Login

सोनचाफा 15

एका खूनाचा शोध. रहस्यकथा.
सोनचाफा 15
संध्याकाळी गौरी तिच्या घरी गेली. तिला बाहेरपर्यंत सोडून अनिकेत घरात आला. जेवण वगैरे आवरले होते; त्यामुळे तो टीव्हीसमोर बसला. समोर टीव्ही जरी सुरू असले तरी त्याच्या मनामध्ये विचारचक्र चालू होते. 'खरंच या खुणामध्ये ओवीचा हात नसेल ना? मला का तिचाच संशय येतोय? हा रोहन आता काय बोलतोय त्याच्यावर पुढील अवलंबून आहे. उद्या काय ते समजेल; पण आता तरी ओवीशी काही बोलायला नको. तसेही डॉक्टरांनी तिच्या मनावर दडपण येईल असे काही बोलू नका असे सांगितले आहेत; त्यामुळे उद्या रोहनला भेटल्यावरच पुढे काय करायचे ते ठरवू.' असा विचार करत अनिकेत बसला होता.

"अनिकेत कोणत्या विचारात बसला आहेस? समोर तर टीव्ही सुरू आहे, इकडे मी बोलतेय तिथेही तुझे लक्ष नाही असा कोणता विचार तुझ्या मनामध्ये सुरू आहे." अनिकेतच्या आईच्या बोलल्यामुळे अनिकेत भानावर आला.

"काही म्हणालीस का आई? सॉरी, ते माझे लक्ष नव्हते. एका केस संदर्भात मी विचार करत होतो." अनिकेत म्हणाला.

"तू तुझ्या ऑफिसमधल्या गोष्टी तिथेच सोडून यायच्यात असे मी सांगितले होते ना? घरामध्ये येताना तू माझा मुलगा आणि ओवीचा नवरा म्हणूनच घरात यायचे, बाकी कोणतेही टेन्शन घेऊन घरात यायचे नाही असे मी तुला पहिल्याच दिवशी बजावले होते आणि तू मात्र आता केसचा विचार करत बसला आहेस! अरे, ती पोरगी खोलीत तुझी वाट पाहतेय. बिचारी कालच आली आहे. तू तिच्यासोबत बोलला देखील नाहीस. मगाशी त्या गौरीसोबत किती खळखळून बोलत होतास आणि ओवीसोबत मी तसे तुला बोललेले पाहिलेच नाही. काही अडचण आहे का?" अनिकेतची आई म्हणाली.

"अगं आई, कुठे काय? तिची तब्येत बरी नाही म्हणूनच मी तिला थोडा आराम करायला वेळ देतोय. ती व्यवस्थित होती तेव्हा बोलत तर होतो." अनिकेत म्हणाला.

"पण आज गौरीसोबत थोडा जास्तच बोलत होतास असे वाटले नाही का तुला? बिचारी ओवी तशीच शांत बसून होती. हे बघ अनिकेत, ओवी तुला पसंत होती म्हणून तिच्यासोबत तुझे लग्न लावून दिले आहे. काही अडचण असेल तर ते मला तू सांग; पण असे मला टेन्शन येईल असे काही वागू नकोस." अनिकेतची आई म्हणाली.

"अगं आई, तू तर ना एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन घेऊन बसतेस. आता बघ ओवी कालच तर आली आहे; शिवाय तिची तब्येत बरी नाही म्हणून तिला थोडा वेळ देतोय इतकेच." अनिकेत म्हणाला.

"तब्येत बरी नाही म्हणजे? अरे, मग तिला दवाखान्यात तर घेऊन जायचं. औषधं घेतली तर ती ठीक होईल ना आणि ती देखील मला काही बोलली नाही." अनिकेतची आई घाबरी होत म्हणाली.

"अगं आई, तब्येत बरी नाही म्हणजे मेजर काही नाही. ते लग्नाच्या दगदगीत थोडसं कणकण आहे असे म्हणाली होती; पण आता व्यवस्थित असेल. मी जाऊन बोलतो तिच्याशी. तू मात्र काही टेन्शन घेऊ नकोस." असे म्हणून अनिकेतने टीव्ही बंद केला आणि तो रूममध्ये गेला.

रूममध्ये गेल्यावर पाहतो तर ओवी तोंड फिरवून बेडवर बसली होती. अनिकेतला काही समजेना. ही अशी का बसली आहे? हिला माझा संशय आलाय का? की गौरी येथे आल्यावर काही घडले? अरे बापरे! याचा अर्थ मला हिची समजूत काढावे लागणार की नक्की तिच्या मनात काय सुरू आहे हे समजून घेण्यासाठी मला तिच्याशी बोलावे लागणार; पण मी बोललो तरी ही माझ्यासोबत बोलेल का काय माहित? असा विचार करतच अनिकेत ओवीजवळ गेला; पण तो तिच्या शेजारी न बसता बेडच्या दुसऱ्या टोकाला जाऊन बसला कारण ओवीने पहिल्याच दिवशी तसा नियम घातला होता. कोणत्याही प्रकारे तिला स्पर्श करायचे नाही, चुकूनही तिच्या शेजारी बसायचे नाही, अशा बऱ्याच अटी तिच्या होत्या. त्यामुळेच तो बेडच्या दुसऱ्या टोकाला जाऊन बसला.

"बापरे, माझं डोकं खूप दुखतंय. बाम कुठे आहे?" अनिकेतने काहीतरी निमित्त करून ओवीशी बोलण्यास सुरुवात केली.

"ती गौरी आहे ना; ती देईल तुम्हाला बाम. तिच्याकडेच तर असेल ना." ओवी चिडून म्हणाली.

"अरे बापरे! तर रागाचे कारण हे आहे. म्हणजे नक्कीच ओवीला माझ्याबद्दल काहीतरी वाटतेय; पण आता काय उपयोग? तिच्यावर खूनाचा आरोप आलाय आणि जर तिनेच हा खून केला असेल तर मग आमची मने अशावेळी जुळून तरी काय उपयोग? जर ओवीनेच खून केला असेल तर मात्र मी काहीच करू शकणार नाही. हे देवा, कसल्या मोठ्या संकटात मला टाकलेस असा विचार करत अनिकेत तिथेच बसला होता. इतक्यात ओवीने त्याच्यासमोर येऊन त्याच्या हातात रागाने बाम ठेवला. अनिकेतला मात्र तिचा राग पाहून हसू आले आणि त्यांने गुपचूप बाम घेतला आणि जाऊन झोपला. इकडे ओवीची मात्र तळमळ होत होती. तिला त्याच्याशी बोलायचे होते; पण तो मात्र झोपण्याचे सोंग घेत होता. तसाही दिवसभर नाटकं करून तसेच थोडी धावपळ करून अनिकेतला खूप कंटाळा आला होता. झोपेचे नाटक करता करता त्याला कधी झोप लागली हे त्याचे त्याला समजले नाही. सकाळी मात्र त्याला लवकर जाग आली आणि जेव्हा त्याने पाहिले तेव्हा ओवी अजूनही झोपलेली होती. तिला उशिरा झोप लागली असेल असे समजून अनिकेत मात्र त्याचे सगळे आवरू लागला. आज त्याला लवकरच जायचे होते. सावरगावला रोहनकडे तो जाणार होता. तसे त्याने ऑफिसमध्ये सांगितले देखील होते आणि सोबत सारंगलाही घेऊन जाणार होता; त्यामुळे त्याला घरातून लवकर निघावे लागणार होते. अनिकेतने त्याचे लवकर आवरले आणि तो बाहेर आला. त्याची आई उठून आवरून बसली होती. त्याने आईला लवकर जाणार असल्याचे सांगितले होते; त्यामुळे अनिकेतच्या आईने त्याच्यासाठी चहा आणि नाश्ता बनवला होता. नाश्ता करून अनिकेत लवकरच बाहेर पडला आणि त्याने घरातून बाहेर पडताना गौरीला तसे कळवले देखील होते; त्यामुळे गौरीदेखील तिचे लवकर आवरून अनिकेतच्या घरी यायला निघाली होती. सगळे काही प्लॅनप्रमाणे सुरू होते.

रात्री उशिरा झोपल्यामुळे ओवीला सकाळी थोडे उशिरा जाग आली. तिने उठून घड्याळात पाहिले तर नऊ वाजले होते. 'अरे बापरे! आज इतक्या उशिरापर्यंत कशी काय झोपले?' असा विचार करतच तिने तिचे आवरून घेतले आणि ती बाहेर आली. बाहेर येताना ती थोडीशी शरमली.

"अगं ओवी, तिथे नाष्टा आहे बघ आणि चहादेखील बनवून ठेवला आहे तो घे. आमच्या दोघींचा नाश्ता झाला आहे." अनिकेतची आई म्हणाली.

"सॉरी आई, आज उठायला थोडा उशीर झाला." ओवी घाबरतच म्हणाली.

"असू दे गं. एखाद्या दिवशी उशीर होणारच. आता नाश्ता करून घे." अनिकेतची आई म्हणाली.

"ठीक आहे." म्हणून ओवी स्वयंपाक घरात गेली. इकडे अनिकेत आणि सारंग दोघेही सावरगांवला जायला निघाले. त्यांनी स्वतःची गाडी घेतली होती. त्यांच्या शहरापासून ते गाव थोड्याच अंतरावर असल्यामुळे त्यांना जायला फारसा वेळ लागला नाही. त्या गावात गेल्यानंतर त्यांनी चौकशी केली तेव्हा त्या गावात एकूण पाच मुले रोहन नावाची होती असे समजले.

"जवळच्या शहरातून आता अलीकडे इथे राहायला आलेल्या रोहनविषयी माहित आहे का?" असे अनिकेतने त्या गावकऱ्याला विचारले.

"दोन दिवसांपूर्वी एक रोहन येथे आला आहे. तो लहानपणी इथेच राहायचा; पण त्याच्या आई-बाबांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तो त्याच्या मामा मामीकडे राहायला गेला होता. आता अलीकडेच शेती करण्यासाठी म्हणून पुन्हा तो या गावात आला आहे." तो गावकरी म्हणाला.

"तो आम्हाला कुठे मिळेल? आमचे त्याच रोहनकडे काम आहे. प्लीज, तुम्ही त्याचा पत्ता सांगाल का?" अनिकेत म्हणाला.

"इथून उजव्या अंगाला जाऊन वरतीकडे जावा. तिथे शेतामध्ये एक घर आहे. तेच रोहनचं घर." असे म्हणून तो गावकरी तिथून निघून गेला. अनिकेत आणि सारंग दोघेही खूप आनंदात घाईघाईने तिकडे जायला निघाले.

खरंच रोहन भेटेल का? तो कुठे असेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः