Login

सोनचाफा 10

एका खूनाचा शोध. रहस्यकथा
सोनचाफा 10
विचारांच्या तंद्रित अनिकेतला कधी झोप लागली त्याचे त्यालाच समजले नाही. पहाटे लवकर त्याला जाग आली; कारण ही केस त्याला जास्त वेळ झोपू देत नव्हती. कधी एकदा या केसचा निकाल लावतो असे त्याला झाले होते; पण त्याला एकही पुरावा त्याच्या बाजूने सापडत नव्हता. अनिकेतने लवकरच त्याचे सगळे आवरले. त्याचे लवकर आवरल्याने तो लवकर ऑफिसला जायला निघाला.

"अरे अनिकेत, नाश्ता तरी करून जा बाळा." अनिकेतची आई म्हणाली.

"अगं आई, मी बाहेर काहीतरी खाऊन घेईन. तू कशाला त्रास करून घेतेस." अनिकेत म्हणाला.

"अरे, मुलासाठी करण्यात कसला त्रास आलाय?" अनिकेतची आई म्हणाली.

"अगं आई, तुझी तब्येत बरी नाही ना, म्हणून म्हणालो." अनिकेत म्हणाला.

"अरे, आता मी ठीक आहे. मला माझ्यासाठी काहीतरी बनवायचं होतं, त्यात तुलाही बनवलं. खा आता." अनिकेतची आई म्हणाली.

"अरे वा! आई, तू शीरा बनवलास. म्हणजे आज चांगली बातमी समजणार." अनिकेत उत्साहात म्हणाला.

"हो रे. बरं मला सांग, आज तू ओवीला घेऊन येणार आहेस ना? शिवाय माझी औषधं संपली आहेत ती देखील घेऊन ये." अनिकेतची आई म्हणाली.

"हो आई. मी तिला संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला की डायरेक्ट घरीच घेऊन येतो." अनिकेत बोलण्याच्या ओघात बोलून गेला.

"डिस्चार्ज! अनिकेत, ओवीला काय झालंय?" अनिकेतच्या आईने घाबरतच विचारले.

"अगं आई, ते मी डिस्चार्ज म्हणालो का? अगं एका केसबद्दल विचार करत होतो आणि तोपर्यंत तू लगेचच मला प्रश्न विचारलास त्यामुळे मी बोलून गेलो. अगं, मी ओवीला ऑफिस सुटल्यावर घेऊन येतो असे मला म्हणायचे होते.

"अरे, जास्त केस संदर्भात विचार करत जाऊ नकोस. थोडं संसाराकडेही लक्ष दे. लग्नाला सहा महिने झाले आता पुढचा विचार करा. तसे मी तुम्हाला काही फोर्स करणार नाही. शेवटी तुमची इच्छा आहे; पण काही गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात, नाहीतर त्रास होतो. इतकेच माझे सांगणे आहे." अनिकेतची आई अनिकेतला समजावत म्हणाली.

"हो आई, तुझे म्हणणे मला पडते; पण मला असे वाटते की अजूनही आमच्या नात्याला थोडा वेळ द्यावा. तू खूप घाई करू नकोस. आधीच पाहुण्यांनी सुद्धा डोक्याचा भुंगा करून टाकलाय. आधी तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. नंतर पुढचे पाहायला येईल." असे म्हणून अनिकेतने पटापट नाष्टा केला आणि तो जायला निघाला. जाताना त्याच्या मनामध्ये खूप विचार सुरू होते. तो ऑफिसला न जाता डायरेक्ट ओवीच्या घरी गेला. तिथे अनिकेत जाताच त्याचे मानपान सुरू झाले. मानपान तर होणारच ना! कारण तो त्या घरचा जावई होता; पण त्याला ही सगळी फॉर्मलिटी नको होती. त्याला त्याच्या केसचा निकाल लवकरात लवकर लावायचा होता आणि जो आरोप ओवीवर करण्यात आला होता तो पूर्णपणे पुसून काढायचा होता. यासाठीच तो प्रयत्न करत होता. त्याने तिकडच्या तिकडे सारंगलाही बोलावून घेतले होते. अनिकेत जवळच असल्याने तो पटकन जाऊन पोहोचला. सारंगला मात्र येण्यास थोडासा उशीर झाला होता. तोपर्यंत त्याचे मानपान झाले होते. सारंग आल्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी सुरुवात झाली.

अनिकेतने पुन्हा एकदा ओवीच्या आईबाबांना वेठीस धरले होते. त्याने चौकशीचा मोर्चा पुन्हा त्यांच्याकडे वळवला होता. आता मात्र ओवीच्या आई-बाबांना खूप भीती वाटत होती; कारण यामध्ये आपली काही चूक नसताना आपल्याला ओढवले जात आहे असे त्यांना वाटत होते. ते आतून खूप घाबरले होते. अनघा गेल्यापासून अनघाचे आई बाबा मात्र काहीच बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते आतून पूर्णपणे तुटून गेले होते. आपल्या लेकीच्याच बाबतीत असे अनर्थ का घडावे असे त्यांना वाटत होते.

"ओवीचे आई बाबा, तुम्ही मला सांगा ओवीचे लग्नाआधी कुणावर प्रेम होते का?" अनिकेतने ओवीच्या आईबाबांना प्रश्न केला.

"जावईबापू, तुम्हाला तर सारे काही माहीतच आहे. ओवीने तुम्हाला सारे काही सांगितलेच आहे. मग तुम्ही पुन्हा आम्हाला तोच प्रश्न का विचारताय? भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळातच ठेवलेल्या बऱ्या; नाहीतर त्याचा परिणाम वर्तमान आणि भविष्यावर होतो." ओवीचे बाबा म्हणाले.

"हा या केसाचा एक भाग आहे; त्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते खरे खरे सांगायचे आहे. मी जेवढे विचारतोय तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्या." अनिकेत रोखठोक बोलला.

"ठीक आहे. तुम्हाला जे काही विचारायचे आहे ते विचारा. आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहोत. कितीही केले तरी आमच्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे." ओवीची आई म्हणाली.

"मला सांगा ओवीचे कोणत्या मुलासोबत अफेअर होते. ओवीचे कोणत्या मुलावर प्रेम होते?" अनिकेत म्हणाला.

"रोहन नाव होतं त्याचं. इथेच आमच्या समोरच्या गल्लीत राहत होता. म्हणजे सध्या तो इथे दिसत नाही. आमच्या घरामध्ये सर्व काही शिस्तीचे वातावरण होते. मुली खाली मान घालून कॉलेजला जायच्या आणि यायच्या; पण त्याची आणि हिची भेट कशी आणि कुठे झाली काहीच माहित नाही. आमच्यासमोर जेव्हा सत्य आले तेव्हा आम्ही सगळे खूप आश्चर्यचकित झालो; कारण ओवी असे काही करेल असे आम्हा कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. ओवी खूप सालस आणि समंजस मुलगी. घरात सर्वात मोठी असल्याने जबाबदारीची जाणीव असलेली अशी ओवी आहे. त्यामुळे ती असे काही करेल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. तिची खूप मोठी स्वप्नं होती; पण या प्रेमप्रकरणामुळे तिचे सर्व स्वप्नं मातीत मिसळली. या सगळ्या समोर आम्ही देखील हतबल झालो होतो. मुलीच्या आयुष्याचे वाटोळे करून देण्यापेक्षा तिचे आयुष्य मार्गी लागणे कधीही चांगलेच. आम्ही तिचे आई-बाबा आहोत; त्यामुळे तिच्या भल्याचाच विचार करणार आणि आम्ही तेच केले." ओवीचे बाबा सारे काही बोलून मोकळे झाले.

"पण यामध्ये इतरांचेही आयुष्य भरडले जाणार याचा विचार तुम्हाला करता आला नाही का? तुम्ही फक्त तिच्याच मनाचा विचार केला; पण तिच्या सोबतच आयुष्य काढणार आहे त्याचे पुढे काय आणि कसे होईल याचा विचार थोडा देखील तुमच्या मनामध्ये आला नाही का? ह्या मुलीचे एकाशी प्रेम होते आणि दुसऱ्याशी लग्न करून देण्याचा तुम्ही विचार केला तर एकाला सोडून दुसऱ्याशी प्रेम लगेच करता येईल का? असा विचार तुम्ही केला नाही का?" अनिकेतने त्याच्या मनात आत्तापर्यंत साचलेले सगळे मत मोकळे केले.

"सहवासाने प्रेम वाढते असे आम्ही ऐकले होते. आमचे देखील अरेंज मॅरेज होते. आम्हाला एकमेकांच्या प्रेमात पडायला बरेच दिवस लागले. असे झटपट प्रेम थोडेच होते! सहवासाने प्रेम होईल असे आम्हाला वाटले म्हणून आम्ही तिचे लग्न तुमच्याशी लावून दिले. खरंच तुमचा मी खूप अपराधी आहे." ओवीचे बाबा अपराधीपणाने बोलू लागले.

"मग तुम्ही त्या रोहनशी ओवीचे लग्न का करून दिले नाही? शेवटी प्रेमाने जुळलेली नाती शेवटपर्यंत टिकतात, असे जबरदस्तीने जोडलेले नाते शेवटपर्यंत टिकेलच असे नाही. तिचे त्याच्यावर प्रेम होते आणि त्याचेही तिच्यावर प्रेम होते तर तुम्ही त्या दोघांचे लग्न का लावून दिले नाही? तसेही तुम्ही थोडासा त्यांना हातभार लावलाच असता ना? आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर ते दोघेही कमावून पुढे आर्थिक परिस्थिती सुधारता आली असती; पण पैसा नाही म्हणून त्याच्याशी लग्न लावून जर तुम्ही दिले नसाल तर तुम्ही पालक म्हणून खूप चुकलात." अनिकेत म्हणाला.

"प्रेम आणि आकर्षण यामधला फरक आम्हाला कळत नाही का बाळा. त्या मुलाशी लग्न लावून न देण्यामागे खूप कारणे आहेत. ते तुला सांगितले तर एक बाप म्हणून तू माझ्या जागी राहून विचार केलास तर तुला नक्कीच समजेल की आम्ही असे का केले?" ओवीचे बाबा म्हणाले.

रोहन कसा आहे हे ओवीच्या बाबांनी सांगितल्यावर अनिकेतला त्यातून काही क्ल्यू मिळेल का? हा खून नक्कीच रोहनने केला असेल का? यामागे काहीतरी पुरावे मिळतील का?
क्रमशः


0

🎭 Series Post

View all