Login

सोनचाफा 16

एका खूनाचा शोध. रहस्यकथा
सोनचाफा 16
अनिकेत आणि सारंग त्या माणसाने सांगितलेल्या दिशेने जाऊ लागले. ते आजूबाजूला कुठे रोहन दिसतोय का हे पाहत जात होते. अखेर त्या माणसाने सांगितलेल्या पत्त्यावर ते दोघे जाऊन पोहोचले. अनिकेतला तिथे शेतात एक छोटेसे सुंदर घर दिसले. घर कसले! साधी झोपडीच होती. ते दोघेही त्याच्याजवळ गेले. अनिकेत तिथले वातावरण पाहून भारावून गेला. तिथला परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर होता. त्या घरापासून पुढे शेती सुरू होती. शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेतले होते. वर निळाशार आकाश आणि खाली हिरवीगार शेती हे पाहून अनिकेतला खूप प्रसन्न वाटले. तो दोन क्षण तिथे पाहतच उभा राहिला.

तिथे अंगणात गेल्याबरोबर त्याला समोर बरीच सोनचाफ्याची झाडे दिसली. त्याच्यावर सोनचाफ्याच्या फुलांचा बहर आला होता. त्याला खूप सुंदर फुले लागली होती. ते पाहून त्याला काहीतरी आठवले. त्याच्या लक्षात आले की, ओवीच्या घरासमोर देखील अशीच सोनचाफ्याची झाडे होती. तिला देखील सोनचाफा खूप आवडायचा. सोनचाफ्याची फुले पाहून ती आनंदून जायची. त्याचा सुवास तिला प्रफुल्लित करायचा. तिच्याकडे सोनचाफ्याचा परफ्युम, सोनचाफ्याचे पर्सला लावण्याचे किचन देखील होते. अनिकेतला त्या दोघांचे अफेअर असल्याचे आठवले; म्हणजेच या दोघांची आवड निवड सुद्धा एकच असावी म्हणूनच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असावेत; पण रोहनबद्दल तर वेगळेच ऐकायला मिळाले आहे. ते नक्की खरे असेल का? जर खरे नसेल तर ओवीचे लग्न याच्याशी लावून दिले असते तर काय बिघडले असते. दोघेही आनंदात राहिले असते ना? शेवटी मने जुळणे खूप महत्त्वाचे असते जर मन जुळले तरचं संसार व्यवस्थित होतो नाहीतर त्या समांतर रेषाच राहतात. असेच रोहन आणि ओवीचे प्रेम असेल ना! ते दोघे मनाने एक झाले असतील; पण या घरच्या कारणामुळे ते विलग झाले असतील तर ओवी माझ्यात कशी गुंतली असती? तिने पहिल्याच दिवशी ही गोष्ट मला सांगितली ते बरे केले; पण थोडेसे धाडस दाखवून लग्नाच्या अगोदर जर ही गोष्ट सांगितली असती तर आम्ही दोघेही सुखात असतो. जाऊ दे. ही वेळ विचार करण्याची नाही पुढे काय होते ते पाहूया. रोहनला शोधायला हवे असा विचार करून ते दोघेही रोहनला शोधू लागले; पण रोहन तिथे कुठेच नव्हता. त्या घराला छोटेसे कुलूप होते.

"अनिकेत, हा परिसर इतका स्वच्छ आहे आणि सुंदर आहे तर रोहन इथे नक्कीच अधून मधून येत असणार. त्याशिवाय इतका परिसर स्वच्छ राहत नाही." सारंग म्हणाला.

"हो मलाही तेच वाटतंय. कदाचित तो मुलींना घेऊन इथे येत असेल तर? लग्नाचे अमिष दाखवून तो त्यांना इथे थोडे दिवस ठेवत असेल तर? हे गाव, ही वस्ती शहरापासून जवळच असली तरी आडवळणी आहे; त्यामुळे इथे फारसे कोणी येत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन तो हे गैरकारभार करत असेल तर?" अशी अनिकेतने त्याच्या मनातील शंका बोलून दाखवली.

आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे रोहनच देईलच. आपण त्याला शोधूया असे म्हणून ते दोघे रोहनला आजूबाजूला शोधू लागले; पण रोहन कुठेच दिसला नाही. बराच वेळ ते दोघेही त्याची वाट पाहत बसले; पण तो काही आला नाही. तिथूनच एक व्यक्ती जाताना त्या दोघांना दिसली. त्यांनी त्या व्यक्तीला हाक मारली. तशी ती व्यक्ती या दोघांजवळ आली.

"दादा, या घरात कोणी राहत नाही का? आम्हाला तर असे समजले की, इथे रोहन राहतो; पण आता तो इथे दिसत नाही. कुठे बाहेर गेला आहे का?" अनिकेतने त्या व्यक्तीला रोहनबद्दल विचारले.

"घराला कुलूप दिसतेय म्हणजे तो कुठेतरी बाहेर गेला असेल; पण दुपारी एक वाजता तो जेवण्यासाठी इथे येतो. त्याचे ते टायमिंगच आहे; त्यामुळे एक वाजेपर्यंत तुम्ही थांबा म्हणजे त्याची तुमची भेट होईल." ती व्यक्ती म्हणाली.

"दादा, मला सांगा तुम्ही इथे रोहनला कधीपासून पाहत आहात. म्हणजे तो इथे राहत नव्हता ना? शहरात राहत होता; मग इथे कसा आला?" अनिकेतने त्या व्यक्तीला प्रतिप्रश्न केला.

"तो अधून मधून इथे यायचा. खूप वर्षापासून यायचा. त्याच्या आई-वडिलांचं हे घर आहे. तो मामा मामीकडे राहायचा; पण जसं त्याला समजू लागले तसं तो इथे यायचा. इथे सगळी साफसफाई करून एक दोन दिवस राहून मग जायचा." ती व्यक्ती रोहनबद्दल माहिती सांगत होती.

"तुम्हाला त्याच्याविषयी कोणता संशय वगैरे आला आहे का? कधी म्हणजे संशयास्पद काही जाणवले आहे का? तसे असेल तर प्लीज सांगा." अनिकेत पुन्हा म्हणाला.

"पोरगं तसं चांगलं आहे. कधी पण इकडून चाललो की बोलतोय. मी नेहमी जातो तेव्हा तो इथेच असतो; त्यामुळे आमचे बराच वेळं बोलणं होतं होते. नेहमीचाच हा रस्ता असल्यामुळे तो कधी येतो, कधी जातो या सगळ्या गोष्टी मला समजायच्या. तसे संशय घेण्यासारखे काही नव्हते; पण एक दोनदा तो एका मुलीला घेऊन इथे आला होता. ती मुलगी दिसायला छान होती. मी त्याला त्या मुलीबद्दल विचारले तर तो काहीच बोलला नाही. मी मुद्दामून दोन-तीनदा विचारले, तर तो बोलणे टाळला आणि तेव्हापासून त्याचे थोडे थोडे बोलणे कमी होत गेले. आता त्याचे काय चालले आहे हेच समजत नाही. कधी येतो कधी जातो ते कळतंच नाही. हा, पण आता शेती मात्र जोमाने करत आहे. तो एक वाजता जेवायला यायचा, तसेच अजूनही येतो. बाकी त्याचे टाइमिंग बदलले आहे." ती व्यक्ती म्हणाली.

"मुलगी यायची! ती मुलगी दिसायला साधारण कशी होती?" अनिकेतने पुन्हा आश्चर्याने त्याला विचारले. अर्थातच असा प्रश्न त्या दोघांनाही पडला होताच.

"मुलगी दिसायला सुंदर होती. गोरीपान होती. तिने खांद्यापर्यंत मोकळे सोडलेले केस, एकदा पॅन्ट शर्ट घालून आली होती आणि एकदा चुडीदार घालून आली होती; पण फार वेळ ती इथे थांबली नाही. लगेच ते दोघेजण इथून निघाले. ती इथले चाफ्याची फुले गोळा करून घेत होती तेव्हा मी तिला पाहिले होते. ती खूप आनंदात होती; शिवाय ती चांगल्या घरातली वाटत होती." ती व्यक्ती म्हणाली.

"ही मुलगी ओवी तर नसेल!' असे म्हणून अनिकेतने लगेचच खिशातील मोबाईल काढला आणि त्या व्यक्तीला दाखवला. "ती मुलगी हीच होती का?"

"हो हो. ती मुलगी हीच होती. मी तिला अगदी निरखून पाहिलोय. ती मुलगी हीच होती." असे ती व्यक्ती सांगत होती. तेव्हा अनिकेतला खूप वाईट वाटले. त्या दोघांचे इतके प्रेम होते आणि मी त्यांच्यामध्ये आलो असे त्याला वाटत होते.

"ठीक आहे. तुम्ही आता येऊ शकता. आम्ही रोहन येईपर्यंत इथे त्याची वाट पाहतो." असे अनिकेतने त्या व्यक्तीला सांगितले तेव्हा तो निघून गेला. अनिकेत आणि सारंग दोघेही तिथे पुढे असलेल्या कट्ट्यावर बसले. आता कुठे बारा वाजले होते. अजून एक तास रोहन यायला बाकी होता. तोपर्यंत काय करावे असा प्रश्न त्या दोघांसमोर उभा होता. ते दोघेही बराच वेळ तिथे बसून होते. तसे ते बसणाऱ्यातले नव्हतेच मुळी. ते आजूबाजूला बारकाईने नजर फिरवत होते. कुठे काही सापडते का याकडे त्यांचे लक्ष होते; पण त्यांना हवे तसे काहीच सापडले नाही. शेवटी रोहन येण्याची वाट पाहण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच पर्याय नव्हता.

अखेर एक वाजायला थोडाच अवधी बाकी होता, तेव्हा मात्र ते दोघे सावध होऊन राहिले.

"सारंग मला काय वाटतंय की आपण इथे लपून बसूयात का? म्हणजे आपण जर इथे समोर बसलो तर रोहनला आपला संशय यायचा आणि तो आल्या पावली पळून जायचा. त्यापेक्षा आपण लपून बसूया." असे अनिकेतने सांगितल्यावर दोघेही एका आडोशाला जाऊन उभा राहिले.

बराच वेळ झाला तरी रोहन काही आला नाही. एक वाजून गेला तरीही त्याचा काहीच पत्ता नव्हता. आता तो येईल की नाही असा त्या दोघांना संशय येत होता, की इथे ते दोघे येऊन उभा राहिले आहेत हे त्याला समजले असेल असाही संशय त्यांच्या मनात आला होता. सव्वा एक वाजून गेला तरीही रोहन आला नाही म्हणून ते दोघेही जायच्या स्थितीत होते, इतक्यात त्यांना कोणीतरी आल्याचे जाणवले म्हणून पुन्हा ते दोघे लपून बसले.

ती आलेली व्यक्ती रोहनच असेल का? पुढे काय होईल हे असल्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all