सोनचाफा 13
अनिकेतने गौरीवर तिची कामगिरी सोपवली आणि तो पुढच्या तपासासाठी घरातून बाहेर पडला. घरातून बाहेर पडताना त्याने सारंगला फोन केला आणि ते दोघेही रोहनच्या घराजवळ गेले. त्या दोघांनीही त्यांचा वेश बदलला होता. एका भुरट्या मुलाप्रमाणे त्यांनी अवतार केला होता. एकदम टपोरी मुलासारखे ते दोघेही तिथून फिरत होते. कुणालाही संशय येऊ नये म्हणून ते दोघे एकमेकांशी बोलत, हसत तिथे अगदी रोहनच्या घरासमोर जाऊन उभा राहिले होते. आता तिथे कुणाकडे चौकशी करावी असा प्रश्न त्या दोघांना पडला होता. तिथे टपोरी मुले तसेच पुरुषदेखील घोळका करून उभे होते. प्रत्येकजण आपापल्या बोलण्यात गुंग होते.
अनिकेतने गौरीवर तिची कामगिरी सोपवली आणि तो पुढच्या तपासासाठी घरातून बाहेर पडला. घरातून बाहेर पडताना त्याने सारंगला फोन केला आणि ते दोघेही रोहनच्या घराजवळ गेले. त्या दोघांनीही त्यांचा वेश बदलला होता. एका भुरट्या मुलाप्रमाणे त्यांनी अवतार केला होता. एकदम टपोरी मुलासारखे ते दोघेही तिथून फिरत होते. कुणालाही संशय येऊ नये म्हणून ते दोघे एकमेकांशी बोलत, हसत तिथे अगदी रोहनच्या घरासमोर जाऊन उभा राहिले होते. आता तिथे कुणाकडे चौकशी करावी असा प्रश्न त्या दोघांना पडला होता. तिथे टपोरी मुले तसेच पुरुषदेखील घोळका करून उभे होते. प्रत्येकजण आपापल्या बोलण्यात गुंग होते.
"अरे अम्या, तुला एक माहित आहे काय? मला एका लई मोठं काम मिळालं आहे. लई म्हणजे काय बोलायलाच नको. तिथं भरपूर पैसे मिळणार आहेत." अनिकेत नाटकी सुरात म्हणाला. म्हणजेच त्यांनी त्यांची ओळख लपवली होती.
"काय सांगतोस? मला पण घे ना त्याच्यात. मी बी येतो तुझ्यासोबत तिथं कामाला. जरा शब्द टाकून बघ ना." सारंग म्हणाला.
"बरं ठीक आहे. पण ते काम लई जोखमीच आहे. एकदा का पोलिसाच्या हाती लागलं की आपला आयुष्य संपलच म्हणून समजायचं." अनिकेत म्हणाला.
"अरं म्हणजे काय गैर कारभार हाय का? जोखमीच काम म्हणजे?" सारंग म्हणाला.
"अरे, तसं बी लय जोखमीचं काम नाही. फक्त पोरीस्नी आपल्या प्रेमात पडायचं." अनिकेत म्हणाला.
"बस! एवढंच होय. तसा मी लय छान दिसतोच तर कोणी बी माझ्या प्रेमात पडलं." असे सारंग म्हणत लाजला.
"अरे, प्रेमात पडायचं म्हणजे खरोखर नाही तर खोटं खोटं." अनिकेत पुन्हा म्हणाला.
"खोटं खोटं प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं? मला वाटलं खरं खरं प्रेमात पडून त्यांच्यासोबत लग्न करायचं. तसं बी त्या लग्नाबिग्नाच्या भानगडीत मी नाही पडणार." सारंग म्हणाला.
"अरे, तुला कोण पाडतंय. फक्त नाटक करायचं." अनिकेत म्हणाला.
"नाटकं! आणि नाटकं करून काय करायचं? त्यात कसं पैसे मिळणार? उलट आपल्याच पदरचं जाणार. त्या पोरींच्या डिमांड पूर्ण करेपर्यंत आपला खिसा रिकामा होणार, त्यापेक्षा प्रेमाच्या कटकटीत न पडलेलं बरं." सारंगने उत्तर दिले.
"अरे, फक्त नाटक करायचं. एकदा का मुलगी पटली आणि ती पूर्ण आपल्या प्रेमात आहे असं समजलं तर पुढचं काम करायला आपला रोहन दादा आहे की." अनिकेत थोडासा जोरातच म्हणाला.
"रोहन दादा! हा रोहनदादा कोण आहे? मी तर हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय." सारंगही जवळजवळ ओरडतच म्हणाला.
"अरे, हळू बोल. आता तो इथे राहत नाही. अरे, इथल्या लोकांना समजलं तर काय करतील काय माहित नाही. तू गप बस." अनिकेत म्हणाला.
अशाप्रकारे त्या दोघांची चर्चा सुरू असतानाच पलीकडे असलेल्या मुलांच्या घोळक्यातून एकटा या दोघांकडे संशयित नजरेने पाहू लागला. ते पाहून या दोघांना नक्कीच त्या मुलाचे रोहनशी काहीतरी नाते असणार असा संशय आला आणि पुन्हा ते दोघे मोठे मोठे बोलू लागले.
"अरे हो, आपला रोहन दादा. त्यानेच तर मला सारे काही सांगितले आहे आणि तोच पुढचे सगळे प्लॅनिंग करतो. त्याला पुढच्या सगळ्या गोष्टी माहित आहेत. तू या कामात येणार आहेस की नाही इतकंच मला सांग. म्हणजे मी तुला त्याची भेट घडवून देतो." अनिकेत म्हणाला.
"हो हो. का नाही. मी तर आत्ता यायला तयार आहे. तसेही मला पैशाची खूप गरज आहे. माझ्या बाबांचे ऑपरेशन आहे आणि त्यासाठी मला पैसे हवे आहेत म्हणून मी काहीही करायला तयार आहे." सारंग म्हणाला.
"चल मग, मी तुला त्याच्याकडे घेऊन जातो." असे म्हणून ते दोघेही त्या घोळक्यातून पाहणाऱ्या मुलाकडे पाहत पाहतच पुढे जाऊ लागले. त्या घोळक्यातून तो मुलगा देखील बाहेर पडला आणि अनिकेत आणि सारंग दोघे कुठे चालले होते त्यांच्या पाठीमागून तो जाऊ लागला. तो मुलगा पाठीमागून येतोय हे त्या दोघांनी जाणले होते आणि ते तसेच पुढे जाऊ लागले. ते दोघे भराभर पावले उचलत जात होते आणि तो मुलगा देखील त्यांच्या पाठीमागून भराभर पावले उचलत त्यांना कळणार नाही असे जात होता. एका ठिकाणी त्या मुलाने त्या दोघांना जाऊन गाठले.
"कोण आहात तुम्ही? आणि रोहनबद्दल तुम्हाला कसे काय माहित आहे?" असे त्या मुलाने विचारले.
"अरे, रोहन दादाला कोण ओळखत नाही. सगळेजण ओळखतात. तसेच मी देखील ओळखतो; पण तुला कसे माहित? तू कसं ओळखतोस त्याला?" अनिकेत म्हणाला.
"माझं सोड; तू सांग. रोहन दादाने तुला कुठलं काम सांगितलं? आणि तुम्ही कधी भेटलात एका आठवड्यापूर्वी की काल-परवा?" तो मुलगा असे म्हणताना अनिकेतला मात्र त्याचा संशय येऊ लागला; कारण त्याने प्रश्न असा विचारला होता, एक आठवड्यापूर्वी की काल-परवा. याचा अर्थ असा की, अनघाचा मृत्यू होण्यापूर्वी की मृत्यू झाल्यानंतर असे त्याला विचारायचे होते. म्हणजेच याबाबत तो मुलगा जाणून होता हे अनिकेतला समजले. आता त्याच्याकडून कसे वदवून घ्यायचे हे त्या दोघांनाही माहीत होते.
"मला एक गोष्ट सांग, रोहनबद्दल तुला कसं काय माहित? तो आता इथे नाही तर कुठे आहे?" अनिकेतने प्रतिप्रश्न केला.
"तुम्हीच आता म्हणालात ना, की तुम्ही त्याला भेटला आहात. मग मला सांगा की, दोन दिवसात भेटला की आधी कधी भेटला आहात?" तो मुलगा पुन्हा म्हणाला.
"कालच भेटलोय मी त्याला आणि त्याने कालच मला हे सगळे समजावून सांगितले आहे; पण का तुला काही माहित आहे का?" अनिकेतने संशयित नजरेने त्याच्याकडे पाहत त्याला प्रश्न केला.
"हे कसं शक्य आहे? त्याने तर आता हे काम करणं सोडलं आहे आणि तो तर आता सावरगांवात त्याच्या गावी गेलाय. तिथे तो शेती करून त्याचे गुजरान करणार म्हणत होता; मग तुम्हाला तरी हे काम कसे सांगितले?" तो मुलगा म्हणाला.
"त्याने असा निर्णय कसा काय घेतला? त्याच्या आयुष्यात काही घडले का? की कोणाचा खून केलाय?" अनिकेत असे म्हणताच त्या मुलाला दरदरून घाम फुटला.
"खून! तुम्हाला हे सगळं कसं माहित?" तो मुलगा संशयाने थोडेसे घाबरतच त्यांना विचारू लागला.
"मी आपलं सहजच म्हणालो. म्हणजे खरंच काही खून वगैरे झालाय का?" पुन्हा अनिकेत काहीच माहित नसल्याचे नाटकं करत त्याला म्हणाला. तेव्हा त्या मुलाने पुन्हा सुटकेचा निःश्वास सोडला.
"नाही नाही. तसे काही नाही. ठीक आहे मी चलतो." असे म्हणून त्या मुलाने घाबरतच तिथून पळ काढला.
"अरे अनिकेत, तू त्याला ताब्यात घ्यायला हवा होतास ना? असं सोडलंस का? खुनाबद्दल काहीतरी चौकशी करायची होतास, म्हणजे आपल्याला पुरावा मिळाला असता ना? तू त्याला असे का सोडून दिलेस?" सारंग म्हणाला.
"हे बघ सारंग, आपण त्याला खूप आढेवेढे घेत बसलो असतो तर त्याने परस्पर रोहनला फोन करून सार्या गोष्टी सांगितल्या असत्या. आता त्यानेच तर आपल्याला सांगितले आहे ना, की रोहन हा सावरगांव येथे त्याच्या गावी गेला आहे. याचा अर्थ तो नक्कीच तिथे असणार. आपण तिथे जाऊन त्याला डायरेक्ट पकडू शकतो. तो तिथे आपल्याला सहजच मिळून जाईल. मग त्याच्याकडेच डायरेक्ट चौकशी करता येईल ना?" अनिकेत म्हणाला.
"हो. आपण तिथे जाणार तर आहोतच; शिवाय त्याला डायरेक्ट पकडूसुद्धा शकतो; पण हा रोहन दिसतो कसा? सावरगांवात अशी कितीतरी मुले असतील त्यातील रोहन म्हणून आपण कोणाला शोधणार आहोत?" सारंगने त्याची शंका व्यक्त केली.
"शोधलं की सापडतंच." असे म्हणून अनिकेत कुत्सित हसला.
रोहनला शोधण्यासाठी अनिकेतकडे काही टॅक्ट होते का? तो त्याला कसे शोधणार होता?
क्रमशः
© प्रियांका अभिनंदन पाटील.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा