सोना मना हैं........

सीरिअल किलिंग ची थरारक गोष्ट ......
सोना मना है.... !

भाग 1 :


" हॅप्पी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू.... हं काजल बेटा केक काप बरं आता. " पप्पांच्या परीने पप्पांच्या हातात हात ठेवूनच केक कापला. बर्थडे सॉंग आणि टाळ्यांच्या कडकडाटात पप्पांनी काजलला केक भरवला.

" थँक्यू पप्पा. मला तुमचं सरप्राईज खूप आवडलं. आणि तुम्ही दिलेले गिफ्ट ही खूप आवडले. "

" अरे बाळा तुझ्यासाठी तर मी काहीही करू शकतो. "

" हो पप्पा, काही करू शकता तुम्ही माझ्यासाठी? तर मग तुम्ही, मी आणि मम्मा दोन दिवस लोणावळ्याला जाऊया ना... "

" हो बेटा, नक्की जाऊ. पण आता आलेल्या पाहुण्यांसोबत गप्पा मारू या ना.. "


काजल इन्स्पेक्टर रणजीत यांची एकुलती एक मुलगी. आज तिच्या वाढदिवसानिमित्त रणजीत यांनी तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टीचे आयोजन केले होते. परिवार आणि नातलग यांच्या उपस्थितीत पार्टी छान रंगात आली होती. एरवी कधीही वेळ न देऊ शकणारे पप्पा, आपल्या सोबत आहेत आणि आणखी दोन दिवस सोबतच असणार, या विचारानेच काजल खुश होती. बागडत होती.

पार्टी संपली. सर्वजण घरी गेले. काजल, रणजीत आणि रूपाली ही घरी जाण्यासाठी निघाले. रस्त्यातच रणजीत चा मोबाईल वाजला. काजल आणि रूपाली ने एकमेकींकडे पाहिले. हे त्या दोघींच्या अंगवळणी पडलेले होते. काजलला तर कॉल आल्यानंतर होणारा संवाद देखील तोंडपाठ झाला होता. आणि त्यानंतर रणजीत त्यांच्याशी काय बोलणार आहेत याचीही कल्पना होती ,

" सॉरी बच्चा, इमर्जन्सी आहे, जावेच लागेल मला. " रणजीत ने काही म्हणायच्या आधीच काजोलने सांगितले.

रणजीत ने करूण नजरेने दोघींकडे पाहिले. त्यांना घराच्या दारासमोर सोडून तो त्याचे कर्तव्य बजावायला निघाला. हवालदार तानाजी शिंदे यांनी सांगितलेल्या जागेकडे रणजीत निघाला.

गुन्हेगारांचा कर्दनकाळ , कमी वेळात गुन्ह्याची उकल करणारा अशी त्याची ख्याती होती. सहा फूट उंची, भरदार शरीर, गुन्हेगारांना धडकी भरेल अशी नजर आणि पिळदार मिशा, असे त्याचे व्यक्तिमत्व होते. सहकारीच काय पण वरिष्ठ अधिकारी देखील त्याच्या प्रामाणिकपणाला आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला वचकून असत . कोणतीही अवघड केस असेल , आणि ती रणजीत कडे आली की त्याचा शोध लागणारच, याची सर्वांना खात्री असे.


घर,कुटुंब, स्वतः यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारे रणजीत आज देखील त्याच्या कुटुंबाला सोडून कर्तव्यावर निघाले होते . रात्रीची वेळ, अंधारून आलेले ढग, आणि अवकाळी सुरू झालेला पाऊस वातावरणात भीती निर्माण करत होता. शिंदेंनी सांगितलेल्या ठिकाणाजवळ रणजीत पोहोचले..

गाडी टेकडीच्या पायथ्याशी ठेवून, रेनकोट अंगावर चढवून ते टेकडीवर जाण्यासाठी निघाला. टेकडीवर एके ठिकाणी पाच-सहा लोक हातामध्ये टॉर्च लाईट घेऊन उभे होते. रणजीत त्याच दिशेने निघाले . पावसामुळे पायवाट निसरडी झाली होती. थोड्याच अंतरावर जातात येणाऱ्या दुर्गंधीने त्यांनी नाकाला रुमाल लावला.

पोलिसांना असा वास , असे वातावरण, नेहमीचे असले म्हणून काय झाले, शेवटी खाकी वर्दीच्या आत मनुष्यच असतो ना!

'आता समोर काय बघायला मिळणार ' , या विचाराने रणजीत अस्वस्थ झाले .

हवालदार शिंदे, त्यांचे दोन-तीन सहकारी, आणि इतर दोन चार माणसे सर्वजण झाडाखाली छिन्नविछिन्न पडलेल्या मृतदेहा कडे बघत होते. सडलेला असल्यामुळे त्या मृतदेहाचा दुर्गंध पसरला होता. क्रूर खुन्याने अत्यंत निर्दयीपणे त्या व्यक्तीचा खून केला होता . व्यक्तीच्या अंगावर ओरखड्याच्या खुणा होत्या. कदाचित झटापटीमध्ये त्या व्यक्तीच्या अंगावर ओरखडे आले असावेत. साधारण 40 /42 वर्षांचा तो इसम होता. त्याच्या अंगावर सुरक्षारक्षकाचा गणवेश होता. त्याचे डोळे काढून घेतलेले होते. आणि कपाळावर प्रश्नचिन्हाच्या आकाराच्या हत्याराने जोरदार प्रहार केला होता.

अत्यंत क्रूरपणे आणि थंड डोक्याने गुन्हेगाराने हा खून केलेला होता. चेहऱ्यावर गंभीर वार केल्यामुळे, डोळे काढून घेतल्यामुळे चेहरा नीटसा दिसत नव्हता. गुन्हेगाराने मृत व्यक्तीच्या शर्ट चा खिसा फाडलेला होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे जिकिरीचे काम होते. खिशावर असणाऱ्या कंपनीच्या लोगोंमुळे कदाचित मृतदेहाची ओळख पटली असती.

इन्स्पेक्टर रणजीत यांनी सहकाऱ्यांना आजूबाजूला काही संशयास्पद वस्तू मिळते का याचा शोध घेण्यास पाठवले. तोपर्यंत फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे कर्मचारी, क्राईम रिपोर्टर, फोटोग्राफर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होते. शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले.

" सर, सर इकडे झुडपात काहीतरी जाळले आहे. " एका हवालदाराच्या आवाजाने सर्वजण तिकडे गेले. तिथे जळालेल्या कापडाच्या राखेत पावसाचे पाणी पडून चिखल झाला होता. अर्धवट जळालेले कागदाचे तुकडे तसेच पडून होते. दारूची संपलेली बाटली, शेंगदाण्याची पाकीटे इतरत्र पडलेली होती . खून होण्याआधी कुणी आणि मृत व्यक्ती यांनी सोबत दारू पिली असावी. नशेत काही भांडण झाले असावे, आणि मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा. असा प्राथमिक अंदाज रणजीत ने व्यक्त केला.

पण ती व्यक्ती कोण? इतक्या निर्दयीपणे कोणी एखाद्याला का मारेल? डोळे काढून घेण्याचा हेतू काय? काही मानवी अवयवाची तस्करी असेल का?

हे प्रश्न मात्र इन्स्पेक्टर रणजीत यांना सतावत होते. त्याच विचारात रणजीत आणि सहकारी घराकडे निघाले, उद्या खुनी आणि मृत व्यक्ती दोघांचाही शोध लावण्यासाठी..... ......


क्रमश :

🎭 Series Post

View all