Login

सोनचाफा 19

एका खूनाचा शोध. रहस्यकथा.
सोनचाफा 19
रोहनने ओवीबद्दल जे काही सांगितले ते अनिकेतने त्याच्याकडून सारे काही ऐकून घेतले. आता त्याला मात्र ओवीबद्दल सारे काही समजले होते; पण त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले नव्हते. रोहनच्या बोलण्यातून कोणताही क्यू त्याला मिळालेला नव्हता; त्यामुळे अनिकेत थोडासा हाताश झाला होता. त्याच्याकडून काही मिळेल असे त्याला वाटले नव्हते. इतक्यात अनघाबद्दल बोलत असतानाच रोहनने अनघाला वेडी असे म्हटले. तेव्हा अनिकेतच्या मनात खूप मोठा प्रश्न पडला. 'रोहनने अनघाला वेडी असे का म्हटले? नक्की त्या दोघांच्यात काही नाते होते का? रोहनला अनघाबद्दल कोणती माहिती होती का?' असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घेर घालत होते.

"तू अनघाला वेडी असे का म्हणालास? त्यामागे काही कारण आहे का? तुला तिच्याबद्दल काही माहित आहे का?" असे अनिकेतने विचारताच रोहन मात्र छद्मी हसला. तेव्हाच अनिकेतला त्याच्याकडून काहीतरी नक्की समजेल असे वाटले.

"वेडी म्हणायला नको तर काय म्हणू? ती देखील ओवीच्याच कॉलेजमध्ये होती, मात्र ओवीची ज्युनिअर होती. कधी कधी ती ओवीसोबत कॉलेजला यायची तेव्हा ओवी माझ्याशी बोलताना अनघा देखील तिथेच असायची. मी कधी तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही; कारण मला तिच्याबद्दल तसे काहीच वाटले नाही. मला तर लहानपणापासून ओवीत आवडायची. थोडे दिवस सुरळीत चालू होते; पण नंतर या अनघाला काय झाले काय माहित? ती माझ्याशी सलगी करू लागली. माझ्यासोबत जास्त बोलू लागली. आधी ओवीसोबत आली की बोलायची; मात्र आता ओवीच्या आधी ती यायची आणि माझ्यासोबत बराच वेळ बोलत उभारायची. मी मात्र ओवीसाठी तिच्याशी बोलायचो. तिच्याकडून ओवीची सोबत होते असा विचार करायचो. मात्र तिच्या मनात काही वेगळेच होते." रोहन म्हणाला.

"वेगळे होते म्हणजे?" अनिकेतने पुन्हा प्रश्न केला.

"म्हणजे, माझ्यासोबत रोज बोलता बोलता ती माझ्या प्रेमात पडली." रोहन सहज बोलला.

"काहीही काय बोलतोयस! माझा तुझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही. अनघा अशी मुलगी अजिबात नव्हती." अनिकेत आश्चर्यचकित होऊन म्हणाला.

"अहो साहेब, तुम्हाला जास्त माहिती की मला. मी तिच्यासोबत खूप वेळा बोललोय. तशी आमच्यात छान मैत्री होती. मी तिला बऱ्याच वेळा बाहेर देखील घेऊन गेलोय; पण मला वाटले की ती मैत्री या दृष्टीने माझ्याकडे पाहत असेल. पण ती वेडी माझ्या प्रेमात होती. तिने मला एकदा एका रेस्टॉरंटमध्ये प्रपोज केले होते. मी मात्र तेव्हा खूप आश्चर्यचकित झालो होतो. माझ्या स्वप्नातदेखील असे काही वाटले नव्हते; पण ते खरे होते. तेव्हाची क्लिप मी रेकॉर्ड करून ठेवायला हवी होती. तिने खूप मोठा बुके माझ्यासाठी आणला होता. मला वाटले की, मैत्रीच्या दृष्टीने तिने आणला असेल; पण नंतर तिने मला लग्नासाठी मागणी घातली. मी अनघाला स्पष्ट नकार दिला, कारण माझे ओवीवर प्रेम होते. अनघाकडे मी फक्त मैत्रीण या दृष्टीनेच पाहत होतो. मला अनघाविषयी तसे काहीच कधीच वाटले नाही तर मी तिला उगीचच टोलवत राहून माझ्या जाळ्यात अडकवण्यात काय अर्थ आहे? तशी ती स्वभावाने खूप चांगली होती; पण तिला बहुतेक माझ्याविषयी आकर्षण वाटले असेल. प्रेम हे काही असे असते का?" रोहन बोलत असतानाच अनिकेत आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होता. अर्थातच रोहनविषयी बऱ्याच गोष्टी त्याच्या कानावर आल्या होत्या. मुलींना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांना वेश्याव्यवसाय ढकलणे हे त्याचे मूळ काम होते असे त्याला समजले होते; पण इथे तर रोहनच्या बोलण्यात काही वेगळेच आले होते त्यामुळे हा रोहन नक्की आहे तरी कसा? असा प्रश्न अनिकेतच्या मनात घोळत होता.

"तू नकार दिल्यावर ती शांत बसली की, पुढे काय घडले. पुढे बोल लवकर." अनिकेतने त्याला पुन्हा बोलते केले.

"नाही. खरंतर तिला माझे आणि ओवीचे प्रेम प्रकरण माहित होते. तिला माहित होते की, मी ओवीच्या प्रेमात आहे; त्यामुळे जर ओवीचेच लग्न झाले तर मग तिचा रस्ता मोकळा होणार होता म्हणून तिने घरी सर्वांना आमच्या दोघांबद्दल सांगितले. तिने कशा पद्धतीने सांगितले काय माहित पण जेव्हा अनघाने त्यांच्या घरी सांगितले तेव्हा तिच्या घरचे ओवीला बाहेर पाठवले नाहीत. तिला कॉलेजला सोडवायला आणि आणायला येत होते त्यामुळे आमचे बोलणे पूर्णपणे कमी झाले आणि एक दिवस अचानक तिचे लग्न ठरले ही बातमी माझ्या कानावर आली. मला खूप मोठा शॉक बसला. खरंतर मी त्यांना समजवायला जाणार होतोच पण त्या आधीच तिचे लग्न ठरले होते. तरीही मी माझ्या एका मैत्रिणीला तिच्या घरी पाठवून पळून जाण्याचा बेत आखणार होतो पण तिने त्यासाठी नकार दिला.

"अनघाने घरी सांगितले म्हणून तू अनघावर चिडलास आणि पुढे अनघाच्या लग्नात तिचा सूड उगवायचा प्रयत्न केलास. अनघाचा बदला घेण्यासाठी तू अनघाला विष देऊन ठार मारलास. बरोबर आहे ना?" अनिकेत चढत्या आवाजात बोलला.

"अनघाचा खून! अजिबात नाही. मी कशाला तिचा खून करेन आणि अनघाचा खून झाला आहे हे तर मला आत्ताच समजले आहे. तेही तुमच्याकडून. अच्छा, म्हणजे तुम्ही अनघाच्या खूनाच्या चौकशीसाठी इथे आला आहात. एम आय राईट." रोहन एक भुवई वर करत म्हणाला.

"हो. अनघाच्या खूनाच्या चौकशीसाठी आम्ही इथे आलो आहोत आणि अनघाचा खून तूच केला आहेस असे आमचे ठाम मत आहे." अनिकेत ठामपणे म्हणाला.

"नाही हो. अनघाचा खून मी कसा करेन? शिवाय तिच्या लग्नाला मी त्या घरामध्ये कसा जाईन? मला तर सगळेजण ओळखत होते आणि मला त्या घरामध्ये कसे जाऊ देतील? तुम्ही काहीही बोलत आहात. हे शक्य नाही." रोहन म्हणाला.

"हो ना. विष देऊन खून करण्यासाठी तिथे जायला हवे असे काही नसते ना? तू कोणाकडून तरी हे काम करवून घेतले असशील." अनिकेत ओरडतच म्हणाला.

"नाही हो. मला तर वाटत आहे की अनघाने स्वतःच विष घेतले असेल, कारण ओवीचे लग्न झाल्यानंतरही ती मला एक दोनदा भेटली होती. ती म्हणत होती की, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, मला तू हवा आहेस असे ती माझ्या पाठ लागली होती; पण मी तिला स्पष्ट नकार दिला. कदाचित हाच धक्का ती सहन करू शकली नसेल आणि म्हणून तिने आत्महत्या करून घेतले असेल." रोहनने त्याचे मत मांडले.

"म्हणजे ओवीच्या लग्नानंतरही ती तुला भेटली होती. मी तिच्यावर कोणी संशय घेतला नाही का?" अनिकेत म्हणाला.

"नाही. कारण ती सर्वांना विश्वासात घेऊन पुन्हा कॉलेजला येऊ लागली होती त्यामुळे तिच्यावर कोणी संशय घेऊ शकले नाही; पण नंतर काय झाले काय माहित? पण तिच्या घरच्यांना याबद्दल समजले म्हणून तिच्या घरच्यांनी तिचे लवकर लग्न लावून देण्याचा विचार केला. ते एका अर्थी बरेच झाले म्हणा. नाहीतर तिने माझी पाठ सोडली नसती." रोहन म्हणाला.

"मग तिला ते लग्न मान्य नसेल का? म्हणून तिने आत्महत्या केली असेल का? पण ही आत्महत्या नसून खून आहे असे मला सारखे वाटत आहे. नक्की काय असेल? असा विचार करत अनिकेत तिथेच थांबला होता.

"सर, मी तुम्हाला सांगतो ते ऐका. तिने स्वतःच आत्महत्या केली असेल. तुम्ही आता जास्त त्याच्या मागे लागू नका. हा विचार सोडून द्या." असे म्हणून रोहन अनिकेतला समजावणीच्या सुरात सांगत होता.

"मग अनघाने तुमच्या नात्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला नाही का?" अनिकेत पुन्हा प्रश्न विचारू लागला.

"कसे करणार? ती पहिल्यांदा मला मनवत होती. जर मी तयार झालो तरच ती घरी सांगणार होती; पण या लग्नासाठी मीच तयार नव्हतो तर ती कशी प्रयत्न करणार. तिचा टिकाव लागला नाही म्हणून तिने आत्महत्या केली असणार." रोहन म्हणाला.

रोहन इतक्या ठामपणे म्हणत होता की, अनिकेतला त्याचा संशय येत होता.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all