Login

सोनचाफा 12

एका खूनाचा शोध. रहस्यकथा.
सोनचाफा 12
ओवी सकाळी लवकरच उठली. तसेही हॉस्पिटलमध्ये आराम करून करून तिला कंटाळा आला होता; त्यामुळे तिला लवकरच जाग आली. तिने उठून अंघोळ वगैरे आटोपून पहिल्यांदा देवपूजा केली. घरामध्ये छान सुगंधी धूप लावले. ज्याचा घरभर सुवास दरवळत होता. त्या सुवासाने अनिकेत आणि त्याची आई दोघेही उठले आणि आश्चर्याने ते गोंधळून गेले. त्यांनी पहिले तर ओवीने देवपूजा करून धूप लावले होते. ते पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. घरात पुन्हा चैतन्याचे वातावरण पसरले होते. नाश्त्यासाठी ओवीने फोडणीचे पोहे बनवले होते. त्यासोबत तिने चहाही बनवला होता. अनिकेत आणि त्याची आई दोघेही आवरून बाहेर आले. ओवीने दोघांना डिशमध्ये पोहे घातले आणि त्यावर ओले खोबरे आणि कोथिंबीर पेरून दोघांना दिले. स्वतःलाही एका डिशमध्ये पोहे घातले वरून कोथिंबीर आणि खोबरे पेरून तीसुद्धा त्यांच्यासोबत नाश्ता करण्यासाठी गेली.

"आई, खरंच मी तुम्हाला खूप मिस केले. मला तिथे अजिबात करमत नव्हते. कधी एकदा घरी येईन असे झाले होते." असे ओवीचे बोलणे ऐकून अनिकेतने ओवीला एक मेसेज टाकला. मेसेजची ट्यून ऐकल्याबरोबर ओवीने मोबाईल पाहिला तर त्यामध्ये अनिकेतने मेसेज केले होते की, 'झाल्या प्रकरणाबद्दल आईला काहीही माहित नाही; त्यामुळे तू चुकून सुद्धा तिच्यासमोर काही बोलू नकोस.' खरंतर ही गोष्ट अनिकेत ओवीला रात्रीच सांगणार होता; पण तो खूप दमला असल्यामुळे लवकरच झोपी गेला आणि हे तिला सांगण्याचे विसरून गेला. ओवीने देखील थम्बचा मेसेज पाठवला.

"अगं, पण तू माहेरी होतीस ना! माहेरी असतानाही सासूची आठवण येणारी तू पहिलीच मुलगी असशील बरं. नाहीतर सासूची आठवण मेली कोणाला येतेय. तसेही सासू म्हणजे खाष्ट असा शिक्काच पडलाय ना?" अनिकेतची आई म्हणाली.

"हो आई, पण तुम्ही अजिबात खाष्ट नाही बरं का. तुम्ही तर खूप प्रेमळ आहात, अगदी माझ्या आईसारखे." ओवी सासूचे खूप कौतुक करत होती.

"तू देखील काही कमी नाहीस बरं. मला मुलगी हवी होती तशीच तू आहेस." अनिकेतच्या आईने देखील तिची प्रशंसा करायला सुरुवात केली.

ओवी जरी अनिकेतशी अनोळखी असल्याचे वागत असली तरी अनिकेतच्या आईसोबत ती प्रेमाने वागत होती. अनिकेतच्या आईची ती अगदी व्यवस्थित काळजी घेत होती. घरी आलेल्या पाहुण्यांचे आगत-स्वागत अगदी प्रेमाने करायची, त्यांच्याशी प्रेमाने आपुलकीने बोलायची, त्यांच्या मानपानात कोणतीही कसूर सोडत नव्हती; त्यामुळे त्या सर्वांना तिचा कधी संशय आला नाही. तिच्यावर कोणी शंका घेईल असे ती कधी वागतच नव्हती. आत्ताही ओवी अनिकेच्या आईशी अगदी प्रेमाने बोलत होती, हे सर्व पाहून अनिकेतच्या मनामध्ये पाल चुकचुकली. 'ही माझ्यासोबत एक वागते आणि आईसोबत एक वागते याचा अर्थ नक्कीच हिच्या मनामध्ये काहीतरी काळभैर असेल का? तिला जर आमचे नातेच नको आहे तर मग ही माझ्या आईसोबत इतके प्रेमाने कसे वागू शकते? हिला माझ्याशी संसार करायचा नाही पण ही आईसोबत मात्र मैत्रिणीसारखी राहते याच्यामागे हिचा काय उद्देश असेल? हिच्या मनामध्ये तोच मुलगा असेल का? की हिला मी आवडत नसेन?' असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये घोंगावत होते.

"अरे अनिकेत बाळा, तू अजून तसेच पोहे घेऊन बसला आहेस. अरे, आवर ना पटकन. ओवी चहा घेऊन येतेय." अनिकेतच्या आईच्या आवाजाने तो भानावर आला आणि त्याने पटापट पोहे खाल्ले. इतक्यात ओवी चहा घेऊन आली. ओवीने अनिकेतला आणि त्याच्या आईला चहाचा कप दिला आणि स्वतः कप घेऊन बसणार इतक्यातच दारावरची बेल वाजली.

"आता यावेळी कोण आलं असेल?" अनिकेतची आई म्हणाली.

"काय माहित आई? बहुतेक माझ्या घरून कोणीतरी असेल." असा अंदाज ओवीने बांधला; कारण कालच दवाखान्यातून ती घरी आली असल्याने आई-बाबांना काळजी वाटत असेल म्हणून ते इथे आले असतील असा तिला अंदाज आला होता.

"अगं, पण तू तर कालच आली आहेस ना! मग लगेच कोणी येऊ शकतं?" अनिकेतची आई म्हणाली.

"आई, आता अनघा पण नाही आणि मी पण नाही; त्यामुळे त्यांना करमत नसेल म्हणून कदाचित भेटायला आले असतील. थांबा हं एक मिनिटं, मी पाहते." असे म्हणून ओवी दरवाजा उघडण्यासाठी गेली आणि दारात पाहते तर कोणी अनोळखी मुलगी होती.

"आपण कोण?" ओवीने प्रश्न केला आणि तिच्या प्रश्नासरशी अनिकेत आणि अनिकेतची आई दोघेही दरवाजाच्या दिशेने पाहू लागले. आता यावेळी अनोळखी असे कोणी आले असेल? असा प्रश्न अनिकेतच्या आईच्या मनात सुरू होता.

"ओवी, कोण आहे बाळा?" अनिकेतच्या आईने ओवीला प्रश्न केला.

"काय माहित आई? कोणीतरी आले आहे, माझ्या काही ओळखीचे नाहीत; कदाचित तुमच्या ओळखीच्या असू शकतील. तुम्ही पाहता का?" असे ओवी म्हणताच अनिकेतची आई दरवाजाकडे जाऊ लागली. तिने तिथे जाऊन पाहिले तर एक अनोळखी मुलगी होती जी अनिकेतच्या आईच्या देखील ओळखीची नव्हती.

"अनिकेत तुझे कोणी घरी येणार होते का?" असे अनिकेच्या आईने विचारताच अनिकेत देखील आश्चर्याने तिकडे पाहू लागला.

तो दरवाजा जवळ जाऊन पाहतो तर काय दरवाजामध्ये त्याची कलीग होती.
"अरे गौरी तू! ये ना. मी तर साफ विसरूनच गेलो होतो तू येणार होतीस ते. आत ये ना. आपण बसून बोलूयात. आई, चल तुला सांगतो मी." असे म्हणून ते चौघेही आत येऊन बसले.

आई, मी तुम्हा दोघींना सांगायचे विसरलोच. ही गौरी. अर्थातच ही एक मेडिकल स्टुडंट आहे. तसेही तिचे कॉलेज संपले आहे. सध्या ती प्रॅक्टिस करत आहे." असे म्हणून अनिकेतने गौरीची ओळख करून दिली.

"नमस्कार काकू." असे म्हणून गौरीनेही त्या दोघींना नमस्कार केले. त्या दोघींनी देखील हसून गौरीचे स्वागत केले.

"आई, गौरी काही दिवस आपल्यासोबत इथे राहणार आहे. खरंतर माझ्या मित्राची ती मावसबहीण आहे आणि मेडिकल स्टुडंट आहे. तिला काही दिवसांसाठी इथे जागा हवी होती म्हणून माझ्या मित्राने तिला माझ्याकडे राहण्यास सांगितले आहे. मी देखील त्याच्या म्हणण्याला होकार दिला; कारण इथे तुला आणि ओवीला तिच्या मदतीची गरज असेल म्हणून काही दिवस इथे ती राहू दे. तसेही तिची नाईट शिफ्ट असल्याने ती दिवसभर येथे तुमच्यासोबत असेल आणि संध्याकाळी तिच्या ड्युटीला जाईल ते पुन्हा सकाळी याचवेळी येत राहील." असे म्हणून अनिकेतने तिचे टाईमटेबल दोघींना सांगितले. असे अनिकेतने सांगताच ओवी मात्र त्याच्याकडे संशयाने पाहत होती.

'ही कोण मुलगी आहे? दिसायला तर छानच आहे; शिवाय नोकरी करते. डॉक्टर आहे म्हणे! नक्की याच्या मित्राची बहिण आहे की याची मैत्रीण आहे? हा तिच्या प्रेमात तर नसेल ना? याला ही आवडत असेल का?' अशा असंख्य शंकांनी तिच्या मनात काहूर माजले होते, पण तिने पुसटही तिच्या चेहऱ्यावर दाखवले नाही.

अनिकेतने गौरीला हळूच खुणावले तसे गौरी देखील ओवीचे निरीक्षण करत होती. आता गौरी दिवसभर घरामध्ये राहून ओवीवर नजर ठेवणार होती आणि संध्याकाळी अनिकेत आल्यानंतर ती तिच्या घरी जाणार होती. हा त्यांच्या केसचाच एक भाग होता. अनिकेत याबद्दल त्यांच्या सरांशी बोलला होता. आता अनिकेत मात्र त्याच्या पुढच्या तपासासाठी निघणार होता. त्यापूर्वी गौरीला त्याने मेसेज करून सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.

ओवीने गौरीसाठी देखील चहा बनवला आणि ते सगळे चहा पीत बसले. अनिकेतची आई गौरीला तिच्या घरच्यांबद्दल आणि तिच्याबद्दल काही गोष्टी विचारून घेत होती. अर्थातच घेणार ना! एका सीआयडी ऑफिसरची ती आई होती आणि आपल्यासोबत जी मुलगी राहणार आहे तिच्याबद्दल काही गोष्टी या माहीत असायलाच हव्यात असे तिला वाटले होते. त्यानुसार ती विचारत होती आणि गौरीदेखील दिल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होती; त्यामुळे तिच्या मनाचे समाधान होत होते. आता अनिकेत मात्र रोहनच्या तपासासाठी घरातून बाहेर निघणार होता. आज काहीही करून रोहनला शोधून काढायचे आणि याचा छडा लावायचा असे त्याने ठरवले होते.
क्रमशः

© प्रियांका अभिनंदन पाटील.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.