Login

सोनचाफा 11

एका खूनाचा शोध. रहस्यकथा
सोनचाफा 11
"तुम्ही रोहन सोबत ओवीचे लग्न का लावून दिले नाही? आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तर तुम्ही त्याला मदत केली असतीच ना? शिवाय ते दोघे कमावले असते. त्यांचा संसार सुखाचा झाला असता." अनिकेत म्हणाला.

"अनिकेत, खरं सांगू; जाती किंवा परिस्थिती यावर मी कधीच अडून बसत नाही. मुलगा चांगला असेल तर माझ्या मुलीचा हात मी स्वखुशीने त्याच्या हाती दिले असते; पण मला नक्की त्या मुलाबद्दल खरी माहिती माहित असताना मी माझ्या मुलीचा हात अशा मुलाच्या हातात कसा देऊ शकतो? स्वतःच्या हातानेच मुलीचा गळा दाबल्यासारखे होईल ना? म्हणून मी हे सारे केले." ओवीचे बाबा म्हणाले.

"अहो ते दोघे एकमेकांवर प्रेम करत होते आणि जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल ना, तर त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करू शकतो. तसे पुढे जाऊन या दोघांचा संसार चांगला सुखाचा झाला असताच ना? मग तुम्ही असे करायला नको होते. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये तुम्ही अशी ताटातूट करायला नको होती. तुम्ही तुमच्या मुलीला समजून घ्यायला हवे होते." अनिकेत म्हणाला.

"मी मुलीला समजून घेतलेच आहे म्हणून तर इतक्यात आटोपले, नाहीतर या गोष्टीचा किती मोठा कांगावा झाला असता तुम्हाला माहित नाही." ओवीचे बाबा म्हणाले.

"म्हणजे? मी काही समजलो नाही." अनिकेत म्हणाला.

"रोहन हा आमच्याच गल्लीत राहणारा मुलगा. त्याला अगदी लहानपणापासून आम्ही ओळखतो. तो जसा दिसतो तसा मुळीच नाही. तो मुलींशी प्रेमाने बोलतो आणि आपल्या जाळ्यात ओढवतो. तिच्याशी प्रेमाची सलगी करतो आणि लग्नाचे अमिष देतो. मात्र लग्न झाल्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायासाठी दुसरीकडे विकतो. हे आम्ही दुरून कुठूनतरी ऐकले होते आणि त्यामुळेच आम्ही त्याच्यापासून मुलींना दूर ठेवले होते. पण ओवीची कशी काय माहित त्याच्याशी ओळख झाली आणि ही वेडी त्याच्यावर प्रेम करून बसली. पण तो कसा आहे हे हिला अजिबात माहीत नाही. त्यातही हिने आम्हाला काहीच सांगितले नाही. उगीच अनघाकडून सारे काही समजले म्हणून बरे झाले. नाहीतर आमची मुलगी हातची निघून गेली असती." ओवीचे बाबा भावूक होऊन म्हणाले.

"इतके सारे असताना तुम्ही पोलिसात कम्प्लेंट का केली नाही?" अनिकेत आश्चर्याने म्हणाला.

"ठोस पुरावा हाती असायला हवा होता ना तसा पुरावा आमच्या हाती नव्हता. आम्हाला या गोष्टी बाहेरून समजल्या होत्या आणि ज्यांना कुणाला माहीत होत्या त्यांच्याकडे देखील असा पुरावा नव्हता. मग आम्ही काय म्हणून पोलिसात कंप्लेंट करणार होतो?" ओवीचे बाबा म्हणाले.

"बरं ठीक आहे. एक वडील म्हणून तुम्ही तुमच्या मुलीचा विचार करणार यात गैर काही नाही. पण आता या सार्‍या गोष्टीमुळे बिचाऱ्या अनघाला जीव गमवावा लागला. नक्कीच अनघाने ओवीबद्दल घरात सांगितले म्हणून तिचा खून झाला असणार अशी मला शंका येते. शेवटी या गोष्टीचा छडा मी लावणारच आहे; पण तुम्ही काळजी करू नका. ओवी नक्कीच निरपराधी असेल. तिने काहीही केले नाही असा मला विश्वास आहे; त्यामुळे तिला सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. तुम्ही निर्धास्त रहा." असे आश्वासन देऊन अनिकेत तिथून बाहेर पडला. जाताना त्याने रोहनच्या घरचा पत्ता घेतला होता.

रोहन हा साधारण अठ्ठावीस ते तीस वर्षे वयो-गटातील मुलगा होता. लहानपणी त्याचे आई-बाबा वारले होते; त्यामुळे तो इकडे मामा-मामींकडे राहायला होता. तसे लहानपणापासूनच त्याचा बोलका स्वभाव होता. गल्लीतच असल्यामुळे लहानपणी तो सर्वांची मिळून मिसळून खेळायचा. पण नंतर कॉलेजला गेल्यानंतर त्याची संगत बिघडली. तो बिघडत चालला आहे हे बऱ्याच लोकांना माहित होते. तसे त्यांनी त्याच्या मामा-मामींना सांगितले देखील होते; पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेही पोरकं पोरं त्याच्याकडे लक्ष द्यायला कोण असणार? रोहन मात्र या सगळ्यात भरकटत गेला. तसा त्याचा स्वभाव खूप चांगला होता. सर्वांशी मदत करायचे, मिळून मिसळून रहायचे असा त्याचा स्वभाव होता; पण मित्रांच्या संगतीने तो बिघडला होता. त्याला कुणाची भीती नव्हती; शिवाय कोणाच्या अंकितात तो राहणारा नव्हता. त्याला फक्त भरपूर पैसा मिळवायचा होता. त्याला विचारणारे कुणीच नव्हते. तसेही त्याचे नातेवाईक फक्त नावाला होते, कुटुंबाचा तर पत्ताच नव्हता; त्यामुळे तो या साऱ्यामध्ये वाहवत गेला होता.

आता अनिकेतला रोहनचा संशय येत होता. या खुनामागे रोहन तर नसेल ना? असे त्याला वाटत होते; कारण 'ओवी आणि रोहनचे अफेअर असल्याची बातमी अनघानेच तर घरच्यांना दिली होती, त्याचा सूड म्हणून त्यांने तिचा खून केला असेल का?' असा संशय त्याच्या मनात येत होता आणि त्यामुळेच त्यांने त्याचा मोर्चा रोहनकडे वळवला. अनिकेत जाता जाता ओवीच्या बाबांनी दिलेल्या पत्त्यावर गेला. तिथे त्यांच्या घराला कुलूप होते; त्यामुळे त्याची निराशा झाली. आज मात्र हा तावडीतून सुटला; पण पुढे नक्कीच भेटेल असे त्याने मनोमन म्हटले आणि तो जाऊ लागला. अनिकेतसोबत सारंगही होता. ते दोघे ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये गेल्यानंतर अनिकेतने सरांना सगळे डिटेल्स दिले. तो तिथेच जाऊन बसला. त्याच्या मनात मात्र त्या साऱ्या गोष्टींचे विचारचक्र सुरू होते.

"अनिकेत, कसला विचार करतोयस? सगळे ठिक होईल. तू इतका विचार करू नकोस." सारंग म्हणाला.

"अरे, तसे काही नाही; पण या सगळ्यांमध्ये उगीचच ओवी आणि तिच्या घरचे भरडले जात आहेत. खुनी मात्र कोणी निराळाच आहे." अनिकेत म्हणाला.

"तू हे ठामपणे कसे काय सांगू शकतोस? खुनी कुणी निराळाच आहे म्हणून!" सारंग म्हणाला.

"अरे, म्हणजे बघ ना. मला असे वाटते की, अनघाचा खून हा रोहनने केला असेल. म्हणजे ओवीचा बॉयफ्रेंड. त्याला ओवी मिळाली नाही आणि त्यांच्या अफेअर बद्दल अनघानेच तर घरी सांगितले होते, म्हणून असे केले आहे आणि त्याचा आरोप मात्र ओवीवर येतोय." अनिकेत म्हणाला.

"पण अनघाच्या लग्नात रोहन कसा येऊ शकतो? त्याला तर सर्वजणच ओळखतात; मग तो या लग्नात आला असेल का? तुला काय वाटते? तुला असा संशय आला नाही का?" सारंग म्हणाला.

"अरे, मला तसं संशय आला ना; पण त्याने हा गेम कोणाच्यातरी मदतीने केला असेल तर? तसेही बरेच लोक पैशासाठी लालची आहेत. पैशासाठी कोणीही असे काम करू शकते. तुला काय वाटलं माझ्या मनात ही शंका आली नसेल? तेव्हाच आली होती; पण पुन्हा असा विचार आला की कोणाच्यातरी मदतीने त्यानेही केले असेल." अनिकेत म्हणाला.

"हो, तसं असू शकते." सारंग म्हणाला.

इतक्यात कसला तरी गजर वाजला आणि अनिकेतचे लक्ष घड्याळाकडे गेले. संध्याकाळचे सहा वाजले होते. 'अरे बापरे! सहा वाजले. आज ओवीला डिस्चार्ज मिळणार होता आणि तिला घेऊन घरी जायचे होते. शीट्, मी ऑफिसच्या कामांमध्ये इतका गढून गेलो होतो की, तिला घरी घेऊन जायचे आहे याचाच मला विसर पडला.' असा विचार करून अनिकेत लगेचच हॉस्पिटलला जायला निघाला. हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर तो लगेच ओवीच्या रूममध्ये गेला. ओवी त्याचीच तर वाट पाहत बसली होती. तिला आता थोडे बरे वाटत होते. अनिकेतला पाहून ती गालातच हसली. आता आपण घरी जाणार म्हणून तिला थोडे बरे वाटले. अनिकेत काउंटरवर जाऊन त्याने हॉस्पिटलची सर्व फॉर्मलिटीज पूर्ण केली आणि ओवीचे सगळे सामान त्याने गाडीत नेऊन ठेवले. तो डॉक्टरांशी भेटण्यास गेला. ओवीच्या तब्येतीविषयी आणि पुन्हा कधी भेटायला यायचे तसेच तिचे पथ्यपाणी याविषयी त्याने सगळी माहिती घेतली आणि ते दोघे हॉस्पिटलमधून घरी जायला निघाले. घरी त्या दोघांना एकत्र आलेले पाहून अनिकेतच्या आईला खूप आनंद झाला.

*************

सकाळी ओवी लवकरच उठली. तसेही हॉस्पिटलमध्ये आराम करून तिला कंटाळा आला होता. तिने सगळी नाष्ट्याची तयारी केली. चहा बनवला आणि अनिकेत, अनिकेतच्या आई आणि स्वतःसाठी नाष्टा टेबलवर मांडला. नाष्टा करून झाल्यानंतर अनिकेत पेपर वाचत बसला होता, इतक्यात दारावरची बेल वाजली.

"आपण कोण?" असे ओवी म्हणताच सर्वांचे लक्ष दाराकडे गेले.
क्रमशः

© प्रियांका अभिनंदन पाटील.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.
0

🎭 Series Post

View all