Login

सोनचाफा 18

एका खूनाचा शोध. रहस्यकथा.
सोनचाफा 18
रोहन ओवीबद्दल सारे काही सांगत होता. त्यांची प्रेम कहानी तो सांगत होता. अनिकेत त्यातील एक एक शब्द टिपून घेत होता. त्यांच्या बोलण्यात कुठेतरी क्लू सापडतोय का हे शोधत होता. रोहनचे बोलणे तो लक्षपूर्वक ऐकत होता.

अनिकेतने "पुढे बोल." असे सांगितल्यावर रोहन पुढे सांगू लागला. "एके दिवशी सोहम आणि मी कॉलेजच्या गेटपाशी बोलत उभा राहिलो होतो. आमचे तसे नेहमीचेच बोलणे सुरू होते. ओवी येण्याची मी वाट पाहत होतो; पण ती काही लवकर आली नव्हती. बऱ्याच वेळाने ओवी आली. अजून बेल व्हायला उशीर होता म्हणून ती सोहमजवळ आली आणि सोहमकडे कसले नोट्स आहेत का विचारात होती. तेव्हा मी एकटा तिच्याकडे पाहत होतो. त्या दिवशी ती खूप सुंदर दिसत होती. तिचा वाढदिवस असावा असे मला वाटले. तिने हलकासा मेकअप केला होता, कानामध्ये छान झुमके घातले होते, गुलाबी रंगाचा चुडीदार घातला होता, त्याची ओढणी खूप मोठी होती त्यामध्ये ती आणखीनच सुंदर दिसत होती. केसांना एक छोटीशी क्लचर लावली होती आणि एका हातात घड्याळ आणि एका हातात ब्रेसलेट होते. हिल्स घालून ती आमच्या समोर येऊन उभा राहिली आणि मी तिच्या आणखीनच प्रेमात पडलो. त्यावेळी तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. ती बिना मेकअपचीसुद्धा खूप सुंदर दिसायची. मला ती आवडत असल्याने कदाचित तिच्या मेकअप आणि बिना मेकअपचा माझ्यावर फरक पडला नव्हता. ती सोहमकडे नोट्स मागत होती आणि मी एकटक तिच्याकडे पाहत होतो. बहुतेक तिला ते जाणवले असावे. तिने फक्त एकदा तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहिले होते. कदाचित तिला माझ्याशी बोलायचे असेल असे मला वाटले. इतक्यात सोहमने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मग माझा अंदाज खरा ठरला. आज ओवीचा वाढदिवस होता म्हणून मी देखील तिला विश करण्यासाठी हात पुढे केलो. मला वाटले ती मला ओरडेल किंवा मला भाव देणार नाही; पण मी हात पुढे केल्यानंतर लगेच दुसर्‍याच क्षणाला हसून तिने हातात हात मिळवले आणि लगेच थँक्यू म्हणाली. तशी ती मनाने देखील खूप चांगली आहे हे मला त्यावेळी समजले. कुणाशीही लगेच मिळून मिसळून राहणारी ओवी मला त्यावेळी आणखीनच आवडू लागली. आतापर्यंत तिला मी दुरूनच पाहत होतो; पण त्यावेळी जेव्हा तिने माझ्या हातात हात दिला तेव्हा तिचा तो स्पर्श झालेला हात घेऊन मी दिवसभर त्याकडेच पाहत बसलो होतो. तो आनंद काही निराळाच होता. त्या दिवसापासून तिची आणि माझी ओळख झाली. हळूहळू आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. ती खूप गोड स्वभावाची होती, शिवाय बोलकी होती; त्यामुळे आमची मैत्री व्हायला फारसा वेळ लागला नाही. रोज भेटणे, रोज बोलणे होऊ लागल्याने त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. मी ओवीसाठी वेळ देत होतो आणि ती देखील माझ्यासाठी वेळ देत होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या खूप प्रेमात होतो; पण ऑफिशियली एकमेकांना सांगणे फक्त बाकी होते. एके दिवशी तिला मनातील प्रेम बोलून दाखवायचे असे मी ठरवले होते; त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी कॉफी शॉपमध्ये घेऊन जायचा प्लॅन मी करत होतो. तिला मी कॉफी शॉपमध्ये येण्याबद्दल सांगितले, तर तिने नक्की येऊ असे सांगितले आणि मग आमचे कॉफी शॉपमध्ये भेटण्याचे ठरले. ओवी तशी शांत, समंजस आणि सालस स्वभावाची होती. ती खूप बडबड करायची. तिचे बोलणे सुरू झाले की ती स्टॉप घेतच नव्हती. मी फक्त तिचे बोलणे ऐकत बसायचो. तिचे बोलणे ऐकायला मला खूप खूप आवडायचे." रोहन ओवीविषयी भरभरून बोलत होता.

'इतकीच बोलण्याची आवड आहे, तर माझ्याशी आत्तापर्यंत एक शब्दही ती बोलली नाही. कशी बोलणार? तिला मी कुठे आवडत होतो? ती फक्त आवडणाऱ्या लोकांशीच बोलत असेल.' असे अनिकेत मनातच म्हणाला.

"त्यादिवशी कॉफी शॉपमध्ये मी सर्वांसमोर तिला प्रपोज केलो आणि तिने देखील लगेच होकार दिला. मला खरंच खूप आनंद झाला. सगळ्या गोष्टी पटकन घडत होत्या. त्या दिवसापासून मी माझ्या या गावामधील घरामध्ये सुधारणा करण्याचे ठरवले. मी जोमाने शेती करू लागलो. अधून मधून गावाकडे येऊ लागलो. इथले सगळे पाहू लागलो; कारण आमच्या लग्नानंतर आम्हाला इथेच राहावे लागणार होते. मामा-मामींकडे किती दिवस राहायचे असे मला वाटत होते. ओवीला आवडतात म्हणून सोनचाफ्याची झाडे मी इथे घरासमोर लावली होती. त्याची बागच करायचा माझा विचार होता; पण त्यासाठी जागा भरपूर गेली तर शेती कशी करणार म्हणून मी घराच्या सभोवताली सोनचाफ्याची झाडे लावले आहेत. तुम्ही निरखूड पाहिले तर तुम्हाला पूर्ण घराभोवती झाडे दिसतील. हे मी फक्त आणि फक्त ओवीसाठी केले होते; पण देवाला आमची नाते मान्यच नव्हते. माझ्या नशिबात तिला द्यायचेच नव्हते. आमची साथ इथंपर्यंतच होती असे मला वाटते; पण तुम्ही सगळे ओवीबद्दल इतकी का चौकशी करत आहात?" रोहनला आता प्रश्न पडला होता.

"ते तुला कळेलच. तुझे आणि ओवीचे कधी भांडण झाले होते का? हे सांग." अनिकेत पुन्हा म्हणाला.

"तसे आमचे कधीच भांडण झाले नाही. आमच्या दोघांचा अडीच वर्षांचा सहवास होता; पण भांडण करण्यासारखे असे काहीच झाले नाही. हा एकदा म्हणायला मी तिच्या बाबांना नावे ठेवत होतो, तेव्हा तिला खूप राग आला आणि ती माझ्यासोबत जवळजवळ आठ दिवस बोलली नाही. आठ दिवसांनी जेव्हा मी तिला सॉरी म्हटलो आणि खूप सारे चॉकलेट दिले होते तेव्हा ती माझ्यासोबत बोलू लागली. खरं सांगू सर, तिला ना सोन्या नाण्याची, पैशाची काहीच अपेक्षा नाही. तिला मनभरून प्रेम करणारी माणसे खूप आवडायची आणि मी तिच्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त तिच्यावर प्रेम करत होतो." रोहन म्हणाला.

"तू इथे तुझ्या घरी कधी ओवीला घेऊन आला होतास का?" अनिकेतने पुन्हा प्रश्न केला.

"हो. दोन वेळा तिला घेऊन आलो होतो. पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तिला हा परिसर इथले वातावरण खूप आवडले होते, तेव्हा मी तिला जबरदस्तीने घेऊन आलो होतो. ती नाही म्हणत होती; पण तिला माझे जग दाखवायचे होते, माझे जीवन दाखवायचे होते. कारण लग्नानंतर आम्ही इथेच राहणार होतो; पण दुसऱ्यांदा येण्याचा हट्ट तिनेच केला होता. तिला निवांत ठिकाणी वेळ घालवायचा होता. खरंतर तिला हा परिसर खूप आवडला. माझे जग तिला खूप आवडले होते. तिला माझ्या जगात रमायला, आयुष्य घालवायला आवडणार होते. त्यासाठी ती तयार झाली होती. सारे काही आमच्या मनासारखे सुरू होते; पण अचानक तिच्या बाबांनी तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले आणि आमच्या प्रेमाची कहाणी अधुरी राहिली." रोहन भावुक होत म्हणाला.

"मग तुम्ही थोडे धाडस दाखवून पळून का गेला नाही?" अनिकेत रागातच म्हणाला.

"पळून जायचा प्लॅन आम्ही दोन-तीनदा केला होता; पण ओवी सुरुवातीला तयार झाली आणि नंतर तिने प्लॅन कॅन्सल केला. असे घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले शिवाय त्यांचा आशीर्वाद न घेता पळून जाऊन लग्न केले, तर ते कडेला लागत नाही. तसा संसार सुखी होत नाही असे तिचे म्हणणे होते; त्यामुळेच दोन-तीनदा आमचा प्लॅन फसला. जर त्यावेळी ओवीने थोडे धाडस केले असते तर या घरामध्ये आमचा छान संसार फुलला असता." रोहन थोडासा दुःखी होत म्हणाला.

"तिच्या घरच्यांना जाऊन समजावण्याचा तू प्रयत्न केला नाही का?" अनिकेत पुन्हा म्हणाला.

"करणार होतो; पण माझ्या मामा-मामी समोर माझे काही चालले नाही. जर आम्ही पळून गेलो असतो तर ते काय करू शकले नसते; पण ओवीच्या घरी जाऊन समजवायला माझे मामा मामी तयार नव्हते. त्यांनी मलाही घरातून बाहेर जाऊ दिलेच नाही. मला बाहेरून कोंडून घातले. त्यांच्यामुळेच आज ही वेळ आली." रोहन म्हणाला.

रोहनने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अनिकेतने ऐकून घेतल्या. या गोष्टीवरून तरी त्याला हा खून रोहनने केला असेल असे वाटले नाही आणि ओवीनेदेखील केले असेल असे वाटले नाही. 'आता याचा मोर्चा अनघाकडे वळवूया' असे तो मनातच म्हणाला आणि मोबाईलमधून अनघाचा फोटो दाखवत "हिला तुम्ही ओळखता का?" असे म्हणाला.

"हे काय विचारणं झालं का? तिच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला मी ओळखून होतो. कोण कसे आहे? हे सारे काही मला माहीत होते. हिनेच तर माझे आणि ओवीचे प्रेम प्रकरण त्यांच्या घरी सांगितले आणि त्यामुळे ओवीच्या घरच्यांनी ओवीच्या लग्नाचा विचार मनावर घेतला आणि तिचे लग्न लावून दिले. जर हिने घरात सांगितले नसते, तर ओवी तिच्या कलाने सर्वांना सांगणार होती. जर घरचे मान्य झाले नसते तर कदाचित पळून जाऊन लग्न केलो असतो." रोहन म्हणाला.

"पण त्यासाठी ओवी तयार नव्हती ना?" सारंग म्हणाला.

"तिचे माझ्यावर खूप मनापासून प्रेम होते. ती माझ्याशिवाय राहू शकत नव्हती; त्यामुळे कदाचित काही वेगळे घडले असते. पण ही आली ना मध्ये. वेडी कुठली. खूप वेडी होती." असे म्हणत रोहन मिश्किलपणे हसला.

रोहन ओवीला वेडी का म्हटला असेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all