या पिढीने सोसू नये इतकीच इच्छा होती आणि ते आता घडतेय." सौदामिनी स्वतःच्या लेकीला सांगत होती.

"आई, तू खूप काही सोसलेस ना? मी तुझ्या जागी असते तर तेव्हाच सासूला जेलमध्ये टाकले असते. मग तिला समजले असते सुनेला त्रास दिल्यावर काय होतं?" सौदामिनीची मुलगी म्हणाली.

"हो बेटा, तू म्हणतेस तसे एक क्षण माझ्याही मनात विचार आला. पण मुळात फॅक्टरीमध्येच फाॅल्ट होता." असे म्हणून सौदामिनी हसू लागली.

"म्हणजे ग आई? मला काही समजले नाही. फॅक्टरीमध्ये फाॅल्ट म्हणजे?" सौदामिनीची मुलगी म्हणाली.

"अगं, म्हणजे माझी आई. मी मोठ्या व्यक्तींना उलट बोलले तरी ती मला ओरडायची आणि मी सासूला जेलमध्ये टाकले असते तर तिने काय केले असते काय माहित? फक्त माझ्या आईसाठी मी शांत बसले. तिनेच मला सगळे सहन करण्यास शिकवले. मी जसे तुला अन्याय सहन करायचा नाही असे शिकवले तसे तिने संयम धारण करायचा असे शिकवले. तिच्या शिकवणूकीनुसार मी वागत होते. पण मी जे काही सहन केलंय तसे माझ्या मुलीने अन्याय सहन न करता त्याच्याशी लढायला हवं अशी शिकवण मी तुला दिली आहे आणि हे सगळे माझ्या या नोकरीमुळे शक्य झाले आहे." सौदामिनी म्हणाली.

"हो ग आई, तू खरंच खूप ग्रेट आहेस. मला तुझा नेहमीच अभिमान वाटतो. तू जर त्या गावात, त्या घरात असतील तर आमच्यावर एवढे चांगले संस्कार करू शकली नसतीस. तिथे नेहमीच तुला आजीला घाबरून रहावे लागायचे. मुक्त संचार करायला येत नव्हता. मी जर तिथे असते तर मलाही जास्त शिकू दिले नसते. मग मी सुद्धा तुझ्याप्रमाणे चूल आणि मूल हेच केले असते. आज या पदावर मी सुद्धा आले नसते. खरंच तू खूप मोठे धाडसाचे पाऊल उचललेस म्हणून आज आमची पिढी तरी सुधारली. आई हे सगळे फक्त तुझ्यामुळे झाले आहे." सौदामिनीची मुलगी म्हणाली.

"नाही ग. यामध्ये तुझ्या बाबांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. जर का त्यांनी मला साथ दिली नसती तर आज मी या स्टेजवर आले नसते. हा अवॉर्ड कदाचित मला मिळाला असता पण तो तुझ्या हस्ते मिळाला नसता. माझ्या आईने जसे मला सपोर्ट केले तसेच मी तुम्हाला सपोर्ट करत आहे. फक्त सपोर्ट करण्याची पध्दत वेगळी." सौदामिनी म्हणाली.

त्या दोघी मायलेकी बोलत असतानाच दारावरची बेल वाजली.
"आई थांब. मी पाहते." असे म्हणून सौदामिनीची मुलगी दार उघडते. तेव्हा दारात तिचे बाबा अर्थात राजन आला होता.

"बाबा, तुम्ही इतका उशीर का केलात? आज खूप छान कार्यक्रम झाला." मुलीच्या तोंडून हे वाक्य ऐकताच सौदामिनी फुगून बसली. राजनशी बोलायचेच नाही असे तिने ठरवले.

तेवढ्यात "बाबा, ही बाई कोण?" असे वाक्य मुलीच्या तोंडून ऐकताच सौदामिनी संभ्रमात पडली.

कोण असेल ती बाई? सौदामिनीच्या ओळखीची असेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all